Tuesday, September 16, 2025
Homeकलाचित्रगीत

चित्रगीत

आज पासून दिवाळी सुरू होत आहे. यानिमित्ताने या चित्रगीतमध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटातील काही जुनी नवी गाणी आपल्या भेटीसाठी.

दिवाळी सण गरीब, श्रीमंत सर्वांसाठी आनंद व उत्साहाचा प्रसंग. मिठाई, नवीन कपडे, मुलांसाठी फटाखे अशी कितीतरी खरेदीसाठी बाजार सजतात. साहजिकच या उत्साहाच्या नादात बराच खर्च होतो.

आधीच महागाईने सामान्य जणांचे कंबरडे मोडलेले. मग करायचे काय ? जॉनी वाकर या विनोदी कलाकाराचे ‘पैगाम‘ (1959) सिनेमातील हे गाणं ऐका. बघा, तो काय म्हणतोय दिवाळीबाबत. ‘कैसे दिवाली मनायेगे लाला, अपना तो बारा महिने दिवाला/ हम तो हुवे ठणठण गोपाला, अपना तो बारा म्हणणे दिवाला/ ..’ रफी यांच्या आवाजातील आणि सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेले हे गाणं ऐकताना अन्न धान्य, पेट्रोल, डिझेल, गॅसची भाववाढ आणि महागलेला प्रवास अनुभवताना, खरंच दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न पडतो. पण तरी काहीही करून सामान्य लोक सण साजरा करीत त्याचा आनंद घेतात.

नजराना (1961) चित्रपटात नायिका वैजयंतीमाला या गीतातून असाच आनंद व्यक्त करीत आहे. ‘मेले है चिरागो के, रंगीन दिवाली है/महका हुआ गुलशन है, हसता हुआ माली है’.. लताजींच्या आवाजातील या गाण्याला रवी यांनी संगीत दिले. पण या प्रकाश उत्सवाला अनेकदा निराशा, उदासी अशा अंधार भावनेची किनार लाभते.

नजराना चित्रपटातील हीच निराशा, ‘एक वो भी दिवाली थी, एक ये भी दिवाली है/उजडा हुआ गुलशन है, सोता हुआ माली है/..मुकेश यांच्या आवाजात प्रकटली आहे.

या निमित्ताने रतन (1944) या सिनेमातील जोहराबाई या प्रसिद्ध गायिकेने गायलेलं गाणं आठवतं. ‘आयी आयी दिवाली, दीपक संग पतंगा नाचे/मै किसके संग नाचू बता जा..’.नौशाद याचं संगीत. मनोजकुमार आणि मालासिन्हा अभिनित ‘हरियाली और रास्ता‘ (1962) या सिनेमातील हे दिवाळी गीत खूप गाजलेले. लाखो तारे आसमान में, एक मगर धुंढे ना मिला/देख के दुनिया की दिवाली, दिल मेरा चुपचाप जला/.. ‘मुकेश लता यांचा आवाज, शैलेंद्र यांचे गीत आणि संगीत शंकर जयकिशन.

मराठी चित्रपटात देखील दिवाळी उत्सवाचे चित्रीकरण दिसते. दिवाळी सणानिमित्त भाऊबीजेला खूप महत्व असते. ते देखील अनेक लोकप्रिय गीतातून अधोरेखित झाले आहे. त्यातील काही जुनी नवी गीते आजही ओठावर येतात. त्यातील ‘भाऊबीज‘ सिनेमातील हे गीत – ‘सोनियाच्या ताटी उजळल्या जोती/ओवाळते भाऊराया, वेड्या बहिणीची ही माया’ खूपच लोकप्रिय आहे. रंजनकुमार आणि कवी संजय यांनी लिहिलेल्या या गीताला वसंत मोहिले यांनी संगीत दिले आहे.अष्टविनायक चित्रपटातील ‘आली माझ्या घरी दिवाळी, सप्त रंगात न्हाऊन निघाली’ या अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील सुरेल गीतावर सचिन आणि वंदना पंडित यांनी बहारदार अभिनय केला आहे

तर आई चित्रपटात ‘आली दिवाळी आली दिवाळी’ असेच सुंदर गीत आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, आशा काळे आणि रमेश भाटकर यांचा सुंदर अभिनय.

बायकोचा भाऊ‘ या चित्रपटात, ‘आली दिवाळी हे गाणं आशा भोसले यांच्या आवाजात ऐकायला मिळते.

‘रक्तकांचणी लावून ज्योती, मंगलमय सजवून आरती/बहीण लाडकी भाऊराया, ओवाळू लागली, दिवाळी आली’ फारच सुरेख गीत आहे. लता, उषा आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेले, ‘शिकलेली बायको‘ या सिनेमातील गाणं अभिनेत्री उषा किरण यांच्यावर चित्रीत झालेले. शब्द आहेत -‘हर्षाचा दिवाळी सण आला’. कधीतरी कानावर पडतंय.खूपच श्रवणीय आहे. संगीत वसंत प्रभू.

असेच लताजींच्या आवाजात, ‘दिवाळी येणार अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी/आमच्या घरी तुमच्या घरी/ श्रवणीय आहे.

चित्रपटात अनेक प्रसंगी गीत व नृत्याची रचना पहावयास मिळते. दिवाळी निमित्त तर अनेक चित्रपटात ही पार्श्वभूमी दिसते. ‘कभी खुशी कभी गम‘ या फिल्मच्या टायटल गीतात दिवाळी उत्साह चित्रीत केला आहे. तर ‘वास्तव‘ या चित्रपटात अभिनेता संजय दत्त हा गुंड बनल्यावर आपल्या आईला भेटायला येतो. गळ्यात सोन्याच्या चैन आणि नोटांचे बंडल, तो आई अभिनेत्री, रिमापुढे करतो. त्यातील ‘पचास तोला’ है’ आणि आईला विकत घेतो का ? हा माय लेकातील सीन व संवाद खूपच गाजला होता. त्याला पार्श्वभूमी आहे दिवाळी रोषणाई आणि झगमगाटाची.

कमल हसन, तब्बू, अमरीश पुरी आणि जॉनी वाकर यांच्या अभिनयाने गाजलेला तुफान विनोदी सिनेमा म्हणजे ‘चाची 420‘. कमल हसन गोडबोले चाची बनून दुर्गाप्रसाद यांच्या घरी येतो तेव्हा फटाकांच्या आवाजाने कशी धमाल उडते याचे चित्रण पहावयास मिळते. ‘हम आपके है कौन‘ चित्रपटात ही साजरी झालेली दिवाळी प्रेक्षकांचे असेच मनोरंजन करते.

दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा असं म्हटलं जातं. त्याचे कारण प्रत्येकजण आपल्या परीने हा दिव्याचा उत्सव साजरा करतो. रांगोळी, पणती, कंदील, आकाशदिवे, फटाके, मिठाई, गाठीभेटी आदीद्वारे आनंद साजरा करतो. आनंद साजरा करणे हे तर सण उत्सवात महत्वाचे.

चला मग आपणही या निमित्त एकमेकांना शुभेच्छा देत ‘चित्रपट गीताचा’ आनंद घेऊ.

डॉ. त्रंबक दूनबळे

– लेखन : डॉ.त्र्यंबक दुनबळे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. धन्यवाद साहेब
    चित्रीत अतिशय सुंदर आढावा घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments