भारतीय स्वातंत्र्याच्या अम्रुत महोत्सवाच्या वर्षात हिंदी चित्रपटातील लोकप्रिय ठरलेल्या १९४८ ते १९५७ वर्षातील गाणी पहिल्या भागात पाहिली.
आता आपण दुसऱ्या भागातील १९५८ ते १९६६ वर्षातील गाजलेली गाणी पाहू या…
१९५८…
१९५८ मध्ये तर एक नव्हे तीनत्रगाणी गाजली, लोकप्रिय ठरली. ‘मधुमती‘, या चित्रपटात सलील चौधरी यांनी स्वरबद्ध केलेले शैलैंद्रचे गीत “सुहाना सफर ये मौसम हसी” फारच गाजले.
त्याच दरम्यान ‘यहुदी‘ मधील “ये मेरा दिवाणापण है” मुकेशने गायलेले गाणं प्रेमवेडया तरुण मंडळींनी डोक्यावर घेतले. याबरोबरच गरीब श्रीमंत वर्गाची असमानता असलेले साहिर लुधियानी यांचे ‘फिर सुबह होगी‘ चित्रपटातील “वो सुबह तो कभी आयेगी” हे गाणं तेवढेच जनसामान्यांनी उचलून धरले.
१९५९…
‘कागज के फूल‘ या गुरूदत्तांच्या चित्रपटातील कैफी आझमी यांनी लिहिलेले व गीता दत्त यांनी गायिलेले “वक्तने किया” गाणं तितकच लोकप्रिय ठरलं.
बिमल राँय यांच्या ‘सुजाता‘ चित्रपटातील “जलते है जिसके लिए” हे गाणे तितकेच लोकप्रिय ठरले.
१९६०
‘मोगले आझम‘ या चित्रपटातील नौशाद यांनी संगीतबद्ध केलेले “प्यार किया तो डरना क्या” या लता मंगेशकरांनी गायिलेल्या गाण्याने तरूणाईत एक नवा विक्रम व जल्लोष निर्माण केला.हे गाणं पडद्यावर अनारकली झालेल्या मधुबालावर चित्रीत झाले या केवळ गाण्यासाठी तर अनेकांनी चित्रपट ५-६ वेळा पाहिला.
१९६१
‘हम दोनो‘ चित्रपटातील जयदेव यांनी संगीत बध्द केलेले “अल्ला तेरो नाम इश्वर तेरो नाम” हे भजन स्वरुपाचे गाणं एकात्मतेचा संदेश देणारे फारच लोकप्रिय ठरले.
‘काबुलीवाला‘ या चित्रपटातील मन्नाडे यांनी गायलेलं “अए मेरे प्यारे वतन” हे गाणं यावर्षी चांगलेच गाजले
१९६३…
यावर्षी कवि प्रदिप यांचे १९६२ च्या भारत-चीन युध्दातील शहीद झालेल्या जवानांसाठीचे लता मंगेशकर यांनी गायलेले “ऐ मेरे वतन के लोगो..जो शहीद हुए है उनकी झरा याद करो कुर्बानी” हे गाणं तुफान लोकप्रिय ठरले.
‘दिल ही तो है’ या चित्रपटात साहिर लुधियानवी यांनी संत कबीर यांच्या निर्गुण भजनाच्या पहिल्या ओळीच्या आधारलेलं “लागा चुनरी मे डाग छुपाऊ कैसे” हे गीतहि चांगलेच गाजले.
‘बंदिनी‘ या चित्रपटातील गुलजार यांचे “मोरा गोरा अंग लै ले” या गीताने देखील या वर्षात चांगलीच लोकप्रियता मिळवली.
१९६४
हे वर्ष भारताच्या द्रुष्टीने तसे वाईट गेले काश्मीर चा संघर्ष तसेच भारताचे पहिले पंतप्रधान पं नेहरु यांचे दुःखद निधन या पार्श्वभूमीच्या आधारे ‘चित्रलेखा’ या चित्रपटातील महमद रफी यांनी गायिलेले “मन रे “हे भावपूर्ण गाणं जनप्रिय ठरले ! ‘लीडर‘ या चित्रपटातील
“अपनी आझादी को हम” हे गीत चांगले लोकप्रिय ठरले.
‘वो कौन थी‘ या चित्रपटातील मदनमोहन यांनी सुरेल संगीतबध्द केलेले “नैना बरसे रिमझिम”या गाण्याने तर उच्चांक गाठला.
१९६५…
देव आनंद यांच्या ‘गाईड‘ या चित्रपटातील वहिदा रेहमान यांच्यावर चित्रीत झालेल्या व लतादिदींनी गायलेल्या “आज फिर जिनेकी तमन्ना है” हे गाणं फारच गाजले.
१९६६….
देवांशी संवाद असलेलं ‘तिसरी कसम‘ चित्रपटातील
“सजन रे झूठ मत बोलो” या गीताने रसिकांच्या ह्रदयाचा ठावच घेतला.

– लेखन : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800