Saturday, July 12, 2025
Homeकलाचित्रभाष्य ( १ )

चित्रभाष्य ( १ )

आई
सर्वच चित्रकार उत्कृष्ट लेखक, वक्ते असतातच असे नाही. ते चित्र काढत असताना, त्यांच्या मनात काय विचार चालू असतील, त्यांचे भाव काय असतील, हे तेही सांगू शकतीलच असे नाही. मात्र असे एकेक चित्र घेऊन, त्या चित्रावर डॉ ज्योती रामोड भाष्य करणार आहेत.

डॉ. ज्योती रामोड या बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी, पुणे येथे इतिहास विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका आहेत. पण त्यांना इतिहासा बरोबरच विविध विषयात रुची आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेतला असून विपुल लेखन केले आहे.

आपल्या न्यूज स्टोरी टुडे साठी परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
आयुष्य जगणे एवढे सोपे नाही. आलेल्या परिस्थितीशी संघर्ष करून जगणे सोपे करावे लागते. जीवनात आलेल्या परिस्थितीशी संघर्ष करावा लागतो. कधी सहन करावे लागते तर कधी तडजोड करावी लागते.

आपण समाजात पाहतो प्रत्येकाची परिस्थिती भिन्न – भिन्न असते. आईचे मन किती मोठे असते याची कल्पना तर आहेच पण ज्यावेळी आपल्या आईच्या परिस्थितीची जाणीव मुलांना होते, त्यावेळी ती स्त्री खरी भाग्यवान माता असते.

अशाच एका बालकाच्या आपल्या आई विषयी असणाऱ्या भावना चित्रकार यशवंत निकवाडे यांनी
आपल्या चित्ररूपात साकारल्या आहेत. जेव्हा आपल्या लेकरांच्या प्राथमिक गरजाही आईकडून पूर्ण केल्या जाऊ शकत नाही त्यावेळी त्या मातेच्या मनाच्या वेदना असह्य असतात.

आपल्या आईचे आत्मबल खचू नये व तिला जगण्याची नवी प्रेरणा मिळावी, ती अहोरात्र करत असलेल्या कष्टाला आपल्या शब्दांतून समाधान व्यक्त करणारे भाव कलाकाराने अत्यंत भावार्थपणे, मार्मिकदृष्टीने आणि आजच्या तरुण पिढीच्या विचाराला वेगळे वळण देण्याच्या पैलूतून रेखाटले आहेत.

आजची तरुण पिढी स्वतःच्या विश्वात खूप रमली आहे आणि त्यामुळे आई- वडिलांसाठी जे करायला हवे ते तरुणांकडून केले जात नाही. बालकाच्या शब्द व भावविश्वातुन आजच्या तरुणांना जागृत करण्याचे कार्य आपल्या कलेच्या माध्यमातून चित्रकाराने केलेले आहे.

मी आज जरी लहान असलो तरी मोठा झाल्यावर सगळे व्यवस्थित करण्याचा विश्वास आणि वचन ज्यावेळी लेकरू आपल्या आईला देते त्यावेळी त्या मातेच्या जीवनातील सर्वात सुखद व आनंदी क्षण असतो. या भावनिक क्षणाचे आपल्या प्रतिभा शक्तीतून चित्रमय वर्णन अत्यंत समर्पक, वास्तविक, हृदयस्पर्शी असे प्रतिबिंबित केले आहे.

जीवन जगणे ही एक कला आहे. ती कला आत्मसात केली आणि स्वतःवरील विश्वास ठाम ठेवला तर व्यक्ती जीवनात कोणत्याही संकटावर मात करू शकतो. स्त्रीच्या जीवनात सगळीच नाती खूप महत्त्वाची असतात. विशेष रूपाने आई आणि मुलगा यांचे नाते वेगळ्या भावनिक अनुबंधाने बांधले गेलेले असते. अशाच नात्याचे भावनिक जीवन ज्यात वर्तमानातील परिस्थिती समजून घेत भविष्यकाळाबद्दल प्रामाणिक, आशावादी, सकारात्मक दृष्टिकोन बालकाच्या कृतीतून अभिव्यक्त होत आहे.

आजच्या तरूण पिढीने आपल्या पालकांची स्थिती समजून वर्तन करावे असा समाज प्रबोधनात्मक हेतू या चित्रातून कलाकाराने उत्तमपणे मांडला आहे.

“माझे हात हातात
तुझ्या आई
मी चालतो ठाई ठाई
आशीर्वाद तुझे राहू दे
मी जग जिंकेन पाई पाई”

यशवंत निकवाडे

– चित्र सौजन्य : यशवंत निकवाडे. शिरपूर

डॉ.ज्योती रामोड

– लेखन : डॉ.ज्योती रामोड. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments