“संध्या : फिल्मी दुनियेतील योगिनी”
भारतीय चित्रपट सृष्टीतील निर्माते दिग्दर्शक अभिनेते व्ही. शांताराम यांच्या तृतीय पत्नी संध्या यांचे अलीकडेच निधन झाले. त्यानिमित्ताने परळ येथील राजकमल स्टुडिओ मध्ये व्ही. शांताराम यांचे चिरंजीव किरण शांताराम यांनी आपल्या आईला काल श्रद्धांजली वाहिली !
किरण शांताराम, तेजश्री आणि सिनेमासृष्टीतील अभिनेत्री राजश्री ही व्ही. शांताराम यांच्या जयश्री या पत्नीपासून झालेली तीन अपत्ये ! संध्या आणि व्ही. शांताराम यांच्यामध्ये 32 वर्षाचे अंतर होते. शेवटच्या दिवसापर्यंत संध्या यांची तब्येत अतिशय चांगली होती.
हिंदी चित्रपट सृष्टीत येण्याअगोदर संध्या या गुजराती नाट्यसृष्टीत होत्या. विजया श्रीधर देशमुख हे त्यांचे माहेरचे नाव. अमर भूपाळी हा त्यांचा पहिला चित्रपट तर पिंजरा हा शेवटचा चित्रपट !
किरण शांताराम यांनी आपल्या भाषणात त्यांची एक चांगली आठवण सांगितली. ती अशी, “पिंजरा चित्रपटाच्या सुमारास संध्या यांचे वजन जरा जास्त झाले होते. ते कमी करण्याकरता व्ही. शांताराम यांनी त्यांना उरळी कांचन येथील एका संस्थेत दाखल केले. त्यावेळी त्यांना नेण्याचे आणण्याचे काम किरण शांताराम करत असत. एकदा त्या शांत परिसरात त्यांना आणायला किरण शांताराम गेले आणि त्यांनी त्यांच्या नकळत संध्या यांना ”आई” अशी हाक मारली ! ती हाक ऐकून संध्या यांनी किरण यांना पोटाशी धरून ओक्साबोक्शी रडू लागल्या ! त्या म्हणाल्या ”मला कधीतरी खात्री होती की तू मला आई म्हणशील !” ही आठवण ऐकताच प्रेक्षकही भारावून गेले !

नवरंग सिनेमामध्ये संध्या यांनी काम केलं. इतकेच नव्हे त्यातील अनेक नृत्यांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं ! परंतु त्यांनी नृत्यदिग्दर्शन म्हणून स्वतःचं नाव घातलं नाही, त्याच्या ऐवजी त्यांनी ”शाम” हे नाव नृत्यदिग्दर्शक म्हणून दिलं ! आता शाम हे नाव कशावरून आलं ? तर व्ही शांताराम यामधील शांताराम या नावाचे पहिले अक्षर शा आणि म हे शेवटचे अक्षर घेऊन त्यांनी शाम हे नाव बनवले !
त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी राजकमल स्टुडिओ मधील मिनी थिएटर मध्ये सुप्रसिद्ध चित्रपट अभ्यासक अरुण पुराणिक यांनी बनवलेली संध्यावर एक डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली आणि त्यानंतर संध्या यांनी अभिनय केलेला “जलबीन मछली” हा चित्रपट दाखवण्यात आला !

या कार्यक्रमाला अनेक नामवंत उपस्थित होते. राजकमल स्टुडिओ मध्ये ज्यांचे भाऊ काम करायचे ते बोरकर वयाच्या 95 व्या वर्षी स्वतः स्टुडिओमध्ये आले होते. तसेच किरण शांताराम यांच्या पत्नी, त्यांच्या सुना आणि त्यांच्या नाती देखील समारंभाला उपस्थित होत्या.
राजकमलच्या लोगोमध्ये एक बाई (विजया महाद्वार) कमळामध्ये उभी राहून हातातून खाली फुले सोडत आहे असे दिसते. या बाईंची मुलगी आणि या बाईंची नात ही देखील या कार्यक्रमाला उपस्थित होती ! स्वतः अरुण पुराणिक हे देखील या प्रसंगी हजर होते.
संध्या यांनी राजकमल स्टुडिओ मध्ये वीस वर्षे काम केले आणि त्यांनी बारा चित्रपटात अभिनय केला. व्ही शांताराम आणि राजकमल यांच्याशी त्या इतक्या प्रामाणिक होत्या की बाहेरच्या मोठमोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स त्यांच्याकडे आल्या परंतु त्यांनी राजकमल सोडून कुठल्याही चित्रपटात काम करण्यास नकार दिला.
अरुण पुराणिक संध्या बद्दल खालील प्रमाणे लिहितात. (सदर लेखन संध्याच्या निधना अगोदर केलेले आहे, याची नोंद घ्यावी.) ”शांताराम बापू हे धोरणी दूरदर्शी व व्यवहार चतुर होते. त्यांची पहिली पत्नी विमला ही कोल्हापूरकडची साधी गरिबाघरची तरुणी होती. दुसरी पत्नी जयश्री ही आधी नटी होती नंतर ती बापूंची पत्नी झाली. तिच्या शकुंतला, डॉक्टर कोटणीस व दहेज चित्रपटांनी राजकमलला आर्थिक स्थैर्य व प्रतिष्ठा मिळवून दिली. शांताराम बापूंना याची मनोमन जाण होती.
बापूंनी आपल्या पत्नी व मुलांमध्ये कधी भेदभाव केला नाही. विमला व जयश्री यांना पेडर रोड सारख्या उच्चभ्रू वस्तीत आलिशान फ्लॅट घेऊन दिले. कपडेलत्ते, दागदागिने घेऊन दिले. मुलांच्या शिक्षणावर खर्च केला. जे शक्य होते ते सर्व काही केले. किरणकडे स्टुडिओची जबाबदारी सोपवली.
दहेज, परछाई नंतर जयश्रीची नायिका म्हणून लोकप्रियता ओसरू लागली होती. बापूंनी काळाची पावले अचूक ओळखली होती. त्यांनी आपली नायिका बदलली. अमर भूपाळीच्या निर्मितीच्या वेळी राजकमलने संध्याशी तीन वर्षाचा करार केला होता. त्यानंतर मात्र त्यांनी आपला आयुष्याचा करार तिच्याशी करून टाकला !
संध्याने अमर भूपाळी, झनक झनक पायल बाजे, दो आँखें बारा हात, नवरंग, स्त्री, जलबिन मछली व शेवटी पिंजरा या चित्रपटांच्या द्वारे बापूंना भरपूर पैसा मिळवून दिला !
संध्या ही मधुबाला सारखी सौंदर्यवती नव्हती. मीनाकुमारी नूतन नर्गिस सारखी कुशल अभिनेत्री नव्हती. वैजयंतीमाला सारखी नृत्यांगनाही नव्हती. परंतु संध्याने ही कसर प्रचंड मेहनत करून शांताराम बापू सारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकांच्या हाताखाली अभिनयाचे धडे गिरवून भरून काढली !
आपल्या बहुतेक चित्रपटातून तिने नृत्य सादर केलेली आहे. ही नुसते प्रचंड दमछाक करणारी, हाडे खिळखिळी करणारी होती. इतर कोणत्याही दिग्दर्शकांनी झनक झनक पायलबाजे व नवरंग या नृत्य प्रधान चित्रपटांसाठी नायिका म्हणून वैजयंतीमालाचा विचार केला असता ! पण बापूंचा आपल्या दिग्दर्शनावर व संध्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता आणि संध्या ने तो विश्वास सार्थ ठरवला !
भूमिका अचूक वटवण्याच्या बाबतीत संध्याने कधीच तडजोड केली नाही. जलबिन मछलीच्या वेळी तर हाडे दुखावली गेल्यामुळे तिला चक्क प्लास्टर मध्ये ठेवावे लागले होते ! पण तिने त्याची तमा बाळगली नाही. पण आता उतार वयात त्यांना तो त्रास जाणवला !

बापूंनी संध्याला मात्र शेवटपर्यंत आपल्या जवळच ठेवले. राजकमल स्टुडिओच्या आपल्या दुसऱ्या मजल्यावरील आलिशान कार्यालयाच्या समोरचा फ्लॅट त्यांनी संध्या ला राहायला दिला होता ! ते स्वतःही तिथेच राहत असत. संध्याने स्टुडिओच्या कामात कधीही ढवळाढवळ केली नाही. कधीही पार्टी नाही, शॉपिंग नाही ! ही साध्वी बाई स्टुडिओ सोडून कुठेच जात नसे ! फक्त शांताराम बापू आणि आपले घर याशिवाय तिला दुसरे कोणतेही विश्व नव्हते ! मातृत्वाचा हट्टही संध्याने कधी घरला नाही ! मिळालेल्या गोष्टीत समाधान मानले.
किरण शांताराम आपल्या धाकट्या आईची सर्वतोपरी काळजी घ्यायचे. तिच्या सेवेसाठी त्यांनी 24 तास नर्स ठेवली होती. संध्या अनेक वर्षे कोणाही बाहेरच्या लोकांना भेटत नव्हत्या. संपूर्ण विरक्तीत एखाद्या साध्वी सारखे जीवन त्या व्यतीत करत होत्या. फिल्मी दुनियेत अशी योगिनी क्वचितच पाहायला मिळते.”

— लेखन : राजेंद्र मंत्री. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
