उत्कृष्ट छायाचित्रणाबद्दल अनेक राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले मुंबईतील ‘द इकोनॉमिक टाइम्स’ चे मुख्य वृत्तपत्र छायाचित्रकार नितीन वामन सोनावणे यांच्या सन्मानात नुकतीच भर पडली आहे. त्यांनी नुकतीच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विषयातील विद्यावाचस्पती (पीएच.डी.) हि पदवी संपादन केली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय “सत्यघटनांचा आढावा घेण्यासाठी प्रकाशचित्रण हे प्रभावी माध्यम आहे. विशेष संदर्भः “प्रकाशचित्रणातून दहा लोककलाकारांचे जीवनचरित्र” हा होता.
श्री सोनावणे हे पीएचडी मिळविणारे बहुधा पहिलेच वृत्तपत्र छायाचित्रकार असावेत.
संशोधन विषय
“सत्यघटनांचा आढावा घेण्यासाठी प्रकाशचित्रण हे प्रभावी माध्यम आहे. विशेष संदर्भः प्रकाशचित्रणातून दहा लोककलाकारांचे जीवनचरित्र”
लोककलेचा समृद्ध वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात लोककलाकार मात्र समृद्ध नाहीत. लोककला लोप पावत चालल्या आहेत. लोककलाकार दिसेनासे होत आहेत. काही लोककलाकार हे फारच दुःखी, कष्टी जीवन जगत आहेत. त्यांचे स्वतःचे आयुष्यच काय, पण चार-पाच पिढ्या एखाद्या कलेसाठी ते खर्ची घालत आहेत. एवढे असूनही त्यांना एक वेळच्या जेवणासाठी देखील संघर्ष करावा लागत आहे. कित्येकदा तर उपाशीपोटीच त्यांना राहावे लागत आहे. ही भयावह परिस्थिती पाहून त्या कलाकारांची पुढे येणारी पिढी या कलेला राम-राम ठोकण्याच्या मनःस्थितीत आहे.
त्या कलाकारांच्या मते जी कला एका वेळची भूक भागवू शकत नाही, ती कला काय कामाची ? ही व्यथा आहे, खेडोपाडी लोककला प्रकार सादर करणाऱ्या कलाकारांची. ज्या वृद्ध कलाकारांनी आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या कलेसाठी खर्च केले तो कलाकार उपासमारीला सामोरे जात आहे. एखादा लोककलाकार वेशभूषा करून त्याची कला सादर करण्यासाठी व्यासपीठावर आल्यानंतर त्याचे स्वतःचे दुःख विसरून, वयाची तमा न बाळगता, त्याची कला समोरील लोकांपुढे सादर करतो.
त्याचा संपूर्ण अभिनय, अनुभव या कलेसाठी देतो पण रंग फासलेल्या चेहऱ्यामागचे दुःख समोरील लोकांपुढे केव्हाच उलगडू देत नाही. त्यावेळेस तो कलाकार सर्वांची वाहवा मिळवून जातो. त्याप्रसंगी प्रकाशचित्रकार प्रकाशचित्रे काढतात, पत्रकार मुलाखती घेतात. त्यावेळेस त्या कलाकाराच्या जीवनात डोकावून पाहण्याचा प्रयत्न मात्र कोणाकडूनही केला जात नाही. त्याचे दुःखी-कष्टी आयुष्य जाणून घेण्यास कोणालाही रस वाटत नाही. त्या कलाकाराची कला जर टिकवायची असेल तर तो कलाकार जगायला हवा. कलाकार जगला तरच त्याची कला जिवंत राहील. ती जिवंत राहावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण व कलागुणसंपन्न असे १० लोककलाकार २००३ या सालापासून नितीन सोनावणे यांनी निवडले. प्रकाशचित्रांच्या माध्यमातून त्यांची प्रकाशचित्रे काढली. पुढे २०१४ साली हाच विषय त्यांनी त्यांच्या संशोधनासाठी निवडला. या १० लोककलाकारांवरती पुन्हा शास्त्रशुद्ध पद्धतीने काम करण्याची संधी यामुळेच मिळाली. निवडलेल्या प्रत्येक लोककलाकारासोबत ते ५० ते ६० दिवस राहिले. त्यांचं राहणीमान, त्यांच दुःख, त्यांनी केलेला कलेसाठीचा रियाज आणि बरेच काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
नितीनने त्या लोककलाकारांचे सर्व सत्य कॅमेऱ्यात बंदिस्त केले. काही लोककलाकारांच्या जीवनात डोकावण्याचा प्रयत्न यातून केला. सर्वच लोककलाकार हे काही स्वतःविषयी लिहू शकत नाहीत. म्हणूनच त्यांच्याच मदतीने त्यांचे जीवन, त्यांचे राहणीमान, त्यांच्या पिढ्यांचा इतिहास, कलेसाठी त्यांनी दिलेले योगदान, त्यांच्या कलेची वैशिष्ट्ये, त्यांच्या कलेमुळे समाजावरती होणारा परिणाम, त्यांच्या कलेतून होणारे समाज प्रबोधन, त्या कलाकारांचे आताचे समाजातील स्थान, त्यांना आलेल्या अडचणी, हे सर्व नितीनने फोटोग्राफीच्या माध्यमातून संशोधन पूर्वक मांडले आहे.
संशोधनाचं महत्त्व
आतापर्यंत इतक्या वर्षाच्या इतिहासात या लोककलेवर प्रकाशचित्रणाच्या माध्यमातून संशोधन झालेले नाही. लोककलेवरती व लोककलेच्या विविध आविष्कारांवरती लिखित स्वरूपात काही मान्यवर संशोधकांनी संशोधनं केली आहेत. ती सर्वच्या सर्व संशोधनं लिखित स्वरुपातील आहेत. त्यातील काही मान्यवर संशोधकांचे प्रबंध नितीन यांनी अभ्यासले. तेव्हा असे लक्षात आले की या विषयात आणखीन भर घालण्यासाठी दृककला हे माध्यम महत्त्वाचे आहे. म्हणूनच नितीन यांनी प्रकाशचित्रांद्वारे हा विषय समाजापुढे मांडायचं ठरविलं.
लोक कलाकारांचे वेगवेगळे पोशाख, त्यासोबत असलेली त्यांची ड्रेपरी, सादरीकरण करताना त्यांचा कला अविष्कार, त्यांच्या भावमुद्रा, त्यांचे हावभाव, त्यांनी त्यांच्या सादरीकरणासाठी वापरलेली विविध वाद्य, त्यांच्या घरातील सत्य परिस्थिती, त्यांच्या समोर त्यांचे सादरीकरण पाहण्यासाठी जमलेल्या रसिकांच्या भावमुद्रा इत्यादी बाबी छायाचित्रणाच्या माध्यमातून जास्त स्पष्टपणे व्यक्त होतात. त्यामुळे या लोककलाकारांचा संपूर्ण जीवनपटच या छायाचित्रांनी तयार झालेला आहे व मुलाखतीच्या माध्यमातून शब्दरूपी देखील तो नितीन यांनी मांडलेला आहे.
या संशोधनासाठी १५ प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली. अशी ही प्रश्नावली महाराष्ट्रातील ६०० लोकांकडे पाठवण्यात आली.
या संशोधनासाठी निवडलेले दहा लोककलाकार व त्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे :-
१. मीराबाई उमप
मीराबाईंनी वयाच्या सहाव्या वर्षापासूनच पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांबरोबर फिरून भिक्षा मागितली. भिक्षा मागत मागतच त्यांचं बालपण गेलं, पण त्यांची खंजिरी वाजवण्याची कला त्यांनी फारच प्रामाणिकपणे जोपासली. बऱ्याच प्रसंगी उपाशी राहून देखील त्यांनी त्यांच्या कलेचा मार्ग कधीच सोडला नाही किंवा त्यांच्या कलेत खंड पडू दिला नाही.
सादरीकरण करताना पोवाडा, भारुड, सोंगी भारुड, भीम गीते, जलसा, कृष्णाचा पाळणा, रामाचा पाळणा, बुरगुंडा, सुया-पोत भारुड, शिवरायांचे पोवाडे, स्त्री भ्रूणहत्या थांबविण्यासाठी सादरीकरण, कुटुंब कल्याणासाठी सादरीकरण, हुंडाबळी जनजागृती, ग्राम स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव, तंटामुक्त गावासाठी जागरण मोहीम, रोग मुक्त गाव, इत्यादी मोठ्या प्रमाणात मीराबाईंनी त्यांच्या कलेचा पुढे विस्तार केला.
२. राधाकृष्ण कदम (स्वर्गवासी)
राधाकृष्ण कदम हे परभणी सारख्या मागास जिल्ह्यात जन्मले, गोंधळी समाजातल्या मागास जाती मध्ये जन्मलेले. राधाकृष्ण कदम यांची ही गोंधळा मधली ५ वी पिढी. त्यांचे वडील राजाराम बापू हे गोंधळ सम्राट होते.
रात्रभर गोंधळ करून तेव्हा राजाराम बापूंना फक्त सव्वा रुपया मिळायचा. त्याही मध्ये चार ते पाच लोक भागीदार असत. ते शेवटपर्यंत गरीबच राहिले. पण त्यांनी कला जोपासली कलेकरता उपाशी राहिले पण कला जगवली. यांचेही शिक्षण झालेले नव्हते.
३. देवानंद माळी
देवानंद यांनी पहिला पोवाडा १९८५ साली गायला. शाहीर बापूराव विभूते यांनीच देवानंद यांना पहिला पोवाडा गायला दिला. देवानंद छोटे-छोटे असे कार्यक्रम करू लागले. सलग तीन दिवस त्यांनी सांगलीच्या चौकात पोवाडा गायन केले आणि तीन दिवसानंतर त्यांना त्या काळातली बिदागी ५१ रुपये मिळाली. २०१० साली देवानंद यांना झी मराठीवर ‘मराठी पाऊल पडते पुढे’, हा कार्यक्रम सुरू झाला. त्यात देवानंद माळी यांनी एकूण ३२ भाग सादर केले. ३२ भागांमध्ये त्यांनी ३२ शाहीरांचे पोवाडे गाईले. या मालिकेचे ते विजेते ठरले. जो शाहीर कोणाला माहिती नव्हता, तो शाहीर फक्त जिल्हा नाही ? राज्य नाही ? देश नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला.
४. राजू बाबा शेख (स्वर्गवासी)
जाती-धर्माच्या पलीकडचा कलाकार म्हणून राजूबाबा शेख यांचा उल्लेख करावा लागेल. जन्माने मुसलमान असूनही त्यांची हिंदू धर्मावरील आस्था व प्रेम हे सर्वांनाच अचंबित करणारे होते. त्यांचे वडील संपूर्ण गावात फिरून बकरे कापात असत. मात्र राजूबाबा लहानपणापासूनच हिंदूधर्माचे सर्व विधी करत आणि हिंदू धर्मातील विविध देवदेवतांची पूजा राजूबाबा करत असत. तसेच, दुसरीकडे दिवसातून ५ वेळा नमाज देखील ते पडत असत. शाळेत न जाता राजूबाबांनी संपूर्ण बाराखडी, फक्त पंधरा दिवसात पाठ केली आणि ते जिद्दीने लिहायला आणि वाचायला शिकले.
त्यांनी कीर्तनातून, अभंगातून, अभंगाचा भावार्थ, गवळणीचा भावार्थ समाजाला समजावून सांगून, त्यांच्या कीर्तनातून समाज प्रबोधनाचे कार्य केलं. पाण्यासहित १५ किलोची घागर, चुंबळ न घेता डोक्यावरती ठेवून, हात सोडून, वीणा वाजवून, गायन करून, अभंग, गवळणी म्हणून राजू बाबा क्वचित प्रसंगी उडी घेऊनही, नृत्य सादर करत. ताल, सूर सर्व सांभाळून ते नृत्य गायन करायचे. जे घागर नृत्य तरुण मुलांनाही जमलं नाही, ते राजूबाबा लहानपणापासून ते वयाच्या ७१ वर्षापर्यंत करत होते. राजूबाबांनी आयुष्यभर कीर्तनाच्या माध्यामातून जनजागृती केली. हे करत असताना, त्यांची गरीबी काय संपली नव्हती. कार्यक्रमांतून मानधन मिळत होत, पण ते पुरेसं नव्हतं. अशा या महान लोककलाकाराची प्राणज्योत ९ फेब्रवारी, २०१८ रोजी मालवली व त्यांच्या सोबत त्यांची ही कलाही कायमची लुप्त झाली.
५. निरंजन भाकरे (स्वर्गवासी)
निरंजन यांच्या घराण्यामध्ये मागील चार-पाच पिढ्यांपासूनच गाण्या-वाजवण्याचा छंद चालत आलेला आहे. निरंजन भाकरे यांचा जन्म, औरंगाबाद जिल्ह्यातील, सिल्लोड तालुक्यातील, रहिमाबाद नावाच्या छोट्याशा गावात झाला. निरंजन हे लहान असताना त्यांच्या वडिलांनीच त्यांना खाटेवरून खाली फेकले व त्यामुळे निरंजन हे ५० टक्के अपंग झाले. निरंजन यांना नाटकाचा छंद होताच कारण गावात गुढीपाडव्याला त्यांची चार नाटकं व्हायची. त्या नाटकात स्त्रीची भूमिका करण्याचा मान भाकरेंकडेच होता. कारण गावात कोणी स्त्रीपात्राचा अभिनय करत नव्हते. ती स्त्रीची भूमिका करण्याची वेळ भाकरेंवर आली.
निरंजन यांच पहिलं भारुड त्यांनी माटुंगा कल्चरल सेंटर, मुंबई येथे झाले. भाकरे यांचा कार्यक्रम संपल्यावर लोकांनी, मुंबईकरांनी त्यांच्या भारुडाचं खूपच कौतुक केलं.
६. विठ्ठल उमप (स्वर्गवासी)
विठ्ठल उमप हे उत्तम प्रकारचे लोकशाहीर तर होतेच, पण त्याचबरोबर ते नायक, गायक व गीतकारदेखील होते. त्याचप्रमाणे कव्वाली, आंबेडकरी गीतांचा जलसा, कोळीगीते, लोकगीते, भारूड, भजन, गण-गवळण, लावणी, कवने, तुंबडी, बोबडी गवळण, धनगरी गीते, नंदीबैल, वासुदेव, पोतराज, डोंबारी, गोंधळी अशी अस्सल मराठमोळी गीते ते गात. ती गीते ते लिहित आणि त्यांच्या अभिनयातून ते ती अजरामर करत. त्यांनी आतापर्यंत एक हजारापेक्षा जास्त गीते ध्वनिमुद्रित केली आहेत. जवळपास ४५ वर्षे ते आकाशवाणीवर गायले. त्यांनी दहा चित्रपटांमध्येही काम केले. ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरचा चित्रपट, ‘टिंग्या’ आणि ‘विहीर’ या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी नेहमी त्यांच्या कलेद्वारे समाजशील संदेश देण्याचा प्रयत्न केला. ‘अबक, दुबक, तिबक’, ‘अरे संसार संसार’, ‘खंडोबाचं लगीन’ आणि ‘जांभूळ आख्यान’ ही त्यांची काही अविस्मरणीय नाटके आहेत. त्यांचे ‘फू बाई फू’ जीवनचरित्र पुस्तक रूपाने लोकांसमोर आले. ‘माझी वाणी भीमाचरणी’ व ‘रंग शाहिरीचे’ ही पुस्तके त्यांनी काढली.
७. अंबुदेवी बुधगावकर (स्वर्गवासी)
अंबुदेवी यांनी त्यांचे भाऊ बापूरावविभूते यांच्याकडून शाहिरी ही कला आत्मसात केली. त्या हयात असेपर्यंत, कला हाच त्यांचा जीव की प्राण होता. पुढे अंबुदेवी यांची परिस्थिती फारच दयनीय झाली. त्यांची पाचही मुले एक एक वर्षाच्या अंतराने मरण पावली व त्या मधल्या काळात त्यांचे पती देखील स्वर्गवासी झाले. तरी त्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्यांची मुलगी विजया हिला सोबत घेऊन शाहिरी कला सुरूच ठेवली. त्यांचे दु:ख लपवून त्यांच्या कलेने त्या लोकांना हसवत राहिल्या. समाजाचे प्रबोधन त्या करतच राहिल्या.
८. सत्यपाल विश्वनाथ चिंचोलीकर
सत्यपाल यांचा जन्म अत्यंत दारिद्र्यात झाला. सत्यपाल हे भजनाला जाऊ लागले. तेव्हा त्यांना खंजरी वाजवण्याचा फारच मोह होत होता. सत्यपाल यांनी मातीचे छोटेसे मडके घेतले व त्यावर खंजिरी वाजवायला सुरुवात केली.
सत्यपाल हे महाराष्ट्रातील समाजप्रबोधक कीर्तनकार आहेत. ते सप्तखंजिरीच्या माध्यमातून ग्राम स्वच्छतेचा संदेश देतात. एकाच वेळी ते नऊ खंजिरी वाजवतात. प्रबोधनाचा प्रयत्न, समाजातील अंधश्रद्धा, जुन्या रुढी-परंपरा, समाजातील जातीय वाद, हुंडा प्रथा, दारू व अंमली पदार्थ व्यसन मुक्ती, कुपोषण, शेतकरी आत्महत्या या विषयीची जनजागृती इत्यादी समाजातील बाबींवर ते त्यांच्या कीर्तनातून प्रकाश टाकतात.
