Wednesday, July 2, 2025
Homeयशकथाछंद झाला उद्योग !

छंद झाला उद्योग !

पत्रकारितेतील नवा प्रयोग म्हणून आपण आज पासून, पुणे येथील विश्वकर्मा विद्यापीठाच्या सेंटर ऑफ कम्युनिकेशन फॉर डेव्हलपमेंट विभागाचे विद्यार्थी आपल्या पोर्टलसाठी विविध यशकथा, लेख, बातम्या लिहिणार आहेत. आपण या उपक्रमाचं स्वागत कराल, या विद्यार्थी पत्रकारांना नक्कीच प्रोत्साहन द्याल असा विश्वास आहे.
आजची पहिलीच यशकथा लिहिलीय तृतीय वर्षांची विद्यार्थिनी प्रतिक्षा जाधव हिने. तिचे आपण स्वागत करू या….

आपल्या घरातील कपडे जुने झाले की एकतर ते आपण टाकून देतो,  कुणी गरजू असला तर त्याला देतो किंवा पूर्वी बोहरणीला देऊन तिच्याकडून भांडीबिंडी घेत असू.पण बदलत्या परिस्थितीमुळे या सर्व गोष्टी आता सहजशक्य राहिल्या नाहीत.

म्हणूनच कोल्हापूरच्या तेजल देशपांडे यांनी एक आगळा वेगळा उपक्रम सुरू केला आहे, तो म्हणजे जुन्या कपड्यांचा पुनर्वापरातून विविध कलात्मक वस्तु बनविण्याचा. विशेष म्हणजे यामुळे पर्यावरणाचा समतोल ही साधल्या जात आहे.

याविषयी सांगताना तेजल म्हणतात, “मला हस्तकलेची लहानपणापासूनच आवड होती. बारावीनंतर अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (एनआयडी) मध्ये मी डिझायनिंगचे शिक्षण घेतले. त्यातच माझे कौशल्य आहे आणि या क्षेत्रात मी चांगली प्रगती करू शकते, असे लक्षात आले आणि मी विविध डिझाईनचे प्रकार शिकले.

हस्तकलेचा अभ्यास करत असताना जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करून नवनवीन व उपयोगी पडणाऱ्या वस्तु डिझाईन करता येतील अशी कल्पना सुचली. उपलब्ध असलेल्या गोष्टीमध्ये बदल घडून ती उपयोगात आणण्याची प्रेरणा मला माझ्या घरच्यांकडून मिळाली”

तेजल या तेजलकेयुर टेक्सटाईलच्या संस्थापिका आहेत. पदवीचे शिक्षण पूर्ण झाले. तेजल यांची कँम्पस प्लेसमेंट मधून बंगलोर येथील नामांकित हॅंडलूम साड्या डिझाईन करणाऱ्या कंपनीत निवड झाली. त्या तिथे डिझायनर म्हणून काम करत होत्या. कंपनीकडून त्यांना चांगले पॅकेज मिळत होते. परंतु, त्यांचे मन नोकरी करण्यात रमेना.

कोल्हापूरच्या लोकांना आपल्या शिक्षणाचा आणि कौशल्याचा काहीतरी उपयोग व्हावा असे त्यांना नेहमी वाटत होते. सन २०२० मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि त्या कोल्हापूरला परतल्या. कोल्हापूर येथील आंबेगावामधील महिलांनी घरच्या घरी राहून काहीतरी व्यवसाय करण्याची इच्छा दर्शवली.

तेजल यांनी आंबेगाव या छोट्याश्या गावात एक स्टार्टअप सुरू केला. या इच्छुक गृहिणींना, देशपांडे यांनी जुन्या कपड्यातून नवनवीन आणि विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले. महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम तेजल यांनी केले.

जुने कपडे, साड्या कचरा नसून त्याचे पुनर्वापर करून किती आकर्षित, उपयोगी वस्तू तयार करू शकतो तसेच या पुनर्वापरातून शाश्‍वत वापरासोबत पर्यावरणाचा समतोल साधू शकतो हे देशपांडे यांनी दाखऊन दिले. त्या पुनर्वापराकरीता जुने कपडे  कोल्हापूर आणि पुणे याच दोन शहरातून गोळा करणे शक्य होत आहे. त्यामुळे याच दोन शहरातून जुने कपडे गोळा केले जातात.

“मी पदवीचे शिक्षण घेत असताना कपड्यांपासून होणाऱ्या प्रदूषणाचा अभ्यास केला. सिंथेटिक, सिल्क, नायलॉन, कॉटन अशा विविध प्रकारच्या कपडे जाळल्यावर कार्बन डाय ऑक्साईड आणि इतर ग्रीनहाऊस वायू वातावरणात पसरते, जे ग्लोबल वार्मिंगला तीव्र करते. याच कपड्यांच्या पुनर्वापरातून पर्यावरण वाचवण्यासाठी मी इतकं तरी करू शकते, असे मला वाटले”, असे तेजल सांगतात.

पॉट कव्हर्स, लॅपटॉप बॅग, शॉपिंग बॅग, फुलदाणी यासोबतच इतरही कलात्मक वस्तू आदी जुन्या साड्या, कपडे, ब्लाऊजपीस, बेडशीट, पडद्यांचा पुनर्वापर करून महिला तयार करतात. समाज माध्यमांचा वापर करून तेजल या नवनवीन वस्तू व त्यांची इतर माहिती लोकांपर्यंत पोहचवते.

खास करून इंस्टाग्राम या समाज माध्यमाचा उपयोग जास्त केला जातो. पुणे, बंगलोर, मुंबई, अहमदाबाद, सिंगापुर इत्यादी शहरातून ग्राहक वस्तू पसंत करतात आणि ऑर्डर देतात. टपालाद्वारे वस्तूंचे वितरण केले जाते.

तेजल यांच्या छंदाने त्यांना एक यशस्वी उद्योजक बनवले आहे. येत्या काही वर्षात हा उपक्रम यशस्वीरीत्या अजून पुढे घेऊन जाण्याची इच्छा तेजल यांनी दर्शवली आहे.
तेजल यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

– लेखन : प्रतीक्षा जाधव
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. नमस्कार
    लेख फार छान आहे
    छंद मधून उद्योग आणि छंद मधून आनंद फार छान आहे. आपण त्यास प्रसिध्दी दिली हे महत्वाचे आणि आजच्या पिढीस आदर्श आहे आणि त्यांनी यातून बोध घ्यावयास पाहिजे.

  2. विश्वकर्मा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला हा उपक्रम मनाला भावला. आजच्या लेखांत प्रतिक्षा जाधव यांनी लिहीलेला तेजस देशपांडे यांनी सुरू केलेल्या उद्योगाबद्दल माहिती समजली व जुन्या कपड्यांतून नविन गोष्टी करण्याचा घरगुती बिझनेस त्यांनी सुरू करून एक खुप छान कल्पना सर्वांनसमोर मांडली आहे. स्तुत्य उपक्रम. तेजस देशपांडेंना सुयश येवो.

  3. छान लिहिले आहे। एक नवीन घरगुती उद्योगाचा परिचय करून दिला। इतरांना प्रेरणा देणारे लिखाण। अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४