आपल्या भारतीय संस्कृतीत “चिन्ह” अर्थात symbol ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसे आपल्या भारतीय परंपरेत शुभसंकेत, पावित्र्य, मांगल्य यांची प्रतिके मानली जाणारी विविध चिन्हे तसेच ब्रीद वाक्यावरील मजकूर अशी कल्पना डोळ्यासमोर येते व त्या चिन्हांचा काय अर्थ आहे ? त्याचे आपण निकष लावतो.
“चिन्हांच्या अनोख्या जगात” असे ज्याचे वर्णन करता येईल, असा “चिन्ह” किंवा “सिम्बाॅल्स” यांवर आधारीत एक अनोखा कार्यक्रम, अजेय संस्थेतर्फे स्वातंत्र्यदिनी, बेडेकर शाळेच्या विद्यालंकार सभागृहात सादर झाला.
कार्यक्रमाचे शीर्षक होते ‘श्री‘ स्वतःचे सर्व काही चांगलं असल्याचं प्रतीक मानलं जातं. या कार्यक्रमाची संकल्पना डॉ क्षितिज कुलकर्णी यांची होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजेयचा निर्माता आणि अध्यक्ष गौरव संभुस यांनी प्रास्ताविकात या संपूर्ण संकल्पनेविषयी माहिती दिली.

तेजस्विता मराठे यांच्या “ॐ” या चिन्हावर आधारीत अप्रतिम नृत्याविष्काराने कार्यक्रमास प्रारंभ झाला.
या कार्यक्रमात २२ कलाकारांनी वेगवेगळी चिन्ह घेऊन अभिवाचन, नृत्य, एकपात्री, गाणं अश्या माध्यमातून चिन्ह पोहचवली. यामध्ये स्वस्तिक, झेंडा, चैत्रांगण, उंबरठा, सरस्वती व इतर वेगळी चिन्ह निवडली होती. प्रत्येक कलाकाराने अतिशय मेहनत घेऊन आणि अभ्यासपूर्ण विचारांनी आणि निवडलेल्या चिन्हांच्या साजेशा शैलीने प्रत्येक चिन्हाची भूमिका व त्याचे प्रयोजन आणि रोजच्या जीवनात असलेले महत्त्व व स्थान आपल्या कलाकृतीतून रसिकांना उलगडून दाखवले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शैलेश साळवी यांनी अचूक वेळेचे भान राखत थोडक्यात पण नेमके कसे बोलावं याचे विवेचन आपल्या भाषणातून मांडले आणि कार्यक्रमाचे संपूर्ण सार आपल्या छोटेखानी भाषणातून नेमकेपणाने श्रोत्यांपर्यंत पोहोचवले.

कार्यक्रमाचा निवेदक कार्तिक हजारे याने बॉब हे परग्रहावरून आलेले एलियन सदृश्य काल्पनिक पात्र वापरून कार्यक्रमाचं अनोख्या पद्धतीने निवेदन केलं.
सर्वात शेवटी औपचारिक स्वरूप असलेलं पण अत्यंत महत्त्वाचं आभार व्यक्त करण्याचं काम उमा रावते यांनी केलं.
“आनंद लेले” यांच्या सुंदर निरुपणाने आणि सुरेल गायनाने विद्येच प्रतिक मानली जाणारी “सरस्वती” या चिन्हामार्फत सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.
— लेखन : सिद्धी पटवर्धन ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800