लहानपणी म्हणजे साठेक वर्षापूर्वी आम्ही तरुण मुले वेगवेगळ्या विषयावर रात्ररात्र वाद घालीत असू. त्यात वादाचा एक हमखास विषय असायचा.. लता श्रेष्ठ की आशा श्रेष्ठ ? रात्र संपली तरी हा वाद संपत नसे. त्याचा निकाल लागत नसे. आज दोघीही आपल्यात नाहीत. पण आशा भोसले यांची बाजू घेतानाचा माझा चढलेला आवाज आजही माझा मलाच ऐकू येतो.
लता मंगेशकर यांचे वर्चस्व वादातीत असले, त्यांना साक्षात सरस्वतीचा अवतार मानले गेले असले तरी आशा भोसले यांनी संगीताच्या क्षेत्रात अक्षरशः दाही दिशा पादाक्रांत केल्या आहेत. घरातल्या घरातील स्पर्धा त्यांना सोसावी लागली हे खरे. इतर बहिणीच्या मानाने स्वतःच्या बंडखोर वृत्तीमुळे अगदी तरूणपणीच त्यांना कौटुंबिक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्यात हेही खरे. पण या सर्वांवर मात करीत त्यांनी स्वतःची वाट स्वतः शोधली. एव्हढेच नव्हे तर त्या वाटेवरील खाचा खळगा पार करीत शर्यत एकटीने जिंकली हेही तितकेच खरे. सगळ्या बहिणीत टीकेचे धनी त्यांनाच व्हावे लागले. अशा बाबतीत बऱ्याच कौटुंबिक गोष्टी बाहेर येत नाहीत. त्या आपण चघळू देखील नये. पण सर्व कौटुंबिक आघात झेलत त्यांनी संगीताच्या क्षेत्रात जे अढळ ध्रुव पद मिळविले त्याला खरेच तोड नाही.
सर्व बहिणीत आशाजी एकट्या, ज्यांनी वडील मास्टर दीनानाथ यांची नाट्य पदे त्याच ताकदीने गायली. वडिलांच्या मूळ शास्त्रीय चिजा भाऊ हृदयनाथ यांच्याकडून आत्मसात करणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे खरे तर. पण हे आव्हान त्यांनी लीलया पेलले. त्यांनी गुलाम अली यांच्या बरोबर गायलेल्या गजला देखील त्यांचे वेगळेपण सिद्ध करतात. सिनेमातील क्लब डान्सची मधाळ गाणी गाण्यासाठी फक्त त्यांचाच गळा निर्माण केला परमेश्वराने खास ! त्यातील खट्याळपणा, शराबी बेछूटपणा फक्त आशाताईंच्याच सुरातून प्रगट होत असे. सिनेमातील काही भजने आपल्या स्वर्गीय सुरावटीने त्यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली.
ओ पी नय्यर अन् आशा हे सिने संगीताला लाभलेले वेगळेच कॉकटेल होते. ओपी ने लता वर बहिष्कार टाकलेला. या पार्श्वभूमीवर आशा – ओपी यांच्या जोडीने त्या काळात अक्षरशः धुमाकूळ घातला. आशाताईंची मुजऱ्याची गाणी असोत की खय्याम, नौशाद, मदन मोहन बरोबरची अस्सल शास्त्रीय रागावर आधारित काहीशी अनवट गाणी असोत, आशाताईंच्या रंग माझा वेगळा, या अट्टाहासची साक्ष देण्यास पुरेशा आहेत.
पुढे आर डी च्या रूपाने नवे वादळ आशाताईंच्या आयुष्यात आले. त्यांचे लग्नही झाले. पण सांसारिक दृष्ट्या त्या कुठेच स्थिरावल्या नाहीत. चांदणे शिंपीत जाशी मधील चंचला हीच त्यांची अस्सल मनोवृत्ती होती. म्हणूनच त्यांनी सगळे वाद तितक्याच बेछूट, बेफिकीर वृत्तीने झेलले. किशोरकुमार या आपल्या साथीदारांचा खट्याळपणा त्यांनी आपल्या आयुष्यात पुरेपूर आत्मसात केला. हातातला घास हिसकावला गेल्याचे (सी रामचंद्र यांचे या मेरे वतन के लोगो गाणे) विष देखील या धाडसी, गायकीने पचविले.
आशाताईंचे स्टेज वर मुक्तपणे नाचत गात वावरणे हा रसिकांसाठी सुखद अनुभव असायचा. काही बाबतीत लता आशा या दोघी बहिणी असूनही ती दोन टोकं होती असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. उंची साड्या, आकर्षक दागिने, केसात गजरा अशा वेशात आशाताईंचा लाईव्ह स्टेजवरील वावर हा नेहमीच नेत्र सुखद असे. श्रोत्यांचे कानाबरोबर नेत्रही तृप्त झाले पाहिजेत हा त्यांचा आग्रह असावा.
आशाताईंनी गायिलेली इतर भाषांतील गाणी देखील तितक्याच ताकदीने, विश्वासाने गायली आहेत. विशेष करून एस डी, अनिल विश्वास, सलील चौधरी, भूपेंद्र हजारिका यांच्याबरोबरची बंगाली गाणी याचा विशेष उल्लेख केला पाहिजे.
मराठी भावगीत क्षेत्रात तर त्यांचे ठळक योगदान मैलाच्या दगडासारखे आहे. सुरेश भट यांच्या गजला, श्रीनिवास खळे यांची गाणी, यशवंत देव, सुधीर फडके यांची भावगीते यांचे आशाताईंनी चक्क सोने केले आपल्या मधाळ स्वरांच्या परिस स्पर्शाने. भावगीतातील भाव त्यांच्या आरस्पानी गळ्यातून स्वर्गीय शराबी धुंदीसह अवतरत असे.

सर्व मंगेशकर बंधू भगिनीत सर्वात जास्त कष्टप्रद, वादळी, दुःखद आयुष्य आशाताईंच्या नशिबी आले. काही वर्षापूर्वी त्यांच्या मोठ्या मुलीचे आणि नंतर मुलाचे दुर्दैवी निधन झाले. इतर कौटुंबिक, व्यावसायिक, संघर्ष, वाद तर त्यांच्या पाचवीलाच पुजलेले ! पण अशा सर्व प्रसंगातून तावून सुलाखून निघण्याचे धैर्य त्यांच्या स्वर्गीय गळ्यातील दैवी स्वरांनी त्यांना दिले. श्रवणीय स्वर हाच त्यांचा श्वास होता. प्राण होता.
लता मंगेशकर पासून तर गीता दत्त, शमशाद बेगम, उषा मंगेशकर, तसेच दुसरीकडे रफी, मुकेश, किशोर, मन्ना डे यांच्या पर्यंत त्यांनी दिलेली स्वर साथ संगीत क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण करणारी होती. त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी होती. ते रसायन इतके छान जमून यायचे की जोडगोळीचे स्वर कानी येताच संगीतकार पटकन ओळखता यावा ! असे ते अभूतपूर्व संप्रुक्त द्रावण होते स्वर मद्याचे !
आशाताई उत्तम सुगरण होत्या. त्यांनी हॉटेलचा व्यवसाय देखील यशस्वीपणे केला. अनेक कौटुंबिक संकटे येऊन देखील त्या कधी डगमगल्या नाहीत. स्वतः.ज्या प्रमाणात आपल्या मुलाखतीत लता दीदींनी किंवा हृदयनाथानी सारखे आपल्या लहानपणाच्या गरिबीचे रडगाणे गायले, तसे धैर्यशील आशाताईंनी कधी केले नाही. त्यांनी कुठेच कधीही कसलीही तक्रार केली नाही. कुणाला दोष दिले नाहीत. त्यांनी आपण जे केले त्याची जबाबदारी स्वतः स्वीकारली. हे त्यांचे लक्षणीय मोठेपण म्हटले पाहिजे. घरातच तीव्र स्पर्धा असताना टिकून राहणे, एव्हढेच नव्हे तर आपले वेगळे सिंहासन, वेगळे राज्य निर्माण करणे, ते टिकवून ठेवणे.. या जिद्दीला खरेच साष्टांग दंडवत घातला पाहिजे.
आशाताईंच्या गजलातील, भावगीतातील, मधाळ स्वर, त्यांच्या नाट्यपदातील त्यांच्याच वडिलांची आठवण करून देणारा गंधर्व स्वर, त्यांच्या लावणीतील शृंगारिक स्वर, त्यांच्या उडत्या कॅबरे गाण्यातील अवखळ, चंचल स्वर…हे त्यांचे स्वतःचे एकमेवाद्वितीय स्वर साम्राज्य होते. आकाश कवेत घेणाऱ्या साम्राज्याची ती अनभिषिक्त सम्राज्ञी होती. महाराणी होती.
आशाताई म्हणजे तीन सप्तकातील सुरांचा खळाळता झरा होता. आता तर लता श्रेष्ठ की आशा श्रेष्ठ असे निरर्थक वाद करण्याचे ना वय उरले ना तशी तारुण्याने सळसळलेली साथ राहिली. किंबहुना या निरर्थकवादात आम्ही कोणे एके काळी आपली प्रतिभा वाया घालवली त्याबद्दल त्या दोघींचीही क्षमायाचना केली पाहिजे असे वाटते. हे उशिरा आलेले शहाणपण म्हणायला हरकत नाही.
या गंधर्व गायिकांचे, सम्राज्ञीचे एक बरे असते. त्या आपल्या सगळ्या स्वरांची श्रीमंती मागे सोडून जातात आपल्यासाठी. त्यामुळे संगीताचे विश्व कधीच पोरके वगैरे होत नाही. लता, आशाचे स्वरसाज आपल्या हृदयाच्या लॉकर मध्ये सुरक्षित असतात. त्यांच्या मागे राहिलेल्या स्वरांच्या श्रीमंतीमुळे हा देश कधीच गरीब होणार नाही.
आशाताईंना विनम्र साष्टांग अभिवादन.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
