रसिकराज विद्याधर
दूरदर्शन च्या लोकप्रिय निवृत्त निर्मात्या डॉ किरण चित्रे यांनी चतुरस्त्र व्यक्तिमत्व लाभलेले विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षात “रसिकराज विद्याधर” हा माहितीपट दूरदर्शन साठी तयार केला आणि तो दूरदर्शनवर प्रसारित देखील झाला.
हा माहितीपट गोखले यांच्या आशीर्वादाने आणि परमेश्वर कृपेने पूर्णत्वास नेऊ शकले, येणाऱ्या पिढ्यांना हे व्यक्तिमत्व नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात शंकाच नाही असे म्हणणाऱ्या डॉ किरण चित्रे यांचे विशेष कौतूक वाटते आणि आपण सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, ते या साठी की, त्यांच्या वर कॅन्सर चे उपचार चालू असताना देखील त्यांनी हिम्मत न हरता दूरदर्शन केंद्रात जाऊन माहितीपटाचे संकलन पूर्ण केले. या वरून डॉ किरण चित्रे यांचा विद्याधर गोखले यांच्या विषयी असलेला आदर च केवळ दिसून येत नाही, तर त्यांची कार्य निष्ठा सुध्दा दिसून येते. इंग्रजीत म्हणतातच, “show must go on” !
कॅन्सर चे उपचार सुरू असताना खचून न जाता, ज्या धीराने त्यांनी कॅन्सर ला तोंड दिले आणि हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेले, या बद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
डॉ किरण चित्रे यांच्या मुळे आज आपल्याला “रसिकराज विद्याधर” हा माहितीपट पाहण्याची संधी मिळत असली तरी प्रारंभी आपण विद्याधर गोखले यांच्या विषयी काही बाबी जाणून घेऊ या.
विद्याधर गोखले हे त्यांनी प्रामुख्याने साठ सत्तरच्या दशकात लिहिलेल्या संगीत नाटकांमुळे उत्तम लेखक म्हणून मान्यता पावले. पूर्वीच्या संगीत नाटकातल्या पदापेक्षा गोखल्यांच्या नाटकातील पदे वेगळी होती. त्यांचा बाज वेगळा होता. बदलत्या काळाशी सुसंगत अश्या स्वररचना होत्या त्या “पंडितराज जगन्नाथ”, “जय जय गौरी शंकर”, “मंदार माला”, “सुवर्णतुला”, या आणि अश्या गोखल्यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांना प्रचंड लोकप्रियता लाभली. त्यातली गाणीही आजतागायत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. केवळ नाट्य लेखनापुरते विद्याधर गोखले यांचं व्यक्तिमत्त्व सीमित नव्हते. ते उत्तम पत्रकार होते. लोकसत्ता या लोकमान्य वृत्तपत्राचे ते जबाबदार, कर्तव्यदक्ष, संपादक होते. मराठी बरोबरच संस्कृत, हिंदी, उर्दू भाषेचा त्यांचा गाढा अभ्यास होता. साहित्याची उत्कृष्ठ जाण असणारे ते ललित लेखक होते. बहुश्रुतता, चौफेर वाचन आणि सभोवताली घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याची संवेदनशीलता या अंगभूत गुणांमुळे गोखल्यांचे वकृत्व झळाळत असे. ते उत्तम वक्ता होते. पुढे प्रभावी संसदपटू म्हणूनही ते प्रसिद्ध पावले.
कलासक्त प्रतिभावंत अश्या विद्याधर गोखल्यांचा मित्र परिवार ही जबरदस्त होता. दिलखुलास गप्पा मारण्यात ते मनापासून रमत. सदाबहार व्यक्ती अशी त्यांची ख्याती होती आणि तरीही अत्यंत साधे, अध्यात्मात रुची असणारे विद्याधर गोखले एक कुटुंबवत्सल गृहस्थ होते.
अश्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्व चे झळकणारे अनेकविध कंगोरे अधिक ठळकपणे रसिकांसमोर उलगडून दाखवणारा माहितीपट आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.डॉ किरण चित्रे यांना दिर्घायुष्य लाभो या न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800