पर्यटन म्हणजे हिंडायला फिरायला प्रत्येकाला आवडते. प्रत्येकजण आपली आवड वेळ आणि आर्थिक कुवत लक्षात घेऊन हिंडत फिरत असतो. देशात, राज्यात आणि शक्य झाले तर विदेशातील प्रसिद्ध ठिकाणी भेट देतो.
पर्वत रांगा, किल्ले, समुद्र किनारे, लेणी, जंगले, वाळवंटी प्रदेश, वस्तूसंग्रहालय यांचा आनंद घेतो. सिनेमा माध्यम तर नेहमीच देश विदेशातील अशा अनेक पर्यटन स्थळांची नेत्रसुखद भेट घडवीत असते.
सुंदर सुंदर चित्रीकरणाबरोबरच विविध मूड असलेली गीत संगीत तर मेजवानीच.
खरं तर जीवन म्हणजे एक प्रवासच असतो. जागतिक पर्यटन दिनानिमित (२७ सप्टेंबर) हिंदीतील निवडक जुन्या नव्या गीत सफरीचा हा आनंद……
थोर अभिनेते दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांचा मधुमती (१९५८) आठवतो त्यातील मधुर गाण्यांमुळे. त्यातील ते ‘सुहाना सफर और ये मौसम है हंसी/ हमे डर है हम खो जाये कही’.. आणि चित्रपट पाहताना आपणच त्या निसर्गाच्या सानिध्यात हरवून जातो. ते हिरवेगार नटलेले जंगल, उंच पर्वत रांगा आणि खोल खोल दऱ्या, नदीचे आणि झऱ्याचे फेसाळत वाहणे. त्या पार्श्वभूमीवर नायकाचे मुक्त भटकणे आणि मुकेशच्या आवाजातील ते मधुर साद घालणारे, काळजाला भिडणारे गीत संगीत. बिमल राय दिग्दर्शित या सिनेमाला सलील चौधरी यांनी संगीत दिले होते.
‘जिंदगी एक सफर है सुहाना/यहां कल क्या हो किसने जाना/ मौत आनी है आयेगी एक दिन/ जान जानी है जायेंगी एक दिन/ ऐसी बातों से क्या घबराना/ यहां कल क्या हो किसने जाना.. अंदाज (1972) सिनेमातील गीत. नायक राजेश खन्ना नायिका हेमामालिनी. मोटार सायकलवरून बेफिकीरपणे वेगात रपट करताय. किशोर कुमारच्या खट्याळ आवाजातील हे गीत लक्षात राहते ते जीवन प्रवासातील अनिश्चितेमुळे. हसरत जयपुरी यांनी लिहिलेल्या या गीताला शंकर जयकिशन यांनी सजविले होते.
’ये दिल ना होता बेचारा/कदम ना होता आवारा/ खूबसुरत कोई/ हमसफर होता’..हातातील काठीला मासे लटकावून पायी तिरके चालत मागवून येणाऱ्या नायिकेच्या मोटार गाडीची अडवणूक करणारा नायक देवानंद म्हणजे सदाबहार अभिनय. किशोर कुमार यांच्या आवाजातील हे गीत आहे ‘ज्वेल थीफ’ या सिनेमातील. मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या या गीताला एस डी बर्मन यांनी संगीत दिले होते.
मग भेटीला येतो टांग्यातून सफर करणारा नायक जितेंद्र. ‘परिचय’ (1972)सिनेमा.’मुसाफिर है यारों/ ना घर है ना ठिकाना/मुझे चलते जाना है/ बस चलते जाना है .. घोड्याच्या टापाच्या तालावर गुंजत जाणारे किशोर कुमार यांच्या आवाजातील हे गाणं कानात मग घोळत राहते. गुलजार यांच्या गीताला आर डी बर्मन यांनी साज दिला आहे..
या प्रवासात मग देवानंद पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतात ते ‘सोलवा सावन’ या चित्रपटात. सोबत आहेत नायिका वहिदा रहेमान आणि हास्य कलाकार सुंदर. हे तिघे आता रेल्वेतून प्रवास करताय.नायिकेला उद्देशून नायक गीत गातोय आणि त्याचा साथीदार माऊथ ऑर्गनवर साथ करतोय..‘ये अपना दिल तो आवारा/ न जाने किस पे आयेगा/ हसीनों ने बुलाया, गले से भी लगाया/ बहुत समझाया यही न समझा/ बहुत भोला है बेचारा / न जाने किस पे आयेगा ..हेमंत कुमार यांच्या आवाजातील हे गीत आजही तितकेच लोकप्रिय आहे. भूले बिसरे गीत किंवा तराणे पुराने ऐकताना ते हळूच मनाच्या कोपऱ्यातून बाहेर येत आनंद देते.
काश्मीरच्या बर्फाळ पर्वत रांगेत आणि जंगल भागातून चार मित्र फिरत आहेत. त्यांच्यावर चित्रित ‘माचीस’
(१९९२) सिनेमातील गुलजार लिखित या गाण्याने धमाल केली होती. ’छोड आये हम ओ गलिंया/ जहां तेरे पैरो के/ कवल गिरा करते थे/ हंसे तो गालों में भवर पडे करते थे’. ओमपुरी, तब्बू आणि चंद्र्चुर सिंग यांनी अभिनित केलेल्या या चित्रपटातील गाण्यांना हरिहरन, सुरेश वाडकर आणि कृष्णकुमार यांनी आवाज दिला होता. तर संगीत होते विशाल भारद्वाज यांचे.
रणबीर सिंग आणि प्रियांका चोप्रा यांचा ‘बर्फी’ हा अलीकडे गाजलेला चित्रपट. त्यातील पापोना आणि सुनिधी चौहान यांनी गायलेले निलेश मिश्रा लिखित आणि प्रीतम यांनी संगीत दिलेले हे गीत जीवन प्रवासा विषयी खूप गंभीर भाष्य करते.’ क्यो, ना हम तुम/चले तेढे मेढे से रास्तो पे नंगे पावों से/ भटक लेना बावरे.. खरं आहे, सरळ धोपट मार्गानेच गेलं पाहिजे असं नाही. कधी वेगळ्या वाटेचा अनुभव देखील घेतला पाहिजे.
मै जिंदगी का साथ ‘निभाता चला गया/ हर फिक्र को धुवे मे उडाता चला गया’ हे देवानंद यांच्यावर चित्रित एक गाणं. चित्रपट ‘हम दोनो’ (१९६१)अत्यंत लोकप्रिय. मोहमद रफी यांच्या आवाजातील आणि जयदेव यांनी संगीतबद्ध केलेले गीत. जीवनात येणाऱ्या सु:ख दुख आणि अडचणीची पर्वा न करता आनंदी व मस्त मजेत जीवन जगण्याचा संदेश देणारे हे गीत. देव आनंद, नंदा, साधना आणि ललिता पवार यांच्या अभिनयासाठी लक्षात राहणारा चित्रपट. दिलीप राज आणि देवानंद या त्रिकुटाने चित्रपट रसिकांवर अनेक वर्षे मोहिनी घातली. त्यातील सबकुच राजकपूर असलेला आवारा (१९५१) म्हणजे गीत संगीताचा खजिना. लोकप्रियतेचा कळस. या सिनेमातील ‘आवारा हूं आवारा हूं / या गर्दिश मे हूं आसमान का तारा हूं’. आवाज मुकेश. गीत शैलेंद्र. संगीत शंकर जयकिशन.कलाकार राजकपूर आणि नर्गिस.
’वहां कौन है तेरा मुसाफिर जाएगा कहा/दम लेले घडी भर ये छिया जाएगा कहा’ हे ‘गाईड’ (१९६५) या गाजलेल्या चित्रपटातील देवानंद वर चित्रित, शैलेन्द्र लिखित आणि सचिनदा बर्मन दा यांनी गायलेले व संगीत दिलेले गीत जीवन सफरीचे दर्शन घडविते. तर हम है राही प्यार के/ हमसे ना कुछ बोलिए हे/ जो भी प्यार से मिला/ हम उसी के हो लिए’. ‘नौ दो ग्यारह’ (१९५७) सिनेमातील देवानंदवर चित्रित चुलबुले गीत. किशोर कुमार यांच्या आवाजात कृष्ण धवल चित्रपटातील एक सदाबहार प्रवास गीत.
‘रोजा’(१९९२) चित्रपटातील ये ‘हसी वादिया, ये खुला आसमा/ आ गए हम कहा, ए मेरे साजना/ हे गीत बर्फाळ पर्वत रांगेचे विलोभनीय दर्शन घडविते. एस बालसुब्रमनियम आणि चित्रा यांनी गायलेले, ए आर रेहमान यांनी संगीत दिलेले हे सर्वोत्तम गीत आहे. असेच एक सुंदर गीत आहे ‘हम है राही प्यार के’ सिनेमातील. आमिरखान आणि जुही चावला या कलाकारांवर चित्रित. ‘युंही कट जाएगा सफर साथ चलने से/की मंजिल आयेगी नजर साथ चलने से/ कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी गायलेले. नदीम श्रवण यांनी संगीत दिले आहे.समीर यांनी गीत लिहिले आहे. सोबतीने प्रवास केला तर तो सुखद होतो हाच संदेश या गीताने दिला आहे.
खरं आहे प्रवासात संगीत आणि सोबत असेल तर किती मजा येते. आनंद मिळतो.

– लेखन : डॉ त्र्यंबक दुनबळे
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800
धन्यवाद साहेब अप्रतिम, चित्रगीत: सुहाना सफर
लेख वाचताना आनंद मिळतो.मन भूतकाळात जाते,
अवतीभवतीच्या जगाचा विसर पडतो. वयाचा विसर पडतो.सर्व विसरून तरुण झालेलं मन फील्मी प्रवास सुरू करतं सर
अप्रतिम चित्रीत: सुहाना सफर,