Wednesday, March 12, 2025
Homeकलाचित्र सफर : ४५

चित्र सफर : ४५

कृतार्थ ‘प्राण

पडद्यावर एकाहून एक जबरदस्त खल नायकी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या तिरस्काराचा धनी होणाऱ्या पण प्रत्यक्ष जीवनात पडद्यावरील भूमिकेच्या अगदी उलट, अशी सहृदयी जीवन जगलेल्या प्राण यांचा आज जन्म दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची काढलेली ही आठवण. प्राण यांना आपल्या पोर्टल तर्फे विनम्र अभिवादन.
– संपादन

वर्ष १९३९ , शहर लाहोर, स्थळ -लाहोरची -हिरामंडी, वेळ रात्रीची. रात्रीचे जेवण झाल्यानंतर पान खाण्यासाठी तीन चार तरुण पानाच्या ठेल्या समोर उभे आहेत. त्यातलाच एक गोरा गोमटा देखणा तरुण, एका छायाचित्रकाराचा सहाय्यक म्हणून करणारा, जेवणापूर्वी थोडेसे नशापाणी करून आलेला . त्याच्या पासून काही अंतरावर उभा असलेला एक माणूस या तरुणाला न्याहाळतोय. त्याच्या मनात तो भरलाय, त्याचे राजबिंडे व्यक्तिमत्व त्याला आवडलेय. तो जवळ जाऊन त्या तरुणाला प्रश्न विचारतो, जणू नियतीच त्याच्या तोंडून प्रश्न विचारतेय, तुझे नाव काय ? त्रासिक चेहऱ्याने तो तरुण विचारतो ‘तुम्हाला काय करायचं ?’ त्यावर तो माणूस म्हणतो कृपया गैरसमज करून घेऊ नका. माझं नाव वली मोहम्मद वलीं. मी एक लेखक आहे. प्रसिद्ध फिल्म निर्माते दलसुख पांचोली यांनी नुकताच माझ्या एका कथेवर चित्रपट निर्माण केला आहे. मी आता त्यांच्या नवीन सिनेमासाठी एक दुसरी कथा लिहितोय. त्या सिनेमाचे नाव आहे ‘यमला जट’ ज़ो पंजाबी मध्ये बनणार आहे. मी मघापासून तुमच्या हालचाली बघतोय. ती तुमची पान खाण्याची स्टाईल, बोलण्याची लकब. माझ्या कथेमध्ये एक character आहे, जे हुबेहूब तुमच्या व्यक्तिमत्वाशी जुळते. तुम्हाला माझ्या सिनेमात काम करायला आवडेल का ?

‘नाही’ तो तरुण तडकाफडकी उत्तर देतो. ‘ठीक आहे, तरी पण हे माझे visiting card घ्या, विचार करा आणि उद्या लाहोरच्या पांचोली आर्ट स्टुडीओ मध्ये सकाळी १० वाजता मला भेटायला या..
तो तरुण दुसऱ्या दिवशी स्टुडीओत जात नाही. आदल्या दिवशीची वली साहेबांबरोबरची भेटही विसरून जातो, पण नियती त्याला तसे सोडणार नसते.

