Saturday, July 5, 2025
Homeकलाचित्रगीत : देशभक्तीपर गीतं

चित्रगीत : देशभक्तीपर गीतं

१५ ऑगस्टला स्वातंत्र दिनी दिल्लीत लाल किल्यावर फडकणारा तिरंगा असो की २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे राजपथावरील संचलन, लष्करी कदमतालच्या लयीत वाजणारी, ‘सारें जहांसे अच्छा, हिन्दुस्ता हमारा’ ची धून, प्रत्येकाच्या मनात देशप्रेमाची लहर आणि उत्साह, निर्माण करते. देशासाठी सर्वोच्च त्याग, बलिदान आणि शौर्याचे प्रतिक असलेल्या वीर जवानांप्रती देशवासीयांना नतमस्तक होण्यास प्रवृत्त करते. शाळकरी, तरुण असो की वयस्क, आपल्या सर्वांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करण्यात, ती सतत जागृत ठेवण्यात आणि वृद्धिंगत करण्यात देशभक्तीपर गीत संगीताचा फार मोठा सहभाग आहे. चित्रपट संगीत आणि विशेष करून हिंदी सिनेमातील अशा अनेक लोकप्रिय गीतांनी आपल्या मनावर केलेले गारुड कायम आहे. राष्ट्रीय एकता आणि एकात्मता, विविधता जपणारी, ‘हम सब एक है’ चा नारा बुलंद करणारी आणि ‘मह्जब नही सिखाता, आपस मे बैर रखना‘चा संदेश देणाऱ्या काही निवडक अनमोल गीतांचे, १५ ऑगस्ट २०२१ निमित हे स्मरण.

राष्ट्रीय दिना निमित्त सर्वत्र सण उत्सवाचे वातावरण असते. सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रत्येक जन त्यात सहभागी असतो. सर्वत्र तिरंगा लहरत असतो. या वातावरणात चित्रपट, दूरचित्रवाणी, रेडीओ, समाज माध्यमे आणि ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून अनेक जुनी नवी गीतं आपल्या कानावर पडतात. त्याच्या चित्रफिती पहावयास मिळतात. जुने नवे कलाकार त्यांच्या आठवणी जागवतात. अनेक शूर वीर स्वातंत्र सैनिकांचे, हुतात्मे आणि अनेक थोर नेत्यांचे स्मरण होते. नव्या पिढीला त्याची ओळख होते. स्वातंत्र चळवळ गतिमान करण्यात मोठा सहभाग असलेली अनेक गाणी या निमित्ताने आठवतात. ओठावर येतात.

बंकिमचंद्र यांचे ‘वंदेमातरम’
(आनंद मठ) हे असेच एक गीत. परकीय इंग्रज सत्तेविरोधात जनमानसाला प्रेरित करण्याचे मोठे काम या गीताने केले होते. कवी रवींद्रनाथ टागोर लिखित ‘जणगणमन’ हे तर आपले राष्ट्रगीत.

एके काळी खूप गाजलेले पण सध्या विस्मरणात गेलेले, किस्मत (१९४२) या सिनेमातील,‘ आज हिमालय के चोटी से हमने पुकारा है, दूर हटो ये दुनियावालो हिंदुस्थान हमारा है,’ चे स्मरण होते. स्वातंत्रत्तोर काळात अनेक सुमधुर आणि अर्थपूर्ण देशभक्ती गीतांनी भारतीय मनावर राज्य केले. ‘ये मेरे वतन के लोगो’ने ..पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या डोळ्यात पाणी आणले होते.

राष्ट्रीय दिनानिमित ही गाणी अनेक आठवणींचे स्मरण करून देतात. त्यात देशाचे रक्षण करणारे सैनिक यांचा गौरव असतो. त्याचबरोबर राष्ट्र उभारणीत योगदान देणाऱ्या प्रत्येक नागरिक ज्यामध्ये विविध सामाजिक, राजकीय नेते, संशोधक, शेतकरी, शिक्षक, विदयार्थी, कर्मचारी व कष्टकरी यांना अधोरेखित करीत गुणगान केलेले असते.

अशा अनेक प्रेरक गीतांमध्ये प्रामुख्याने लक्षात राहतात ते, “ये देश है वीर जवानोंका, अलबेलों…. (नया दौर), किंवा मेरे देश की धरती, सोना उगलें उगलें हिरे मोती (उपकार),  ‘नन्ना मुन्ना राही हुं, देशका शिपाई हूं’ (सन ऑफ इंडिया), ‘छोडो कल की बातें, कल की बात पुरानी’ (हम हिंदुस्थानी) ,’सर कटा सकते है मगर सर झुका सकते नही,’ (लीडर),’ आय लव माय इंडिया’ (परदेश) ‘हम उस देश के वासी है, जिस देश मे गंगा बहती है’ (जिस देश मे गंगा बहती है), ’जहां डाल डाल पर, सोने की चिडीया करती है बसेरा’ (सिंकदर ए आजम),’ ये प्रीत जहां की रीत सदा’ (पुरब और पश्चिम)’ऐसा देश है मेरा’ (वीर –जारा), ‘दे दी हमे आजादी’ (जागृती), ‘भारत हमको जानसे प्यारा है’ (रोजा), ‘ए मेरे वतन के लोगो,’ ‘मेरे देश की धरती’ (उपकार), ‘ए वतन तेरे लिये’ (कर्मा), संदेशे आते है (बोर्डर),‘ मेरा मुल्क मेरा ये वतन’( दिल जले ),’इंसान की डगर पर’ (गंगा जमना) ‘अब तुम्हारे हवाले वतन साथी यो’ (हकीगत) ‘ए मेरे प्यारे वतन’ (काबुलीवाला) ‘नन्ने मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी मे क्या है’ (बूट पोलिश), ‘सर फरोशी की तम्मना है’ (शहीद भगत सिंग), ‘मेरा रंग दे बसंती’ (शहीद), ‘सारे जहांसे से अच्छा’,’ दे दी हमे आजादी तुने खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल, या सारखी अनेक गीते प्रामुख्याने कानावर पडतात.

ए आर रेहमान यांचे ‘वंदे मातरम’ मधील ‘मां तुझे सलाम’, लक्ष सिनेमातील ‘कधों से मिलते है कंधे, कदमो से कदम मिलाते है’ किंवा ‘फना’ चे ‘देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला’,फिल्म राजी चे ‘ए वतन आबाद रहे तू’ ही लोकप्रिय गीते तरुण मनाला साद घालतात. तर मिले सूर मेरा तुम्हारा सारखी चित्रफित पाहताना व ऐकताना आपण मंत्रमुग्ध होतो.

अनेक नामवंत कवी आणि शायरांच्या लेखणीतून ही अजरामर गीते उतरलेली आहेत. त्यात कवी प्रदीप, प्रेम धवन, राजा मेहंदी अली खान, शकील बदायुनी, इंदीवर, राजेंद्र किशन, कैफी आजमी, गुलशन बावरा, आनंद बक्षी, शैलेन्द्र, बिस्मिल अजीमावादी, जावेद अख्तर, नीरज, गुलजार, प्रसून जोशी आदि नामवंत कवी आहेत. कित्येक दिग्गज कलाकारांनी आपल्या जादुई सुरेल आवाजात ही गीते अजरामर केली आहेत या रचनांना गान कोकिळा लता मंगेशकर, आशा भोसले, आमीर बाई कर्नाटकी, मोहमंद रफी, मन्नाडे, मुकेश, किशोर कुमार, राकेश काला, महेंद्र कपूर ते रूप कुमार राठोड, कुमार सानू, कविता कृष्ण मूर्ती, हरीहरन, उदित नारायण, शंकर महादेवन, दलेर मेहानी, के.एस.चित्रा, मनमोहन वारीस, अर्जित सिंग, कुणाल गन्जीवाला पर्यंत आवाज लाभला आहे. तर गुलाम हैदर, अनिल बिस्वास, मदन मोहन, हंसराज बहल, कल्याणजी आनंदजी, शंकर जयकिसन, सी रामचंद्र, हेमंत कुमार, नौशाद, एस.डी बर्मन, अनु मलिक आदि अनेक महान संगीतकारांनी अवीट सुरात ती सजविली आहेत.

दिलीप कुमार, राज कपूर,प्राण, मनोज कुमार, अजित, प्रेम चोप्रा, मदन पुरी, बलराज सहानी, सुनील दत्त, धर्मेंद्र, प्राणनाथ, अभिताभ बच्चन, अमरीश पुरी, सनी देवल अशा अनेक जुने नवे दिग्गज कलाकारांनी पडद्यावर आपल्या जिवंत अभिनयातून न्याय दिला आहे. अनेक ज्ञात अज्ञात सहकलाकारांचे योगदान देखील महत्वाचे आहे.

थोडक्यात, या विविध गीतांनी आपणास खूप समृद्ध केले आहे. या गीतांच्या माध्यमातून येथील विविधता, संस्कृती, इतिहास आणि भुगोल यांचे दर्शन होते. देशाची एकता आणि एकात्मता तर या गीतांचा प्राण आहे.आपण सर्व एक आहोत. देश सर्वांचा आहे आणि त्याच्या विकासात सर्वांचा सहभाग आहे. हा संदेश देणारी ही गीते आपला अनमोल खजिना आहे.सर्वांसाठी तो गौरव आहे.

डॉ. त्रंबक दूनबळे

– लेखन : डॉ त्र्यंबक दूनबळे
– संपादन :  देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments