मी पाहिलेला पहिला चित्रपट
माझे वडील सरकारी डॉक्टर होते. त्यामुळे त्यांच्या विविध गावी बदल्या होत असत. साल 1957-58 असावे. माझ्या वडिलांची बदली वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे झालेली होती. तेव्हा मी ५-६ वर्षांची असेल. माझ्या वडिलांना चांगले चित्रपट पाहण्याची आवड होती.

त्यावेळी पुलगाव मध्ये “काबुलीवाला” हा चित्रपट लागला होता. वडील मलाही तो चित्रपट पहायला घेऊन गेले आणि मी पाहिलेला अगदी पहिला चित्रपट ठरला, तो म्हणजे “काबुलीवाला”.

सुप्रसिद्ध साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांच्या “काबुलीवाला” या भावपूर्ण बंगाली कथेवर आधारित हा चित्रपट अत्यंत उच्च दर्जाचा होता. फार अस्पष्ट पण मनावर गारुड करणारा चित्रपट व ती कथा. सुप्रसिद्ध अभिनेते बलराज साहनी यांनी काबुलीवालाची भूमिका उत्कृष्ट साकारली होती.
अफगाणिस्तानातून भारतात रोजगारासाठी एक लाडकी लहान मुलगी सोडून आलेल्या इसमाची भावावस्था चित्रपटात खूप प्रभाव टाकणारी. तो जिथे काम करतो त्या घरात एक त्याच्या मुलीच्या वयाचीच मुलगी असते. त्या मुलीला बघून त्याला स्वतःच्या मुलीची खूप आठवण येते. लहान मुलगीही त्याला फार लळा लावते. खूप काही कळत नव्हते पण चित्रपट बघताना लक्ष त्यावरून हटलं नाही. मुलीच्या स्वप्नातील एका गाण्याचं पिक्चरायझेशन खूप सुंदर केलेलं. त्या गाण्यातील फक्त मीनू बिटीया, मीनू बिटीया … एवढंच आठवतं.

पुढे एका छोट्या भांडणात काबुलीवालावर हल्ल्याचा चुकीने आरोप होऊन तो बराच काळ जेलमधे जातो. त्याच्या मुलीच्या छोट्याशा हातांच्या तळव्याचे ठसे त्याने आठवण म्हणून सोबत आणलेले असतात. “ऐ मेरे प्यारे वतन” …हे अजरामर गीत याच जेलमधे काबुलीवाला म्हणताना दाखवलंय. तो सुटून आल्यावर त्यांच्या आधीच्या घरी मीनू बिटियाला भेटायला जातो. मीनूला वडील बोलवतात तेव्हा ती मोठी साडीतील मुलगी झाली असते. तेव्हा ती लहान असते पण आता तिला खूप आठवून ही काबुलीवाला मुळीच आठवत नाही. तिचं लग्नही लवकरच होणार असतं. तेव्हाच काबुलीवाला तिला नवरीच्या वेषात बघतो आणि मूकपणे आशीर्वाद देतो.
त्या सीनने मीही तेव्हा खूप रडली होती. काबुलीवालाला वाटतं, मीनू मला विसरली तशीच माझी मुलगीही तिकडे मला अशीच विसरली असेल का…? आणि इथेच चित्रपट समाप्त होतो..
मला जे अंधुकपणे त्या वयातील या चित्रपटाच्या ह्रद्य आठवणी होत्या त्या आज अर्धशतकानंतर शेयर करता आल्यात याचा आनंद व पुन्हा या अप्रतिम भावपूर्ण सिनेमाची उजळणी झाली याचं समाधान!त्या भाबड्या वयात तो चित्रपट जसा भावला तसाच आता लिहिला.
इतकी वर्ष त्याचा परिणाम अजून तसाच मनावर कायम आहे.

— लेखन : अरुणा दुद्दलवार. दिग्रस – यवतमाळ
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800