Wednesday, November 13, 2024
Homeकलाचित्र सफर : ४०

चित्र सफर : ४०

“हृदयस्थ”

संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या शिष्या सौ विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी त्यांच्यावर वेगळ्या शैलीत लिहिलेला लेख, मोठा जरूर आहे पण तो वाचताना स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पं.हृदयनाथ मंगेशकर यांची जणू जुगलबंदी लागलीय की काय ? असा छान आनंद देणारा आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचा.
पं. हृदयनाथ मंगेशकर यांना वाढदिवसानिमित्त न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.

लेख वाचण्यापूर्वी जाणून घेऊ या लेखिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांचा अल्प परिचय…
महाराष्ट्रातील ज्येष्ठ गायक पंडित शंकरराव वैरागकर यांच्या कन्या आणि शिष्या असलेल्या विजयालक्ष्मी या पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याही शिष्या आहेत. इतकेच नव्हे तर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या सांगीतिक जीवनावर त्या संशोधन करीत आहे. आपल्या या गुरूंवर त्यांनी तयार केलेला सुंदर माहितीपट आपल्याला लेखाच्या शेवटी पाहायला मिळेलच. संगीताचा इतका सधन वारसा आणि कारकीर्द लाभली असूनही विजयालक्ष्मी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. इंग्रजी, शिक्षण, संगीत या तीन विषयात एम ए, बी एड, संगीत विशारद या पदव्या त्यांनी संपादन केल्या आहेत. शिक्षण समुपदेशक, अभ्यासक, गायिका लेखिका, कवयित्री असणाऱ्या विजयालक्ष्मी या ग्लोबल व्हिजन स्कूल या संस्थेच्या संस्थापक संचालक आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
– संपादक

नुकतीच मी अंदमान सहल पूर्ण केली. पोर्ट ब्लेअर (म्हणजे नुकत्याच झालेल्या नामांतरानंतरचे श्री विजयपुरम) येथील सेल्युलर जेल पाहताना इथे कैदेत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ज्या अनंत यातना भोगाव्या लागल्या, त्याची कल्पना करून डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले… शंभर वर्षांपूर्वीचे क्रांतीवीरांचे विव्हळ ऐकू येऊ लागले…..

‘सागरा प्राण तळमळला,
ने मजसी ने परत मातृभूमीला’
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या वेदनेतून उमटलेली विव्हळयुक्त साद महाराष्ट्रातीलच नव्हे तर अवघ्या भारतातील जनतेच्या मनात या पोर्ट ब्लेअर विषयी चीड, उत्कंठा, भय जागृत ठेवून आहे. क्रांतीवीरांची ही करुणेची याचना गेली सत्तर पंचाहत्तर वर्षे इथे भारतीय पर्यटकांना खेचून आणते आहे. अनेक काव्य श्रेष्ठ असतात पण जेव्हा अप्रतिम संगीत रचनेमुळे ते काव्य घराघरात पोहोचते रसिकांच्या हृदयात वसते तेव्हा त्या काव्याचे श्रेष्ठत्व जनमानसात ठसते आणि त्या दिव्य संगीतामुळे त्या काव्याचे आयुष्यमान चिरंतन टिकते.
अशी अनेक सुंदर श्रेष्ठ काव्ये अद्वितीय संगीत रचना करुन पंडितजींनी… पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी घराघरात पोहोचवली आहेत. त्याबद्दल अवघा महाराष्ट्र त्यांच्या ऋणात आहे. त्यांचे उतराई आपण कसे होणार ?

पोर्ट ब्लेअरच्या (श्री विजयपुरम) या समुद्र किनाऱ्यावरील सेल्यूलर जेल पाहिल्यावर सावरकरांचे लहानपणी वाचलेले ‘माझी जन्मठेप’; ‘काळेपाणी’ आठवले आणि त्यातील मराठी भाषा, शिक्षेची भयंकर वर्णने, इंग्रजांचा राक्षसी दुष्टपणा आणि क्रांतीवीरांचे शोषण पुन्हा एकदा मनात कालवाकालव करु लागले.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या कवितेस हृदय पिळवटून टाकणारी करुण चाल दिली आणि मंगेशकरी पंचस्वरांनी म्हणजे लता, मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांनी त्यांच्या तरुणपणी गायली. ती रेकॉर्ड त्या पंचस्वरांच्या दैवी स्वरांनी मराठी जनतेचा बीजमंत्र बनली. पं. हृदयनाथांची ही संगीत रचना म्हणजे पोर्ट ब्लेअर वरील उसळणाऱ्या सागरी लाटांस संथ करत आपल्या मातीतील शहीद हुतात्म्यांना वाहिलेले अर्घ्य ठरली. ‘सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा…..या धृपदातील आर्तता ऐकून माजेने उसळणारया या हैवानी लाटाही शांत शांत होत गेल्या अन् मनात विचार आला “हजारो क्रांतीवीरांचे रक्त पिऊन उन्मत्त झालेला हा समुद्र आता का असा शांत भासतोय ?”

सेल्युलर जेल मध्ये झालेल्या अत्याचाराची साक्ष ठरणारी या कारागृहाची एकेक भिंत रक्तबंबाळ झालेली भासू लागते अन् त्या भिंतींचा कण न कण, कोपरा न कोपरा व्यापून घेणारा साउंड ॲन्ड लाईट शो इथे सायंकाळी सुरु होतो. त्याच कारागृहाच्या भिंतींवर दाखवलेल्या कैद्यांच्या कारावासातील अत्याचाराची रक्तरंजित कहाणी बघताना चित्त खवळून उठते. अंग गरम होते, डोळ्यातून पाणी वाहू लागते. मन आक्रंदन करु लागते, हात पाय सळसळू लागतात आणि हृदय रडू लागते. इतके भयंकर अत्याचार सोसूनही कुठून आली असेल ही क्रांतीची आग त्यांच्या तनामनात ? कसे सोसले असतील ते जीवघेणे अत्याचार ? आधीच अतिशय भव्य वाटणारा तो कारागृह आता आणखीनच महाकाय राक्षसी वाटू लागतो अन् त्यातील त्या खुराड्यागत शेकडो खोल्या म्हणजे भव्य बेनाम, बेवारस पहाडावरील उपेक्षित छोटी छोटी अंधारी बीळे वाटू लागतात.

सावरकरांची कोठडी तिसऱ्या मजल्यावरील सर्वात शेवटची. ती बघण्यासाठी संपूर्ण जेल आपण पायी तुडवत चढतो अन् तिथे पोहोचतो, कोठडीत सावरकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतो. तिथपर्यंत पोहोचताना आपले संपूर्ण शरीर घामाने भिजून सगळे कपडे चिंब होतात आणि जेल बघणंही नकोसं होतं. पण इथली प्रत्येक भिंत अंतर्मुख व्हायला भाग पाडते. प्रत्येक मजल्यावर लिहिलेली क्रांतीवीरांची नावे त्यांच्या यातनामय किंकाळ्या आपल्या मनात आक्रोश निर्माण करतात आणि पुन्हा आठवते… लतादीदींच्या आर्त हळुवार स्वरांतील
‘भुमातेच्या चरणतला तुज धुत,
मी नित्य पाहीला होता,
मज वदलासी अन्य देशि चल जाऊं,
सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद विरहशंकितही झाले
परि तुवा वचन तिज दिधले,
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठ वाहीन
त्वरीत या परत आणीन,
विश्वसलो या तव वचनी मी
जगद्नुभव योगे बनुनी मी,
तव अधिक शक्त उद्धरणी मी,
येईन त्वरे कथुन सोडिले तिजला….
सागरा प्राण तळमळला….

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी
ही फसगत झाली तैशी
भुविरह कसा सतत साहे या पुढती….

हे काव्य म्हणजे नुसते अवघड शब्दांनी गुंफलेले पांडित्य दर्शन नव्हे तर हृदय, मन, शरीरावर कोड्यांच्या चाबकांच्या वारांनी मारांनी वठलेल्या वळींनंतर आलेल्या ज्वाला आहेत. डोळ्यात अश्रु आणि हृदयात करुणा निर्माण करणारी ही संगीत रचना म्हणजे हुतात्म्यांच्या वेदनेशी एकरूप होत स्वतःच्या देहात ती यातना जागवून स्वरांची जी कंपनयुक्त आक्रंदने त्यांच्याही नकळत हृदयातून बाहेर पडलेल्या नादमयी हुंकार आहेत. अंतर आत्म्याचे एकाकार होणे हेच असावे !

असे म्हणतात वरुन शांत भासणारा हा अंदमानचा समुद्र ज्वालामुखिय आहे. म्यानमार आणि थायलंडच्या किनारपट्टीने वेढलेला ईशान्य हिंद महासागराचा एक सीमांत समुद्र आहे जो मारताबानच्या आखातासह मलय द्वीपकल्पाच्या पश्चिम बाजूने बांधलेला आहे आणि बंगालच्या उपसागरापासून विभक्त आहे. त्याच्या पश्चिमेला हे अंदमान बेट आहे. अतिशय शांत निळाशार दिसणाऱ्या या समुद्राच्या गर्भात या क्रांतिकारकांच्या रक्तरंजित तप्त ज्वाला गिळून समुद्र शांत झालेला भासतो.

पंडितजी आपण ‘ने मजसी ने… परत मातृभुमीला, सागरा प्राण तळमळला’ ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता निवडली, संगीतबद्ध केली आणि सेल्यूलर जेलचा कडवा इतिहास, क्रांतीवीरांचा प्राणांतिक छळ घराघरात पोहोचवला आणि तेंव्हापासून या सेल्यूलर जेलला भेट देऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांची खोली बघावी, कोलू बघावा, इथला परिसर बघावा, समुद्र खवळलेला बघावा असे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात येऊ लागले. डोळ्यांत न मावणारा एवढा अवाढव्य समुद्र वीर सावरकर कसा पोहून गेले असतील ही उत्कंठा आपल्या या गाण्याने भारतीयांच्या मनामनात जागृत केली. ही प्रचंड मोठी ताकद आपल्या संगीतात आहे. हे पुन्हा पुन्हा गेली साठ सत्तर वर्षे सातत्याने सिद्ध होत राहिले, पुढे अनंतकाळ चिरंतन राहणार आहे. आपल्या या एका गाण्याने या एका संगीत रचनेने भारतीय जनतेचे मन हृदय या अंदमान च्या ओढीने व्यापून गेले अन् लोकांचे जथ्थेच्या जथ्थे इथे पोर्ट ब्लेअर ला गेली साठ सत्तर वर्षे येत आहेत, ते केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांची खोली पहायला, हा कारागृह पहायला आणि राजकैद्यांचा छळ, वीरांचा छळ काय होता, कसा होता हे जाणवून घ्यायला इथे बाराही महिने भारतीय नागरिक येऊ लागले.

आदरणीय पंडितजी आम्ही आपले ऋण या जन्मात फेडू शकत नाही. केवळ महाराष्ट्रावर नव्हे तर अवघ्या भारतीयांवर आपले ऋण आहेत आणि या अंदमान वर आपले ऋण आहेत. आज अंदमान हे भारतातील एक अतिशय महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे. जे अंदमान ऐंशी नव्वद वर्षांपूर्वी ब्रिटीशांनी दिलेली जन्मठेपेची शिक्षा भोगण्यास नियोजित नरक होते त्या अंदमानास आज भारताचे जलमय स्वर्ग समजले जाते. आता इथला समुद्र काळा भासत नाही. कितीतरी क्रांतीकारकांचे रक्त प्यायलेला हा समुद्र आता शांत निळाशार झालाय. बळी घेऊन स्वातंत्र्य दिलेला हा समुद्र भारताची शान झालाय.

आपल्या या गाण्याने क्रांती केली अन् अंदमान चे रुपांतर भारतातील महत्वाचे टुरिझम सेंटर मध्ये झाले. भारतीय लोक देवभोळे आहेत. ते इश्वर शोधण्यास तीर्थक्षेत्र यात्रा करतात. संपूर्ण भारतभ्रमण करतात. चारधाम करतात आणि पाचवे धाम म्हणून इथे पोर्ट ब्लेअर चा कारागृह पहायला येतात. भारतीय जनतेसाठी इश्वर ठरलेले क्रांतीवीर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या आत्म्यास वंदन करायला येतात. अंदमान हे भारतीयांचे पाचवे धाम ठरावे ही किमया केवळ पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या एका संगीत रचनेने केली ही एक अनोखी किमया हे बेट गेली सत्तर पंचाहत्तर वर्षे अनुभवत आहे. आपण धन्य आहात पंडितजी. इथे सगळे काही वीर सावरकरांच्या नावाने असले तरी सावरकर हे नाव मात्र केवळ गर्दी खेचून आणायलाच वापरले जाते हे मात्र कटु सत्य आहे. वीर सावरकर एअर पोर्ट वर उतरल्यावर वाटते की आता आपल्याला इथे ठिकठिकाणी सावरकरांचे पुतळे बघायला मिळतील, त्यांचे साहित्य इथल्या भिंतीवर वाचायला मिळेल, त्यांची पुस्तके इथे बघायला मिळतील पण तसे काहीच इथे नाही. केवळ सेल्यूलर जेलमध्ये एका सर्वात वरच्या मजल्यावर शेवटच्या खोलीत विनायक दामोदर सावरकर यांचा एक फोटो ठेवलेला आहे. आज स्वातंत्र्यानंतर पंचाहत्तर वर्षे झाली, पाच पिढ्या संपल्या. आता इथून पुढच्या नवीन पिढ्यांपर्यंत क्रांतीकारकांचे हे बलिदान पोहोचलेच पाहिजे. तुमच्या काळात तहहयात या कार्यासाठी तुम्ही झटलात. संगीताच्या माध्यमातून तुम्ही वीरांची अशी अनेक अप्रतिम संगीतरचनांची स्मारके बांधलीत. त्यांचे जतन आमच्या आणि पुढच्या पिढ्यांनी केले पाहिजे.

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. प्रेमात अणुबॉम्बची ताकद असते, पण सच्चा प्रेमात ! सावरकर आणि सगळ्याच क्रांतिकारकांचं हे देशप्रेम अतुलनीय आहे. सर्वोच्च कोटीच्या या प्रेमास काही उपमा नाही नी काही तुलना नाही. आमच्या सारख्या फुकट मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेणाऱ्या नागरीकांना तर या प्रेमाचे महात्म्य कसे कळणार ?

इश्वर शोधायचाच असेल तर तो अशा विभुतींमध्येच पहावा ज्यांच्या बलिदानातून हा देश स्वतंत्र झाला अन् गुलामगिरी संपली. गुलामगिरीचा खरा अर्थ, इंग्रजांचे अत्याचार, राक्षसी वृत्ती, स्वातंत्र्याची ज्वाला समजून जाणवून घ्यायचे असेल तर इथे दाखवला जाणारा हा साउंड ॲन्ड लाईट शो नक्कीच पहावा. क्रांतीवीरांनी लिहिलेला खरा इतिहास वाचावा. वीरांचे काव्य वाचावे, ते समजून घ्यावे. माणसाच्या अवतारात राक्षसच अवतरले होते असे ब्रिटिश इथे कळतात अन् असीम देशप्रेम संवेदनशील कोमल मनाच्या भावनाशील अन् कर्त्तव्य कठोर योगी व्यक्तींस शोषण सहन करणारा दगड बनवते हेही इथे कळते.

नभि नक्षत्रे बहुत
एक परि प्यारा
मज भरत भूमिचा तारा

अशा या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीतांना अवीट गोडीच्या चाली लावून ती अजरामर करणाऱ्या पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यावर मी तयार केलेला माहितीपट, संगीतकार पं..हृदयनाथ मंगेशकर यांच्या सांगीतिक प्रवासावर प्रकाशझोत टाकणारी ही डाॅक्युमेंटरी फिल्म नक्की पहा. २६ ऑक्टोबर त्यांच्या वाढदिवसानिमित्त 🙏

आपला अभिप्राय कळविल्यास आनंद होईल.

विजयालक्ष्मी मणेरीकर

— लेखन : विजयालक्ष्मी मणेरीकर. नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments