“चाफा बोलेना, चाफा चालेना” हे अजरामर गीत लिहिणाऱ्या कवी, नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी “बी” यांची आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने हा विशेष लेख…..
कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी “बी”
हे लक्ष्मीबाई उर्फ अन्नपूर्णाबाई आणि मुरलीधर बाजीराव गुप्ते यांचे ज्येष्ठ अपत्य. त्यांचा जन्म १ जून १८७२ रोजी झाला. त्यांचे घराणे रायगड जिल्ह्यातील पेण जवळ असलेले “वाशी” हे आहे .
कवी बी यांना चार भाऊ आणि तीन बहिणी होत्या. कवी बी यांचा पहिला विवाह १८८७ मध्ये वणी येथील मार्तंडराव प्रधान यांच्या कन्येशी झाला. परंतु अल्पावधीत त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांचा एक वर्षाच्या आत दुसरा विवाह अमरावती येथील गोविंद रावजी सुळे यांची कन्या कु .सुंदर यांच्याशी झाला. विवाहानंतर सुंदर सुळे, लक्ष्मीबाई गुप्ते झाल्या. उभयतांस पाच मुली व एक मुलगा. सन १८८९ मध्ये कवी बी यांच्या वडिलांचे व पाठोपाठ दोन महिन्यांनी आईचे निधन झाले. नाशिक येथील गजानन महाराज हे कवी बी यांचे सर्वात लहान बंधू.
ज्ञानेश्वरीची परंपरा अध्यात्म वादाने कायम राखणारे कवी म्हणून कवी ” बी ” यांची खास ओळख आहे . जुन्या मराठी संत कवींच्या अभंग वाडःमयाचा आणि जातिवंत शाहिरांच्या लावण्या – पोवाडे यांचा मार्मिक अभ्यास करून कवी “बी” यांनी आपली शब्द संपदा कमावली.
कवी बी यांची पहिली कविता “प्रणय पत्रिका” १८९१ साली ” करमणूक ” मध्ये प्रसिध्द झाली. त्यांनी एकूण ४९ कविता लिहिल्या. १९३४ साली त्यांचा पहिला कविता संग्रह “फुलांची ओंजळ” प्रकाशित झाला. त्याला आचार्य अत्रे यांची प्रस्तावना लाभली. अकरा कवितांचा समावेश असलेला “पिकले पान” हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
मराठी काव्यात ” बी ” यांचे स्थान त्यांच्या अवघ्या दोनच कवितांनी अढळ केले आहे. त्या कविता म्हणजे
“कमला” आणि “चाफा बोलेना”. या दोन कवितांनी रसिकांना वेड लावले आणि कवी “बी ” यांना प्रसिध्दीच्या शिखरावर बसवले .
कवी “बी ” हे उत्क्रांतीवादी होते. समाजविघातक रूढींचा आणि संस्थाचा नायनाट होऊन जनता सामर्थ्यवान व्हायला पाहिजे असे त्यांना मनापासून वाटत होते . ३० ऑगस्ट १९४७ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी हा प्रतिभावंत कवी काळाच्या आड गेला. त्यांचे निधन होऊन ७४ वर्ष पूर्ण झाली आहेत तरी त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही .
१ जून २०२२ रोजी कवी बी यांची १५० वी जयंती आहे .त्यामुळे १ जून २०२१ ते १ जून २०२२ हे कवी “बी ” यांचे ” शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष ” आहे . तसेच ३० ऑगस्ट २०२२ रोजी कवी बी यांची ७५ वी पुण्यतिथी आहे. त्यामुळे ३० ऑगस्ट २०२१ ते ३० ऑगस्ट २०२२ हे त्यांचे “अमृत महोत्सवी पुण्यतिथी ” वर्ष आहे. विविध शैक्षणिक, साहित्यिक संस्थांनी कवी ” बी ” यांच्या संदर्भात खास कार्यक्रम आयोजित करून त्यांना आदरांजली वहावी अशी अपेक्षा आहे.

– लेखन : दिलीप प्रभाकर गडकरी
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800
उत्तम कविची माहिती आणि आशयघन कवितेचा रसाळ भाषेत सुरेख परिचय. आभार.
चाफा बोलेना… एक उत्तम लेख!