३० सप्टेंबर हा आंतराष्ट्रीय भाषांतर दिन असतो. त्यानिमित्ताने भाषांतराचा इतिहास आणि त्याचे आजच्या काळातील महत्त्व विशद करणारा हा विचार प्रवर्तक लेख…..
एका भाषेच्या आशयाला अन्य भाषेत आणणे म्हणजे भाषांतर अथवा अनुवाद असे म्हणतात. भाषांतरामुळे भाषा भाषांतील वैचारिक, साहित्यिक, भावनिक, कलात्मक देवाण घेवाण होते . भाषांतराचा मूळ उद्देश ज्ञानप्रसार, विचारसंवर्धन, ज्ञानसंवर्धन,अन्य संस्कृती व समाज जीवनाचे आकलन हे आहेत .भाषांतरकाराला दोन्ही भाषांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे .तसेच भाषा आकलन व भाषा उपयोजनाचे कौशल्य असावे लागते .
भाषांतर करण्याची परंपरा फार जुनी आहे.संत जेरोम ह्यांचा जन्म इ. स. ३४७ साली झाला. ३० सप्टेंबर ४२० रोजी त्यांचे निधन झाले .त्यांनी बायबलचे हिब्रू भाषेतून ल्याटीन भाषेत भाषांतर केले . त्यांना आद्य भाषांतरकार समजले जाते .त्यांचे निधन होऊन १६०० वर्ष झाली असली तरी त्यांना कोणी विसरले नाही. इंटरनेशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेटर्स (FIT) संस्थेने १९९१ साला पासून दरवर्षी ३० सप्टेंबर हा दिवस आंतराष्ट्रीय भाषांतर दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवत गीतेचा मराठीत ” ज्ञानेश्वरी ” हा अनुवाद केला .संस्कृत मधील रामायण, महाभारत आणि पंचतंत्र जगातील अनेक भाषांत अनुवादित झाले आहेत .होमर सॉक्रेटीस, शेक्सपियर आदींच्या रचना जगभरात अनुवादांच्या माध्यमातून पोहोचलेल्या आहेत .
विलियम जोन्स यांनी अतिशय मेहनत घेऊन संस्कृत भाषा अवगत करून कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतल नाटकाचा इंग्रजी अनुवाद १७८९ साली केला .त्यामुळे जगाला या नाटकाची ओळख झाली . १७९२ मध्ये जोन्सने “गीतगोविंदचा’ अनुवाद केला .
१८०० ते १८७४ या कालखंडास भाषांतर युग म्हटले जाते . सध्या त्या व्यवसायाकडे तुलनेने दुर्लक्ष होत आहे . भाषांतर व्यवसायाचा विविध देशामध्ये जास्तीत जास्त प्रचार ,प्रसार होत आहे . जागतिकिरणाच्या प्रवाहात भाषांतर व्यवसायाची वाढती मागणी लक्षात घेऊन आपली भाषांतरांची कामे करून घेण्यासाठी अनेक कंपन्या पुढे आल्या असून तीनशे हून अधिक भाषांमध्ये काम करण्यासाठी सुमारे साडेतीन लाख नोंदणीकृत भाषांतरकार व दुभाषि कार्यरत आहेत . यावरून सध्या भाषांतराचे महत्व वाढले आहे हे लक्षात येते .
भाषा तज्ञांच्या मते जगाच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के जनता इंग्रजी, मंडारीन, हिंदी, इत्यादी प्रमुख समजल्या जाणाऱ्या पन्नास भाषा बोलते तर उर्वरित पन्नास टक्के जनतेचा संवाद उरलेल्या ६९५० भाषांमध्ये होतो . त्यांच्या मते अनेक भाषांचे भवितव्य धोक्यात आहे. तज्ञांच्या मते येत्या नव्वद वर्षात नव्वद टक्के बोली भाषा नष्ट होतील .ई. स.२११० मध्ये फक्त सहाशे भाषा शिल्लक राहतील . ३००० साली जगात फक्त इंग्लिश, मंडरीन, ईत्यादि अवघ्या दहा भाषा शिल्लक राहतील .
भाषा टिकवायच्या असतील तर प्रत्येकाने मातृभाषे बरोबर इतर जास्तीत जास्त भाषा अवगत केल्या पाहिजेत. तसेच जास्तीत जास्त साहित्य भाषांतरित केले पाहिजे .
जगातील राष्ट्रांना एकत्र आणण्यास , संवाद सुधारण्यासाठी, समजून घेण्यासाठी जागतिक शांतता व सुरक्षा मजबूत करण्यासाठी भाषांतर कारांची भूमिका महत्वाची ठरते.

– लेखन : दिलीप प्रभाकर गडकरी
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800