त्याच्या पुढच्या शनिवारी तो तरुण परत मित्रांबरोबर लाहोरच्या प्लाझा सिनेमा मध्ये पिक्चर बघायला जातो. परत त्याची योगायोगाने वली साहेबांशी गाठ पडते. त्याला (न आल्याबद्दल) पंजाबी मध्ये शिव्यांची लाखोली वाहतात क़ेवळ त्त्यांचा राग शांत व्हावा म्हणून तो तरुण दुसऱ्या दिवशी त्यांच्या बरोबर स्टुडीओत जातो. त्याचे फोटो काढले जातात, स्क्रीन टेस्ट घेतली जाते. अंतिमतः त्याची ‘यमला जट’ या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी निवड केली जाते. पन्नास रुपये महिना या अटीवर करारही होतो. ‘पण सर, तो तरुण चाचरत म्हणतो ‘मला फोटोग्राफी मध्ये सध्या महिना २०० रुपये मिळतात. ‘ठीक आहे, मग फोटोग्राफर म्हणून काम करत रहा. आम्हाला जेव्हा शूटिंग च्या वेळी तुझी गरज भासेल तेव्हा आम्ही तुला बोलवु. अरे भल्या माणसा, तुला समजत कसे नाही, आज तू पन्नास रुपयाच्या करारावर सही कर भविष्यात हाच करार तुला लाखोंच्या राशीत लोळवेल. अशी संधी लाथाडू नकोस.
हो म्हण आणि सही कर. ‘पांचोली स्टुडीओ चे मालक दलसुख पांचोली वडिलकीचा सल्ला देत होते. त्या तरुणाने थोडा विचार केला. करार पत्र समोर ओढले व आयुष्यातला पहिला सिने contract साईन केला. खाली लफ्फेदार अक्षरात सही केली ‘प्राण किशन सिकंद’ !!!!!!!

१२ फेब्रुवारी १९२० रोजी जुनी दिल्लीच्या बालीमारन इथे जन्मलेल्या प्राणचा ‘यमला जट’ हा पहिला पंजाबी चित्रपट. पण त्यांना व्हायचे होते फोटोग्राफर. मेट्रिक च्या परीक्षेनंतर पुढील शिक्षणात मन रमत नसल्याने प्राणने वडिलांकडे फोटोग्राफी शिकण्याची इच्छा व्यक्त केली. वडिलांनी मित्राच्या A. Das & Co. या त्या वेळच्या सुप्रसिध्द फोटोग्राफर कडे apprentice म्हणून लावून दिले. तिथे ते developing & printing पण शिकले. पण नियतीने त्यांना मायानगरीत आणून सोडले.सुरुवातीला चौधरी, खजांची, या चित्रपटात खलनायकाचे काम केल्यानंतर ‘खानदान ‘मध्ये नूरजहान बरोबर नायकाची भूमिका देखील केली. पण पडद्यावर स्वतःला नायिकेच्या मागे झाडामागे पळताना, गाताना बघून त्यांनाच आवडले नाही. तेव्हाच त्यांनी ठरवले की अशाच चित्रपटात काम करायचे ज्यात आपल्याला पडद्यावर गावे लागणार नाही.

१९४५ ते १९४७ चा तो काळ. भारतात स्वातंत्र्याचे वारे वाहायला लागले होते. लाहोरला १५-२० चित्रपटात काम करून झाले होते. ४७ च्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्राण आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करायला लाहोरहून इंदोर ला आला होता. एका रात्री रेडीओ वरून बातमी आली कि लाहोर मध्ये रक्तपात झालाय. फाळणीच्या जाणीवेने लोकांची माथी भडकली होती. लोक एकमेकांच्या जीवावर उठले होते. लाहोर ला परतायचे दरवाजे असे अचानक बंद झाले होते. १५ ऑगस्ट ला भारत स्वतंत्र झाला. प्राण सारख्या ज्यांनी लाहोरला आपले घर मानले होते ते घर आता दुसऱ्या देशाचा भाग झाले होते. बायको ला बरोबर घेऊन हिंदी चित्रपट सृष्टीत नशीब आजमावण्यासाठी प्राण मुंबईत येऊन दाखल झाला. त्यानंतर त्यांना पुढील आयुष्यात अनेक वेळा पाकिस्तान हून लाहोर भेटीची आमंत्रणे आली. पण ते कधीच लाहोरला गेले नाहीत. ज्या मातीतून त्यांना जबरदस्तीने हाकलण्यात आले, त्या मातीची ओढ त्यांना कधीच वाटली नाही. फाळणीची भळाळती जखम उराशी धरूनच ते आयुष्यभर जगले.

१९४७ साली पत्नी शुक्लासह मुंबईत आल्यावर प्राण सुरुवातीला ताज हॉटेल मध्ये राहिला (४७ साली ताज चे भाडे होते दिवसाला ५५ रुपये फक्त अन तेही ब्रेकफास्ट, लंच व डिनर सह !) मग सुरु झाल्या एका स्टुडीओतून दुसऱ्या स्टुडीओत काम मागण्यासाठी चकरा. पन ही वाट वाटली तेवढी सोपी नव्हती. हळू हळू त्यांच्याजवळ होते-नव्हते ते पैसे समाप्त आले. पत्नीच्या सोन्याच्या बांगड्या विकायची वेळ आली. ताज मधून कमी ग्रेड च्या हॉटेल मध्ये स्थलांतर सुरु झाले. असे बेकारीचे आठ महिने गेल्यावर एक दिवस अचानक Bombay Talkies मधून प्राणला फोन आला. ते नवीन कलाकारांना घेऊन जिद्दी हा चित्रपट काढत होते. हिरो चे नाव होते देव आनंद, हिरोइन होती कामिनी कौशल आणि खलनायकाच्या भूमिकेसाठी प्राण ला साइन करण्यात आले ते ५०० रु. च्या करारावर. (त्यावेळी हे तिघे प्रमुख नट चर्चगेट हून लोकल ट्रेन ने मालाड ला जायचे. मालाड स्टेशन हून चालत स्टुडीओत जायचे व संध्याकाळी शूटिंग संपल्यावर मालाड-चर्चगेट हा परतीचा प्रवास करायचे.)
आठ महिने बेकारीतून होरपळल्या नंतर (!) नशिबाने साथ द्यायला सुरुवात केली होती. जिद्दी नंतर आठ दिवसात अपराधी, पुतली, गृहस्थी या चित्रपटांच्या ऑफर्स पण आल्या.

मग आला प्राण च्या खलनायकाच्या कारकीर्दीवर शिक्कामोर्तब करणारा रेहमान, सुरैया, गीता बाली बरोबरच ‘छोटी बहेन’ (चले जाना नही नैन मिलाके,चूप चूप खडे हो जरूर कोई बात है, वो पास रहे या दूर रहे नजरोमे समये रहते है-सं -हुस्नलाल -भगतराम) इथूनच सुरुवात झाली भारतीय सिनेमाच्या नंबर वन ‘Baddy ‘ची. नंतरच्या काळात या ब्याडीच्या 6वाटेला उतमोत्तम खलनायकाच्या भूमिका येत गेल्या. प्राण नेही आपल्या ढंगाने त्यात अभिनयाचे गहिरे रंग भरले. हलाकु, आशा, मधुमती, अदालत, अफसाना !. मुनीमजी, चोरी चोरी, होत तुमसा नाही देखा या सारख्या सिनेमातून प्राण आपले villain चे स्थान पक्के करत होता . हिरोइन च्या मागे झाडाच्या आडून इकडे-तिकडे पळत, रोमान्स करत गाणं म्हणणाऱ्या Goody Goody हिरो च्या भूमिका करणं त्याला जमत नव्हतं. तशी त्याची इच्छाही नव्हती.

राज-दिलीप-देव या त्या काळच्या त्रिकुटाच्या प्रेमात बिब्बा घालणारा हा प्राणच असायचा. देव आनंद बरोबर जिद्दी, मुनीमजी, अमरदीप, जाब प्यार किसीसे होता है या सिनेमातून villain च्या भूमिका केल्यानंतर जॉनी मेरा नाम, देस परदेस, मध्ये मोठ्या भावाची तर वॉरंट मध्ये वडिलांची भूमिका प्राण ने केली. दिलीप कुमार सह आझाद, देवदास, मधुमती, दिल दिया दर्द लिया, आदमी, गोपी यात खलनायक म्हणून चमकला. पण आजही आपल्या लक्षात राहतो तो ‘राम और शाम’ मधला दिलीपकुमार ला चाबकाने फोडून काढणारा प्राण चा गजेंद्र !

राज कपूर च्या चोरी चोरी छलिया दिल हि तो है यात काम केल्यावर प्राण ने मेरा नाम जोकर च्या अपयशानंतर कर्जाच्या खाईत लोटलेल्या राज कपूर च्या बॉबी त केवळ एक रु, मानधनावर काम केले होते. (बॉबी हिट झाल्यावर राज कपूर ने त्याचे योग्य ते मानधन पाठवले हा भाग वेगळा !) आर. के. च्या जिस देशमे गंगा बहती है मधला राका डाकू हि प्राण ची भूमिका मात्र आपण विसरू शकत नाही. याच राज कपूर ने प्राण ला त्याची इमेज बदलण्याचा प्रयत्न ‘आह’ मध्ये डॉक्टर चा गुडी गुडी रोल देऊन केला होता पण आह पडला व प्राणचा चांगले रोल करायचा प्रयत्नही फसला.
नंतरच्या काळात राजेंद्रकुमार, विश्वजित, जितेंद्र, धर्मेंद्र, मनोज कुमार, शम्मी कपूर, शशी कपूर यांच्या प्रेमात काटे घालण्याचे काम प्राणने इमाने ऐतबारे केले. त्या काळात प्राण च्या भूमिकांमध्ये देखील वैविध्य असायचे. नव्हे तर प्राण जाणीवपूर्वक ते आणण्याचा प्रयत्न करायचा. संपर्कात येणाऱ्या माणसाच्या वागण्याचा, बोलण्याचा, देहबोलीचा बारकाईने अभ्यास करायचा .मग ते character लक्षात ठेऊन चित्रपटात एखाद्या भूमिकेमध्ये त्याचा चपखल पणे वापर करायचा. मेकअप मध्ये देखील कधी दाढीचे वेगवेगळे प्रकार तर कधी मिश्यांचे विविध अवतार, तर कधी डोक्यावर केसांचे अनेक प्रकारचे विग्स याचा उपयोग केल्यानेच प्राणचा नेमका एकच चेहरा आपल्या डोळ्यासमोर येत नाही . जिस देशमे मधला राका,उपकार मधला मलंग चाचा, जंजीर मधला शेरखान, बॉबीतला हाय सोसायटी मध्ये वावरणारा ऋषी कपूर चा बाप अशी प्राण ची विविध रूपे आपल्याला दिसतात. काही वेळा विविध मासिकांमधले दाढी, मिशी, विग असे गेट-उप असलेले फोटो तो कट करून ठेवायचा व त्याचाही योग्यवेळी वापर करायचा

जेव्हा-केव्हा एखाद्या चित्रपटासाठी प्राण भूमिका साईन करायचा तेव्हा त्या भूमिकेत वेगळे काय करता येईल याचा आधी विचार करायचा. मग मेकअप मन पंढरी दादा जूकर व विग मेकर कबीर यांना बोलावणे जायचे. डोक्यातील कल्पना त्यांच्यासमोर मांडली जायची. कधी कधी त्या भूमिकेचे sketches काढले जायचे, मग जन्माला यायची प्रत्येक सिनेमासाठी वेगवेगळी characters . खानदान मधील त्याचा वेश हा हिटलर च्या मिशा आणि हेयर स्टाईल सारखा होता. तर अमर अकबर अंथोनी मधला अब्राहम लिंकन सारखा, जुगनू मध्ये त्यांनी मुजिबुर रेहमान सारखी मिशी, कुर्ता, चष्मा वापरला होता. तर निगाहे मधील दाढी हि sam pitroda सारखी ठेवली होती. वेशभूषे बरोबर त्याच्या लकबीहि वाखाणण्या जोग्या असायच्या.

दिल तेरा दिवाना मध्ये विडी ओठांच्या डावीकडून उजवीकडे फिरवत संवाद बोलण्याची, मर्यादा मध्ये पेटती सिगारेट जिभेच्या सहाय्याने उलटी करून परत बाहेर काढण्याची, कब, क्यू और कहा ? त नाणे उडवून उलट्या हातावर झेलण्याची तर मजबूर मध्ये अंगठा आणि बाकीच्या बोटांची वर्तुळ करून माणसे हेरण्याची लकब, या लकबी त्याच्या भूमिकेत चार्म निर्माण करायच्या. बडी बहेन मध्ये त्याचा प्रवेश हा असाच सिगारेट ओढत ओठांच्या चंबू करून त्याची वर्तुळ करून फेकण्यात (Rings) व्हायचा. त्या रिंग्स दिसल्या की समजायचे की हा आला म्हणून.

जवळ पास २० वर्ष खलनायकाच्या पण वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकार केल्यानंतर १९६७ मधे प्राण च्या कलाजीवनाला कलाटणी देणारा ‘उपकार’ आला. यात त्याने एक पाय गमावलेल्या मलंग चाचा चा रोल केला होता . पण आपली इमेज बदलण्याचा प्राण चा हा पहिलाच प्रयत्न नव्हता.
५३ साली आह आपटल्यावर ६५ मधे मनोज कुमार च्या शहीद मधील केहार सिंग ची भूमिका गाजली . त्यावेळचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी शहीद चे कौतुक केले. आपल्या जय जवान जय किसान या घोषणे वर एखादा चित्रपट बनवण्याची विनंती मनोज कुमार ला केली आणि उपकार चा जन्म झाला . उपकार मध्ये प्राण वर ‘कस्मे वादे प्यार वाफा सब बाते है बातो का क्या हे गाणेही चित्रित झाले .(हे गाणे गायला किशोर कुमार ने नकार दिल्यानंतर मग कल्याणजी आनंदजी यांनी मन्नाडे कडून गाऊन घेतले . उपकार ने प्राण ची इमेजच बदलून टाकली.२० वर्ष लफंगा, हलकट, बदत्तमीज , हरामी अशी प्रेक्षकांची विशेषणे झेलणाऱ्या प्राण वर कौतुकाचा वर्षाव व्हायला लागला आणि मग सुरु झाली प्राण ची हिंदी चित्रपट सृष्टीतील Second Inning !
उपकार नंतर प्राण चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेत दिसायला लागला .प्रेक्षकही त्याच्या या नव्या भूमिकांना प्रतिसाद देऊ लागले . २० वर्ष खलनायकाच्या भूमिकेतून लोकांच्या मनात कायम तिरस्कार निर्माण करणारा प्राण आपली ती इमेज पुसून टाकण्यात पुरा यशस्वी ठरला . एक काळ असा होता कि प्राण च्या नुसत्या एन्ट्री वर बाय-बापड्या त्याच्या नावाने कडकडा बोटे मोडायच्या, त्याला शिव्यांच्या लोखोल्या वाहायच्या . तोच प्राण आता लोकांच्या गळ्यातला ताईत बनायला लागला होता . त्यांच्या या दोन्ही इमेज चा सुरेख वापर हृषीकेश मुखर्जी यांनी ; गुड्डी मध्ये केलाय.एका प्रसंगात प्राण धमेंद्र ला आवडलेलं घड्याळ देऊ करतो तेव्हा तिथे शूटिंग बघायला आलेली गुड्डी धर्मेंद्र ला हळूच म्हणते कि घेऊ नका ते घड्याळ त्यांच्याकडून ते देण्यामागे जरूर त्यांच्या मनात काहीतरी वाईट हेतू असेल . त्यावर धर्मेन्द्र तिला सांगतो प्राण सारखा चांगला माणूस या फिल्म इंडस्ट्री मध्ये शोधूनही सापडणार नाही. पण त्यांच्या सारख्या चांगल्या माणसाला वाईट माणसाच्या भूमिका कराव्या लागतात.

उपकार नंतरही प्राण आदमी, ब्रह्मचारी,तुमसे अच्छा कौन है, हमजोली, 56 प्यार हि प्यार, कब क्यू और कहा, गवार, आन बान, रूप तेरा मस्ताना या चित्रपटात खलनायक म्हणून हि चमकला पण नंतर चरित्र नायकाच्या भूमिकेतच राहिला . त्यातच भर पडली प्राण चे प्रत्येक चित्रपटात एखादे गाणे असण्याची उपकार मधले कस्मे वादे हिट झाले होतेच .जंजीर मधले शेरखान चे यारी है इमान मेरा हेही हित झाले . चित्रपट वितरकांचा निर्मात्यांवर प्राण वर चित्रित झालेले एखादे गाणे हवेच चा दबाव वाढायला लागला . वास्तविक प्राण ला पडद्यावर गाणे गायचा जाम तिटकारा पण व्यावसायिकतेच्या गणितांमध्ये त्यांना हा दबाव स्वीकारावा लागला . आणि मग सुरु झाली प्राण च्या चित्रपट गीतांची रांग . मजबूर मध्ये ‘आ गोयचो सायबा, विक्टोरिया २०३ मधे दो बिचारे बिन सहारे ,धर्मा मध्ये राझ कि बात कः दु तो जाने मैफिल मी फिर क्या हो , बेईमान मधील न इज्जत कि चिंता, कसौटी मधील हम बोलेगा तो बोलोगे कि बोलता है या सर्व प्राण वर चित्रित झालेल्या गाण्यांनी प्राण एका वेगळ्याच लोकप्रियतेच्या शिखरावर नेले

गाण्याबरोबरच प्राण विनोदी भूमिकेत देखील धमाल उडवून गेला. या विनोदी भूमिकांची सुरुवात झाली ती दादामोनी अशोक कुमार यांच्या बरोबर च्या विक्टोरिया २०३ ने . यात या दोघांनी राजा और राणा या भूमिकांमध्ये जी बहर उडवून दिली . कि पुढे या दुकलीला घेऊन चोरी मेरा काम, चोर के घर चोर, राजा और राणा असे धमाल विनोदी चित्रपटच निघाले . प्राण ने आप के दिवाने, जंगल मी मंगल (दुहेरी भूमिका ) यात देखील विनोदी भूमिका खुबीने रंगवल्या.

सत्तर च्या दशकात प्राण पेक्षा जास्त मानधना घेणारा फक्त एकच कलाकार होता तो म्हणजे राजेश खन्ना. पण या दोघांनी त्याकाळात मर्यादा वगळता एकत्र काम केलेच नाही (नंतर सौतन,बेवफाई मध्ये एकत्र आले) राजेश खन्ना चे म्हणणे असे होते कि माझे चित्रपट यशस्वी करायला प्राण सारख्या व्हिलन ची आणि मेहमूद च्या कॉमेडीयन ची गरजच नाही (त्याकाळच्या कुठलाही चित्रपट या दोघांशिवाय पूर्ण व्हायचा नाही) राजेश ने एक प्रकारे प्राण ला दिलेली हि compliment च होती.

सत्तर -ऐंशी च्या दशकात बॉबी, जुगनू,धर्मा, जोशीला, कसौटी, संन्यासी, दस नंबरी , विश्वनाथ ,दोस्ताना ,कर्ज ,कलीया, नसीब ,अमर अकबर अंथोनी ,सौतन,सनम बेवफा या चित्रपटात प्राण चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेत अवतरला . प्राण च्या अनेक चित्रपटांची जर श्रेय नामावली बघितली तर सुरुवातीचे नायक,नायिका,व प्रमुख कलाकारांचे नाव आल्यानंतर प्राण चे नाव येई ते देखील AND PRAN असे . एकदा एका एका चाहत्याने त्यांना विचारले होते की तुमचे नाव नुसते प्राण आहे का AND PRAN आहे ?
ते स्वतःचे सिनेमे फार क्वचितच बघत असत. जंजीर जवळपास वीस वर्षानंतर त्यांनी बघितला व अमिताभ ला फोन करून सांगितले कि मला तुझे जंजीर मधले काम आवडले म्हणून काही वर्षानंतर का होईना प्राण साहेबांकडून आलेली हि प्रतिक्रिया अमिताभ ला सुखावून गेली.

