Monday, September 15, 2025
Homeलेखचला, मानसिक आरोग्य जपू या !

चला, मानसिक आरोग्य जपू या !

जगातील वाढत्या मानसिक आजारांकडे लक्ष वेधण्यासाठी, त्यावर चर्चा होऊन ते दूर करण्यासाठी १९९२ सालापासून जागतिक मानसिक आरोग्य संघटना व जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करते. यासाठी एक थीम निश्चित करण्यात येते. यावर्षीची थीम आहे “मानसिक आरोग्य: जागतिक प्राधान्य”. या निमित्ताने मानसिक आरोग्य जपणं किती महत्वाचं होत चाललं आहे, हे आपण जाणून घेऊ या….

मुळातच गतिमान, स्पर्धाशील जीवनामुळे दिवसेंदिवस मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात कोरोनामुळे झालेले लॉक डाऊन, हालचालींवर बंधनं, घरातच सतत बसून राहणं, नेहमीचं जन जीवन ठप्प होणं, बिघडत चाललेले नाते संबंध, एकटेपणाची भावना, आर्थिक परिस्थिती, भविष्याची अति चिंता, अशा अनेक बाबी माणसाचं शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरत आहेत.

शारीरिक आजाराची अंतर्गत, बाह्य लक्षणं सहज दिसून येतात. त्यांचं मोजमाप करण्यासाठी विविध प्रकारची साधनं, उपकरणं उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांच्यावर त्वरित उपचार करणं शक्य होतं. तसंच शारीरिक आजार दाखवणं, त्यांच्यावर उपचार करणं यात कमीपणा मानला जात नाही. मात्र काही मानसिक आजारांच्या बाबतीत बाह्य लक्षणं दिसून येत नाही. आपल्याला काही मानसिक आजार आहे, हे एक तर संबंधित व्यक्ती किंवा तिच्या जवळच्या माणसांच्या लक्षात येत नाही. आलं तरी मानसिक आजार हे दुबळेपणाचं प्रतिक समजल्या जातं म्हणून असेल किंवा त्या विषयी समाजात अजून हवं तेव्हढं जन जागरण झालं नसेल, यामुळे शास्त्रीय उपचार करून न घेता मानसिक आजार लपविण्याकडेच समाजात मोठया प्रमाणात कल दिसून येतो. पण ही परिस्थिती बदलणे अत्यंत आवश्यक आहे.

मानसिक आजारांवर त्वरित योग्य उपचार करून न घेतल्यास रुग्ण आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलतो. काही प्रकरणात रुग्ण दुसऱ्या व्यक्तीच्या जीवावरसुध्दा उठू शकतो. म्हणून मानसिक आजार, त्यांचं स्वरूप, प्रकार, उपचार या सर्व बाबी समजून घेण्याची गरज आहे.

मानसिक आजार होण्याची प्रमुख कारणें म्हणजे आनुवंशिकता, स्पर्धात्मक युग, दैनंदिन जीवनातील ताण तणाव, सर्व क्षेत्रात जाणवणारा संयमाचा अभाव, मोडकळीस येत चाललेली कुटुंब व्यवस्था, वाढते शहरीकरण आणि ग्रामीण भागात निसर्गाचा लहरीपणा ही समजल्या जातात.

प्रथम मानसिक आरोग्य म्हणजे काय ? हे आपण समजावून घेऊ या. तर मानसिक आरोग्य म्हणजे “आपलं उद्दिष्ट कष्टपूर्वक साध्य करीत असताना, प्रसंगी अपयश आल्यास ते पचविणे आणि यश मिळाल्यास यशाच्या नशेत न राहता, वर्तमान जगताना भूतकाळाचा अनुभव व त्या दृष्टीने घेतलेला भविष्याचा सकारात्मक वेध” म्हणजे मानसिक आरोग्य होय. व्यक्तीने नातीगोती जपली पाहिजेत. परंतु या नात्यागोत्यात गुंतून न राहता, आपले सामाजिक तसेच व्यावसायिक भान ठेवत कोणत्याही प्रकारचे वैफल्य न बाळगता केलेली वाटचाल म्हणजे मानसिक आरोग्य होय.

काही वेळा मुबलक साधन सामुग्री उपलब्ध असूनही व्यक्तींच्या जीवनात एक प्रकारचे नैराश्य येते. कधी कधी नकार किंवा पराभव सहजपणे न स्वीकारल्यामुळे अशी व्यक्ती निराशेच्या किंवा व्यसनाच्या आहारी जाते. मानसशास्त्रात व्यसनाला सुध्दा मानसिक आजार समजल्या जातं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार झाला आहे, हे ओळखण्याची काही लक्षणं म्हणजे, व्यक्तीची झोप बिघडणे, भूक कमी होणे, चिडचिड वाढणे, एकलकोंडेपणा, दैनंदिन कामकाजात चुका, वजन खूप कमी होणे किंवा खूप वाढणे, अवास्तव भिती वाटणे, आत्मविश्वास कमी होणे, जीव घाबरणे, काम करण्याची इच्छा कमी होणे, आत्महत्या करण्याची धमकी देत राहणे, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे, प्रसंगी आत्महत्या करणे, मुलांच्यात शिक्षणावर विपरीत परिणाम होणे, त्यांची संगत बिघडणे, खोटे बोलणे, स्वच्छता – टापटीपपणा याकडे दुर्लक्ष होणे, चेहरा चिंताग्रस्त दिसणे इत्यादी आहेत.

आपल्याला मानसिक आजार झाला आहे, हे बऱ्याचदा संबधित व्यक्तीलाच समजत नाही किंवा समजलं तरी तो दुर्लक्ष करत राहतो, नाकरत राहतो. अशावेळी कुटुंबातील व्यक्तींनी, कार्यालयातील सहकाऱ्यांनी, वर्गातील मित्र-मैत्रिणींनी आपल्या जवळच्या व्यक्तीत वेगळी लक्षणे दिसून आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता, त्या व्यक्तीला धीर देऊन, समजावून तिला सोबत घेऊन तत्काळ मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे, योग्य उपचार करणे, आवश्यक असल्यास त्या सोबत समुपदेशन करून घेणे आवश्यक ठरते.

मानसिक आजाराचे प्रमुख प्रकार म्हणजे मनाची दुभंग अवस्था, नैराश्य किंवा उदासीनता (डिप्रेशन), सतत वाटत वाटणारी भिती, चिंता (एक्झाईटी) मनोलैंगिक विचार, मनो शारीरिक विकार, अति आनंदी – अति दु:खी अवस्था (बायपोलर) इत्यादी होत.

याशिवाय ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्वसाधारणपणे वरील लक्षणांबरोबरच नैराश्य, स्मृतीभ्रंश, महिलांमध्ये मासिक पाळीशी संबंधित तसेच बाळंतपणापूर्वी किंवा बाळंतपणानंतर उद्भवणारे मनोविकार दिसून येतात.

बालकातील मनोविकारांमध्ये प्रामुख्याने वर्तणुकीतील दोष किंवा विकृती, नैराश्य, अनामिक भिती इत्यादी लक्षणे दिसून येतात.

वाढत्या मानसिक आजारांसाठी आज प्रामुख्याने सोशल मीडियाला जबाबदार धरले जाते. पण सोशल मीडिया हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे, हे आपण मान्य केले पाहिजे. म्हणून सोशल मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न न करता आपल्या अभ्यासासाठी, माहितीसाठी, व्यक्तिमत्त्व विकासासाठी सोशल मिडियाचा वापर कसा करता येईल ? हे आपण पाहिलं पाहिजे. मुलांना सुध्दा तसंच शिकविणें गरजेचे आहे.

आपले मन आपले मित्र आहे. पण हा मित्र शत्रू होणार नाही, आपलाच घात करणार नाही, यासाठी आपण दक्ष राहिलं पाहिजे. यासाठी नियमित व्यायाम, सकस आहार, ध्यान धारणा, प्रार्थना, सकारात्मक विचार याचा अवलंब केला पाहिजे.

जेष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ. संजय कुमावत, समुपदेशक डॉ. नीलम मुळे यांच्या मी घेतलेल्या मुलाखतींवर आधारित हा लेख लिहिला आहे. त्यांचे मनःपूर्वक आभार. आपल्याला सर्वांगिण आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments