राजा गोसावी
नाट्य,चित्र अभिनेते राजा गोसावी यांची जयंती नुकतीच, 28 मार्च रोजी होऊन गेली. त्या निमित्ताने हा विशेष लेख. या थोर मराठी विनोदी अभिनेत्याला आपल्या पोर्टल तर्फे विनम्र अभिवादन.
– संपादक
नाट्य,चित्र अभिनेते राजा गोसावी यांचा जन्म २८ मार्च १९२५ रोजीचा. त्यांचं आख्ख आयुष्य म्हणजेच एक विनोद होता. त्यांना चित्रपट नाटकाच्या वेडापायी पडेल ते काम करावे लागले.
चौथी इयत्तेपर्यंतच शिकलेल्या राजा गोसावी यांचे खरे नाव राजाराम जरी असले तरी ते राजा गोसावी या नावानेच फेमस होते.
ते मूळसातारा जिल्ह्यातील माणदेश भागातल्या सिद्धेश्वर कुरोली येथील होते. एकूण २६५ मराठी आणि ५ हिंदी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या; तर अनेक नाटके आणि त्याचे शेकडो प्रयोग त्यांनी केले.
मेळे, गाणी, नकला आणि नाटके या यांची लहानपणापासून आवड असलेल्या राजाभाऊंनी घरातून काढता पाया घेतला आणि थेट गंगाधरपंत लोंढेंच्या ‘राजाराम संगीत मंडळी’त प्रवेश मिळवला. तेथे पडद्यामागील कामे करत असतानाच त्यांनी मा. विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये नोकरी पत्करली. ही नोकरी करत असतानाच चित्रपटाच्या विविध भागात थातूरमातूर कामे केल्यावर त्यांना ‘चिमुकला संसार’ या चित्रपटात पहिले किरकोळ काम मिळाले. नंतर त्यांनी ‘गजाभाऊ’ आणि ‘बडी माँ’ या चित्रपटांतही किरकोळ कामे केली.
‘गजाभाऊ’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचा दामूअण्णा मालवणकरांशी परिचय झाला, त्यानंतर त्यांना दामुअण्णा मालवणकरांच्या ‘प्रभाकर नाट्य मंदिर’ या नाट्यसंस्थेत प्रवेश मिळाला. तेथे त्यांना नाटकाचे प्रॉम्टिंग करण्याचे काम मिळाले. त्यांना एकदमच नाटकात काम करण्याची संधी मिळाली नाही. नाटक कंपनीत पडेल ती कामे करत असतानाच हळूहळू नाटकात उभे राहण्याची संधी मिळाली.
प्रथम त्यांना या संस्थेच्या ‘भावबंधन’ या नाटकातील स्टेशन मास्तरच्या पहारेकऱ्याचे काम मिळाले. नंतर ते त्या नाटकात मोरू, फौजदार, मनोहर व धुंडिराज या भूमिका करत असत. धुंडिराजचा भाबडेपणा ते बेमालूम व्यक्त करीत. भावी काळात त्यांनी नाटकांत आणि चित्रपटांत प्रेमळ मनाच्या आणि साध्या स्वभावाच्या विविध व्यक्तिरेखा रंगवल्या, त्याची मूळ प्रेरणा धुंडिराज व्यक्तिरेखेत होती.
राजा गोसावी यांनी पुढे ‘उधार उसनवार‘, ‘एकच प्याला’, ‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘शिवसंभव’ अशा असंख्य नाटकात लहानसहान कामे केली.
त्यांचा विवाह ५ जुलै १९४९ रोजी झाला. आता त्यांच्यावर बायकोचाही भार होता. प्रपंचाचा खर्च भागविण्यासाठी त्यांनी पुण्याच्या ‘भानुविलास’ थिएटरमध्ये बुकिंग क्लार्कची नोकरी पत्करली. नाटकातही ते काम करत होते.
दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘अखेर जमलं’ या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना त्यांनी याही चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. कोडे सोडवण्याऱ्या माणसाची त्यांनी रंगवलेली व्यक्तिरेखा राजा परांजपे यांच्या नजरेत भरली.
राजाभाऊंनी त्यांना ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात काम दिले. हे विनोदी चित्र कमालीचे गाजले. ग. दि माडगुळकर त्या चित्रपटात त्यांच्या सासऱ्याच्या भूमिकेत होते. आपल्या मुलीशी लग्न करायचे तर आधी एक लाख रुपये खर्चून दाखव, अशी अट त्यांनी घातली होती. परंतु झाले उलटेच. त्यांनी घोड्याच्या मरतुकड्या रेसवर पैसे लावले. तो मरतुकडा घोडा रेसमध्ये जिंकला. राजाभाऊंना आणखी पैसे मिळाले. अशी गमतीजमती त्यात होत्या.
ज्या भानुविलासमध्ये ते बुकिंग क्लार्क होते, तेथेच हा चित्रपट हाऊसफुल गर्दी खेचत होता. त्याच चित्रपटगृहात ते तिकिटांचे ब्लॅकमेकिंग करायचे. चित्रपटाला महोत्सवी यश मिळाले. अल्पावधीतच ते ‘हिरो’ बनले. या यशामुळे चित्रपट निर्माते त्यांच्याभोवती फिरू लागले. त्यांनी आयुष्यभर विनोदी भूमिका मोठ्या प्रमाणात केल्या.
अशा या हसतमुख आणि निरागस चेहऱ्याच्या अभिनेत्याचा मृत्यू २८ फेब्रुवारी १९९८ रोजी झाला.

– लेखन : प्रकाश क्षीरसागर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
