“मर्मबंधा गव्हाणे”
हिंदी चित्रपट सृष्टीचा उगम महाराष्ट्रात जरी झाला असला तरी आजही या सृष्टीत मराठी माणसं हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच नेहमी रहात आली आहेत.
असे असले तरी, एका मराठमोळ्या, ते ही चक्क मराठवाड्यातील, ज्या भागाला, मुंबई, पुणे, कोल्हापूर सारखा चित्रपट सृष्टीचा काहीही इतिहास नाही, अशा भागातील एक मराठी मुलगी स्व कर्तृत्त्वावर आपला चांगलाच ठसा उमटवित आहे, ती म्हणजे छ्त्रपती संभाजीनगर येथील मर्मबंधा गव्हाणे होय.
गव्हाणे नाव वाचले, ऐकले तर लगेच माध्यम जगतातील व्यक्तींच्या डोळ्यापुढे एकच नाव येते ते म्हणजे प्रा डॉ सुधीर गव्हाणे सर यांचे. त्याच सुधीर गव्हाणे सर आणि प्रा डॉ शुभांगी मॅडम यांची मर्मबंधा ही मुलगी आहे. खरं म्हणजे, हे दोघेही विद्यापीठ पातळीवरील प्राध्यापक होते. त्यातही गव्हाणे सर तर एका नाही तर दोन विद्यापीठांचे कुलगुरु पद भूषविलेले आहेत.
पण असे असले तरी या दोघांचे कौतुक यासाठी वाटते की इतर पालकांप्रमाणे त्यांनी मर्मबंधा ला डॉक्टर, इंजिनियर किंवा स्वतः सारखे पीएचडी होऊन विद्यापिठात प्राध्यापक होण्याचा दबाव न टाकता, तिला तिच्या आवडीच्या विषयात शिकू दिले आणि त्याच क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. आज मर्मबंधा जे यश मिळवित आहे, त्या यशात तिच्या कर्तबगारी बरोबरच तिच्या आईवडिलांच्या पाठिंब्याचे महत्वाचे योगदान आहे असे मला वाटते. सर्व पालकांनी आपापल्या मुलामुलींची आवड ओळखून त्याच विषयात त्यांना शिकू दिले, करिअर करू दिले तर अक्षरशः हजारो मुलंमुली आत्महत्या करण्यापासून नक्कीच वाचू शकतील. मानसिक, भावनिक दृष्ट्या अस्थिर न राहता सक्षम, आनंदी जीवन जगू शकतील.

मर्म बंधाचे पती साहील शिवराम हेही अभिनय व गायन कलेत अग्रेसर असल्याने त्यांची मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात नि अर्थातच लग्नात झाले. साहील शिवराम हे पन्नासच्या दशकातील नामांकित संगीतकार पंडित शिवरामचे नातू. वडील नवीनभाई शिवराम हेही संगीतकार- गीतकार व आई ममता शिवराम याही कलोपासक. त्यामुळे सासरचेही तिला सातत्याने प्रोत्साहन मिळाले आणि मिळत आहे. ही सर्व मंडळी मर्मबंधास मुलीसारखी वागणूक देतात. असेच सहकार्य इतर विवाहित मुलींच्या पतीनी, सासरच्यांनी दिले तर किती तरी संसार मोडण्यापासून नक्कीच वाचू शकतील. अशा या मर्मबंधाची चित्रपट सृष्टीतील प्रेरणादायी सफर आज आपण पाहू या.
मर्मबंधाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण छ्त्रपती संभाजीनगर येथील लिटल फ्लॉवर स्कूल शाळेत झाले. तिने शालेय जीवनात कथाकथन स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके जिंकली होती. आई, प्रा. डॉ. शुभांगी गव्हाणे यांनी तिचे कलागुण बालपणीच ओळखून तिला गायनाचे प्रशिक्षण पंडित भांडारे तसेच पंडित विश्वनाथ ओक यांच्याकडे शिक्षण मिळण्यासाठी खूप मेहनत घेतली. तिचे आकाशवाणी व दूरदर्शनवरही कार्यक्रम झाले आहेत.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मर्मबंधाने पुढे मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर स्वतःची आवड ओळखून सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या फ़िल्म सिटीतील व्हीस्लिंग वूड्स या संस्थेत प्रवेश घेतला. या संस्थेच्या पहिल्या बँचची ती विद्यार्थिनी आहे. स्टुडंट कौन्सीलची पहिली सचिव म्हणून ती निवडून आली होती. या संस्थेतून तिने दोन वर्षांचा “पटकथा लेखन व चित्रपट निर्मिती” हा अभ्यासक्रम गुणवत्ता शिष्यवृत्तीसह पूर्ण केला आहे.

मर्मबंधाला विद्यार्थी दशेतच नामांकित पटकथा लेखक निरंजन अय्यंगार यांनी त्यांच्या हिंदी पटकथा लेखनात सहाय्यक म्हणून संधी दिली. त्यानंतर “नक्षत्र“ या हिंदी चित्रपटाचे व प्रमोद प्रॅाडक्शनच्या “फ्रॅाम सिडनी वुइथ लव्ह“ या ॲास्ट्रेलियात चित्रीकरण झालेल्या हिंदी चित्रपटाचे तिने संवाद लेखन केले. कलर टीव्हीसाठी “छोटी आनंदी” या ॲनिमेशन मालिकेचे पटकथा व संवादलेखनही तिने केलं आहे. ही मालिका आता “व्हूट”या ओटीटीवर आहे. त्यानंतर तिने “ॲस्ट्रा फोर्स“ या डिस्नी इंडिया, ग्राफिक इंडिया व अमिताभ बच्चन यांची संयुक्त निर्मिती असलेल्या आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन शो चे पटकथा व संवाद लेखन केले. या शो चे प्रसारण डिस्नी चॅनल व नंतर अमेझॅान प्राईमवर केले गेले. या दोन्ही लेखनाला “फिकी” चे समीक्षक पुरस्कार मिळाले आहेत. तिने मराठी फिल्म “ती आणि ती” चे संवाद लेखन केले असून चित्रपटगृह व झी ५ वर त्याचे प्रदर्शन झाले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या फॅाक्स स्टार स्टुडिओत स्क्रिप्ट रीडर म्हणूनही तिने काम केलेले आहे. फिल्मस्टॉक या मुंबईतील चित्रपट निर्मिती कंपनीत हेड ॲाफ कंटेंट असताना महान लेखक “मंटो“ यांच्यावरील गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केली गेली आहे.

मर्मबंधाचा अमेझॉन प्राईमवर प्रसारित झालेला व लंडनला चित्रीकरण झालेला अलीकडील मराठी चित्रपट म्हणजे “वेल डन बेबी“ हा होय. या चित्रपटाची कथा, पटकथा व संवादलेखन मर्मबंधाचेच असून या चित्रपटाची ती सहयोगी दिग्दर्शकही आहे. सध्या ती सत्यकथेवर आधारीत दोन हिंदी चित्रपटाचे पटकथा -संवाद लेखन करीत आहे.
अशा प्रकारे गेली २० वर्षे ती मुंबईत पटकथा व संवादलेखन करीत आहे.

राष्ट्रीय पातळीवर चमकत असणारी मर्मबंधा आता लवकरच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी सिध्द झाली आहे. नुकतीच तिची निवड अमेरिकन सरकारच्या अतिशय प्रतिष्ठेच्या व विविध क्षेत्रातील आश्वासक प्रतिभावंतांसाठी असणा-या “आंतरराष्ट्रीय अतिथी नेतृत्व कार्यक्रम” या उच्चस्तरीय कार्यक्रमासाठी झाली आहे. भारतातील अतिका चौहान, अनुभूती बॅनर्जी, परसीस सोडावॅाटरवाला, पूजा तोलानी आणि त्यांच्या समवेत निवड झालेली मर्मबंधा हि एकमेव आणि पहिलीच मराठमोळी मुलगी ठरली आहे.

अमेरिकन सरकारतर्फे हा आंतरराष्ट्रीय अतिथी नेतृत्व कार्यक्रम १९४० पासून सुरू असला तरी भारतीय चित्रपट सृष्टीतील पटकथा लेखिका यांच्या साठी मात्र हा पहिलाच कार्यक्रम आहे. या विशेष कार्यक्रमाचा बीजविषय “परिवर्तनासाठी पटकथालेखन“ असा आहे. या आंतरराष्ट्रीय चित्रपट पटकथा लेखन विषयक नेतृत्व कार्यक्रमाचा प्रवास, निवास असा सर्व खर्च अमेरिकन सरकार करणार आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीत महिला पटकथा लेखिकांची संख्या फक्त १२ टक्केच आहे व त्यातील अवघ्या १% महिला पटकथाकारांनी शास्त्रीय अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे, म्हणून नव्या पिढीतील प्रतिभावान व आश्वासक महिला पटकथा लेखिकांसाठी हा आंतरराष्ट्रीय स्तराचा कार्यक्रम आखला गेला आहे. या कार्यक्रमांतर्गत अमेरिकन चित्रपट सुष्टीतील नामांकित महिला पटकथाकारांशी वैचारिक आणि अनुभवांची देवाणघेवाण, संयुक्त लेखन, चित्रपटात महिलांविषयक सकारात्मक दृष्टिकोन प्रतिबिंबित होण्यासाठी जागतिक प्रयोग, आंतरराष्ट्रीय किर्तीच्या संस्थांना भेटी व चर्चा होणार आहे. या पटकथा लेखिकानी भारतीय चित्रपटसृष्टीत पुढील तीन दशके महिला समानतेविषयक परिवर्तन घडवून आणण्यासाठी नेतृत्व करावे असा व्यापक हेतू या कार्यक्रमाच्या मागे आहे.
अशा या आंतरराष्ट्रीय पटकथा लेखन कार्यक्रमासाठी निवड झालेल्या मर्मबंधा चे न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800