“शोले”
हिंदी चित्रपट सृष्टी जी बॉलिवूड नावाने प्रसिद्ध आहे, तिच्या इतिहासात “शोले” या चित्रपटाचे विशेष स्थान आहे. मैलाचा दगड म्हणता येईल अशा या सर्वांनाच वेड लावलेल्या चित्रपट निर्मितीला यंदा पन्नास वर्ष पूर्ण झालीत. या चित्रपटाने एक इतिहास रचला असे म्हणायला हरकत नाही. मल्टी स्टार चित्रपट तेव्हाही निघत होते. आताही निघतात. पण या चित्रपटात जी एकाहून एक धुरंदर नायक नायिकांनी फौज होती की त्याला तोड नाही. इंगजीत ज्याला unparallel म्हणतात तशी स्टारकास्ट होती. तो जमाना चित्रपटाच्या खिडकीवर भली मोठी रांग लावून तिकीट काढण्याचा होता. अँडवान्स बुकिंग साठी लोक त्याकाळी रात्रभर रांगेत उभे राहत नंबर लावायला. अर्थात शोले च्या बाबतीत हे घडले नसावे. कारण पहिले काही दिवस हा पिक्चर चालला च नाही. थिएटर रिकामे होते. याला कारण एका वृत्तपत्रात आलेले नकारात्मक परीक्षण! पण नंतर आठवड्यात काय चमत्कार घडला देव जाणे !. सगळी थिएटर्स हौसफुल गेलीत. लोकांना या चित्रपटाचे संवाद पाठ झालेत. या संपूर्ण चित्रपटाच्या केवळ संवादाच्या कॅसेट निघाल्या ज्या बाजारात लाखोंनी विकल्या गेल्या त्या काळात. संजीव कुमार, अमिताभ बच्चन, जया, हेमा, धर्मेंद्र, या नायक नायिकांबरोबर अमजद खान या नव्या खल नायकाने बाजी मारली. त्याचे डायलॉग आजही आमच्या पिढीला पाठ आहेत !
खल नायकांचे एक वेगळे रंगरूप या चित्रपटाच्या निमित्ताने लोकांना बघायला मिळाले. याबरोबरच ए के हंगल, आसरानी, सचिन अशी चरित्र अभिनेत्याची फळी देखील तितकीच लक्षात राहिली. एकूणच पटकथा, संवाद, गाणी, विनोद, हाणामारी, पार्श्वसंगीत, छायाचित्रण अशा सर्वच आघाड्यांवर हा चित्रपट म्हणजे एक लाजवाब, अभूतपूर्व असा चमत्कार होता.याने सर्व रेकॉर्ड मोडले, नवे मापदंड निर्माण केले.
आमची पिढी अजूनही अनेक बाबतीत नॉस्टॅल्जिक होते ते उगाच नाही. आम्ही अनेक क्षेत्रातला सुवर्णकाळ पाहिला. उत्तम मराठी नाटक, नाट्यसंगीत, भावगीते, सुगम संगीत, गीत रामायण याने भारावून जाण्याचा तर तो काळ होताच.पण उत्तम हिंदी चित्रपट निर्मितीचाही तो काळ होता.”दिलीपकुमार श्रेष्ठ की राजकपूर ?” उत्तम असे वाद घालण्याचा ते काळ होता. लता, आशा यांच्याही स्पर्धेविषयी वाद घालून भांडण्याचा तो काळ होता. त्या बरोबर प्रदीप कुमार, जॉय मुखर्जी, विश्वजीत अशा ठोकळ्याना सहन करण्याचा देखील तो काळ होता. यांना आम्ही सहन केले ते त्यांच्या चित्रपटातील उत्तम संगीता मुळे. सुमधुर गाण्यामुळे !
आमची पिढी एकीकडे नूतन, मीनाकुमारी, यांच्या कडे श्रद्धेने बघणारी होती. तर दुसरीकडे मधुबाला, वहिदा, साधना, नंदा, तनुजा, राखी, हेमा, वैजयंती माला यांच्यावर फिदा होणारी होती. संगम चित्रपटासाठी तासन् तास रांगेत उभे राहणारी आमची पिढी. वक्त चित्रपटातील राजकुमाराचे संवाद पाठ असलेली आमची पिढी !
आम्ही उत्तम गाणी ऐकली. दर बुधवारी रात्री आठ वाजता रेडिओ सिलोन ला कान लावून बिनाका गीत माला ऐकली. केव्हा कोणते गाणे पहिल्या क्रमांकावर (पहिली पादान पर !) येईल यावर शर्यती लावल्या. सिलोन वरच सकाळी भुलेबिसरे गीत या कार्यक्रमात सात वाजून सत्तावन मिनिटांनी लागणारे सैगलचे गाणे ऐकणे हे आमच्यासाठी संध्याकाळी शुभम करोति म्हणण्याइतकेच पवित्र कर्तव्य होते ! विविध भारती वरील सैनिकांसाठी असणारा जयमाला हा सिने संगीताचा कार्यक्रम आमच्या साठी शाळेच्या अभ्यासा इतकाच महत्वाचा होता. तलत च्या गजलावर प्रेम करणारा एक वर्ग, मुकेश ला चाहणारा एक वर्ग,रफी पुढे सगळे फिके म्हणणारा एक वर्ग, तर किशोर कुमार वर जान निछावर करणारा एक वर्ग.. अशा वेगवेगळ्या पक्षाचा तरुण वर्ग होता तेव्हा.कारण गळ्यात उपरणे घालून, हातात झेंडा घेऊन राजकीय पुढाऱ्यांच्या मोर्चात आपले आयुष्य वाया घालविणारी बेजबाबदार पिढी तेव्हा निर्माण झाली नव्हती.
नुकतेच गुलाम अली, अनुप जलोटा यांच्या गजला हवेत तरंगायला लागल्या होत्या. त्या ऐकण्यासाठी कोपऱ्यावरील पानाचा ठेला हे एकमेव सोयीचे स्थान होते. या गजलानी आमच्या पिढीला चक्क वेड लावले होते.
उत्तम मराठी नाटके येत होती. हाऊसफुल चालत होती. अगदी बाळ कोल्हटकर पासून तर वि वा शिरवाडकर, दारव्हेकर, कानेटकर, दळवी पर्यंत लेखकांनी प्रेक्षकांना वेड लावायला सुरुवात केली होती. बॉलिवूड च्या तुलनेत मराठी चित्रपटाकडे पाठ फिरवली जात होती. पण नाटकाला गर्दी भरपूर असायची.थिएटर मधील मोगऱ्याच्या गजऱ्या च्या सुगंधाचे देखील खास आकर्षण होते. तो मी नव्हेच च्या फिरत्या रंगमंचाने जशी तोंडात बोटे गेली तसेच अश्रूंची झाली फुले नाटका मधील शेवटच्या विमानतळाच्या नेपथ्याला टाळ्या देखील दिल्या आम्ही. सगळेच नवीन होते, वेगळे होते तेव्हा..
शोले च्या निमित्ताने कितीतरी जुन्या आठवणी जाग्या झाल्या. काही खेडे गावात प्रेक्षक संख्या बघून रात्रीचा शो सुरू होत असे.ठरल्या वेळी नव्हें. रात्रीच्या शेवटच्या शो ला तर नाईट पायजमा घालून जाण्यात कसलीही लाज वाटत नसे ! आज आपण धार्मिक वादात नको तितके गुंतत चाललो राजकारणाच्या पोळ्या भाजण्यासाठी. पण बॉलिवूड मध्ये नौशाद, रफी, शमशाद बेगम, दिलीप कुमार, कैफी आजमी, सलीम जावेद यांना आम्हीच मोठे केले. डोक्यावर घेतले. आज ज्या बंगालकडे राजकीय भूमिकेतून वाकड्या नजरेने बघितले जाते त्याच वंग भूमीने आम्हाला एस डी, आर डी, मनाडे, अशोक, किशोर कुमार, सत्यजीत रे, बासू दा, ऋषीदा, गुरुदत्त, हेमंत कुमार अशी एकाहून एक रत्ने दिली. त्यांनीच हिंदी चित्र सृष्टी समृद्ध केली.श्रीमंत केली.
सिनेमाच्या जगात सगळे धर्म, सगळ्या भाषा, सगळ्या संस्कृती एकजीव झाल्या. आम्हाला जगण्यातला आनंद देत गेल्या. आज नवी गाणी ओठावर रेंगाळत नाहीत. गुणगुणावी शी वाटत नाहीत. संवाद लक्षात राहत नाहीत. सगळेच बदलले आहे. सगळे अल्पजीवी झाले आहे. थिएटर बेडरूम मध्ये आल्यापासून मनोरंजनाचे महत्वच बदलले आहे. हा रिमोट ने सोफ्यावर बसून सारखे चॅनेल बदलण्याचा अस्थिर जमाना आहे ! आम्हाला मात्र अमजद खान चा अरे सांबा, कितने आदमी थे हा डायलॉग विसरू म्हटले तरी विसरता येत नाही. अन् धर्मेंद्र ची मौसी कडे हेमा साठी शिफारस करतानाचे संवाद आठवले की हसून लोटपोट झाल्या शिवाय राहवत नाही. ते दिवस मंतरलेले होते आमच्यासाठी !

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैदराबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️9 869484800

शोले चित्रपट हा भारतीय चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय अनुभव आहे.