चित्रपट माध्यमात दृश्य, अभिनय, गीत, संगीत, संवादातून भाव भावनांचे विविध रंग अधिक ठळक होतात. चित्रगीत सदरात ‘ना चिट्ठी ना कोई संदेश’ चा आठवणीना उजाळा देणारा हा गीत प्रवास…..
सण, उत्सव असो की एखादा छोटा मोठा सभारंभ, प्रत्येकाला जीवलगांच्या भेटीची आतुरता असते. पत्र, संदेश निरोप आमंत्रण याची सर्वच वाट पाहत असतात.
आता मोबाईलमुळे त्वरित संपर्क होतो. पण गेल्या दशकापर्यंत डोळ्यात प्राण आणून पत्र घेऊन येणाऱ्या पोस्टमनची वाट पहिली जात होती. तेव्हा वाट पाहून कंटाळलेली एखादी माउली अंगणी आलेल्या एखाद्या पाखरालाच साद घालते. ‘जा जा रानीच्या पाखरां तू जारे भरारा, तुला घालिते चारा, जावा संदेश माहेरा तू जारे भरारा’ म्हणते.‘रुन झून रे पाखरा जारे माझ्या माहेरा’ हे देखील एक असंच हूर हूर लावणारे गीत.
मराठी प्रमाणेच हिंदी चित्रपटात पत्र विषयावर ‘डाकिया डाक लाया डाकिया डाक लाया, खुशीका पैगाम कही, कही दर्द लाया’ सारखी अनेक सुमधुर गीतं आहेत.
पत्र गीत म्हटले की आजही आठवतो ‘संगम’(१९६४). राजकपूर, राजेंद्र कुमार आणि वैजयंती माला यांनी सजविलेला प्रेम त्रिकोण. त्यातील ‘ये मेरा प्रेम पत्र पढकर की तुम नाराज ना होना, की तुम मेरी जिंदगी हो की तुम मेरी बंदगी हो’ हे मोहम्मद रफी यांनी गायलेलं बेमिसाल गाणं. ’तेरा खत लेकर सनम’.. अर्धागनी (१९५९) चित्रपटातील मीनाकुमारीवर चित्रित गाजलेले गीत. आवाज लता. संगीत वसंत देसाई. ‘फुल तुम्हें भेजा है खत में, फुल नही मेरा दिल है, ‘प्रीयतम मेरे मुझको लिखना क्या ये तुम्हारे काबील है’. सिनेमा स्वरस्वती चंद्र(१९६८). लता आणि मुकेश यांचा स्वर. नूतन आणि मनिष यांचा अप्रतिम अभिनय. इंदीवरच्या शब्दांना कल्याणजी आनंदजीनी सजविलेले.
असेच एक बहारदार गीत. ‘लिखे जो खत तुझे वो तेरी याद मे हजारो रंग के नजरे बन गए, सबेरा जब हो गया तो फुल बन गये जो रात आयी तो सितारे बन गए’ कन्यादान (१९६८) चित्रपटातील शशी कपूर आशा पारेख वर चित्रित नीरज लिखित हे गाणं, मोहमद रफी यांनी गायले आहे. संगीत शंकर जयकिशन. ’कोरा कागज था दिल ते मन मेरा लिख दिया नाम उसपे तेरा’ हे आठवतेय. आराधना (१९६९) सिनेमातील राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांनी अभिनित केलेले. आनंद बक्षी यांच्या गीताला एस डी बर्मन यांनी किशोर आणि लताच्या आवाजात संगीत दिले आहे..
असेच एक सदाबहार गाणं ‘मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया. जो लिखा था आंसूओं के संग बह गया’ हे कोरा कागज सिनेमातील. गायक किशोर कुमार. गीत एम.जी.हसमत., संगीत कल्याणजी आनंदजी. कलाकार जया भादुरी आणि चेतन आनंद. धर्मेंद्र आणि राखी यांनी अभिनित केलेलं किशोर कुमार यांचा मखमली आवाजातील ‘पल पल दिलके पास तुम रहती हो, जीवन मिठी प्यास ये कहती हो’ तर मनाला आजही धुंद करते. चित्रपट ब्लँक मेल (१९७३). संगीत कल्याणजी आनंदजी. ‘हाय हाय एक लडका मुझको खत लिखता है’. ‘कच्चे धागे’ (१९७३) सिनेमातील मौसमी चटर्जी विनोद खन्ना यांच्यावर चित्रित चुलबुले गीत. आवाज लता. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल. ‘हम दोनों मिलके कागज पे दिल को चिट्ठी लिखेंगे जबाब आयेंगा’. चित्रपट ‘तुम्हारी कसम’ (१९७८) कलाकार मौसमी चटर्जी आणि नवीन निश्चल. आवाज मुकेश आशा भोसले. सं.राजेश रोशन. आजही हे गीत लोकप्रिय आहे.
‘आखरी खत’ हा राजेश खन्ना आणि इंद्रनी मुखर्जी यांचा सिनेमा लक्षात राहतो तो ‘बहारों मेरा जीवन संवारो’ गीतासाठी. ‘लिखा है तेरी आंखोमें किसीका फसाना हे’ देवानंद आणि नंदा अभिनित तीन देवीयां (१९६५) लता आणि किशोर यांचे प्रचंड गाजलेले गीत. जुन्या आठवणी उजळणारे हे गीत लिहिले आहे. मजरूह सुल्तानपुरी आणि संगीत एसडी बर्मन.
‘आपका खत मिला आपका शुक्रिया आपने याद मुझको किया’ चित्रपट ‘शारदा’ (१९८१) लता यांचा आवाज. कलाकार रामेश्वरी. गीत आनंद बक्षी. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल.
‘हमने सनम को खत लिखा’ हे शक्ती (१९८२) सिनेमातील स्मिता पाटील आणि अभिताभ बच्चन यांच्यावर चित्रित गीत म्हणजे धमाल आहे. असेच लता आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात अर्पण (१९८३) सिनेमातील परवीन बाबी आणि जितेंद्र यांच्यावर चित्रित हे लोकप्रिय गीत, ‘लिखने वाले ने लिख डाले, मिलन के साथ बिछोडे.. दिन रह गए थोडे’ फारच सुंदर. आजही कानावर पडले की मोहरून येते.
राज बब्बर आणि रीना राय, सीमा देव यांनी अभिनित केलेला ‘एक चिट्ठी प्यार भरी’ (१९८४) या सिनेमातील ‘एक चिट्ठी प्यार भरी’ हे सुरेख गाणं. महेंद्र कपूर यांच्या सुराला कल्याणजी आनंदजी यांनी साज दिला आहे. गीत इंदीवर आणि मलिक वर्मा. बुलबुल नावाच्या मुलीने आपली वडिलांची भेट व्हावी यासाठी देवालाच लिहिलेलं पत्र यासाठी हे गीत ऐकलेच पाहिजे.
’चिट्ठी आयी है आयी है चिट्ठी आयी है, वतन से चिट्ठी आयी है, बडे दिनों के बाद, घुमते दिनों के बाद’ हे पंकज उदास यांच्या आवाजातील ‘नाम’ (१९८६) चे गाणं कोण विसरणार ? परदेशी गेलेल्या मुलाची आई आणि भावाने जागविलेली आठवण. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल. कलाकार नूतन संजय दत्त, कुमार गौरव आणि अमृता सिंग. पत्र म्हणजे केवळ पिंपळाचे पान किंवा कागदाचा तुकडा नसून काळजाचा तुकडा आहे, सांगणारे हे गीत लताजीने गायले आहे.
‘कबुतर जा जा पहले प्यार की पहली चिट्ठी साजन को दे आ’ या ’एस बाल सुब्रामानियाम आणि लताजीचे बहारदार गीत. मैने प्यार किया (१९८९) सिनेमातील भाग्यश्री या अभिनेत्रीने केलेला कबुतराशी संवाद सर्वांना सुखावून गेला होता.
देव कोहलीच्या गीताला राम लक्ष्मण यांनी सजविलेले होते. ‘दूर बहुत क्या देश है तेरा, तेरी बंजारन रस्ता देखे’ हे बंजारन (१९९१) चे गीत अलका याग्निक यांनी गायले आहे. आनंद बक्षी लिखित लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी सजविलेले गीत श्रीदेवी यांनी अभिनित केले आहे. ‘चिट्ठी मुझे लिखना’ हे अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित या कलाकारानी सजविलेले, अमित कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात आनंद बक्षी लिखित आणि संगीत बप्पी लहरी. चित्रपट प्रतिकार (१९९१).दांडिया गीत नृत्यातून पत्र लिहायला सांगितले आहे. ‘प्यार के कागज पे दिल की कलम से पहिले बार सलाम लिखा, मैने खत महेबूब तेरे नाम लिखा’..जिगर (१९९२). अभिजित आणि साधना सरगम यांचा सूर. गीत समीर आणि आनंद मिलिंद यांचे संगीत. अभिनय अजय देवगण आणि करिष्मा कपूर.
’संदेशे आते है हमे तडपाते है, चिट्ठी आती है पुझे जाती है घर कब आयोगें लिखो कब आयोगें’, सोनु निगम आणि रूप कुमार राठोड यांच्या आवाजातील हे देशभक्ती गीत प्रत्येक भारतीयांच्या मनात घर करून आहे.
जावेद अख्तर यांनी लिहिलेले बॉर्डर (१९९७) सिनेमांतील गीत सीमेवरील सैनिकांच्या घराच्या ओढीच्या भावना अतिशय सुरेख व्यक्त करते. ‘चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौनसा देश जहां तुम चले गए’ आपल्या जिवलगाच्या पत्राची वाट पाहणाऱ्या उदास मनाची व्यथा मांडणारे जगजीत सिंग यांच्या आवाजातील हे गीत भावविभोर करते. आनंद बक्षी यांनी लिहिलेले आणि उत्तम सिंग यांनी सजविलेले हे गीत दुश्मन सिनेमातील (१९९८) काजोल या अभिनेत्रीवर चित्रित आहे. कागदावर लिहिलेली, डोळ्यात सांडलेली आणि काळजावर कोरलेली अशी शेकडो पत्र गीतं आहेत.
आपल्या मनाच्या तळात आठवणीत जपून ठेवलेली, पुस्तकात लपलेली. जगजीत सिंग यांच्या आवाजात ‘कागज की कश्ती’ असलेली ही गाणी कानावर पडताच मोहरून टाकतात.
काळ बदलला, संवादाचे तंत्र बदलले, दारावर येणारा पोस्टमन दुर्लभ झाला, पण पत्रातील हळुवार, कोमल आणि रंगबेरंगी इंद्रधनुच्या आठवणी कायम आहेत.

– लेखन : डॉ. त्र्यंबक दुनबळे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800