नौशाद
काहीवेळा आपल्या आयुष्यात अनपेक्षित योग असतात. ध्यानीमनी नसताना अचानक एखादी अशी प्रसिध्द व्यक्ती जवळून भेटते जिचे दर्शन पण दुर्लभझ असते. असा एक योग मला २५ डिसेंबर २००४ साली आला. माझा जीवलग मित्र सुशील गटणे जो संगीतकार नौशाद यांचा फॅन आहे, घरी आला. चल आपण नौशाद यांच्या घरी जावू. आज त्यांचा वाढदिवस आहे. लगेचच तयार होऊन आम्ही दोघे रिक्षा ने वांद्रा येथे कार्टर रोड ला त्यांच्या बंगल्यावर गेलो. दारातच त्यांचे चिरंजीव रहमान भेटले. सुशील अनेकदा जात असल्याने त्याला सगळे ओळखत. रहमान नी सांगितले पापा सो रहे है आपको रुकना पडेगा. आम्ही बाहेर दिवाणखान्यात बसलो. जरा वेळाने नौशाद उठल्यावर आम्हाला आत बोलावले. पलंगावर नौशाद बसले होते. बाजूच्या खुर्चीवर संगीत संयोजक/संगीतकार उत्तम सिंग बसले होते. आम्ही नौशाद यांना पुष्पगुच्छ, मिठाईचा पुडा दिला. दिलखुलास आमच्याशी त्यांनी गप्पा मारल्या. एका मोठ्या व्यक्तीला भेटल्याचे समाधान झाले.
भारतात मोगल आल्यावर मुस्लिम संस्कृतिचा प्रभाव पडणे स्वाभाविक होते. खाद्य संस्कृती तसेच शास्त्रीय संगीतात हे जाणवते. उत्तर भारतात लखनौ, अवध या ठिकाणी शास्त्रीय संगीत बहरत गेले. वाजिद अली शहा सारखा संगितप्रेमी नबाब लाभलेल्या अवध प्रांताच्या लखनौ शहरात २५ डिसेंबर १९१९ साली नौशाद यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल वाहिद अली दरबारात मुन्शी होते. ते अतिशय धार्मिक आणि कर्मठ होते. नौशाद यांना लहानपणा पासूनच संगीताची आवड होती. मूकपटाचा जमाना होता. लखनौ शहरात गिरिधरी लाल यांची दोन थिएटर्स होती. बसंत आणि मेफेयर. या दोन्ही थिएटर्स मध्ये गायक, वादक आणि कवी नोकरीला होते. मूकपट प्रदर्शित व्हायच्या आधी या सर्वांना दाखवला जायचा. मग प्रसंगानुसार पार्श्वसंगीत तयार करत. तसेच गाणी तयार केली जात. थिएटर्स मध्ये मूकपट सुरु असताना संगीत वाजवले जायचे, गाणी म्हणली जात असत. आजच्या भाषेत सांगायचे तर हे लाईव डबिंग असे. यात गोहर सारखी गायिका होती, लद्दन मिया हार्मोनियम वाजवत, बाबुल क्लॅरिनेट वाजवत आणि कल्लन मिया तबला वाजवत.
नौशाद आणि त्यांचा भाऊ चार आण्याच्या एकाच तिकीटात सिनेमा पहात. इंटरवल पर्यंत एक जण आणि त्या नंतर दूसरा. मग घरी आल्यावर उरलेल्या भागाचे कथानक दुसर्याल्या ऐकवत. थिएटर मधल्या लाईव डबिंग ने नौशादना मोहून टाकले.
नौशाद यांच्या वडिलांना संगीताचा तिटकारा होता. हार्मोनियम शिकायला पैसे द्यायला त्यांनी नकार दिला.एका वाद्यांच्या दुकानात नौशाद नोकरी करु लागले. वाद्ये स्वच्छ आणि नीटपणे मांडणे हे त्यांचे काम. त्यांचे काम पाहून खुश झालेल्या मालकाने हार्मोनियम बक्षिस दिला. घरी हार्मोनियम आणल्यावर वडिल खवळले. संगीत किंवा घर यातली एक गोष्ट निवड असे सांगितले. नौशाद नी घर सोडले. या आधी उस्ताद बबन खान यांच्याकडून हार्मोनियम आणि उस्ताद युसुफ यांच्याकडून सतारी चे प्रारंभिक शिक्षण त्यांनी घेतले होते.
घर सोडल्यावर नौशाद नाटक कंंपनीत वादकाची नोकरी करु लागले. कंपनी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल तसेच देशाच्या अनेक शहरात दौरे करत असे. गुजरात च्या विरमगाम मुक्कामी आर्थिक अडचणीमुळे कंपनी बंद झाली. घरी परतणे शक्य नव्हते. नाईलाजाने मुंबईचा रस्ता पकडला. हे साल होते १९३७. नौशाद अठरा वर्षाचे होते. मुंबईत त्यांचे दूरचे नातेवाईक झेवियर काॅलेज चे प्रोफेसर अब्दुल अलिम नामी यांच्याकडे कुलाबा येथे नौशाद राहू लागले. त्या वेळी अनेक स्टुडिओ दादर परिसरात होते. खिशात पैसे नसल्याने अनेकदा नौशाद कुलाबा ते चालत यायचे.
कालांतराने नौशाद यांनी प्रोफेसर अलीम यांचे घर सोडून दादरच्या ब्राॅडवे सिनेमासमोर च्या फूटपाथवर आश्रय घेतला. संगीतकार उस्ताद झंडे खान याच्याकडे ४० रुपये महिना पगारावर पियानोवादक म्हणून ते नोकरी करु लागले. त्याच वेळी गुलाम महंमद यांना ढोलकवादक म्हणून महिना ८० रुपये पगार होता. मूकपटाचा जमाना संपला. बोलपट सुरु झाले. सिनेमात गाणी आली. अतिशय खडतर काळ होता. प्लेबॅक पध्दत आलेली नव्हती. नट नट्यांना आपले गाणे स्वतःच गायला लागे आणि वादकांना कॅमेर्याच्या कक्षेत न येता वाजवावे लागे. नौशाद नी ही अनेक वेळा अश्या प्रकारे वादन केले होते. त्यांचे कष्ट पाहून झंडे खां यांनी त्यांना आपले सहाय्यक बनवले. यानंतर मनोहर कपूर, मुश्ताक हुसेन आणि खेमचंद्र प्रकाश यांचे सहाय्यक म्हणून नौशाद नी काम केले. यानंतर यंग इंडिया या रेकाॅर्ड कंपनीत ते १०० रुपये पगारावर नोकरीला लागले.
मुश्ताक हुसैन यांचे सहाय्यक म्हणून निराला हिंदुस्तान, बागबान, पती पत्नी या सिनेमासाठी काम केले. चित्रा प्राॅडक्शन च्या कांचन सिनेमात एक गाणे स्वतंत्रपणे संगीतबध्द करायची संधी त्यांना मिळाली. हे गाणे लिला चिटणीस यांनी गायले. उर्वरीत दहा गाणी ग्यानदत्त यांनी संगीतबध्द केली होती.
नौशाद यांना स्वतंत्रपणे संगीतकार व्हायचे भाग्य लाभले ते प्रेमनगर सिनेमापासून. १९४० साली आधी प्रेमनगर रिलीज झाला आणि नंतर कांचन. यानंतर १९४२ साली दर्शन आणि मेला सिनेमांना त्यांनी संगीत दिले. तो पर्यंत प्लेबॅक सिस्टीम सुरु झाली होती. सुरैय्या ने सर्वप्रथम प्लेबॅक दिला तो शारदा सिनेमात. अभिनेत्री मेहताब साठी तिने हे गाणे गायले होते. नई दुनिया आणि शारदा सिनेमानंतर करदार प्राॅडक्शन्स च्या कानून, नमस्ते, संजोग (सगळे १९४३) यानंतर गीत, जीवन, पहले आप (१९४४) या सिनेमांना त्यांनी दिलेले संगीत मोहक होते पण खरी लोकप्रियता मिळाली ती १९४४ सालच्या रतन सिनेमाने. निर्माता जेमिनी दिवाण याने ७५००० रुपयात सिनेमा निर्माण केला. नुसत्या रेकाॅर्डसच्या विक्रीतून ३,५०,००० रुपये राॅयल्टी मिळाली. हा त्या वेळचा उच्चांक होता.
सात दशकानंतर ही रतन ची गाणी लोकप्रिय आहेत. याच वेळी नौशाद ना लग्नाचा प्रस्ताव आला. वर काय करतो ? सिनेमात आहे हे सांगणे कमीपणाचे वाटायचे म्हणून सांगितले मुंबईत शिवण काम करतो. त्यांच्या लग्नात बॅंडवाल्यांनी रतन ची गाणी वाजवायला सुरुवात केली. सासरे खवळले, कोणी तयार केली असली फालतू गाणी ? त्या संगीतकाराला बडवा. अनेक वर्षं त्यांच्या सासर्यांना माहित नव्हते की त्यांचा जावई आघाडीचा लोकप्रिय संगीतकार आहे.पहले आप सिनेमात महमंद रफि पहिल्यांदा नौशाद यांच्याकडे गायले. यानंतर करदार प्राॅडक्शन्स च्या सन्यासी (१९४५), शहाजहान (१९४६) आणि किमत (१९४६) या सिनेमांना नौशाद यांचे संगीत लाभले. कुंदनलाल सैगल शहाजहान या एकाच सिनेमात नौशाद यांच्या संगीतात गायले. गीतकार मजरुह सुलतानपुरी यांचा पहिला सिनेमा शहाजहान होता.
शहाजहान सिनेमात कुंदनलाल सैगल बरोबर दोन ओळी गाण्याची संधी महमंद रफींना लाभली. या नंतर च्या अनमोल घडी पासून मेहबूब खान आणि नौशाद यांचे सूर जुळले. गायिका नूरजहां चा पाकीस्तान ला स्थलांतरीत व्हायच्या आधीचा शेवटचा सिनेमा होता. १९४७ सालच्या दर्द पासून गीतकार शकील बदायुनी आणि नौशाद यांची जोडी जुळली. दर्द मध्येच गायिका उमादेवी ला (टुनटुन) पहिल्यांदा गाण्याची संधी मिळाली.
लता दिदी नौशाद यांच्याकडे पहिल्यांदा गायल्या १९४९ च्या चांदनी रात सिनेमात. नायिकेसाठी पार्श्वगायन करण्याची प्रथम संधी नौशाद यांनी लतादिदींना दिली १९४९ च्या अंदाज सिनेमाता. गीता दत्त पहिल्यांदा नौशाद साठी गायाल्या दिल्लगी सिनेमात. १९४९ पासून नौशाद यांचा भरभराटीचा काळ सुरु झाला. दुलारी, बाबुल, दास्तान, दीदार, आन, बैजू बावरा, दिवाना असे अनेक यशस्वी सिनेमे येत राहीले. पाश्चात्य वाद्यांचा पहिला वापर त्यांनी जादू सिनेमात केला.
फिल्मफेअर अवाॅर्डस ची सुरुवात १९५३ साली झाली. उत्कृष्ट संगीताचा पहिला पुरस्कार बैजू बावरा साठी नौशाद ना लाभला. ब्राॅडवे थिएटरमध्ये त्यांचा सत्कार झाला. अनेक वर्षापूर्वी आपण समोरच्या फूटपाथवर रहात होतो याची त्यांना आठवण झाली. त्यांनी सांगितले मुझे उस फूटपाथ से इस फूटपाथ पर आनेके लिये कई साल लग गये.
या नंतर १९७० सालापर्यंत अमर, शबाब, उडन खटोला, मदर इंडिया, सोहनी महिवाल, मुगले आझम, कोहिनूर, गंगा जमना, सन ऑफ इंडिया, मेरे मेहबूब, लिडर, दिल दिया दर्द लिया, साज और आवाज, पालकी, राम और श्याम, आदमी, साथी, संघर्ष आणि गवांर या सिनेमासाठी दिलेले संगीत लोकप्रिय झाले. मुगले आझम आणि मदर इंडिया या सारखे भव्य यश इतर सिनेमांना लाभले नाही. मदर इंडिया नंतर शमशाद बेगम यांचे पार्श्वगायन सिनेमातून लुप्त झाले.उस्ताद बडे गुलाम अली खां पहिल्यांदा सिनेमात गायले ते मुगले आझम साठी.
साठच्या दशकाच्या उत्तरार्धात हिंदी सिनेमात आमुलाग्र बदल झाला. सिनेमा रंगीत झाला. नायिकाप्रधान सिनेमे संपले. प्रेक्षकांची अभिरुची बदलली. नौशाद नी आपल्या संगीतात पाश्चात्य वाद्याचा जास्त वापर सुरु केला.राम और श्याम, साथी आणि गंवार या सिनेमात याचा प्रत्यय आला. ७० च्या दशकात सिनेसंगीतात झालेल्या बदलामूळे नौशाद ना जुळवून घेणे अवघड झाले. त्यांचे संगीत एकसुरी वाटू लागले. तांगेवाला, माय फ्रेंड, आयना, सुनहरा संसार, चंबल की रानी हे त्यांनी संगीत दिलेले सिनेमे अपयशी झाले. १९८२ साली रिलीज झालेल्या धरम कांटा सिनेमाचा अपवाद वगळता लव अॅंड गाॅड, आवाज दे कहां है, तेरी पायल मेरे गीत आणि गुड्डू हे सिनेमे कधी आले कधी गेले कळलेच नाही. जवळ जवळ दहा वर्षं ते सिनेसृष्टी पासून दूर होते. २००५ ला अकबर खान च्या ताजमहाल सिनेमाचे त्यांनी नवीन तंत्र वापरुन दिलेले संगीत सुवर्णयुगाची आठवण करुन देत होते.
नौशाद फक्त संगीतकार नव्हते तर उत्तम लेखक आणि निर्माते पण होते. त्यांनी आठवा सूर हे पुस्तक लिहीले ज्यात त्यांनी लिहिलेल्या शायरींचा संग्रह आहे. त्यांनी लिहीलेल्या कथेवर वाडिया मुवीटोन ने मेला सिनेमा निर्माण केला. सनी आर्ट प्राॅडक्शन्स या बॅनरखाली बाबूल, उडन खटोला आणि मालिक सिनेमाची निर्मिती केली.मालिक चे संगीत त्यांचे एके काळ चे सहाय्यक गुलाम महंमद यांनी दिले. अनेक वर्षं रखडलेला पाकिझा चे चित्रण परत सुरु झाले तेव्हा गुलाम महंमद हयात नव्हते.पार्श्वसंगीत नौशाद नी तयार केले. त्यांनी संगीतबध्द केलेल्या सहा गाण्यांचा समावेश लांबी वाढल्याने सिनेमात करता आला नाही. पाकिझा च्या लाॅंग प्लेईंग रेकाॅर्ड मध्ये ही सहा गाणी होती.नौशाद नी टिपू सुलतान, अकबर, सरगम आणि आरोही या टीव्ही सिरियल्स ना संगीत दिले.
नौशाद यांनी ६५ वर्षाच्या फिल्मी कारकिर्दीत ६५ हिंदी सिनेमांना संगीत दिले. एका भोजपुरी आणि एका मल्याळम सिनेमा लाहीत्यांनी संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेले आन, उडन खटोला आणि मुगले आझम तामिळ मध्ये डब केले होते.त्यांनी संगीत दिलेले पाच सिनेमे अर्धवट राहिले. मध्यप्रदेश सरकार चा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकार चा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, उत्तर प्रदेश सरकारचा अवध पुरस्कार आणि संगीत रत्न पुरस्कार, भारत सरकार चा संगीत नाटक पुरस्कार,दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण असे अनेक सन्मान त्यांना लाभले.
नौशाद निर्व्यसनी होते. तलत मेहमूद एकदा रेकाॅर्डींग ला सिगारेट पिताना पाहिल्यावर त्यांनी परत कधीच त्याला रेकाॅर्डींग ला बोलावले नाही. निर्मात्यांना रेकाॅर्डींग ला कधीच आपल्या कामात ढवळाढवळ करु दिली नाही. स्वभावाने अतिशय नम्र होते. मुगले आझम रंगीत केला त्या वेळी सगळी गाणी डाॅल्बी मध्ये परत रेकाॅर्ड केली. मूळ गायकांचा आवाज तसाच ठेवून बाकीचे संगीत डाॅल्बी मध्ये रेकाॅर्ड करायचे अवघड काम त्यांनी संगीत संयोजक उत्तम सिंग यांच्या सहाय्याने केले. या साठी मद्रासहून सतार वाजवणारे आणावे लागले. लव अॅंड गाॅड चे पार्श्वसंगीत करायच्या वेळी त्यांची पत्नी गेली.
दिर्घ आजाराने ५ मे २००६ ला नौशाद गेले. भारतीय संगीताच्या सुवर्णकाळाचा एक प्रमुख स्तंभ काळाच्या पडद्याआड गेला.

– लेखन : विवेक पुणतांबेकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800