किशोर कुमार यांच्या सहवासात
भावस्वराचा बादशहा किशोरकुमार यांची 36 वी पुण्यतिथी काल, 13 ऑक्टोबर 2023 रोजी झाली.
किशोरदा हयात असतांना त्यांचा प्रत्यक्ष सहवास मला लाभला. त्यांना गाताना संगत करण्याचे भाग्य मला लाभले. त्यांच्यातल्या थोर कलावंत, मनस्वी माणसाचा सहवास लाभला. या निमित्ताने त्यांच्या सहवासातील काही आठवणी आपल्या सोबत घेऊन येत आहे.
एकदा मी त्यांना माझ्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी गेलो होतो. तेव्हा ते म्हणाले, “ए क्या हें ?.” मी म्हणालो, “दादा, ए मेरे शादी का कार्ड है ।” त्यांचा मूड चांगला होता. ते म्हणाले, “कौन शादी कर रहा है ?” मी म्हणालो, “मै कर रहा हूं” “तू शादी कर रहा है ?” हाच प्रश्न मला 2 ते 3 वेळा विचारला व नंतर मला हसत म्हणाले, “फिर तू तो कामसे गया।” मी म्हणालो, “आपने तो चार शादीयां की है।” तेव्हा ते म्हणाले, “इसलीये तो मै भी कामसे चला गया।”
नंतर त्यांनी सांगितले की मे महिन्यात मी परदेशात प्रोग्रामसाठी जात आहे. तेव्हाच त्यांनी मला लग्नाच्या शुभेच्छा देऊन मिठाई दिली व पुन्हा मुंबईत येताना पत्नीस बरोबर घेऊन भेटायला सांगितले.
एकदा आम्ही मेहबूब स्टुडिओत 12 ऑगस्ट 1986 रोजी मि. इंडिया या चित्रपटाचे आमच्या कोरस गाण्याचे रेकॉर्डिंग होते. किशोरदा व कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात रेकॉर्डिंग झाले. रेकॉर्डिंग संपल्यावर किशोरदा यांना लवकर घरी जायचे होते. परंतु त्यांची गाडी आली नव्हती. तसेच लक्ष्मीकांतजी यांचा ड्रायव्हरही आला नव्हता. तेव्हा किशोरदा मला म्हणाले, “अरे उदय, मुझे घर जलदी जाना है । एक टॅक्सी ले आना ।” मी लगेच जाऊन टॅक्सी घेऊन आलो. टॅक्सी आल्यावर त्यांनी मला आग्रह करून त्यांच्याबरोबर घरी नेले. तेंव्हा त्यांच्याबरोबर खूपच मोकळेपणाने गप्पा मारता आल्या. त्यादिवशी त्यांचा मूड खूप चांगला होता. त्यातच टॅक्सीवाला त्या भागात नवीन असल्याने रस्ता चुकला. त्यामुळे त्यांच्या घरी जाण्यासाठी खूप वेळ लागला तेंव्हा त्यानी बोलताना सांगितले की आता पहिल्यासारखे गाणे गाण्यासाठी मजा येत नाही. लवकरच मी मुंबई सोडून खंडवा येथे राहण्यास जाणार आहे. मी तेव्हा कृषी अधिकारी असल्याने त्यांनी शेतीबद्द्ल बरीच माहिती घेतली. त्यांची इच्छा खंडवा येथे आंबा व द्राक्ष यांची लागवड करण्याची होती. नंतर मला ते त्यांच्याबरोबर खंडवा येथे त्यांची शेती दाखवण्यासाठी नेणार होते. परंतु दुर्दैवाने तो योग काही जुळून आला नाही.
याच टॅक्सी प्रवासात मी त्यांना मला मुलगा झाल्याचे सांगितले. तेव्हा त्यांना खुप आनंद झाला व नुसतं सांगू नको, मिठाई खाऊ घाल, असे ते म्हणाले व टॅक्सी मिठाईच्या दुकानासमोर उभी करायला लावली. नंतर त्यांना मिठाईचा बॉक्स घेऊन दिला. तेव्हा त्यांनी माझ्या मुलास आशीर्वाद दिला व मुंबईत येताना मुलाला घेऊन येण्यास सांगितले. त्यावेळी टॅक्सीचे 16 रुपये बील झाले होते. ते मी स्वतः देऊ लागलो तेंव्हा त्यांनी माझ्या पाठीवर जोरात थाप मारली व “तू बील नही देना”असे म्हणाले. त्यानंतर त्यांनी टॅक्सी ड्रायव्हरला 20 रु नोट दिली व परत पैसेही घेतले नाहीत.
लोक असे म्हणतात की ते फार कंजूष होते पण मला तरी तो अनुभव आला नाही. नंतर त्यांच्या घरी गेल्यावर त्यांच्याबरोबर चहा पिऊन मी परत आलो.
प्रत्येक वेळी माझ्याबरोबर किशोरदा चे वागणे खूपच प्रेमाचे व आपुलकीचे होते. ते स्वतः एवढे महान गायक असून देखील माझ्या सारख्या छोट्या क्षुल्लक कोरस गाणाऱ्याची ओळख ठेऊन त्यांच्या थोर मनाचे दर्शन घडविले.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच मी मुद्दाम त्यांचे अंत्यदर्शनासाठी व अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी गेलो होतो. त्यांना खांदा देण्याचे भाग्य मला लाभले. अजूनही त्यांचा आवाज कोठुन ही कानावर पडला तर अक्षरशः जीवाची खूप तगमग होते व एकदम मन उदास होते. भूतकाळात जाऊन त्यांच्या आठवणीत डुबून जाते व ते आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.
मी गेल्या अनेक वर्षांपासून यादिवशी “एक श्याम किशोर के नाम” या प्रोग्रामचे आयोजन करीत असे. या यूगातील महान गायक, अष्टपैलू, कलाकार किशोर कुमार यांना पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

— लेखन : सिने गायक उदय वाईकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800