प्राण यांना चित्रपटा व्यतिरिक्त त्यांना उर्दू शेरो शायरीची हि आवड होती. फुटबॉल , हॉकी , क्रिकेट या खेळावरही त्यांचे प्रेम होते . १९५० च्या सुमारास त्यांनी एक फुटबाल टीमही काढली होति. कपिल देव जेव्हा उगवत क्रिकेटपटु म्हणून उदयास येत होता तेव्हा BCCI ने त्याला ऑस्ट्रेलिया ला ट्रेनिंग साठी पाठवायचे ठरवले . पण कोणी 6 मिळेना . (तेव्हा BCCI ची हि परिस्थिती होती! )प्राण ला हे समजताच त्यांनी स्वतः कपिलचा ट्रेनिंग चा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली होती . सर फ्रांक वॉरेल प्राण चे चांगले मित्र होते . जेव्हा जेव्हा ते भारतात यायचे तेव्हा मुंबईत प्राण ला भेटल्याशिवाय जायचे नाहीत . १९७९ साली आसिफ इक्बाल च्या नेतृत्वाखाली पाकिस्तान ची टीम भारतात आली तेव्हा सिकंदर बख्त भेदक गोलंदाजी मुळे दिल्ली कसोटीत भारत पराभवाच्या छायेत होता. पण दिलीप वेंगसरकर च्या शतकाने भारताला सामना अनिर्णीत ठेवण्यात यश मिळाले . त्यावेळी प्राण ने खुश होऊन भारतीय संघाच्या सर्व खेळाडूंचा गोल्ड मेडल देऊन सत्कार केला होता व सिकंदर बख्त लाही तो मेडल द्यायला विसरला नाही.

प्राण ला उपकार ने पहिले Best supporting Actor चेफिल्मफेयर अवार्ड मिळवून दिले दुसरे ‘आंसू बन गये फुल ने (आपल्या अश्रूंची झाली फुले या नाटकावर आधारित) व तिसरे बेइमान मधील पोलिस हवालदाराच्या भूमिकेने मिळविण दिले. पण ते स्वीकारण्यास मात्र त्यांनी नकार दिला . त्याचे कारण होते त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट संगीतकाराचे पारितोषिक बेइमान साठी शंकर जयकिशन यांना जाहीर झाले होते. प्राण चे म्हणणे असे कि हे अवार्ड पाकीझा साठी गुलाम मोहम्मद ला मिळायला हवे होते. आपल्या याच भूमिकेवर ठाम राहत प्राण ने अवार्ड स्वीकारण्यास असमर्थता व्यक्त केली होती . (प्राण चा निर्णय किती योग्य होता. आजही पाकीझा ची गाणी आपण आवडीने ऐकतो. ती आपल्या स्मरणात आहेत . बेईमान चे एकतरी गाणे तुम्हाला आठवते का ?)

रूढार्थाने प्राण ला चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यासाठी संघर्ष करावा लागला नाही पण व्हिलन म्हणून आपले स्वतंत्र स्थान निर्माण करण्यात आणि ते टिकवण्यासाठी त्यांनी अपरंपार कष्ट घेतले . उपकार मधून प्राण ने हेच सिद्ध केले की खलनायकाला कायम त्याच प्रकारच्या नकारात्मक भूमिका करत रहायची गरज नाही. जर त्याच्यात क्षमता व आत्मविश्वास असेल तर त्या चाकोरी बद्द भूमिकेतून बाहेर पडून तो नायक-चरित्र नायकाच्या भूमिकाही यशस्वी hh साकार करू शकतो . प्राण ने ही वाट तयार केली व नंतर त्याच वाटेवर खलनायक म्हणून कारकीर्द सुरु केलेले शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्ना चालत गेले. पुधे यशस्वी नायकही झाले.

हिंदी चित्रपट सृष्टीचा एव्हढा पगडा भारतीय जनमानसावर आहे कि मुल जन्मले कि त्याचे नामकरण एकतर देवादिकांच्या नावे केले जाते नाहीतर त्याकाळातील लोकप्रिय किंवा आवडत्या चित्रपट अभिनेत्याच्या नावाने .पूर्वीच्या काळी राज, दिलीप,राजेंद्र,मनोज अशी मुलांची नावं ठेवल्या जायची . त्यानंतर पिढी बदलली व राजेश,अमित,शशी,विनोद,
सुनील हि नावं ठेवल्या गेली . आजची पिढी संजय, ह्रितिक, अभिषेक ,सचिन अशी नावे ठेवते . काळ बदलला पिढ्या बदलल्या .पण नावे ठेवायचा हा सिलसिला कायम आहे . फक्त दोनच नावं या आधीच्या पिढ्यांनी आपल्या मुलांची कधीच ठेवले नाहीत . एक म्हणजे ;रावण आणि दुसरे प्राण !!!! एक इतिहासात बदनाम झालेले आणि दुसरे खलनायकाच्या भूमिका करून वर्तमानात बदनाम झालेले प्राण हे नाव आजपर्यंत कोणी ठेवल्याचे ऐकिवात नाही. मुलाचे नाव प्राण ठेवल्याचा पेढा मी तरी आजपर्यंत कधी खाल्ला नाही . हेच प्राण या अभिनेत्याचे यश आहे.

उणीपुरी सहा दशक हा माणूस यशस्वी जीवन जगला . अनेक प्रकारच्या विविध रंगी भूमिका केल्या .मान -सन्मान मिळवले. चांगला माणूस म्हणून फिल्म इंडस्ट्री मध्ये नाव कमावलं . हस्ते परहस्ते गरजूंना मदत केली . मुलांना उच्च शिक्षण दिले ,एकसे एक गाड्यांचा शौक केला . बंगल्यात एकाच वेळी ५-६ जातीचे कुत्रे पाळण्याचाही शौक पुरा केला .पत्ते ,क्रिकेट,फुटबाल ,हॉकी याचा भरपूर आनंद लुटला .उत्तोमोत्तम ड्रिंक्स चा आस्वाद घेत जीवन जगला . वयाच्या नव्वदी पर्यंत कृतार्थ आयुष्य जगला . माणसाला आणखी काय हवे असते आयुष्यात ? या जगात येताना कोणाचा तरी ‘दुवा’ बनून येतो आणि जाताना लाखो,करोडो चाहत्याचा दुआ घेऊन जातो . यापेक्षा कृतार्थ जीवन काय हवे ?या सिनेसृष्टीत नायक म्हणून अनेकांनी स्वतः ला मिरवले . पण खलनायक म्हणून अभिमानाने स्वतः ला मिरवणारा प्राणच.u
भारतीय सिनेसृष्टी चे शताब्दी वर्ष साजरे होत असताना प्राण सारख्या बुजुर्ग अभिनेत्याचे १२ जुलै २०१३ रोजी हे जग सोडून जाणे ही गम क बात सहीच पण त्याहीपेक्षा वाईट या गोष्टीचे वाटते कि यानंतर कुठल्याही नवीन चित्रपटाच्या श्रेय नामावलीत AND PRAN हि आद्याक्षरे यापुढे कधीही दिसणार नाहीत.

प्रशांत कुळकर्णी

— लेखन : प्रशांत कुलकर्णी. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम