आज आंतरराष्ट्रीय चहादिन आहे. त्यानिमित्ताने चहा पाठवत आहे.
गोड मानुन घ्या. ☺️
एकमेकांना घरी बोलावून किंवा चहाच्या टपरीवर, हॉटेलमध्ये बोलावून चहायुक्त शुभेच्छा देता आल्या असत्या तर आनंदच वाटला असता. पण तसं शक्य नसलं तरीही फेसबुक, व्हाट्सएपवर वाफाळलेल्या चहाचे कपासह छायाचित्र पाठवून एकमेकांना शुभेच्छा देऊन चहाचा आस्वाद घेऊ या.
आमच्या शेजाऱ्याने आम्हाला सपत्नीक चहाचे आमंत्रण देऊन चहादिन साजरा केला त्याची धम्माल गोष्ट…
जागतिक चहा दिनाच्या दिवशी आमच्या शेजाऱ्याने आम्हाला आग्रहाने चहाला बोलवले. आम्ही उभयता बरोबर चारच्या ठोक्याला त्यांच्याकडे गेलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. काही वेळात वहिनींनी एका तबकात चहाचे कप आणून आमच्या समोर असलेल्या
टीपॉयवर ठेवले. यजमानाने हाताच्या इशाऱ्याने आम्हाला चहा घेण्याचे सुचवले.
तसे पाहिले तर मी पट्टीचा चहा पिणारा म्हणून ओळखला जातो. महाविद्यालयात असताना मित्रांसोबत शर्यत लावून एकामागोमाग एक पंचवीस कप चहा मी किती तरी वेळा रिचवला असेल. त्यामुळे मित्रांनी मला ‘चहासम्राट’ ही पदवी अकरा कप चहा मला एकट्याला पाजवून बहाल केली आहे.
पुढे शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. दहा सहकारी शिक्षक होते परंतु माझ्यासारखा चहाबाज दुसरा कुणी नव्हता. गावात हॉटेल नव्हते त्यामुळे माझा जीव चहाविना तळमळू लागला. कुणी अधिकारी आले तर शाळेतील मुली घरून चहा करून आणायच्या पण माझे मन भरत नव्हते. मग मी एक शक्कल लढवली. स्वतःच्या खर्चाने स्टोव्ह, कपबश्या, चहा गाळणी, पातेले इत्यादी चहा सामग्री विकत आणली.
मला चहा एकदम कडक हवा असतो. जिथे कुणाला नॉर्मल कपाला एक चमचा पत्ती लागत असेल तर तिथे मला तीन चमचे पत्ती लागते. पाहुण्यांकडे, परिचित, मित्रांकडे गेलो की मी आधी ‘मला कडक चहा लागतो, पत्तीही जास्त लागते असे सांगून मोकळा होतो.
हॉटेलमध्ये साधारण एकदा वापरलेली पत्ती पुन्हा वापरतात. पण मी मात्र ‘डबल पैसे घ्या परंतु पत्ती बदला’ असे सांगून पत्ती बदलायला लावतो. सर्व साधारणपणे चहा घेतला की झोप येत नाही असा एक सार्वत्रिक समज आहे परंतु मला रात्री ९-५५ ला चहा दिला तरी मी दहा वाजता घुरक्या ठोकतो.
काही कारणास्तव रात्री नेहमीच्या वेळी झोप लागली नाही तर मी फार तर पंधरा- वीस मिनिटे झोपेची आराधना करतो. झोप येण्याची चिन्हे दिसत नाही हे पाहून मी अनेक वेळा रात्री चक्क बारा वाजता चहा करून प्यायलो आहे. कहर म्हणजे प्रत्येक वेळी चहा घेताच मला ढाराढूर झोप लागली. अर्थात तसे करताना भांड्याला भांडे लागून श्रीमतीची झोप मोडली हे सांगायला नको.
एकदा तर गंमत झाली. नवीन लग्न झाले आणि काही दिवसात मी सपत्नीक सासरी गेलो. रात्री मला झोपच येत नव्हती. बारा वाजत होते. मी शेजारी पाहिले बायकोचे सप्तसूर मला जणू चिडवत होते. वैवाहिक जीवनाच्या सुरवातीलाच एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की, माझ्या साता जन्माच्या सोबतीणीला घोरायची सवय आहे. आता काय करावे ह्याचा विचार करत असताना मला आठवले की, बायको घोरते म्हणून तिला चिडवत असताना ती म्हणाली,
“अहो, मलाच काय पण आमच्याकडे न घोरणारी व्यक्ती औषधालाही सापडणार नाही.”
“याचा अर्थ तुझ्या माहेरी घोरणे हा वारसा आहे तर…”
“तसे म्हणा हवे तर…”
हा संवाद आठवताच मला काही तरी सुचले आणि मी तटकन उठलो. खोलीबाहेर आलो. पाहतो तर काय सर्वत्र अंधार होता. एकूणएक लाईट बंद करून सारे आपापल्या खोलीत झोपले होते. विशेष म्हणजे वेगवेगळे आवाज परिसर दुमदुमत होते. मी त्या आवाजांचे रहस्य जाणले. मांजराच्या पावलाने स्वयंपाक घर गाठले. तिथेही अंधार असला तरीही देवाजवळ तेवत असलेल्या दिव्याचा मंद मंद प्रकाश पसरला होता. मी मनात म्हटले, ‘माझ्या चहाची देवालाच काळजी…’
मी अडखळत गॅसच्या ओट्याकडे निघालो असताना रस्त्यावर मध्येच कशाला तरी अडखळून थेट गॅसच्या ओट्याला जाऊन थडकलो. दोन्ही हात ओट्यावर ठेवलेल्या पातेल्यावर आदळले. मोठा आवाज झाला. त्या आवाजाने घोरणारी मंडळी जागी झाली. पातेल्यातील भाजी सरळ माझ्या चेहऱ्यावर पडली. सारेजण हातात पडेल ती वस्तू घेऊन स्वयंपाक घरात आले. मग काय विचारता राव, आठ दिवस सुजलेल्या चेहऱ्याने पाहुणचार घेत पडून होतो…
चहाचा रंग, चहाचा गंध यावरून मी चहाची चव सांगू शकतो त्यामुळे समोर ठेवलेल्या कपातील चहाची प्रकृती मी तत्काळ ओळखली तरीही आम्ही तत्काळ कप उचलून तोंडाला लावले. दुसऱ्याच क्षणी माझ्या पत्नीने माझ्याकडे पाहिले. तितक्यात यजमान म्हणाले,
“हा आमचा पत्नीतुल्य चहा. कोणत्याही ‘तुल्य’ चहाच्या तुलनेत हिने केलेला चहा नेहमीच छानच असतो. एकदा पिला ना दिवसभर दुसरीकडे कुठे चहा पिण्याची इच्छाच होत नाही.” यजमानाचे ते वाक्य ऐकून माझ्या ओठावर आलेले परंतु आत दाबलेले शब्द असे होते, (तुम्ही आमच्या श्रीमतीच्या हातचा चहा प्याला नाहीत म्हणून तुम्हाला तुमच्या बायकोच्या हातचा चहा इतका प्रिय वाटतोय. खरेतर माझ्या बायकोच्या हातच्या चहापुढे हा चहा म्हणजे…)परंतु मी म्हणालो, “खरे आहे. असा चहा मी आजवर कधीच प्यालो नाही.” मी असे म्हणालो. तसे तिथे असलेल्या चार डोळ्यात अंगार फुलले. वहिनींनी जळजळीत नजरेने यजमानांकडे पाहिले. जणू म्हणत होत्या, ‘बघा. याला म्हणतात चहाचा पारखी. नाही तर तुम्ही गाढवाला गुळाची…’
आमच्या सौभाग्यवतीच्या नजरेत फुललेला इंगोळ मला विचारत होता, ‘असे आहे का ? दिवसातून दहा कप चहा ढोसता आणि एक घोट चहा गिळला नाही तर माझ्यासमोर हिची स्तुती करता ? चला तर घरी. मग पाजते तुम्हाला चहा.’ बायकोच्या चेहऱ्यावरील भाव पाहून आपण काय बोलून बसलो ह्याची मला जाणीव झाली आणि शरीरात कापरे भरले. कसाबसा चहा घश्याखाली उतरवून मी गृहमंत्र्याच्या पाठोपाठ एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे घरी निघालो.
एकूणएक व्यवहाराच्या किल्ल्या बायकोच्याच हाती होत्या. घराच्या कुलुपाच्या किल्ल्याही तीच सांभाळत असे. रागारागाने तिने कुलूप काढले. आत शिरल्याबरोबर किल्लीसह कुलूप सोफ्यावर फेकले आणि दाणकन स्वतःचे शरीरही सोफ्यावर आपटले. मी कापत म्हणालो,
“अग… अग.. ऐक तर. माझा म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता ग. खरे सांगू का त्या चहाचा पहिला घोट घेतला आणि मला तुझा अमृतमय चहा आठवला…”“मग हे तिथे का नाही बोललात की, माझ्या बायकोचा चहा यापेक्षा हजारपटीने चांगला होतो म्हणून. का तिथे मूग गिळून बसलात ? दातखिळी का बसली ?”
“अग, तसे सांगण्याची अतितीव्र इच्छा होती परंतु ते बरे दिसले नसते. त्यांनी एवढ्या आग्रहाने चहाला बोलावले आणि आपण त्या चहाला नावे ठेवली असती तर त्या वहिनीला राग आला…”
“व्वा ! व्वा ! म्हणे राग आला असता ? त्या ढमणगुळणी I चहाची स्तुती करताना बायकोला काय वाटेल, तिला वाईट वाटेल हा विचार का नाही आला ?”
“अग, खरेच ग, मी तिची स्तुती मनापासून…”
“मला मुर्ख समजता ? तुम्ही सरळसरळ तिच्या फडतूस चहाची स्तुती करताना ‘असा चहा आजवर प्यायलो नाही’ अशी मुक्ताफळे उधळलीत याचा अर्थ मला समजत नाही ? मी बेअक्कल आहे न ? तुमची लहर आली की, चहाचा कप देणारी मी… आणि ते काही नाही. आता मी यापुढे चहा करणार नाही. एक तर आपला आपण चहा करुन प्या नाहीतर आणा तिच्याकडून काय तो ‘पत्नीतुल्य’ चहा ! ऐकलत ना, ते गृहस्थ तशा चहाची कशी तोंड फाटेस्तोर स्तुती करत होते ते ! आणि तुम्ही ? केलीय का चहाची स्तुती ?” असे म्हणत तिने डोळ्याला पदर लावला.
काही तरी करावेच लागणार, नाही तर त्या चहाचा उतारा म्हणून हवा असलेला चहा मिळणार नाही. या उद्देशाने मी म्हणालो, “कोण म्हणाले तू मुर्ख, बेअक्कल आहे म्हणून ? फक्त तू समजून घेत नाहीस. त्या वाक्याचा गर्भित अर्थ म्हणजे दुसऱ्या… नकारात्मक अर्थाचा तू विचारच केला नाहीस…”
“दुसरा… नकारात्मक अर्थ तो कसा ?” हुंदक्याच्या सोबत आलेले शब्द.
“असा चहा मी आजवर मी कधीच प्यालो नाही… याचा अर्थ तू चांगला, उत्कृष्ट चहा असा घेतलास ना ?” मी विचारले. “मग दुसरा कोणता अर्थ असू शकतो हो ? मला काय…”
“थांब. थांब. स्वतःला आणखी कोणते विशेषण चिकटवून घेऊ नकोस. असा चहा याचा अर्थ इतका बेचव, आळणी चहा मी आजवर कधीच प्यालो नाही. असा होत नाही का ? त्यांनी चहा दिला. तिच्या नवऱ्याने चहाची स्तुती केली असताना मी ‘खूप घाण आहे हो चहा’ असे म्हणू का ? नाण्याला दोन बाजू असतात परंतु साऱ्यांचे लक्ष समोर पडलेल्या बाजूकडे जाते. जी बाजू जमिनीला कवेत घेते तिच्याकडे कुणी लक्ष देत नाही कारण ती पराजयाची निशाणी असते. सारे तिकडे दुर्लक्ष करतात. जसे की…”
“मी दुर्लक्ष केले. खरेच तुम्ही की नाही खूप हुशार आहात हो. कुणाला शालीतून कसा चहा म्हणजे शालीतून कसे जोडे मारावेत…”
“ते शालीचे राहू देत त्या ‘पत्नी तुल्य’ चहाने तोंडाची चव गेलीय. तोंड कसे आंबटडग पडले आहे. तर जरा…” “आणते हो आणते. तुमच्यासाठी खास माझ्या हातचा चहा आणते. बसा. आलेच…” असे म्हणत बायको लगबगीने स्वयंपाक घरात गेली आणि मी स्वतःचीच पाठ थोपटून घेत सोफ्यावर बसलो…
स्वयंपाक घरात जाताना बायको काही तरी पुटपुटत असल्याचे मला जाणवले. ती नक्कीच म्हणाली असणार, ‘काय कडू वाण माझ्या पदरी पडलय बाप्पा…..’

– लेखन : नागेश सू. शेवाळकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
मस्त, खुसखुशीत भाषा. चहाबाज लोकांना, म्हणजे मला आवडला.