लतादीदी आणि नौशादच्या गझला
२८ सप्टेंबर १९२९ रोजी एक महान गायिका या भूतलावर अवतरली. तिच्या आवाजात लाखो करोडो लोकं आपली सुखदुःख पहायचीत, इतकी ती या आवाजात एकरूप होत असत. असा हा आवाज ६ फेब्रुवारी २०२२ रोजी लोप पावला पण मागे ठेऊन गेला असंख्य आठवणी. आपण ओळखलेच असेल मी भारतरत्न, गानकोकिळा लता दीदी मंगेशकर यांच्या विषयी बोलतोय म्हणून ! तर आज त्यांचा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने एका वेगळ्या पैलुतून डॉ. नीता पांढरीपांडे मॅडम यांनी लता दीदी यांच्यावर लिहिलेला लेख पुढे देत आहे. डॉ. नीता पांढरीपांडे मॅडम यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे. लता दीदींना विनम्र अभिवादन.
– संपादक
स्वर सम्राज्ञी लतादीदींच्या गाण्यावर भरभरून लेख लिहिले गेले आहे. या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाबद्दल प्रत्येकाच्या मनात भाव कल्लोळ उठतो आणि प्रत्येकाला त्यांच्याबद्दल लिहावंसं वाटतं.
दीदींनी गायलेल्या आणि मला भावलेल्या अनेक गझला आहेत. सर्व गझलांचा आढावा घेणे या छोट्या लेखात शक्य नाही म्हणून केवळ नौशाद साहेबांच्या लतादीदींनी गायलेल्या गझलांचा उल्लेख केलेला आहे.
गझल हा तसा मूळ उर्दू काव्यप्रकार. सुरुवातीला लतादीदींच्या उच्चारावर अनेकांनी तुच्छतादर्शक शेरे मारले होते. त्यानंतर दीदींनी उर्दू शब्दांचे उच्चार शिकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आणि आपल्या मखमली आर्त स्वरात गझला रसिका पर्यंत पोहोचविल्या.
सुरुवातीच्या काळात 1949 साली ‘अंदाज’ चित्रपटातील गझल ‘उठाये जा उनके सितम’ चे रेकॉर्डिंग नौशादजींना करायचे होते. त्यासाठी नौशादजींनी लता मंगेशकर यांची दहा-बारा दिवस तालीम करून घेतली होती. रेकॉर्डिंगच्या दिवशी मेहबूब खान साहेबांनी चित्रपटाचे नायक दिलीप कुमार, नर्गिस, राज कपूर सगळ्यांना रेकॉर्डिंग रूममध्ये बोलावले होते. स्वतः महबूब साहेब सपत्नीक उपस्थित होते. त्या दिवशी लताजी खूप घाबरल्या होत्या. नौशादजींनी त्यांना धीर दिला, म्हणाले- तुमच्यासमोर मोठमोठे कलाकार बसून गाणे ऐकत आहे असे समजू नका. त्यांच्याकडे न बघता केवळ गाण्यावर लक्ष केंद्रित करा. केवळ गात रहा. ’लताजींनी त्यांचा सल्ला ऐकला आणि त्या निर्भयपणे गझल गायल्या. सगळ्यांना गझल खूपच आवडली. पहिल्याच वेळी गझल ‘ओके’ झाली. (नौशाद जरा जो आफताब बना पुस्तकातील अंश) ती ही गझल. दुःखी पण संयत हतबलता व्यक्त करणारी ही गझल हृदयाला पिवटून टाकते. या गझलेतील प्रत्येक शब्द आणि शब्दानुरूप भावनेत चिंब भिजलेला दीदींचा स्वर आणि नौशाद यांचे भावानुरूप हृदयस्पर्शी असं अप्रतिम संगीत. लयीला, स्वर सांभाळायला अतिशय अवघड अशी नौशादजींची ही रचना बहुधा लताजींची क्षमता ओळखून केलेली असावी असंच वाटतं. गझलेतील मर्म समजून अनवट जागा हेरून लताजींनी ही गझल गायली. गझलेत प्राण फुंकले आहेत. गझल कशी गायची याचे संकेत समजून घेऊन ते कसोशीने पाळत लताजींनी आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केली.
