मखमली आवाजाचे गायक सुरेश वाडकर
खरंच, दैवी व अद्भुत आवाजाची देणगी लाभलेले एक महान गायक; चांदणी, परिंदा, हीना, प्रेमरोग, राम तेरी गंगा मैली, सदमा, इमानदार, यातील गाणी ऐकली की आजही आठवतोय असा जादूमय आवाज, ज्याने सर्वांची मने जिंकली तो आवाज आहे सुरेश वाडकर यांचा.
सुरेश वाडकर यांचा जन्म 7 ऑगस्ट 1954 रोजी कोल्हापूर येथे झाला. ते अवघ्या 5 वर्षांचे असताना संगीता कडे आकर्षित झाले. आठव्या वर्षी हे आकर्षण इतके वाढले की घरच्यांना वाटले हा नक्कीच मोठा गायक होईल.
पुढे त्याने रितसर संगीत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. संगीत गुरू आचार्य जियालाल बसत यांनी 13 वर्षाच्या सुरेश ला विद्यार्थ्यांना शिकवण्याचा सल्ला दिला. गाण्याची समज पाहून संगीतात पदवी संपादित करण्याचा पण सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी प्रयाग संगीत समितीमधून प्रभाकर ही पदवी संपादित केली आणि ते मुंबईच्या एका शाळेत संगीत शिक्षक म्हणून रुजू झाले.
अनोखा आवाज लाभलेल्या या गायकाने चित्रपट सृष्टीत कसे आगमन केले पहा ! 1970 च्या आसपास एक मोठी संगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याचे परीक्षक संगीतकार रविंद्र जैन आणि जयदेव हे होते. सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, शिव हरी हे पण उपस्थित होते. या स्पर्धेत पूर्ण भारतातून अनेक नवीन गायक सहभागी झाले होते. सुरेशजीनी अशी छाप सोडली की, ही स्पर्धा त्यांनी जिंकली.
त्यांना मदनमोहन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या आवाजाने रवींद्र जैन आणि जयदेव इतके प्रभावित झाले की, माझ्या चित्रपटात पार्श्वगायन करण्याची नक्की संधी देईल असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे 1977 च्या पहेली या फिल्मद्वारे सुरेशजींचा चित्रपट सृष्टीत प्रवेश झाला. जयदेव यांनी गमन मधून संधी दिली. यातील “सिने मे जलन, आखो मे तुफान सा क्यू है ? इस शहर मे हर शक्स क्यू परेशानसा क्यू है” हे गाणे खूप लोकप्रिय झाले. त्यांच्या बरोबरच ते सहायक म्हणून काम करू लागले.
लता मंगेशकर नवोदित गायक सुरेश च्या आवाजाने इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल, खय्याम आणि कल्याणजी आनंदजी यांना त्यांचे नाव सुचवले. त्याच्या परिणामी, त्यांनी लताजी समवेत क्रोधी मध्ये “चल चमेली बाग मे मेवा खिलावूगा” हे गीत गायले, जे खूप गाजले. यानंतर त्यांनी कधी मागे वळुन पाहिले नाही.
सुरेशजींनी हिंदी बरोबरच मराठीत सुधीर फडके, अरुण पौडवाल, श्रीनिवास खळे, वसंत देसाई अशा अनेक संगीतकारांसमवेत गाणी गायली. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे, दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल हे शापित मधील आशाजी समवेतचे त्यांचे गाणे आजही लोकप्रिय आहे. श्रीधर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनात ओंकार स्वरूपा, सद्गुरू समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो…. गायलेल्या गणेश गितापासून आजही अनेक प्रोग्रॅम ची सुरवात होत असते. 1986 च्या “माझे घर, माझा संसार” मधील दृष्ट लागण्या जोगे सारे…. हे अनुराधा पौडवाल समवेत गायलेले गाणे आजही खूप लोकप्रिय आहे.
“नवरी मिळे नवऱ्याला” मधील निशाना तुला दिसला ना ….हे त्यांनी अप्रतिमच गायलेय. “सर्जा” मधील चिंब पावसान रान झालं आभाळ, दानी झाकू कशी पाठावरती आणि सुरेशजी गातात,
झाकू नको गवळणबाई सखे लावण्याची खाणी… मुंबईचा फौजदार यातील, हा सागरी किनारा ओला, सुगंध वारा ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा,
नाही तर धुमधडाका मधील प्रियतमा प्रियतमा दे मला तू , अग अग पोरी फसलीस ग … हे विनोदी गीत आजही मराठीत लोकप्रिय आहे. आर के बॅनर च्या प्रेमरोग 1982 मधील “मै हु प्रेमरोगी मेरी किसमत मे तू नही शायद, भवरे ने खीलाया फूल जो ले गया राजकवर, 1985 च्या ‘राम तेरी गंगा मैली’ मधील हुसन पहाडो का क्या कहना, मैं ही मैं हु दुसरा कोई नही, ‘राम तेरी गंगा मैली हो गयी’ आणि ‘हिना’ 1991 मधील पण, मै देर करता नही, हो जाती है.
यावरून एक लक्षात येते की राज कपूर यांच्या फिल्मची जी गाणी सुपरहिट झाली आहेत, त्यात सुरेश वाडकर यांचे मोठे योगदान आहे. विशाल, ए आर रहमान, आर डी बर्मन यांच्या बरोबर पण त्यांनी काम केले. छोड आये हम ओ गलिया यात सुरेशजी गायले. त्यात दिवंगत केके तसेच हरिहरन यांचा पण आवाज आहे. आमिर खान साठी आनंद मिलिंद ने दिल 1990 ओ प्रिया प्रिया क्यू भुला दिया हे गीत सुरेशजी कडून गाऊन घेतले जे खूप हिट झाले.
‘परिदा’ त अनिल कपूर साठी तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमा हुवे पुरे दिल के, हे आर डी ने खुप सुंदर गाऊन घेतले. ‘सदमा’ तील ए जिंदगी गले लगाले, गम मे भी तेरे हर एक गम को गले से लगाया है, आजही क्या बात है असेच सर्व जण म्हणतात. तसेच अजून एक गाणे, मेघा रे मेघा रे मत परदेस जा तू हे पण अतिशय सुंदर आहे. त्यांची लताजीं समवेत अजूनही किती तरी सुंदर गाणी आहेत. पण येथे सर्वांचा उल्लेख करता येणार नाही.
सुरेश वाडकर यांचा आवाज सर्वांपेक्षा वेगळा आहे. त्यांच्या काळातील किंवा नंतर आलेल्या काही गायकांनी लोकप्रिय गायक सर्वश्री रफी, किशोर, मुकेश यांची कायम नक्कल केली पण सुरेश वाडकर यांनी स्वतः चा स्वतंत्र आवाज आहे हे दाखवून दिले.
सुरेशजी नी “आजीवसन” या त्यांच्या कला अकादमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातूनही संगीताचे शिक्षण दिले. हा त्यांचा प्रयत्न जगभरात प्रसिध्द झाला. मुंबई आणि न्यूयॉर्क मध्ये त्यांचे संगीत विद्यालय आहे. लता मंगेशकर पुरस्कार, 2011 चा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, काही राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
भावगीत, चित्रपट गीते, भक्तीगीते, विरह गीते यामधून सुरेश वाडकर यांनी रसिकांना आपल्या आवाजाने भावनाविवश केले आणि यापुढेही नक्कीच करत राहतील असा विश्वास आहे.
त्यांच्या आगामी सुरमयी वाटचालीसाठी शुभेच्छा.
– लेखन : संदिप भुजबळ.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मा संपादक जी आपल्या चित्र सफर यात 11 वी स्टोरी प्रकाशित केली याबद्दल मी आपला आभारी आहे. खूपच सुंदर रित्या आपण एडिटिंग केले आहे यापुढे मी माझे लेखणीत अजून बेस्ट देणेचा प्रयत्न करेल.