लोकसत्ता दैनिकात १६ जानेवारी १९९० रोजी प्रसिद्ध झालेल्या हृदयस्पर्शी बातमीचा जवळपास तीस वर्षांनी केलेला हा पाठपुरावा…
रेल्वे रुळ ओलांडणारी १४ वर्षे वयाची कर्ण बधीर मुलगी आणि तिला वाचविण्यासाठी झेपावणारा किसन तुकाराम कदम हा तरुण हे दोघेही मृत्युमुखी पडले.
केवळ ही बातमी देऊन न थांबता अपघातग्रस्त कुटुंबाला लोकसत्ताचे तत्कालीन प्रमुख संपादक माधव गडकरी, निवासी संपादक अनिल टाकळकर, बातमीदार सुनील कडुस्कर यांनी वाचकांच्या मदतीने भरीव मदत मिळवून दिली.
या घटनेनंतर तीस वर्षात किसन कदम यांच्या कुटुंबियांच्या जीवनाचा फ्लॉलो-अप विश्वकर्मा विद्यापीठाच्या तीन विद्यार्थीनींनी केला. त्यातून उभी राहिलेली कथा मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तीन भाषांतून स्वतंत्रपणे लिहिली.
या अनोख्या केस स्टडीचा प्रतीक्षा जाधव यांनी लिहिलेला हा मराठी वृत्तांत……
युद्धभूमीवर हौतात्म्य प्राप्त झालेल्या सैनिकाच्या असीम त्यागाबद्दल जनमानसात आदराची भावना असणे स्वाभाविक आहे. परंतु केवळ युद्धभूमीवरच नव्हे तर आयुष्याच्या रोजच्या जगण्याच्या लढाईत काही असामान्य माणसे जिवाची बाजी लावून अनोळख्या व्यक्तींसाठी देखील हौतात्म्य पत्करतात. अशांचे बलिदान हे युद्धभूमीवरील सैनिकांच्या बलिदानाइतकेच मौलीक असते. माणुसकीच्या नात्यावरील विश्वास त्यामुळे अधिक दृढ होतो. या अनुभवाची प्रचिती देणारी बातमी लोकसत्ताने देऊन पत्रकारितेतून रचनात्मक कार्य कसे उभे करता येते याचा वस्तुपाठ निर्माण केला.
दैनिकामध्ये अपघाताच्या बातम्या येणे हा एक अविभाज्य भाग आहे. तशीच जानेवारी १९९० मधील ही घटना होती. पुण्यातील शिवाजीनगर जवळील वाकडेवाडी रेल्वे क्रॉसिंगवर घडलेल्या या रेल्वे अपघातात रेल्वे रुळ ओलांडणारी १४ वर्षे वयाची कर्ण बधीर मुलगी आणि तिला वाचविण्यासाठी झेपावणारा किसन तुकाराम कदम हा तरुण हे दोघेही मृत्युमुखी पडले.
संध्याकाळी झालेल्या या घटनेच्या वेळी रेल्वे क्रॉसिंगवर भरपूर गर्दी होती. गाडी वेगाने येत असतानाही ही मुलगी रूळ ओलांडत होती. इंजिन ड्रायव्हरने इंजिनची शिट्टी वाजवून तिचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण कानाने ऐकू येत नसल्याने तिच्या ते लक्षातच आले नाही. ही मुलगी गाडीखाली सापडणार याची कल्पना गर्दीतील अनेकांना आली पण धावत जाऊन तिला वाचविण्याचे साहस अन्य कोणालाच करावेसे वाटले नाही. किसन कदम यांनी मात्र अखेरच्या क्षणी आपल्या जिवाची पर्वा न करता या मुलीला वाचविण्यासाठी धाव घेतली. पण त्यात दोघांनाही प्राण गमवावे लागले.
ही बातमी देणारे लोकसत्ताचे वार्ताहर सुनील कडूसकर यांचे वैशिष्ट्य असे की, अपघाताची ही बातमी दिल्यानंतर हे दोघे कोण असतील ? परस्परांत त्यांच्यात काय नाते असेल ? त्यांच्या परिवाराचे आता काय होईल ? अशा विविध प्रश्नांनी त्यांना अस्वस्थ केले. पत्रकारितेचे धडे गिरविताना त्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गुणांचा उल्लेख होतो. त्यामध्ये ती व्यक्ती सहृदय, माणुसकीचे मूल्य जपणारी अशा गुणांची असावी अशी अपेक्षा त्यात व्यक्त होते.
कडूसकर यांच्या या बातमीमधून त्यांची संवेदनशीलता आणि माणसांच्या सुखदुःखाविषयी त्यांना वाटणारी आस्था यांची प्रचिती आली. त्यांनी या बाबत दिलेल्या माहितीनुसार नंतर ते पुन्हा घटना स्थळी गेले. त्यावेळी त्यांना मृत व्यक्तीचे नाव किसन कदम असून ते अॅम्युनिशन फॅक्टरीचे कामगार असल्याचे कळले.
किसन कदम यांचे कुटुंब वाकडेवाडी येथील झोपडपट्टीत रहात होते. पत्नी, दोन मुली, एक मुलगा व दिव्यांग भाऊ असे सर्वजण आठ बाय आठच्या छोट्या खोलीत रहात असल्याचे निदर्शनास आले. कदम यांची पत्नी वैजयंता दुसऱ्याच्या घरी धुणी- भांडी करून आपल्या संसाराला हातभार लावत होत्या.
या कुटुंबातील कर्ता पुरुषच गमावल्याने साऱ्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. ही परिस्थिती जाणून घेतल्यावर या कुटुंबाला सावरण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी आपले वरिष्ठ, लोकसत्ताचे निवासी संपादक अनिल टाकळकर यांच्यापुढे मांडली.
त्यानंतर त्या दोघांनीही लोकसत्ताचे प्रमुख संपादक माधव गडकरी यांच्याशी संपर्क साधला. गडकरी हे सहृदय, संवेदनशील व माणुसकीचे मूल्य जपणारे संपादक होते. त्यांच्या “चौफेर” या लोकप्रिय स्तंभामधूल याचे प्रतिबिंब उमटलेले असायचे.
किसन कदम यांचे शौर्य त्यांना भावले. आपली जवळची नातेवाईक नसतानाही देखील केवळ माणुसकीच्या भावनेने अनोळखी व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न करणे, हे उदाहरण समाजात प्रेरणादायी ठरेल असे त्यांना वाटले. आणि असे बलिदान करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या मागे समाजाने सक्रीय पाठबळ दिले तर त्यामुळे अशा तऱ्हेचे धाडस करणाऱ्यांना ते आश्वस्त करणारे वाटेल.
हे हौतात्म्य सैनिकाच्या बलिदानाइतकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांचे प्रांजळ मत होते आणि चौफेर या आपल्या स्तभांतून त्यांनी ते प्रभावीपणे मांडले. याच स्तंभातून त्यांनी किसन कदम मदत निधी या योजनेची घोषणाही केली. इंडियन एक्स्प्रेस समुहाचे सर्वेसर्वा विवेक गोएंका यांना ही कल्पना सांगून या समुहाच्या वतीने २५ हजाराची मदत त्यांनी जाहीर केली. समुहाचे आताचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वर्गीस यांनी या मोहिमेची प्रशासकीय जबाबदारी तितक्याच आत्मीयतेने उचलली.
या आवाहनाला मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दहा बारा दिवसांतच या निधीने ८५ ते ८८ हजाराचा टप्पा ओलांडला. आजच्या काळात चलनवाढीमुळे ही रक्कम अल्प वाटत असली तरी ३० वर्षापूर्वी तिचे मूल्य मोठे होते. निधी संकलन एक दोन दिवसांत बंद करणार असल्याचे जाहीर केल्यावर त्याच दिवशी सकाळी एक ज्येष्ठ महिला नागरिक ११ हजाराचा धनादेश घेऊन लोकसत्ताच्या कार्यालयात दाखल झाली. आपला धनादेश सफाई कर्मचाऱ्याच्या हाती देऊन आपले नाव न सांगताच ती घरी परत गेली.
एवढी मोठी देणगी देणारी ही महिला कोण, हा प्रश्न पडल्यावर तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पतीच्या निधनानंतर ही महिला पुण्यातीलच एका वृद्धाश्रमात रहात होती. त्यांना भेटायला कडूसकर व त्यांच्या पत्नी तेथे पोहोचल्या. एवढा मोठा निधी देण्यामागील कारण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या म्हणाल्या, वैधव्य किती यातनादायी व कठीण असते, हे मी स्वतः अनुभवले आहे. त्यामुळे ही मदत करावी, असे मला वाटले. शिवाय एक लाख रुपयांना ११ – १२ हजार रुपये कमी पडतात, म्हणून मी या रकमेचा धनादेश दिला. कारण हा निधी किमान एक लाखावर व्हावा, अशी माझी इच्छा आहे.
लोकसत्ताने या कुटुंबाचे जणू पालकत्त्वच घेतले होते. म्हणूनच अॅम्युनिशन फॅक्टरीचे सरव्यवस्थापक एस. एस. नटराजन यांच्याशी संपर्क साधून अनुकंपा तत्वावर कदम यांच्या पत्नी वैजयंता यांना नोकरी द्यावी, अशी विनंती लोकसत्तातर्फे करण्यात आली. नटराजन यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून कदम यांच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन आठवड्यात वैजयंता यांना आया म्हणून नोकरीवर घेतले. त्याचबरोबर मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारीही अॅम्युनिशन फॅक्टरीने उचलली. त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणावर हलका झाला. काही दिवसातच फॅक्टरीच्या क्वॉर्टरमध्ये वैजयंता कदम यांची राहण्याची व्यवस्था झाली.
नंतर निधी संकलनाद्वारे जमा झालेली रक्कम कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी महाराष्ट्र बँकेच्या ट्रस्टी कंपनीकडे जमा करण्यात आली आणि तिचा विश्वस्त निधी तयार करण्यात आला. या प्रक्रीयेत गडकरी, टाकळकर आणि कडूसकर हे विश्वस्त सल्लागार होते. मुले मोठी झाली की, प्रत्येकाच्या वाट्याला २५ टक्के निधी येईल व तो त्याच्या शिक्षणासाठी वापरला जाईल, असे नियोजन कडूसकर यांनी केले.
काही वर्षानंतर एक लाख रुपयांच्या रकमेचे ८ ते ९ लाख रुपये झाले. मुलीच्या विवाहासाठी निधीची २५ टक्के रक्कम वापरण्यात आली. दुसऱ्या मुलीने घेतलेल्या नर्सिंग शिक्षणासाठी याच निधीतून मदत मिळाली. तिसऱ्या मुलाने दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर त्याच्या लग्नालाही २५ टक्के रक्कम देण्यात आली.
दरम्यान वैजयंता यांनी तब्बल ३२ वर्षे अॅम्युनिशन फॅक्टरीत नोकरी केली. पुढील वर्षी फेब्रुवारीत त्या निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्या दिघी येथे घेतलेल्या नव्या घरात रहायला गेलेल्या आहेत.
हे घर घेतानाही निधीतील उर्वरित रकमेचा वापर करण्यात आला. कमी किमतीत वाढीव सवलती मिळाव्यात म्हणून बिल्डरशीही वाटाघाटी करण्याचे काम कडूसकर यांनी केले.
माणुसकी प्रती संवेदनशील असलेला वार्ताहर पत्रकारितेच्या सांकेतिक चौकटीच्या बाहेर जाऊन एखाद्या कुटुंबासाठी किती मोठा आधार ठरू शकतो, असे उदाहरण पत्रकारितेत क्वचितच पहायला मिळते.
कदम यांनी केलेल्या त्यागाचे व शौर्याचे मोजमाप पैशामध्ये करता येणार नाही. तरीही त्यांच्या पश्चात त्या कुटुंबाला आर्थिक व मानसिक आधार देऊन एका मोठ्या संकटातून कडूसकर यांनी बाहेर काढले. त्यावेळी त्यांचे वय केवळ ३२ होते. आता ते ६३ वर्षाचे आहेत. या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी असंख्य चांगल्या बातम्या लिहिल्या, पण अजूनही त्यान किसन कदम ची कहाणी ठळकपणे आठविते. याचं कारण माणुसकीसाठी चांगलं काम करणाऱ्या कुटुंबाच्या मागे समाज खंबीरपणे कसा उभा राहतो, याचेही सुखद प्रत्यंतर या घटनेने आणून दिले.
या कामगिरीबद्दल कडूसकर यांना इंडस्ट्रियल कम्युनिकेटर्सने १९९२ मध्ये पुरस्कार दिला. हा त्यांच्या पत्रकारितेचा सार्थ गौरव म्हणायला हवा. पत्रकारितेत राहून निरपेक्ष भावनेने केलेल्या त्यांच्या या कामावर पसंतीची मोहोरच या पुरस्काराने उमटविली आहे.
– लेखन : प्रतीक्षा जाधव
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
खुप छान उपक्रम.
घटनाक्रम वाचताना अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आले. गडकरी सर, अनिल सर आणि सुनील सर patrkaritemadhil बाप माणसे. या निमित्ताने त्यांनी आमच्यासाठी एक आदर्श वास्तूपाठच घालून दिला आहे. ग्रेट. कुठल्या शब्दात वर्णन करावे ते समजत नाही. सलाम. 11 हजाराचा चेक देणाऱ्या विधवा आजी पण ग्रेटच.
: रमेश वत्रे, सकाळ बातमीदार, केडगाव, ता.दौंड.
सर, सलाम पत्रकारितेला
Thank you sir
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुद्धा समाजातील इतरांच्या जीवाची पर्वा करणारे माणस अस्तित्वात असतात याचे खरोखरच एक उदाहरण आहे. यातून समाजातील व्यक्तींना सुद्धा इतरांसाठी जीवन जगण्याची सतत प्रेरणा मिळत राहील
टाकळकर , कडुसकर व गडकरी साहेब यांचे आम्ही ऋणी आहोत. समाजात अशा माणुसकी जपणाऱ्या लोकांची खुप गरज आहे.या सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही आज सुखकर जीवन जगत आहोत .कडुसकर साहेब स्वत: फोन करून आज ही तितक्याच तप्तरतेने आमची विचारपुस करतात. या सर्वाचे खुप खुप आभार व सर्वाना विनंती की जेव्हा अशाप्रकारे कोणावरही संकट येईल तेव्हा छोटीशी जमेल तशी मदत करा.
धन्यवाद !
फार अभिमानास्पद कार्य. समाजात असे लोक फार थोडे दिसतात पण त्यांच्यामुळे माणुसकी वरील डळमळणारा विश्वास परत स्थिर होतो. टाकळकर, कडूसकर व गडकरी यांचा कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. समाजानी पण साथ दिली हि सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. 👏👏👏
धन्यवाद सर