Saturday, October 18, 2025
Homeलेखचष्मायण

चष्मायण

मानवी जीवनात एका विशिष्ट वयात किंवा काही कारणवश व्यक्ति परत्वे चष्मा नावाचा प्रकार जवळपास प्रत्येक व्यक्तींच्या डोळ्यांसाठी अत्यावश्यक साधन म्हणून वापरण्यात येतो. या छोट्याशा चष्म्याची करामत किती छान असते ? हे आपण पाहतच असतो. या छोटे मियांची जागा नेमकी नाकावर टेकू देऊन दोन्ही कानाला काड्या अडकवून त्याच काड्यांचा वापर करून त्याला गोल – अर्धर्गोल, किंवा चौकोनी अशा विशिष्ट आकाराची भिंगे म्हणजेच काचेपासून बनवलेल्या या छोट्याश्या बबलुची काय मिजास असते.

मग असा चष्मा वापरणारी व्यक्ति त्याचा वापर करतांना अनेक प्रकारची चाळे करत असतात. कोणी मोठ्या भिंगाचे चष्मे वापरतात, अशी माणसं त्याच्या चष्म्याला दोन प्रकारची भिंगे – काचा बसवून घेतात, या चष्म्यामध्ये लांबचे व जवळचे असे दोन्ही अंतरावरचे दिसावे म्हणून या भिंगात – काचेत रचना केलेली असते. अशा प्रकारचा चष्मा शक्यतो कार्यालयीन अथवा कोणत्याही वाचनाची आवड असलेल्या व्यक्तींच्या नाका -डोळ्यांवर असा चष्मा हमखास दिसतोच.

दुसरा प्रकार हा छोट्या काचेपासून बनवलेल्या चष्म्याचा असतो. हा छोट्या काचेचा चष्मा वाचतांना अगदी नाकाच्या टोकांपर्यंत उतरलेला असतो. मग असा चष्मा वापरणारी व्यक्ति वाचतांना बरोबर त्या काचेतून पाहत वाचतो. मात्र, वाचता वाचता त्याला जिथे कुठे नजर फिरवायची असेल तिथे ही व्यक्ति त्या छोट्याश्या साधनाच्या चौकटीच्या वरून डोळे टवकारत – टवकारत चोहिकडे नजर फिरवत असतो.

ज्याच्या डोळ्याला काही ना काही कारणामुळे चष्मा लागला आहे, त्याला मात्र तो लावल्या शिवाय चैन पडत नाही. मग ती वाचनाचा छंद असलेली व्यक्ति असो , कार्यालयीन काम करणारी असो वा कोणतेही घरगुती काम करणारी असो !! त्या व्यक्तीला एकदाचा चष्मा लागला म्हणजे, त्याच्या डोळ्यावर तो परिधान केल्याशिवाय पुढचे कोणतेही काम त्या व्यक्तीला सूचत नाही.

कधी कधी त्याला हा छोटासा बबलू जागेवर सापडला नाही, तर त्यामुळे अशी पंचाईत होते की ही गोष्टच विचारू नका ? कधी कधी हा चष्मा वापरणारी व्यक्ति एवढी विसरभोळी असते की, त्याच्या चष्म्याशी चाळे करता करता त्याला आपल्या डोक्यावर कधी चढवतो याचे त्याला भान नसते. तो जर ऐनवेळी सापडला नाही तर, मग सा-या ठिकाणी धुंडाळत बसतो, पण हा छोटा बबलू काही सापडत नाही, कसा सापडणार ? त्याला डोक्यावर बसवण्याची संवय लावल्याची बाब तो विसरतो आणि एक नाही तर अनेक ठिकाणी शोधत बसतो. मग कोणीतरी त्यांच्या लक्षात आणून देतं की, साहेब आपला चष्मा आपल्याच डोक्यावर बसवला आहे . तेंव्हा मात्र आजुबाजुला साहेबांच्या विसरभोळेपणाची दाद म्हणून एकच हशा पिकते, हा भाग वेगळा ?

अश्या ह्या चष्मायणच्या अनेक सुरस कथा आपल्या आजुबाजुला अनेक वेळा पाहयला आणि ऐकायला मिळत असतात. त्या खूप मजेदारही वाटतात किंवा थोड्या गंभीरही असतात ? आता हाच किस्सा पाहा ना ?

आमच्या घरात आम्हा दोघा नवरा – बायकोला चष्मा लागला आहे. घरात माझ्या उठण्या बसण्याच्या जागा ठरलेल्या आहेत. बाहेरच्या हॉल मध्ये बसलो तर माझी खुर्ची अन् चष्मा ठेवण्याची जागा, टीपॉय किंवा शोकेशच्या कठड्यावर, बेडरूममध्ये असलो तर माझ्या स्टडी टेबलवर, किंवा कठड्यावर आणि बाहेर गावी असलो तर शक्यतो माझ्या शर्टाच्या वरच्या खिशात ठेवत असतो. त्यामुळे माझा चष्मा चूकून मी विसरलो तरी वरच्या जागे व्यतिरिक्त त्याची शोधाशोध करण्याची गरजच पडत नाही. मात्र, हल्ली नातवंड आल्यामुळे ते माझ्याच नाही तर आजीच्याही चष्म्यासोबत काही चाळे करता करता कुठेतरी ठेऊन किंवा लपवून ठेवतात आणि मग आमच्या चष्म्याची शोधाशोध सुरु होते. ती कधी तरी, हल्ली मात्र नेहमीचेच झाले आहे . त्यामुळे त्यांना लाडेलाडेच सांगावे – विचारावे लागते, माझा चष्मा कुठे ठेवला आहे रे या लबाडाने, मग ती दोघे सुध्दा या बबलूच्या शोधाशोध साठी आम्हाला मदत करतात.

मात्र, आमच्या अर्धांगिनीच्या चष्मा ठेवण्याची त-हाच निराळी आहे. शक्यतो तिचा मोबाईल आणि चष्मा ठेवण्याच्या जागा ठरलेल्या असल्या, तरी ती काही काम करत असेल तर ते काम संपल्यावर तिथेच कुठेतरी ते न दिसणा-या जागेवर ठेवणार, कधी कधी शिलाई मशीनचे काम करता करता ते काम झाले की, ती शिवत असलेल्या कपड्याखाली ठेऊन देणार आणि काही वेळाने आठवले की, माझा चष्मा कुठे ठेवला ते आठवत नाही अन् तो सापडतही नाही. किंवा किचनमध्ये काम सुरू असेल तर फ्रीज़ वर किंवा मिक्सरच्या स्टॅडवर ठेऊन देणार आणि तिथली कामं आटोपल्यावर आपली कामं आटोपल्याचा सुस्कारा सोडून थोडा निवांतपणा घालवण्यासाठी चष्मा जागच्या जागी विसरून येणार नी मग घरभर शोधत बसणार ? ती दुस-या कोणाला विचारणारही नाही, माझा चष्मा कुठे पाहिला कां म्हणून? पण तिचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो. अशी आमच्या चष्म्याच्या कथायणाची “ चष्मायण“ आहे.

एकदा मी आमच्या व्याह्यांच्या घरी पाहूणा म्हणून त्यांच्या घराच्या वास्तुच्या निमित्ताने अकोल्याला गेलो होतो. त्यांच्याकडे वास्तुच्या निमित्ताने काही पाहूणे मंडळी घरी येणार म्हणून त्यांच्या ऊठबस आणि जेवणा – खावणाची व्यवस्था करण्यासाठी त्यांच्या घरच्या मंडळींची धावपळ सुरू होती. ह्या धावपळीत थोडी फार मदत करण्यासाठी त्यांच्याकडे लक्ष्मीबाई नावाची मोलकरीन काम करायची, तिची पण काही कामे आटोपते घेण्यासाठी घाई सुरु होती.

मग ही लक्ष्मीबाई भाज्या निवडून साफ करून दे, कांदे चिरून दे, लसून साफ कर , मधूनच घरात झाडू मार, घरा समोरच्या चपला – जोडे एका कोप-यात ठेव अश्या प्रकारची कामे करून आपला सहभाग सगळीकडेच असल्याचे जणू भासवत होती. ही उतार वयात असलेली लक्ष्मीबाई आपल्या फाटक्या संसाराला ठिगळं लावण्यासाठी अशीच शेजार पाजारच्या घरातून लहान मोठी कामे करून दोन पैसे मिळवून आजारी नव-याची सेवा करण्याचा व्रत अखंडपणाने चालवत होती. ह्या लक्ष्मी बाईला नाही म्हणायला एक मुलगा आणि दोन मुली होत्या. दोन्ही मुलींची लग्न होऊन त्यांच्या संसाराला लागल्या होत्या आणि मुलगा त्याच्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी कुठे तरी पुण्या- मुंबईकडे मिळेल ती कामे करत होता. मात्र, लक्ष्मीबाई याही वयात हिंमत न हारता स्वकष्टाच्या मेहनतीवर आपला चरितार्थ चालवत होती.

या सर्व धावपपळीत मला लक्ष्मीबाई तिच्या डोळयांवर जाड काचेचा चष्मा लावून अनेक कामे सराईतपणे करण्याच्या चिकाटीची कमालच वाटली. कारण, वयोमान परत्वे कोणतेही कामे करण्यासाठी मर्यादा येतातच. मात्र, ही मोलकरीन बाई काही वेगळ्याच रसायनाची बनली असावी याची मला किमया वाटली. आता व्याह्यांच्या घरचे पुजापाठ आटोपले, सर्वांची जेवणं आटोपल्यावर लक्ष्मी बाई थोडी निवांत झाली. तेंव्हा कुठे एका कोप-यात बसून तिने पान- सुपारीचा बटवा ( चंची ) काढून, कात, चुना लावून पान स्वत: खाल्ला आणि घर मालकीनीला आणि सोबतच्या दोन बायांनाही खायला दिले. ही कामे मात्र चष्मा न लावता केली की नाही हे कळले नाही. मग हे समारोपाचे काम करून लक्ष्मीबाई तिच्या घरी निघून गेली. त्यावेळी तिचा चष्मा यजमानांकडे ठेऊन गेल्याचे तिच्या लक्षात राहिले नाही. एव्हाना बराच वेळ झाला होता. त्यावेळी ती बाई चष्मा इकडच्या घरीच विसरून गेल्याचे लक्षात आल्यावर आमच्या व्याह्यांनी तो अलगदपणे उचलून खिडकीवर ठेवला.

आता लक्ष्मी बाई घरी तर पोहोचली मात्र, बरीच संध्याकाळ झाल्यामुळे अंधारही झाला होता. मग तिच्या लक्षात आले की आपला चष्मा कुठे तरी पडला की, विसरली हे नेमके लक्ष्मी बाईला आठवत नव्हते की, नेमके कुठे ठेवले ते ? मग घरच्या म्हाता-यानेही घरात सगळीकडे शोधाशोध करायला मदत केली, संपूर्ण घराची झाडाझडती घेतली. परंतु हा छोटेमिंया काही केल्या सापडला नाही.

याच कारणावरून म्हातारा तिच्यावर खेकसला,  “अन् तुले म्या कितींदा सांगितले की, तुव्हा चश्मा बरोबर ठिवत जा ? पण म्हाह्या तू ऐकशील तरच ना“ ? आता आली की नाय पंचाईत ? नवा चश्मा घियायची ? मग , म्हातारीने पण आपला बाणा दाखवत म्हणाली, हो हो तुमी काई कायजी करू नोका ना बाप्पा ? मी राईन बिना चष्म्याची ? काय करा लागते तुमाले ? हो$$$$ मोठी आली बिन्या चष्म्याची राईन म्हणते तू , झामल – झामल कराले ? आता बिचारीने भांडण आटोपते घेऊन म्हाता-याला दोन घास खाऊ घातले आणि दोघेही निद्रादेवीच्या भेटीसाठी निघून गेले.

म्हातारी सकाळीच उठली, तिची जी काही घरची कामं होती ती आटोपली, नी तडक व्याह्यांचे घर गाठून आपल्या हरवलेल्या चष्म्याचे गा-हाने ऐकवले. तेंव्हा, आमच्या व्याह्यांच्या लक्षात आले की, रात्री त्यांना सापडलेला चष्मा हा कोणी पाहूण्यांचा विसरून राहिलेला नसून तो लक्ष्मीबाईचाच आहे. मग त्यांनी खिडकीवर ठेवलेला चश्मा अलगदपणे काढून लक्ष्मीबाईकडे सुपूर्द केला. तेंव्हा या बाईला काय तो आनंद झाला, तो शब्दातीत करणे त्यावेळी मला फारच अवघढ वाटले. असा हा चष्मायनाचा किस्सा संपतांना संपूर्ण घर लक्ष्मी बाईच्या विसर्भोळेपणावर नी दोघा नवरा बायकोंच्या भांडणावर मनसोक्त हसून सर्वांची चांगलीच करमणूक झाली.

असा हा “चष्मायनाचा“ किस्सा आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला कधी ना कधी तरी येतच असतो, त्यामुळे तो विसरू न लगे ?
धन्यवाद !!
इतिश्री :

राजाराम जाधव

लेखन : राजाराम जाधव, नवी मुंबई.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप