Tuesday, March 11, 2025
Homeबातम्याचित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम

चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम

आजच्या मुलांना नवीन काही करायला नको, सर्व मुले मोबाईलच्या आहारी गेली आहेत, असा नुसता त्रागा न करता, आपल्या कडून ही पिढी घडविण्यासाठी कसे योगदान देता येते, हे राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई आणि चित्रकार विजयराज बोधनकर यांनी संयुक्तपणे घेतलेल्या चित्र भाषा संमेलनाने दाखवून दिले आहे. अर्थात एक मंडळ, एक व्यक्ती किती ठिकाणी पुरी पडेल ? म्हणून गरज आहे, असे उपक्रम गावोगावीच नाही तर शहरे आणि महानगरे येथेही भरविण्याची.

एक छान उपक्रम आयोजित केल्याबद्दल,छान उदाहरण घालून दिल्याबद्दल राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई आणि चित्रकार विजयराज बोधनकर या दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन.
_ संपादक

चित्रकला आणि साहित्य हे हातात हात चालावे असा माझा खूप वर्षा पासून प्रयत्न सुरू आहे. चित्र ही मौन भाषा असली तरी सामान्य माणसाला सुध्दा आकर्षित करून घेते.. आणि हाच मुद्दा लक्ष्यात घेवून मी २००३ सालापासून १०० साहित्यिकांच्या स्वभाव चित्रांचे प्रदर्शन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भरवत आलो.

त्यानंतर एक वेगळी कल्पना डोक्यात घोळत होती, ती म्हणजे मनावर परिणाम करणारी सामाजिक चित्रे. काही वर्षातच मला १०० चित्रांचेही प्रदर्शन चितारण्यात यश मिळाले. २०२४ साली त्या चित्रांचे पहिले प्रदर्शन ठाण्यातील कळवा येथील एका कॉलेजमध्ये केले. विद्यार्थी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला तो कोकणातल्या ग्रामीण साहित्य संमेलनात. तिथे हेच १०० चित्रांचे प्रदर्शन भरवले…”मनावर परिणाम करणारे सामाजिक चित्र प्रदर्शन” आणि अपेक्षित निकाल हाती लागला. कारण युवा पिढीने १०० चित्रांमधून एका चित्राची निवड करून त्यावर निबंध लिहावा, असे मी आयोजन केले होते. आणि त्याला यश मिळाले.

पण ग्रामीण साहित्य संमेलन भरवणं ही काही सहज साध्य होणारी बाब नाही. यासाठी कमालीचे परिश्रम घ्यावे लागतात. ही अत्यंत धाडसाची बाब म्हटली पाहिजे. त्याचे मूळ कारण म्हणजे आर्थिक होय. मात्र गेली सलग नऊ वर्षे राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई यांच्यावतीने संघाचे अध्यक्ष चित्रकार लेखक, अभिनेते सुभाष लाड आणि त्यांचे जागृक सहकारी हे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन अत्यंत यशस्वीपणे भरवतात.

२०२५ या वर्षीचे १० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन कोकणातल्या वाटूळ या गावी येथे संपन्न झाले. मागील वर्षी शिपोशी या गावाच्या संमेलनात चित्रकार लेखक म्हणून माझा सहभाग होता. येथे मुलांवर प्रयोग करायला संधी होती पण स्पर्धेचे आयोजन न केल्यामुळे परिणाम हाती आला नाही. मात्र २०२५ साली म्हणून चित्रकार _ लेखक या नात्याने मी नवीन प्रयोग करून बघितला. चित्रे प्रतिकात्मक, सामाजिक संदेश देणारी होती. ही चित्रे नेहमी पेक्षा वेगळ्या विचारांनी चितारली होती. चित्र भाषा मुलांपासून आबालृद्धांपर्यंत सर्वांना समजणारी होती. त्यात समाजभान आणि सद्य परिस्थिती अधोरेखित केली असल्यामुळे रसिकांना ती भावत होती, त्यावर रसिक भरभरून बोलत होते. प्रत्येक चित्राखाली सामाजिक भान आणणारे वाक्य लिहिले होते.

या प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे कारण असे होते की, आजची बाल आणि युवा पिढी पुस्तकी शिक्षणात आणि मार्कांच्या कचाट्यात अडकली आहे. अवांतर वाचन कमी झाले. मोबाईलमधल्या रील या प्रकारामुळे डोक्यात नको त्या खुळचट कल्पना घर करू लागल्यात. मुलांचे स्वतंत्र विचार करणे कमी होत चालले आहे. स्वतंत्र विचार करण्याची सवय लागावी म्हणून आताची सामाजिक चित्रे हा उपक्रम अनेक वर्षापासून राबविले आहे.

या १०० चित्रांखालचे वाक्य वाचून एका चित्रावर शालेय विद्यार्थी वर्गाने ३०० शब्दांचा निबंध लिहायची स्पर्धा मी आयोजित केली. ग्रामीण साहित्य संमेलनात या स्पर्धेचा योग आणला. त्याला चित्रकार सुभाष लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखवला. शिक्षकांच्या सहकार्याने शाळेत जावून मुलांशी गप्पा मारून स्पर्धे विषयी वातावरण निर्माण केले, अनेक प्रभावी गोष्टी सांगितल्या आणि बौद्धिक, मानसिक दृष्ट्या त्यांना तयार केले… गोष्टींमुळे त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते आणि त्यानंतर तब्बल ६० मुलामुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्यातून मुलांचे विचार विश्व उलगडत गेले. मुले चित्र प्रदर्शनात रेंगाळत होती. प्रत्येक ओळ वाचत होती. चित्रे बघत होती.

कारण त्यांना एक चित्र निवडून त्यावर निबंध लिहायचा होता. निबंध लेखनामुळे त्यांच्यावर एक जबाबदारी पडली होती. मुलांवर जबाबदारी टाकली की मुले स्वतंत्र पद्धतीने सुंदर विचार करतात आणि इथे ती करू लागली होती. त्यांनी आपापली चित्रे निवडून निबंध लिहिले होते. ते स्वतंत्रपणे विचार करीत होते आणि लिहीत होते. हे आमच्या परीक्षक मंडळींच्या लक्ष्यात आले. दोन्ही परीक्षक अनुभवी, शासकीय नोकरीतून निवृत्त झालेले होते.. मुलाच्या विचारांचे कुतूहल त्यांना ही होते.

प्रथम, द्वितीय, तृतीय असे ३ आणि उत्तेजनार्थ ५ पुरस्कार होते. विद्यार्थी वर्गांने यात सहभागी होवून उत्तम निबंध लिहून बक्षिसे पटकावली…
प्रथम पुरस्कार : श्रेयस चंद्रकांत कुळ्ये.
द्वितीय पुरस्कार : सार्थक भानू झारापकर.
तृतीय पुरस्कार : मानसी गाडे.
आणि उत्तेजनार्थ : प्रतीक संजय कुळ्ये; अभिनव रमेश कांबळे; आश्लेषा अरुण शिगम; सुमेध सचिन जाधव; नंदिनी धावडे.
अशी बक्षिसे प्रदान करण्यात आली.

संमेलनात अशा प्रकारचा पहिलाच अनुभव मुले अनुभवत होते. मुलांमध्ये उत्साह दांडगा होता. शाळेतील शिक्षक सुध्दा यात मोठ्या प्रमाणात सहभागी होवून विद्यार्थी वर्गाला प्रोत्साहन देत होते. चित्र भाषा मुलांना याच वयात समजावी आणि चित्र बघून विचार मनात येवून लिहता यावे हा प्रकार यश मिळवून गेला. चित्रकार या नात्याने हा प्रयोग करून बघितला आणि त्याला उत्स्फूर्त यश मिळाले.
पुस्तकांबाहेरचे जग मुलांना दिसले पाहिजे. त्यांची विचार वृध्दी झाली पाहिजे. हा विचार आज करणे मला गरजेचे वाटले. आजच्या मुलांना काय नवीन देता येईल हा विचार प्रत्येक क्षेत्रातली व्यक्तीने करायला हवा. केवळ भाषणे करून काहीही हाती लागणार नाही. नवीन कृती अमलात आणली तरच हळूहळू स्वतंत्र विचार करण्याची सवय मुलांना लागू शकेल असे माझे स्पष्ट मत आहे.

ही ग्रामीण मुले निसर्गाच्या सानिध्यात राहतात. निसर्गाची भाषा जाणतात. विशेष म्हणजे या संमेलनात नदीमधील जलपूजनाने साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला होता. संमेलनाच्या आवारात एक झोपडी साकारली होती. त्या झोपडीत अनेकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सलग तीन दिवस प्रत्यक्ष संमेलन स्थळी आणि त्या अगोदर व नंतर कार्यकर्त्यांचे अनेक हात अविश्रांत मेहनत घेत होते. प्रत्येक कार्यकर्ता अक्षरश: पडेल ते काम, कुठलाही कंटाळा न करता करीत होते. प्रत्येकाचं ध्येय एकच होते, ते म्हणजे साहित्य संमेलन यशस्वी करण्याचे.

एखादा उपक्रम अथवा कार्यक्रम सुरू करणं खूप सोपं असतं. मात्र त्यात सातत्य ठेवून दरवर्षी एका गावाची निवड करणं, विविध मान्यवरांना आमंत्रित करत आणि महत्त्वाचं म्हणजे कोकणला केंद्रबिंदू ठेवून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केलं जातं करणं. यासाठी कोणताही अर्ज अथवा फाईल मागवली जात नव्हती. यासाठी कोणाचीही ओळख उपयोगी पडत नव्हती. नागरिक संघामधील तज्ञ मंडळी पुरस्कार व्यक्तींना तपासत होते, त्यावर सखोल चर्चा करीत होते आणि त्यानंतरच पुरस्कार दिला जाणाऱ्या व्यक्तीच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जात होतं. चांगल्या उद्देशाने माणसे जोडणे आणि चांगल्या गोष्टी,उपक्रम राबवणे हेच काम राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई करीत आहे. विविध क्षेत्रातील एकूण १४ पुरस्कार दरवर्षी देत असतात. त्यात या मुलांच्या पुरस्काराची नव्याने भर पडली.

संमेलनाच्या जवळ गगनगिरी महाराजांचा मठ होता आणि सारा परिसर म्हणजे जणू भक्तीचा सागर. मठाकडे जाताना वाहते पाणी पायाला स्पर्श करीत होते. त्यावर मुद्दामून उभारलेला साकव (लाकूड फाटा आणि बांबू पासून बनविलेला पुल) बांधला होता. मठाच्या रम्य परिसरात माझ्या चित्रांचे प्रदर्शन भरवले होते.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीमती वृंदा चव्हाण (मुंबई) आणि चव्हाण सर (सावंतवाडी) यांनी जबाबदारी पार पाडली. या स्पर्धेमुळे शालेय मुलांमधे उत्साहाचे वातावरण होते. त्यांना चित्र भाषा समजू लागली होती.

पुढील साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत या विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख समाविष्ट करण्यात येईल. यामुळे ग्रामीण भागात उत्तम लेखक /लेखिका घडण्याची प्रक्रिया सुरू होईल.

मठामध्ये शिव अभ्यासक सुनील कदम यांचे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, मुलांचे चित्र प्रदर्शन ही संघाने भरविले होते. त्याला ही युवा पिढीचा उत्तम प्रतिसाद मिळाला. एकूणच या संमेलनाने चांगला निकाल दिला.. नव्या पिढीला एक दिशा दर्शक असे हे संमेलन होते. ग्रामीण साहित्य संमेलन काळाची एक गरज असे मनापासून मला वाटते. कुठल्याच प्रकारचा गाजावाजा न करता हे संमेलन संपन्न झाले. दुर्दैवाने प्रसिद्ध वृत्तपत्रे किंवा चॅनल इकडे फिरकताना दिसले नाही कारण कुठलाही वाद व नाद न करता सात्विकतेने या प्रदर्शनाचे सूप वाजले होते. कुठलीही माया या संमेलनाच्या मागे घुटमळत नव्हती आणि मोठा वाद असल्याशिवाय मीडिया साद देत नाही हे पुन्हा सिद्ध झाले.असो. पण या अनुभवामुळे ओढ लागली ती मुलांसाठी पुन्हा अशा चित्र भाषा संमेलनात सहभागी होण्याची, त्यांना मार्गदर्शन करण्याची.

विजयराज बोधनकर

— लेखन : चित्रकार विजयराज बोधनकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

31 COMMENTS

  1. श्री.विजयराज बोधनकर सरांचे, मनःपुर्वक अभिनंदन 💐 💐
    भ्रमणध्वनी जास्त वापर,, आणि म्हणूनच बालमनाला व्यक्त करणारी कला जिवनाचा भाग करून जपायला हवी.
    प्रतीकात्मक सामाजिक संदेश देणारी चित्रं, आबालवृद्धांना बोलत करते.
    अभ्यासा व्यतिरिक्त वाचन कमी झालंय म्हणूनच स्वतंत्र विचार आणि अभिव्यक्ती चित्रांच्या,खाली प्रेरणात्मक वाक्यांच्या मदतीने होणं हे अभिनव, महत्वाचे.
    ग्रामीण असो किंवा शहरी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कला साहित्य संमेलन यशस्वी पार पाडण्यासाठी घेतलेले परिश्रम स्तुत्यच,🙏🙏💐💐💐

  2. बोधनकर साहेब, नमस्कार.
    आपण आपल्या सहकाऱ्यांसह ‘चित्र भाषा संमेलन’ हा अभिनव उपक्रम आयोजित केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आपल्या उपक्रमामुळे युवा पिढी मोबाईलच्या आभासी दुनियेपासून जागृत होऊन आपल्यातील आंतरिक चेतनेकडे वळण्यासाठी परावृत्त होत आहे, हे ही नसे थोडके! असे उपक्रम शालेय शिक्षणात समाविष्ट करण्यात आल्यास मुलांना अधिक फायदा होईल असे मला वाटते. आपली सामाजिक कार्याची तळमळ पाहून आपले मनापासून कौतुक आहे.
    ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो. हीच प्रार्थना…!
    सस्नेह नमस्कार. 🙏🙏
    धन्यवाद.

  3. Bravo, Vijay!!
    What an initiative…
    A great and remarkable effort to engage young minds and encourage them to express their thoughts through the medium of essays, inspired by your paintings…
    It’s an unique way to spark creativity in today’s mobile obsessed kids by arranging such competitions…
    You are truly an inspiration to today’s society…
    Your being a wonderful artist, writer, poet, could make this initiative all the more impactful….
    Heartiest Congratulations and best wishes for more such future endeavors!!

  4. खूपच छान सर्वांना एकत्र जोडण्याचा हा चांगला उपक्रम आहे .खूप खूप अभिनंदन ..

  5. अत्यंत सुंदर आणि नाविन्यपूर्ण उपक्रम. श्री. बोधनकर सर आणि टीम चे अभिनंदन. असे उपक्रम शहरातील शाळांमध्ये, कॉलेजात सुरू केले गेले पाहिजेत. मुलांना व्यक्त होता आले पाहिजे. मोबाईल च्या आभासी दुनियेतून बाहेर येण्यासाठी याचा नक्की उपयोग होईल.

  6. विजयराज, मुलांना मोबाईलकडून चित्र, भाषा याकडे वा अन्य कौशल्याने वळवणाऱ्या अशा उपक्रमांची आज नितांत आवश्यकता आहे. सर्जनशीलते बरोबरच यातून आपले समाजभानही दिसून येते. आपल्या या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळतोय हे उत्साहवर्धक आहे. आपणास शुभेच्छा देत असतानाच आपल्यासारखे अनेक हात पुढे यावेत ही इच्छा बाळगतो. आपण तळमळीने करत असलेल्या या कार्यासाठी समाज आपला सदैव ऋणी राहील.

  7. फारच सुंदर उपक्रम, डिजिटल आणि सोशल मीडियाच्या सध्याच्या काळात असे उपक्रम राबवणे म्हणजे तसे आव्हानात्मक आहे, आजकाल वाचन पण कमी च झाले आहे आणि विचार करून लिखाण करणे हा उपक्रम खूप च कौतुकास्पद आहे , मुलांचे मानसिक आरोग्य अशा उपक्रमामुळे नक्की च सुधारण्यास मदत होईल . विजयराज बोधनकरांनी सामाजिक बांधिलकी म्हणून हा फारच छान उपक्रम सुरू केला आहे, त्यांचे अभिनंदन

  8. अप्रतिम आणि प्रशंसनीय उपक्रम
    या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल
    त्यांची निरिक्षण शक्ती आणि लेखणकौशल्य पण विकसित होईल आणि ते या विश्वात रममाण होतील
    म्हणजे आपोआपच त्यांचे मोबाईल चे व्यसन कमी कमी होऊन त्यांचे लेखन कौशल्य वाढीस लागेल

    खुपच आवडली ही कल्पना आणि विद्यार्थी समाविष्ट करुन घेण्याची ही भन्नाट कल्पना
    खुप खुप अभिनंदन विजयराज

  9. चित्रांची भाषा ही जगातील प्रत्येक माणसाला समजणारी भाषा. एकच चित्र पाहून सुचलेली विचारांची अभिव्यक्ती प्रत्येकाची वेगळी असू शकते. जसे एखादं पुस्तक वाचल्यानंतर प्रत्येक माणसाच्या मनाच्या रंगमंचावर अभिव्यक्त झालेले नाट्य वेगवेगळे असू शकते, अगदी तसेच एकच चित्र पाहून मनात उमटणारे तरंग वेगवेगळे असू शकतात. नव्हे असतातच.

    तुमचा हा उपक्रम वाचल्यानंतर माझ्या मनात तुम्ही काढलेली चित्रं आणि त्यावर विद्यार्थ्यांनी लिहिलेला निबंध या दोन्ही गोष्टी पाहण्याची अनिवार ओढ लागली आहे. हेच या उपक्रमाचे यश आहे.

    विजयराज बोधनकर सर हे स्वतः चित्रकार आणि लेखक असल्यामुळे हा उपक्रम त्यांना सुचला!

    बोधनकर सरांचा उपक्रम असल्यामुळे तो यशस्वी होणारच होता. त्याला दुसरा पर्याय नव्हता!

    बिपीन देशमाने

  10. बोधनकर सर हे अत्यंत सकारात्मक व्यक्तिमत्त्व. कोणत्याही समाजोपयोगी उपक्रमात ते हिरीरीने सहभागी होतात. याही उपक्रमात त्यांचा सहभाग म्हणजे विद्यार्थी व आयोजक दोघांसाठी एक पर्वणीच! असे उपक्रम वारंवार होवोत ही शुभेच्छा!

  11. चित्र बोलकी असतात पण चित्राला शब्दात व्यक्त करण्याची कला विद्यार्थ्यांमधे जोपासण्याच्या उद्देशाने या नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला लेखन संस्कृती जोपासण्यासाठी मोकळ आकाश विख्यात चित्रकार विजयराज बोधनकर यांनी निर्माण करून दिल आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला मन भरून शुभेच्छा…

  12. एक अभिनव आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे साकार केल्याबद्दल बोधनकरसर आणि आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन.

    उदय सबनीस.

  13. चित्र- भाषा संमेलन,चित्रकार मित्र श्री विजयराज बोधनकर यांचा हा उपक्रम माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक कळव्याच्या शाळेत हा उपक्रम मी प्रत्यक्ष पाहिला आहे.मुळात श्री विजयराज हे चित्रकार असले तरीही सामाजिक बांधिलकी जपुन आपले चित्र प्रयोग करीत असतात. या संकल्पनेत विद्यार्थ्यांना चित्रभाषा समजुन घेत निबंध लिहायला लावणे हा एक सुंदर विचार आहे.हा मनस्वी चित्रभाषा प्रयोग शाळाशाळांत प्रदर्शित करीत चित्र भाषा जागृत करणे आजच्या विचलित समाजाची गरज आहे.शिक्षणाबरोबर चित्र ओळख, चित्रभाषा शब्दांकित करणे, हा चित्रकार विजयराज बोधनकर यांचा ध्यास आहे.या अभिनव उपक्रमाची महाराष्ट्रात सांगड घालणे हे समाज प्रबोधन आहे.महाराष्ट्रात सर्व शाळा/महाविद्यालयात अशी सुंदर संवेदनशील उपक्रम मालिका व्हावी ही सदिच्छा.
    राज वसंत शिंगे
    २१/०२/२०२५

  14. अप्रतिम उपक्रम…. चित्रभाषा हे मुलांनी व्यक्त होण्याचे अतिशय सुंदर माध्यम आणिं त्यावर निबंध लेखन म्हणजे एखाद्या अमूर्त गोष्टीला मूर्त स्वरूप देण्यासारखेच आहे…. मुलांचे मन हे कोवळे असते आणि त्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप असते, त्यांच्या मनात बऱ्याच वेळेस खूप गोंधळ असतात पण अशा स्पर्धा त्या विचारांना योग्य दिशा देण्याचे काम नक्कीच करेल…नेहमीच्या स्पर्धांपेक्षा हे वेगळे आल्यामुळे खूप चांगला प्रतिसाद मिळत राहील ….. तुमची मेहनत वाखणण्याजोगी आहे.

  15. फारच भन्नाट कल्पना आहे ही…. सर्वप्रथम ऐकतेय मी हे…
    विचार करायला लावणारी चित्रे 👌👌 त्यावर लिहायचं म्हणजे फारच छान…. मस्त

  16. मित्रवर्य चित्रकार/लेखक/कवी श्री. विजयराज बोधनकर हे सामाजिक भान असलेले कलाकार आहेत. ते मागील कित्येक वर्षे कलेची नि:स्वार्थ सेवा करत आहेत. कलेचा उपयोग समाजासाठी कसा होईल, हाच ध्यास त्यांनी कायम बाळगला आहे आणि त्याच ध्यासाने प्रेरित होऊन ते आपले कार्य करत असतात. हे सर्व करताना त्यांनी कधीही आर्थिक बाजूचा विचार केला नाही. आजच्या जगात असा विचार करणारा कलाकार माझ्या पाहण्यात नाही. कला, साहित्य, संस्कार, आदर्श समाजात मुळापासूनच रुजायला हवेत, या विचाराने विजयराज बोधनकर नेहमीच भारलेले असतात. याच विचारातून त्यांनी ‘चित्रातून संस्कार’ हा उपक्रम मागील २५ वर्षांपासून राबवला. याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. कला-साहित्य खेड्यापाड्यात पोहोचावे, खेड्यातील विद्यार्थी मोबाईल/टीव्हीसारख्या समाज प्रदूषित संसर्गापासून दूर राहावेत आणि विद्यार्थ्यांमधून उद्याचा एक आदर्श नागरिक घडावा, हाच श्री. विजयराज बोधनकरांचा ध्यास आहे.
    – विजय लाड
    ( इंटिरियर डिझायनर/ चित्रपट समिक्षक )

  17. मला ही स्पर्धा खूप आवडली… यातुन विध्यार्थी खूप नवे विचार या अंतर्गत मांडू शकतात.. मी एक.. विद्यार्थी म्हणून.. माझे विचार व्यक्त करतोय.. ही… योजना.. म्हणजेच मराठी ग्रामीण साहित्य संमेलन… असेस पुढे पण.. चालत राहावे.. आणि यातून… विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळावी म्हणून.. सर्वांनी प्रयत्न करावे..

  18. उत्तम!
    खूप खूप अभिनंदन!
    आपण कलांना आणि कलाकारांना वाव मिळवण्याचे असे उपक्रम आयोजित करत रहावे अशी ईच्छा 😇
    आमच्या शुभेच्छा

  19. सुंदर उपक्रम आहे हा. असे असे नाविन्यपूर्ण उपक्रम कलेच्या क्षेत्रात फार आढळत नाहीत. आपल्याला चित्र काढता येत नाही हे लहानपणीच मुलांनी ओळखल्यावर मग पुढे ती कलेपासून खूप लांब जातात. पण अशा उपक्रमामुळे मुलांच्या मनातली कलेविषयीची भीती कमी होईल. त्यांना काहीतरी करावेसे वाटेल. चित्रांविषयीचे त्यांचे कुतूहल वाढत जाईल. सहाजिकच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. असे उपक्रम भविष्यात महाराष्ट्रातच नाहीत तर देशभर व्हायला हवेत. खूप खूप शुभेच्छा.

  20. विजयराज असा हा लक्षवेधी कार्यक्रम आणि उपक्रम हाती घेतल्याबद्दल तुमचं आणि तुमच्या इतर सहकाऱ्या चे खूप खूप अभिनंदन …..
    स्तुत्य उपक्रम

  21. चित्रकार श्री विजयराज बोधनकर हे सातत्याने नवनवीन प्रयोग करणारे सृजनशील कलावंत आहेत. कलाकाराला निसर्गाच्या सान्निध्यात जेवढं आवडतं तेवढंच स्वतःच्या मनाच्या खोलात जाऊन नवनिर्मिती करायला आवडतं.
    अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या धनी असलेल्या चित्रकाराच्या या अभिनव उपक्रमामुळे नवीन पिढीतील अनेक कलावंत मनांना झंकारीत केलं असेल.
    त्यांना सहकार्य करणाऱ्या असंख्य व्यक्तिमत्त्वांना आणि सर्व टिमला अनेकानेक शुभेच्छा आणि अभिनंदन.!
    भविष्यातील आगामी उपक्रमांना माझ्या खुप खुप शुभेच्छा.!
    संपादक श्री देवेंद्र भुजबळ आणि निर्माती सौ अलका भुजबळ यांचेही अभिनंदन. असे उपक्रम सर्वच स्तरावर राबवले जावेत असे वाटते.

  22. विजयराज बोधनकर, स्नेह पुर्वक जयगुरू!आपण निर्मिती केलेल्या चित्र भाषा साहित्य संमेलनाचे निमित्ताने खुप खुप शुभेच्छा!आपला प्रत्येक उपक्रम हा विद्यार्थी, शिक्षक व पालकांना प्रेरणादायी असतो, आपल्या चित्रकारही तेला आपण आज खऱ्या अर्थाने जनमानसात राजवैभव प्राप्त करून दिले.एक दिवस निश्चितच आपला चित्रदर्शी चित्रप्रदर्शन प्रत्येकाच्या मना मनात जाईल.यात काही शंका नाही, आपल्या सेवा कार्याबद्दल अभिनंदन!

  23. वा खुपच छान उपक्रम आहे. ही कल्पना अभिनव आहे ती ईतर राज्यात शहरातही राबवता येईल 🎉🎉

  24. फारच छान उपक्रम होता, चित्रे तर एवढी उद्बोधक होती की परत परत पहावी, आपणच आपल्याशी नव्यानं संवाद करावा. गावोगावी हा उपक्रम व्हायला हवा. शुभेच्छा खूप खूप!

  25. नमस्कार,असे नाविन्यपूर्ण स्पर्धाआयोजन मनास भावले
    मला स्वतः चित्रकला थोडीशी अवगत आहे आणि एखाद्या चित्रावर मीच कविता लिहिते.त्यामुळे हे सारे खूप आवडले,
    आयोजक, स्पर्धक परीक्षक इ. सर्वांचे अभिनंदन

  26. अप्रतिम चित्र लेखन स्पर्धा….
    अशा प्रकारची स्पर्धा भरविल्याचे ऐकिवात नाही.
    मुलांनी आवडीने चित्र बघून सोडून न देता त्यावर चिंतन करून मनात निर्माण झालेले भाव कागदावर मांडणे याला कौशल्य लागते. आणि मुलांनी ते दाखविले तसे बक्षिसे प्राप्त केली.
    खरच खूप कौतुकास्पद…….
    विजेत्यांचे अभिनंदन….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम