भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंदी चित्रपटातील ७५ वर्षात गाजलेली गाणी पहात आहोत. आज आपण १९९६ ते २०१९ वर्षातील गाणी या पाचव्या आणि शेवटच्या भागात पाहू या…
१९९७…
‘बाँर्डर‘ हा चित्रपट चांगलाच गाजला. त्यातील “संदेसे आते है” गाणं देखील फारच लोकप्रिय ठरलं !
१९९८..
‘दिल से‘ या चित्रपटातील “आये अजनबी” हे उदित नारायण यांनी गायिलेले छैया छैयाचा त्यांत अंतर्भाव असल्याने तरुणाईत फारच गाजलं!
२००१..
यावर्षी दोन चित्रपटातील दोन गाणी खुपच लोकप्रिय ठरली. ‘लगान‘ चित्रपटातील ए.आर रेहमान यांनी संगीतबध्द केलेले “चले चलो” चांगलच गाजलं
~याच वर्षी “दिल चाहता है” चित्रपटातील त्याच नावाने सुरुवात केलेले “दिल चाहता है” हे गाणं तरूणांईत लोकप्रिय ठरले.विशेष म्हणजे या गीताचे संगीतकार “शंकर ऐहसान लाँय” हे तिघे संगीत दिग्दर्शक म्हणून याच चित्रपटातून उदयास आले
२००३…
‘कल हो ना हो’ हा चित्रपट, “कल हो ना हो” याच टायटल गाण्याने गाजला. गायक सोनु निगम तरुणाईत लोकप्रिय ठरला.
२००४…
अमेरिकेत नासा मधील एक इंजिनिअर स्वदेशाच्या प्रेमामुळे भारतात परत येतो या पार्श्वभूमीवर असलेला ‘स्वदेश‘ चित्रपट यावर्षी वेगळा अनुभव देऊन गेला.
यातील, “यह जो देश है” हे ए आर रेहमान यांनी संगीतबध्द केलेले गाणं चांगलचं लोकप्रिय ठरलं !
२००५…
मराठी गीत लेखक सदानंद किरकिरे यांच ‘हजारो ख्वाईशे ऐसी‘ या चित्रपटातीऊल गाणं “बावरा मन” ने तर बाँलिवुडमध्ये सदानंदजींनी आपला चांगलाच ठसा उमटविला. हे गाणं यावर्षात चांगलं लोकप्रिय ठरलं !
२००६…
‘रंग दे बसंती‘ चित्रपटातील, “रंग दे बसंती” हे देशभक्तीपर गाणं या वर्षी चांगलेच लोकप्रिय ठरले. पूर्ण चित्रपटात रामप्रसाद बिस्मीलचे अमर गीत “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है, देखना है जोर कितना बाज्-ए-कातिल मे है, ऐ शहीद-ए-मुल्क-ओ मिल्लत मै तिरे उपर निसार, ले तिरी हिम्मत का चर्चा गैर के महफिल मे है, वक्त आने दे दिखा देंगे तुझे,
ऐ आसमां, हम अभी से क्यूं बताएं, क्या हमारे दिल मे है” ऐकू येते. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते राकेश ओमप्रकाश मेहरा आणि अमीरखान मुख्य भुमिकेत होता. चित्रपट चांगलाच गाजला.
२००७…
‘चक दे इंडिया‘ चित्रपटातील याच नावाचे गीत अजूनही गाजते आहे.मुलींच्या हॉकी टीमवर आधारित या चित्रपटातील सुखविंदर सिंग यांनी गायलेले गीत प्रत्येक क्रीडा महोत्वात गायले जाते. अलीकडेच टोकियो आँलिंपिक मध्ये देखील प्रामुख्याने गायले गेले.
२००८…
‘स्लमडाँग मिलिनीयर‘ चित्रपटातील ए आर रेहमान यांनी संगीतबध्द केलेले “जय हो” या गाण्यास तर आँस्कर पुरस्कार दोन तांत्रिक बाबी साठी मिळाला होता. आजही ते गाणं लोकप्रिय झाल्याने सर्वत्र गायले जाते.
२००९…
“ओ परदेसी” हे अमिताभ भट्टाचार्य यांनी गायलेले ‘देव दी’ चित्रपटातील गाणं चांगल्यापैकी गाजलं.
२०११…
‘राँकस्टार‘ चित्रपटात मोहित चौहाण यांनी गायलेले “सदा हक” गीत तरुणाईत लोकप्रिय ठरले.
२०१३…
यावर्षी दोन चित्रपटापैकी ‘आशिकी 2‘ या चित्रपटातील “तुम ही हो” हे अर्जितसिंग ने गायलेल्या गीतामुळे तो व चित्रपटहि चांगला लोकप्रिय ठरला.
याच वर्षी ‘ऐ जवानी है दिवानी‘ चित्रपटातील “कबिरा” हे प्रितम यांनी संगीतबद्ध केलेले अमिताभ भट्टाचार्य यांचे गीत लोकप्रिय ठरले
२०१५…
” तूं किसी रेल से गुजरी है” हे ‘मसान‘ चित्रपटातील गाणं बरच लोकप्रिय झालं
२०१९…
‘गली बाँय’ या चित्रपटातील “आझादी”हे काहीसे राजकीयदृष्ट्या व्यंग असलेले आणि मुंबईतील अंडरवर्ल्ड मधील काही प्रसंगावर भाष्य करणार गाणं लोकप्रिय ठरलं. नुकत्याच निधन झालेल्या कवियत्री कमला भसीन यांनी ते गीत लिहिलेलं आहे.
आपल्याला ही चित्रगीत माला कशी वाटली ? हे अवश्य कळवा. धन्यवाद.
समाप्त.

– लेखन : सुधाकर तोरणे
निवृत्त माहिती संचालक
– संपादक : देवेंद्र भुजबळ. 9869484800