कोणत्या क्षणासाठी ही सर्व फुले फुलतात ?
कोणत्या क्षणासाठी या रंग नभीं खुलतात ?
कोणत्या क्षणासाठी या लाख झुले झुलतात ?
कोणत्या क्षणासाठी या भलेभले भुलतात ?
क्षणभंगुर जन्माला या चिरंतनाची ओढ
काहीच चिरंतन नसते जे क्षणभर भासे गोड
क्षण एक चिरंतन येथे हा जन्म शोधतो आहे
जणू सौख्याची परिभाषा दुःखास लांघते आहे
पण जुळत कुठेतरी नाही काळाची अमाप मिती
क्षणीं झणी धावून येती निती अन् चालीरीती
कधी क्षणाला जडतो चिरंतनाचा रोग ?
असे भोग हा कोणां कोणांस त्याग की योग !
की क्षणिक सुखाच्या पोटी कुणी रिते होऊनी जाणे
अन् उभा जन्म कुणी ल्यावे चिरंतनाचे लेणे !

— रचना : नयना निगळ्ये. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800