केरळचं शिक्षण
नमस्कार, वाचक हो.
केरळ हे जीवन शैली आणि सामाजिक कल्याण बाबतीत सर्वात प्रगत राज्य आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत केरळमधील नागरिक श्रेष्ठ दर्जाचे शिक्षण आणि आरोग्य अनुभवतात.
केरळ मध्ये साक्षरतेचे प्रमाण जवळजवळ १००% आहे आणि कदाचित यामुळेच इथल्या जीवन शैलीचा दर्जाही उच्च आहे.
केरळ मधील लोकांना समाजातील सर्व स्तरावर सेवा, संधी प्राप्त होतात. प्रशासनात लोकांना महत्व आहे याबरोबरच कायदा आणि सुव्यवस्था यामध्येही केरळ राज्य सर्वात पुढे आहे. भ्रष्टाचाराचे प्रमाणही कमी असल्यामुळे सर्व सोयी सुविधा सर्व स्तरापर्यंत पोहचतात. कदाचित हे सुद्धा कारण असू शकेल केरळ राज्य पूर्ण साक्षर असण्याचे !
इथे साक्षरतेचे प्रमाण जास्त का असेल तर पहिल्यापासूनच राज्य सरकार आणि जनतेही शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. बदलत्या जीवनात शिक्षणाशिवाय पर्याय नाही या जाणीवेमुळे आपोआप संपूर्ण साक्षरतेची गरज सिद्ध करते.
केरळमध्ये मातृभाषेला फार महत्व दिले जाते. पण याबरोबरच इंग्रजी भाषेचाही अट्टाहास लोकांनी धरला. जमेची बाजू म्हणजे इंग्रजीचा वापर पर्यटनासाठीही खूप फायदेशीर होतोय.
मुलगा मुलगी असा भेदभाव न करता प्रत्येकाला उत्तम शिक्षण यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न दिसून येतात. मुलींच्या शिक्षणाची गतीही इथे लक्षणीय आहे.
शिक्षणासोबत सुजाण वाचक घडवण्यासाठी ग्रंथ निर्मित्ती, नियतकालिके, वर्तमान पत्रे यातूनही प्रयत्न झाले आणि होत आहेत.
केरळ मधील बरेच जण शिक्षणाच्या बळावर परदेशात जाऊन नोकरी, व्यवसायही करतात. केरळ राज्याच्या अर्थ व्यवस्थेला अशा प्रकारेही मदत होत राहते.
उच्च शैक्षणिक स्तर, शिक्षणाची संधी, समानता, पायाभूत सोयी सुविधा अशा अनेक गोष्टींमुळे केरळ साक्षरतेच्या बाबतीत अग्रगण्य आहे.

– लेखन : सौ. मनिषा पाटील पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800