दीपावली हा आशेचा, प्रकाशाचा सण. या निमित्ताने या आशयाची चित्रपट गीतं या चित्रगीतमध्ये पाहू या….
तोरा मन दर्पण कहलाये…
दीपावली म्हणजे प्रकाशाचा उत्सव. विद्दुत रोषणाई, आकाश कंदील आणि फटक्याच्या आवाजात तो निनादत आहे. पण या प्रकाश उत्सवाला अंधाराची, निराशा आणि दु:खाची एक किनार देखील आहे. कोरोना, बेरोजगारी, अतिवृष्टी आणि वाढत्या महागाईमुळे हजारो लोकांच्या जीवनात अंधार पसरला आहे. तसं प्रत्येकाच्या जीवनात हा आशा निराशेचा खेळ सुरु असतो. अशा वेळी अंधारत काजवा चमकावा तसे एखादे गीताचे बोल कानावर पडतात. ते मनातील मळभ दूर करतात. अंधारलेले मनाचे आकाश चांदण्या आणि तारे यांनी तेजाळून जाते.
अनेक गीतकार, शायर, कवी, गायक आणि कलाकारांनी आपल्या जादुई शब्द आणि आवाजाने ही कमाल करतात. चित्रपट गीत संगीताच्या माध्यमाने हे हे मन उजीयाराचे काम नेहमीच केले आहे. अशाच काही चित्रपट गीतांचा हा फेरफटका.
‘बातो बातो मे’ हा अमोल पालेकर आणि टीना मुनीम, डेविड, लीला मिश्रा अभिनित बासू भट्टाचार्य यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा. आठवतोय. त्यातील हे एक गाणं. ‘कहा तक ये मन को अंधेरे छलेंगे/ उदासी भरे दिन कही तो ढलेंगे/ कभी सुख कभी दुख यही जिंदगी है/ ये पतझड का मोसम घडी दो घडी है / नये फुल कल पतझड मे खिलेंगे. (आवाज किशोर कुमार, गीत योगेश, संगीत राजेश रोशन)
कधी कधी मन खूप निराश होते. सर्वापासून दूर जावे असे वाटते. ‘पौर्णिमा’ धर्मेंद्र आणि मीनाकुमारी अभिनित ‘पौर्णिमा’ या सिनेमात नायक असंच ‘तुम्हे जिंदगी के उजाले मुबारक, अंधेरे हमे अब रास आने लागे है’ म्हणत जीवनापासून दूर जातो. मुकेश यांच्या आवाजातील या गीताला कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिले आहे.
‘उजाला’ हा शम्मी कपूर आणि माला सिन्हा यांचा एक गाजलेला चित्रपट. त्यातील हे गाणं खूपच भावपूर्ण आहे. ’अब कहा जाये हम ये बता दे जमीं, इस जहाँ मे कोई हमारा नही/ अपने साये से भी, लोग डरने लगे, अब किसी का किसी पर भरोसा नही/ (गा.मन्नाडे, गीत शैलेन्द्र संगीत शंकर जयकिशन)
तर ‘कहां जा रहा है ओ जानेवाले, अंधेरा है मन का दीया या तो जला ले, ये जीवन सफर है जो अंधा सफर है, बह्का है मुमकिन भटनेका का डर है, संभलता नही दिल किसीके संभाले/ सीमा चित्रपटातील गीत आजही कानावर पडले तरी निरास मनात किरणाची बरसात करत. मो.रफी यांचा आवाज. गीत अमय चक्रवर्ती आणि संगीत शंकर जयकिशन. बलराज सहानी, नूतन आणि शोभा खोटे यांनी केलेला बहारदार अभिनय आजही अविस्मरणीय.
राजेश खन्ना आणि स्मित्ता पाटील यांचा अभिनय. मनातील आशा निराशा यांना उत्तर देणारा ‘आखिर क्यों’ एक सुंदर चित्रपट. त्यातील कितीही निराशा आली तरी निराश होऊ नये हा संदेश देणारे हे गीत. ’एक अंधेरा लाख सितारे, एक निराशा लाख सहारे/ सबसे बडी सौ बात है जीवन, नादान है जो जीवन से हारे/ मोहमद आजीज यांनी गायलेले हे गीत इंदीवर यांनी लिहिले आहे तर संगीत दिले राजेश रोशन यांनी.
नेहमी ताठ मानेने जगा. कितीही संकटे आली तरी घाबरू नका. या अर्थाचे खूपच लोकप्रिय असलेले महेंद्र कपूर यांच्या पहाडी आवाजातील हे गीत. ’न मुँह छुपा के जिओ, और ना सर झुका के जिओ, गमों का दौर भी आये तो मुस्कराते जिओ/ चित्रपट हमराज. कलाकार सुनील दत्त आणि बबिता. गीत शाहीर लुधियानवी. संगीत रवी.
खरं तर आशा निराशा हे मनाचे खेळ असतात. आपले मन आपला आरसा असतो आणि त्यात आपण जे काही करतो ते त्याचे दर्शन होत असते. ‘तोरा मन दर्पण कहलाये, भले बुरे सारे कर्मो को देखे और दिखावे/ मन ही देवता मन ही ईश्वर,मन से बडा न कोई/मन उजीयारां जब जब फैले, जग उजियारा होय../ काजल चित्रपटातील आशा भोसले यांचं आवाजातील हे गाणं ऐकताना हीच भावना मनात उचंबळून येते. रवी यांचे संगीत असलेला चित्रपट धर्मेंद्र, राजकुमार आणि मीनाकुमारी यांनी आपल्या अभिनयाने सजविलेला आहे.
‘जब उजियारा छाये मन का अंधियारा जाये/किरनों की राणी गाये, जागो हे मेरे मन, मोहन प्यारे/ जागो मोहन प्यारे, नव युग तुने नैन बिठाये/ जिसने मन का दीप जलाया, दुनिया को उसने ही उजला पाया/ जागते रहो चित्रपटातील हे गीत मनावर भाष्य वेधक करते. राजकपूर, नर्गिस, मोतीलाल अभिनित या सिनेमातील हे गीत लता मंगेशकर आणि कोरस मध्ये आहे. संगीत सलील चौधरी. अतिशय अर्थपूर्ण आणि चिंतनशील गीत.
तर हा आशा निराशेचा खेळ आपण सर्वच अनुभवत असतो. अंधार आणि प्रकाश, उन सावलीचा मेळ. या निमित्ताने आपण अंधारावर मात करून पुढे जाऊ. चित्रपटातील गीत संगीताचा आस्वाद घेताना हा संदेश मनात आहे.

– लेखन : डॉ त्र्यंबक दुनबळे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
धन्यवाद साहेब
चित्रगीत सदरातील सदाबहार गीते व प्रेक्षणीय चित्रपट.
अंधारातून प्रकाशाकडे मनातील अंधकार झटकून,
प्रकाशाकडे प्रवास हा सकारात्मक विचार लेखातून व्यक्त होतो.