Friday, December 27, 2024
Homeपर्यटनचलो बाली : ३

चलो बाली : ३

२९/११/२०२३

बाली म्हणजे वेगवेगळे समुद्रकिनारे.
प्रत्येक समुद्रकिनाऱ्याचे वैशिष्ट्य आणि सौंदर्य वेगळे. एकच हिंदी महासागर पण त्याची अनंत रूपे. बाली मधल्या वास्तव्यात या उदात्त सागरदर्शनाने आम्ही खरोखरच प्रसन्न तर झालोच पण एका अज्ञात गूढ शक्तीने अंतर्मनात कुठेतरी पार शुद्धी मिळाल्यासारखे वाटले. निसर्गाशी तद्रूप होणे म्हणजे काय हे अंशत: अनुभवले.

दक्षिण कुटा येथील बारुंग मधला पांडव बीच हा असाच एक दूरस्थ समुद्रकिनारा. दोन उंच टेकड्यांनी वेढलेला. यापैकी एका टेकडीवर वरपासून खालपर्यंत कुंती, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांचे पुतळे कोरलेले आहेत. खाली पसरलेल्या अथांग समुद्राचे आणि संथ किनाऱ्यावर फेसाळत येणाऱ्या लाटांचे निसर्ग चित्र केवळ अप्रतिम! हे थोडे अवघड पर्यटन स्थळ होते. निदान आमच्या वयाचा विचार करता. त्यामुळे आपण येथे तरुण असताना का आलो नाही हा प्रश्न घेऊनच आम्ही परतलो.

बाली म्हणजे सागर तसेच बाली म्हणजे मंदिरे. हिंदू देवदेवतांची अनेक मंदिरे येथे आहेत. बालीनीज तसे धार्मिक, श्रद्धाळु.
रस्त्यातून जाताना लाल कौलांची सुरेख बैठी घरं पाह्यला मिळायची. प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन सदृश बांधकाम दिसायचं आणि खजुराच्या पानांच्या टोपलीत ठेवलेल्या तृणपात्या, चाफ्याची, जास्वंदीची फुले, पाने वाहिलेली असत. अगदी प्रत्येक टॅक्सी मध्ये सुद्धा डॅशबोर्डवर अशा प्रकारचं पूजन केलेलं असायचं. त्याला ते अर्पण म्हणजेच त्यांच्या भाषेत कनांगसाडी असे म्हणतात. शिवाय अनेक ठिकाणी झाडांवर इतरत्र कृष्णधवल चौकडे असलेले कापडही गुंडाळलेले दिसले. तोही एक भक्तीचाच प्रकार आहे. अशा प्रकारच्या पताका, रुमाल अथवा वस्त्रं ईशान्य भारताच्या भागातही आढळतात. एकप्रकारे, ”देवा! तुझ्या कृपेची उब मला सदैव मिळो“ अशी विनवणी त्याद्वारे केली जात असावी. एकंदरच इंडोनेशियन आणि भारतीय संस्कृतीतले साम्य बऱ्याच बाबतीत दिसून येते.

एका मंदिराला भेट देण्याचे आम्ही ठरवले. तसे ते उंच पर्वतावरच होते. मात्र आमचा टॅक्सीवाला आणि तेथील काउंटर वरचे लोक म्हणाले,” फारसे कठीण नाही. थोड्या पायऱ्या आहेत आणि दहा-पंधरा मिनिटांची चाल आहे.” म्हणून आम्ही या स्थळाला भेट देण्याचे ठरवले. प्रत्येकी २५ हजार आयडीर भरून तिकीटेही काढली आणि मंदिराच्या दिशेने कूच केले. बरेचसे चढ-उतार, पायऱ्या चढत, उतरत चालत राहिलो. वाटलं तितकं सोपं नव्हतं पण आता इतके आलोच आहोत तर अजून थोडे पुढे जाऊया करत चालत राहिलो, चढत राहिलो. सभोवताली गर्द झाडी आणि वरून दिसणारा सागर मनभावन, लुभावणारा होता. पण झाडांवरच्या माकडांनी मात्र उच्छाद मांडला होता. कुणाचा चष्मा पळव, कुणाची पर्स, मोबाईल, चप्पल, टोपी. माकडचेष्टा या शब्दाचा खरा अर्थ अनुभवत होतो. आम्ही अगदी सावधानतेने आपापल्या वस्तू घट्ट सांभाळत चाललो होतो तरी सतीश ची कॅप आणि साधनाची चप्पल माकडांनी पळवलीच.
मंदिरापर्यंत पोहोचलो. कमरेवर बाली पद्धतीप्रमाणे निळ्या, भगव्या सिल्कचे काही लुंगी टाईप वस्र गुंडाळावे लागले होते. मात्र इतके चढून आल्यानंतर कळले की मंदिराचे द्वार बंद आहे. बाहेरून मंदिराच्या आतला भाग दिसत होता. उंच खांबावर एक राजदंड होता आणि त्याचे बाहेरूनच दर्शन घ्यायचे होते. ते प्रतिकात्मक हनुमान मंदिर होते आणि सभोवतालची माकडे मंदिराचं खोडकर प्रतिनिधित्व करत होते !
निसर्गाचा नजारा मात्र अवर्णनीय होता आणि देव आम्हाला त्या दूर क्षितिजावर, विस्तीर्ण जलाशयात हलकेच मावळणाऱ्या सूर्याच्या रूपातच भेटला हे मात्र अगदी खरं.आम्ही मनोभावे त्या मावळणार्‍या भास्कराला वंदन केले.

प्रचंड थकलो होतो. कसेबसे पाय ओढत उतरलो आणि टॅक्सीत बसून बंगल्यावर परतलो.
दरम्यान एका वाईट प्रसंगाचे साक्षी व्हावे लागले होते. मंदिरावरून खाली सेंटरवर परतलेल्या एका माणसाला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. तो तिथेच कोसळला. लोकांची धावपळ झाली. गर्दी जमली. मदतीचे अनेक हात पुढे आले. स्थानिक लोकांपैकी कुणी ॲम्बुलन्स मागवली, डॉक्टर्सना फोन केले. घोळक्यात कुणी डाॅक्टर आहे का म्हणून विचारले.त्या गृहस्थाच्या समवेत असलेल्यांची बावरलेली स्थिती केवीलवाणी होती. आम्ही मनातल्या मनात त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना केली आणि परतलो. मानवतेचं झालेलं ते दर्शन हृदयस्पर्शी नक्कीच होतं. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही असा माणूस हा माणसासाठी धावतोच हे चित्र मात्र दिलासा देणार होतं. आम्ही मात्र ऐंशी च्या उंबरठ्यावर ही घटना पाहून एकच ठरवलं” इथून पुढे फारशी धाडसं करायची नाहीत. झेपेल तेवढं आणि पचनी पडेल तेवढंच करायचं. “ बालीचा अनुभव घ्यायचा, फक्त निसर्गातच रमायचं.

टॅक्सी सुरु झाली. मन बेचैन होतं.
साधना सुरेख आवाजात गात होती,पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा….”
क्रमश:

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सौ. राधिका भांडारकर यांचे क्रमशः बालीचे प्रवासवर्णन रंगत चालले आहे. वाचत असता मीही मनाने तेथील सागरकिनार्‍यावर पोहोचते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९