‘दिवाना’ (1967) चित्रपटातील ‘तीर खाते जायेंगे आंसू बहाते जायेंगे’ ही गझल गाताना देहभान विसरून लताजी जेव्हा ‘दिल का शीशा तोडनेवाले किये जा तू सितम /अपनी बरबादी का शिकवा लब पे लायेंगे ना हम/ तू जो गम देगा कलेजे से लगाते जायेंगे /म्हणतात तेव्हा रसिकांची मनेदेखील घायाळ होतात. नायिका जेव्हा ‘ बेअसर होते नही आंसू किसी नाकाम के/ तुझको भी रोना पडेगा एक दिन दिल थामके/ दर्द बनकर हम तेरे दिल में समाते जायेंगे/ म्हणताना लताजींचा बदललेला स्वर मनाला दिलासा देतो. नायिकेच्या व्यथा, वेदना स्वतःच्याच आहेत हे दीदी अनुभवतात आणि म्हणूनच त्या भावना व्यक्त करताना ऐकणाऱ्याच्या हृदयाला स्पर्श करून जातात. लताजींची ही एकरूपता त्यांच्या शब्दातून व्यक्त होते. दोन्ही अंतऱ्यातील वेगवेगळे भाव अतिशय सुंदर रीतीने गाऊन त्यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. नायिकेचे भडभळणारे दुःख नौशाद साहेबांनी दिलेल्या संगीताच्या साथीने आणखी उभारून येते याचा प्रत्यय गाणे ऐकताना जाणवतो. गीतातील शांतता जणू त्यातील व्यथा बोलकी करते म्हणूनच त्याचा परिणाम जबरदस्त साधला गेला आहे. शकील बदायुनीने लिहिलेल्या या गझलेला नौशाद आणि लताजींनी पूर्ण न्याय दिलेला आहे. लताजींच्या आवाजातील आलाप, विशिष्ट शब्दांवर दिलेला जोर, त्यातील भाव संगीतकाराला अपेक्षित असलेला उतार चढाव आणि आवाजातील दर्द लताजींनी अचूक साधला आहे म्हणूनच इतक्या वर्षानंतर देखील आजही या गझलेची लोकप्रियता कमी झालेली नाही.
50 -60 चे दशक हे पुरुषप्रधानच होते. त्या काळाच्या समाजाचे प्रतिबिंब गझलांमधून झालेले दिसते. त्या काळच्या गझला स्त्रीच्या समर्पणाच्या, तिच्या गौण भूमिकेचे वर्णन करणाऱ्या होत्या. प्रियकराने केलेले अत्याचार सहन करून ओठ बंद करून निमूटपणे दुःख सहन करून त्याचीच पूजा करायची हेच संस्कार त्या काळच्या चित्रपटातून दिसतात. त्या काळातील गाणी गाताना स्वतःकडे सगळं दुःख घेऊन प्रियकराला प्रेमात न्हाऊ घालायचा फील त्यांच्या आवाजातून देतात.
दुःखाच्या अनेक छटा जीवनात आहेत. प्रत्येकीच्या दुःखाला आपल्या मुलायम आवाजात चपखलपणे बांधून रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम दीदींनी अतिशय प्रभावीपणे केले. त्यांच्या मखमली स्वरात मिसळलेली उदासीन त्याची भावना ‘न मिलता गम तो बरबादी के अफसाने कहा जाते’ या गझले मधून अतिशय परिणामकारक रीतीने व्यक्त झालेली आहे.’ तुम्ही ने गम की दौलत दी बडा अहसान फरमाया /जमाने भर के आगे हाथ फैला ने कहां जाते/ शेवटच्या कडव्यातील या ओळी गाताना आवाजातील हतबलता मनाला स्पर्शून जाते. शब्दांची योग्य फेक साधून भावाभिव्यक्तीसाठी आवाजात चढ-उतार करण्याचे तंत्र अवगत असल्यामुळे या गझलेला एक आगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. ‘अमर’ चित्रपटातील या गझलेने धुमाकूळ घातला. लोक लताजींच्या आवाजाचे दिवाने झाले आणि त्यांच्या प्रतिमेला वेगळी ओळख प्राप्त झाली.
‘मुगल ए आजम ‘चित्रपटातील : ए मेरे मुश्किल कुशा (कठीण समय कामात येणारा अर्थात ईश्वर) फर्याद है फरियाद है /आपके होते हुए दुनिया मेरी बरबाद है/ ’बेकस पे करम कीजिए‘ म्हणताना सुरुवातीच्या दोन ओळीतील ईश्वराला स्मरून मारलेली हाक आणि नंतरच्या जख्मों से भरा है किसी मजबूर का सीना’ म्हणताना मधुबालाच्या चेहऱ्यावरील दुःख लतादीदी आपल्या शब्दातून, स्वरातून अत्यंत सूक्ष्मपणे आणि तितक्याच संयमीतपणे रसिकांत पर्यंत पोहोचवतात. सुरुवातीची आर्तता आणि नंतरच्या ओळीतील स्वर मनाला भिडतात. मधुबालाच्या नाजूक कोवळ्या अत्यंत आकर्षक चेहऱ्यावरील दुःखी भाव आणि तेवढेच घायाळ करणारा दीदींचे स्वर कोणाचेही डोळे पाणावतील असेच आहेत. शकील बदायुनींचे शब्द नौशादचे संगीत आणि लतादीदींचा स्वर यांच्या अद्भुत किमयेतून साकारलेली अगदी स्वतंत्र स्वतःची अशी प्रतिमा ही गझल रसिकांच्या मनावर उमटवते.
मनातील उद्वेग, दुःख, आशा निराशा, मनोभंग या भावना मोजक्या शब्दात ओतप्रोत व्यक्त करणे कवीच्या दृष्टीने अतिशय क्लेश कारक असते. शकील बदाययुनींच्या या गझला म्हणजे दुःखात बुडालेले शब्द. नायिकेच्या भरून न येणाऱ्या जखमा आठवून ते दुःख, पीडा स्वतःचीच आहे असे समजून गझल गाणे खूप अवघड आहे. अशा अनेक गझला लतादीदींनी गायलेल्या आहेत. दुसऱ्या कोणाच्याही आवाजात या गझलेची कल्पना देखील करता येत नाही.
विविध चित्रपटातील वेगवेगळ्या नायिका, विविध विषय, त्यातील दुःखाच्या अनेक वेगवेगळ्या छटा, पण स्वर मात्र तोच. प्रत्येक नायिकेचे दुःख व्यक्त करताना दीदींच्या स्वरातील बदल अप्रतिम असाच आहे. त्या स्वरातून सौंदर्य, नाद, धुंदी, दुःख, उदासी प्रगट होते. संगीताच्या मिलाफातून दीदींनी चंदेरी गान विश्व तयार केले आणि रसिकांच्या मनावर अखंड अधिराज्य केले.
पाकीजा’ चित्रपटातील काहीशी उदास उदास अशी ही गझल कधीतरी भेटलेल्या या व्यक्तीची आठवण जन्मभरासाठी सोबत करते आहे. मीनाकुमारीचा अभिनय जेवढा प्रभाव टाकणारा आहे तेवढाच लतादीदींच्या सुरातील अभिनिवेश थक्क करून सोडणारा आहे. याचे 21 रिटेक झाले असे वाचण्यात आले होते. ती गझल म्हणजे –‘चलते चलते युं ही कोई मिल गया था/. सुरांच्या सानिध्यात गझलेतील एक एक शब्द त्या जगल्या आहेत. गझलेतून त्या रसिकांपर्यंत भेटत गेल्या. आपल्या गाण्याची संमोहिनी त्यांच्याशी नकळत रसिकांवर पडली. या गाण्याला गुलाम मोहम्मद यांनी संगीत दिले होते. पण त्यांच्या मृत्यूनंतर नौशाद यांनी पार्श्वसंगित दिलेले आहे.
कोणतीही गझल अत्यंत भावपूर्ण रीतीने कशी गायची आणि त्यातून काळजाला स्पर्श करणारी असाधारण कलाकृती कशी निर्माण करायची यासाठी लतादीदी नेहमीच प्रयत्नशील असत. लतादीदींच्या आवाजातील दर्द रसिकांच्या हृदयातून आत्म्यापर्यंत पोहोचतो. तोच स्वर शेवटपर्यंत जपण्यासाठी त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत, नित्य रियाज याची कल्पना करणे अवघड आहे. त्यांनी संगीतासाठी स्वतःला वाहून घेतले होते. संगीत हेच त्यांचे जीवन, त्यांचा आत्मा होते आणि म्हणूनच त्यांचे गायन अपूर्व असेच झाले. लतादीदींचे संगीतातील स्थान आढळ आहे आणि सदैव ते तसेच राहणार आहे.’ न भूतो न भविष्यती’ अशा या स्वराला ही मानवंदना.
— लेखन : डॉ. नीता पांढरीपांडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800