अफगाणिस्तान सध्या तेथील अस्थिर व अशांत वातावरणामुळे चर्चेत आहे. पूर्वी हा भूभाग ब्रिटिश सत्तेचा आणि अखंड भारताचा होता.
आपल्या देशाच्या फाळणीपूर्वी पेशावर, लाहोर, रावळपिंडी ही शहरे शिक्षण आणि कलेची केंद्रे होती. साहजिकच फाळणीपूर्वी आणि नंतर अनेक कलाकार, विशेष करून हिंदी चित्रपट जगाचे अविभाज्य भाग राहिले. अगदी दिलीपकुमार ते पृथ्वीराज कपूर, राजकपूर, देवानंद आणि शाहरुख खान ते अमीर खान आणि सलमान खान आदीपर्यंत त्यांची नाळ जोडलेली दिसून येते.
हिंदी, उर्दूवरील प्रभुत्व, उंच गौर कांती, प्रामाणिकपणा व भावनिकपणा या कलागुणामुळे चित्रपट क्षेत्रात पठाण कुळाचे वर्चस्व आजही कायम आहे.
अफगाणिस्तानची राजधानी काबुल म्हटलं की सर्वाना आठवतो तो “काबुलीवाला” सिनेमा. रविंद्रनाथ टागोर यांच्या काबुलीवाला या कथेवर आधारित या सिनेमात बलराज साहनी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.
1961 साली आलेला हा सिनेमा त्याच्या कथेबरोबरच लक्षात राहिला आहे तो त्यातील देशभक्तीपर गीतामुळे.
हे गीत आहे,’ ऐ मेरे प्यारे वतन/ये मेरे बिछडे चमन/तुझपे दिल कुर्बान/तुही मेरी आरजू/तुही मेरी आबरू/तुही मेरी जान …पंधरा आगस्ट असो की प्रजासत्ताक दिन सोहळा, हे गीत सर्वत्र वाजते.
देशप्रेमावरील हे व्याकुळ गीत गायले आहे मन्नाडे यांनी तर लिहिले आहे प्रेमधवन यांनी. सलील चौधरी यांनी संगीत दिले आहे.
पण या सिनेमातील आणखी एक सुंदर गीत या निमित्ताने आठवते. ‘गंगा आये कहासे/गंगा जाये कहारे/लहरा पानी मे जैसे धूप छांव रे/रात काली दिन उजियाला/मिल गये दोनो साये.. फारच सुंदर गीत आहे.
हेमंत कुमार यांच्या आवाजातील हे गीत गुलजार यांनी लिहिले आहे. आजही हे गीत कानावर पडले तर श्रोता भावुक होतो.खरं तर काबूलीवाला ही गोष्ट आपण सर्वांनी शालेय जीवनात वाचलेली व ऐकलेली असते. एक पठाण दरवर्षी आपल्या देशातून सुकामेवा घेऊन ते विकण्यासाठी कोलकत्ता शहरात येत असतो. तो गल्लोगल्ली ते विकत असताना एका लहान मुलीशी त्याची ओळख होते. या मुलीत तो आपल्या मायदेशी असलेल्या लहान मुलीला पाहतो. पुढे विक्री केलेल्या
सुकामेवा व्यवहारात वाद होतो. त्याचे रूपांतर एका खुनात होते. तो तुरुंगात जातो. त्याला पोलीस घेऊन जात असताना ती मुलगी बघते. ती आपल्या वडिलांना विचारते. तेव्हा सासरला घेऊन जात आहे, असे उत्तर तिला वडिलांकडून मिळते.
शिक्षा भोगून बाहेर आल्यावर काबुलीवाला तिला या मुलीला भेटायला येतो. आता काळ बदलला. ही मुलगी मोठी झाली. तिचे लग्न ठरले आहे. ती आता त्याला ओळखत नाही. आपली मुलगीही आता लग्नायोग्य झाली आहे, याची तीव्र जाणीव त्याला होते. आता या मुलीप्रमाणेच तिची सासरला जाण्याची वेळ आली आहे, या भावनेने तो कासावीस होतो. तिला आशीर्वाद देऊन तो बाहेर पडतो. या आशयाची भावनिक गुंतागुंत व प्रेमाचा संदेश देणारी ही गोष्ट आजही तितकीच लोकप्रिय आहे.
हिंदी सिनेमात पठाणी व्यक्तिमत्त्व असलेल्या अशा अनेक व्यक्तिरेखा आढळतात. पठाणी कुर्ता, सलवार, फेटा आणि जॅकेट असा वेष परिधान करणाऱ्या व्यक्तिरेखा कधी सावकार, रखवालदार, डॉन आदी मध्ये दिसतात. त्यांचा तो हातात रुमाल घेऊन केलेला अतारी नाच तर खूपच लोकप्रिय आहे.
पण पठाणी व्यक्तिरेखा आठवताच नजरेसमोर येतो तो प्राण यांनी अजरामर केलेला शेरखान. अभिताभ बच्चन यांची अँग्री यंगमन प्रतिमा स्थापित करणाऱ्या जंजीर सिनेमातील नायक, तरुण, धडाकेबाज इन्स्पेक्टर आणि त्याच्यासमोर उभा ठाकलेला प्राण यांचा शेरखान. ती उभयतातील डॉयलॉगबाजी ..’जब तक कहू नही, बैठना नही’ म्हणत खुर्चीला मारलेली लाथ. त्याला शेरखानने दिलेले उत्तर आणि दोघांमध्ये झालेली मैत्री आजही चित्रपट प्रेक्षक विसरले नाहीत. पण जंजीर कायमचा लक्षात राहतो तो ‘यारी है इमान मेरी यार मेरी जिंदगी’ या गाण्यासाठी. हातात रुमाल घेऊन शेरखानने केलेलं नृत्य.
संकटात सापडलेल्या पोलीस अधिकारी मित्राला आपले सर्व वाईट धंदे सोडून देण्याचा वचनाला जागत दिलेली साथ प्रेक्षकांच्या मनात घर करते.
शेरखान कायमचा मित्र होतो. मन्नाडे यांच्या आवाजातील या गीताला कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिले होते. गीतकार होते गुलशन बावरा.
अफगाणिस्तान हा तसा डोंगराळ व वाळवंटी प्रदेश. तेथील सुकामेवा यासाठी तो लक्षात राहतो. पण दोन सिनेमामुळे हा सुंदर प्रदेश भारतीय चित्रपट रसिकांच्या मनात कायमचा कोरला आहे. पहिला चित्रपट आहे फिरोजखान यांचा धर्मात्मा(1975).
हेमामालिनी, रेखा, फिरोजखान अशी स्टार कास्ट असलेला हा सिनेमा त्यातील मधुर गीतामुळे गाजला होता. ‘क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो/फिरसे कहो, कहते रहो, अच्छा लगता है/जीवन का हर सपना सच्चा लगता है’ हे मुकेश आणि कांचन यांनी गायलेले गीत असो की, किशोर कुमार यांच्या आवाजातील,’ तेरे चेहरे में वो जादू है, बिन डोर खिंचा जाता हूं/ जाना होता कही ओर, ‘तेरी ओर चला आता हूं/ आजही लोकप्रिय आहे.
धर्मात्मा सिनेमाप्रमाणेच चित्रीकरण आणि गाणी यासाठी गाजलेला चित्रपट म्हणजे खुदागवाह(1991).
अभिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण काबूल, मझहर आणि शरीफ या शहराभोवती झाले होते आणि तेव्हाच्या अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी त्यात विशेष रुची दाखविली होती.
साहजिकच हा सिनेमा भारताच्या आणि अफगाणिस्तानच्या रसिकांमध्ये खूपच लोकप्रिय झाला होता. त्यातील गाणी तर विशेष गाजली. या सिनेमातील ‘तू मुझे कबूल’हे लताजींच्या आवाजातील आणि मोहमद अजीज
आणि अलका याज्ञीक यांनी गायलेले ‘तू ना जा मेरे बादशाह’ ही गाणी खूप श्रवणीय आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक सिनेमांनी आपली छाप सोडली आहे.
पृथ्वीराज कपुर यांच्या सिंकंदर (1941) या नाटकापासून ते आलमआरा या पहिल्या बोलपटापर्यंत पठाणी व्यक्तिरेखांचा प्रभाव भारतीय चित्रपटावर दिसून येतो. राजकपूर आणि नूतन यांनी अभिनित केलेल्या छलिया चित्रपटात प्राण यांनी रंगविलेली पठाण व्यक्तिरेखा असो की 1978 साली रस्किन बॉण्डच्या कादंबरीवर आधारित ‘जूनून’ असो, प्रेक्षकांनी या भूमिकाला जोरदार प्रतिसाद दिला.
आजही ‘एस्केप फ्रॉम तालिबान’ (2003),
‘काबुल एक्सप्रेस’ (2006) असो की ‘जानासीन’, यासारख्या सिनेमांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. शाहरुख खान यांचा ‘पठाण’ सिनेमा येऊ घातलाय. त्याची माध्यमात बरीच चर्चा आहे.
भारतीय सिनेमा जगत आणि अफगाणिस्तान यांचं असं अतूट नातं आहे. कधीही न संपणारे. कलेला भाषा, धर्म, प्रांत आणि संस्कृती असे कोणतेही बंधन नसते. करमणूक, मनोरंजन हा एकच त्याचा धागा असतो, सर्वाना जोडणारा. कबुलीवाला तोच तर संदेश देतो. प्रेमाने जग जिंकण्याचा. जगभरचे सिनेमा माध्यम अनुभवताना, त्याचे गीत संगीत ऐकताना, हाच सुखद अनुभव वाट्याला येतो.

– लेखन : डॉ. त्र्यंबक दुनबळे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800
डॉ. दुनबळे यांनी अतिशय प्रवाही भाषेत भारतीय सिनेमा सृष्टी मध्ये पठाणी व्यक्तीरेखा असलेले चित्रपट
आणि आपल्या अभिनयाने जीवंत केलेल्या नटांची
आठवण जागविली.लेखक संपादक यांचा आभारी आहे.