Wednesday, July 2, 2025
Homeपर्यटनचला केरळला

चला केरळला

केरळची संस्कृती

नमस्कार ,
वाचक हो.
“चला केरळला” मध्ये मागच्या पहिल्या भागात आपण केरळचा इतिहास पाहिला. आज आपण दुसऱ्या भागात केरळच्या संस्कृती विषयी  थोडंफार जाणून घेणार आहोत.

निसर्गाने नटलेले राज्य म्हणून केरळ प्रसिद्ध आहेच पण त्याबरोबर इथली संस्कृतीही खास वैशिष्ट्यपूर्ण आहे.
नृत्य, कला, लोक कला, सण, उत्सव, संगीत, जेवण आणि जीवन शैली सर्व काही आगळं वेगळं छाप पाडणारं आहे. इथल्या संस्कृतीला लोक जतन करून आहेत.

मलयाळम नव वर्ष – हिंदूंचे नववर्ष दर वर्षी एप्रिल मध्ये १४ किंवा १५ तारखेला विशू साजरा करतात. विशूकन्नीला सर्व साहित्य गोळा करून विशूच्या अगोदरच्या संध्याकाळी एका मोठ्या भांड्यात (ज्याला उरली म्हणतात) तांदूळ, मोठी काकडी, फणस, केळी, सुपारी, पैसे, नारळ, अशा विविध वस्तू ठेवल्या जातात. बहाव्याची फुले विशू साठी महत्वाची असतात. त्याला कनीकोन्ना म्हणतात. दुसऱ्या दिवशी पहाटे शुचिर्भूत होऊन पूजेचे दर्शन घेतात, पूजेत ठेवलेल्या आरशात पाहतात, वडीलधारी मंडळी लहानग्याना आशीर्वादरुपी नवीन नोटा देतात, गरिबांनाही दान देतात. नवीन कपडे घालून फटाके उडवले जातात.

यांचा पारंपारिक पोशाख म्हणजे मोती रंगांचे नी सोनेरी काठ असलेले मुंडू ( लुंगी ), आणि स्त्रियांसाठीही अशाच प्रकारची साडी असते. प्रत्येक शुभ कार्यक्रमात, सण समारंभात पारंपारिक पोशाखाचा वापर केला जातो.

मलयाळम महिना चिंगम म्हणजे आपला श्रावण यावेळी ओनम हा सण येतो. बळी राजाची पूजा म्हणजे ओनम साजरा करणे. श्रीविष्णूनी बळीला पाताळात ढकलले होते पण एक वर ही दिला होता तो म्हणजे वर्षातून एकदा प्रजेला भेटायला जाणे. म्हणून ओनमच्या वेळी बळी येतो असे समजून त्याची पूजा करतात.

१० दिवस उत्साहात ओनम साजरा होतो. रोज दारात फुलांच्या रांगोळ्या सजतात, ओनमच्या दिवशी बळीची प्रतिकृती म्हणून मातीपासून मावेली बनवून अंगणात ठेवतात . नवीन कपडे खरेदी केली जातात. पारंपरिक कार्यक्रम पुलीकली, कथकलीचे आयोजन केले जाते. विशेष जेवण बनवले जाते त्याला ओनम सद्या म्हणतात. केळीच्या पानावर विविध भाज्या, खिरी, पापड, लोणची, ताक, केळ म्हणजे पर्वणीच.

ओनमचे खास आकर्षण म्हणजे वलमकली (पाण्यातला खेळ) म्हणजे नौकांची शर्यत. आलपूळा जिल्ह्यात पूनमड्डा येथे बॅक वॉटर मध्ये दर वर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी नौकांची शर्यत होते. सर्पनौका  (Snake boat ) साधारण शंभर फूट लांब आणि त्यामध्ये नाविक सरावाने एका लयीत नावा चालवत असतात. शर्यत जिंकण्याची चढाओढ पाहून प्रेक्षकांनाही स्फूरण चढत असते.

संगीतामधील लोकसंगीताचे प्रकार म्हणजे सरप्पट्ट, अय्यपन पट्टू, तळालपट्टू असे विविध प्रकार येतात. पंचम वाद्य, केळी कोट्टू या प्रकारचे विशेष वाद्य संगीत तर चेंडा, मंद्दलम, चेंगल सारखी विशेष वाद्य प्रकार येतात.
कोळीयनोम, कोळीकम, मोपलकळी, कुम्मी लोकनृत्याचे काही प्रकार. विविध प्रकारांनी केरळची नृत्यकला संपन्न आहे.

कथकली प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यकला, भव्य पोशाख आणि चेहऱ्यावरचे विशेष रंगकाम मन मोहवून टाकते. पण कथकली कलाकारांना तयारी करायला फार वेळ जातो. यात रंग, भाव, संगीत, नाट्य, नृत्य यांचा अतुलनीय मेळ दिसतो.

मोहिनीअट्टम हा पण एक शास्त्रीय नृत्य प्रकार जगविख्यात आहे. श्रीविष्णूनी अमृतमंथंनामध्ये घेतलेल्या मोहक सुंदरीच्या अवतारावरून मोहिनीअट्टम हे नाव पडलेले आहे. या नृत्याला सहसा कर्नाटकी शास्त्रीय संगीताची साथ असते. संगीत आणि नृत्याद्वारे अभिनय केला जातो. नाट्य शास्त्रानुसार हे नृत्य लास्य प्रकार मध्ये येते.

मलयाळम लोक आपल्या संस्कृतीवर, संस्कारांवर फार प्रेम करतात. त्यांच्या जीवन शैलीतून सहज दिसून येते. ही खरच कौतुकाची बाब आहे.

मनीषा पाटील

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील, पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४