९. बापूराव विभूते (स्वर्गवासी)
बापूराव हे लिंगायत कोष्टी असल्यामुळे विणकाम करणे हाच त्यांचा पूर्वीपासूनचा व्यवसाय होता. तो व्यवसाय करत करत, बापूराव यांनी वयाच्या १२व्या वर्षापासून शाहिरी कला जोपासली. शाहिरी ही डफाशिवाय नाही, हे बापूरावांनी ओळखले व त्यांच्या शाहिरीला डफाच्या बोलांची साथ दिली. त्याचप्रमाणे चालींमध्ये भेदिक मधल्या काही चाली शाहिरी पोवाड्यांमध्ये आणल्या. कैक हजारो लोक बापूरावांचा पोवाडा ऐकायला येत असत. फक्त दुसरी पर्यंत शिक्षण घेतलेल्या बापूराव विभूते, यांचे शाहिराचे लेखनातले योगदान मात्र सर्वांनाच अचंबित करणारे असे आहे.
बापूराव विभूते यांनी १०४ पोवाडे लिहिले, २५ पाळणे लिहिले, ७ वगनाट्य लिहिली, ५ ग्रामीण नाटके लिहिली, ७ शाहिरी फटके लिहिले, २२ लावण्या लिहिल्या, तसेच जवळपास ३०० विविध प्रकाराची गाणी लिहिली. एवढे मोठे योगदान बापूरावांनी त्यांच्या कलेतून समाजाला दिलेले आहे. असा फक्त दुसरी पास झालेला ज्ञानी, गुणी कलावंताने ६८ शाहिरी शिष्य निर्माण केले. त्या ६८ शाहिरांमध्ये त्यांचा मुलगा ‘आदिनाथ विभूते’ व त्यांची बहीण ‘अंबुबाई बुधगावकर’ यांचाही समावेश आहे.
१०. उद्धवबापू शिंदे
उद्धवजी शिंदे यांनी पखावज वाद्याचे शिक्षण त्यांचे वडील शंकरबापू शिंदे यांच्याकडूनच गुरु-शिष्य परंपरेतूनच घेतले. उद्धवजींनी सन २०१७ मध्ये पुणे येथे संपन्न झालेल्या श्री श्री रवी शंकर यांच्या वर्ल्ड फेस्टिवल कार्यक्रमात ९००० मृदंग वादकांना सोबत घेवून वारकरी संप्रदायाची सांघिक बैठक संपन्न केली. जिचा उल्लेख ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये झाला आहे. पखवाज जागतिक पातळीवरती घेऊन जाण्याचे काम उद्धवजींनी केले.
लोककला आता नष्ट होत चालल्या आहेत. त्या जर नवीन युवकांपर्यंत घेऊन जायच्या असतील तर फोटोग्राफी हे खूपच चांगले माध्यम आहे. दृक कला म्हणून फोटोकडे बघितले जाते. कलाकारांच्या वेगवेगळ्या मुद्रा यातून संग्रहित होतात. काही काळानंतर तर फक्त हाताच्या बोटांवरती मोजू इतक्याच लोककला शिल्लक राहतील. त्या जतन झाल्याचं पाहिजेत, त्यासाठी छायाचित्रण हा एक छान असा पर्याय आहे.
भविष्यात हे सर्व पुस्तकरूपाने समाजापुढे येणार आहे. या सर्व कलाकारांवर माहितीपट बनवायचा नितीन यांचा मानस आहे. पुढे ते माहितीपट जगातील विविध चित्रपट महोत्सवातून रसिकांपर्यंत पोहचतील व या लोककलाकारांचा संपूर्ण जीवनपटच जगापुढे येईल. यामुळे साहजिकच त्यांना व त्यांच्या कलेला चांगले दिवस येतील अशी त्यांना अपेक्षा आहे.
श्री सोनावणे यांचा ३८४ पानांचा हा संपूर्ण प्रबंध पुढील संकेतस्थळावर आपण पाहू शकता :
http://hdl.handle.net/10603/334394
श्री नितिन सोनावणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या भावी उपक्रमांना हार्दिक शुभेच्छा💐

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
Congratulations dr.nitinji sonwane
जेव्हा सध्या सर्व जण रुळलेल्या वाटातच धुंडाळत आपले जीवन सार्थ करू पहात आहेत अशा वेळी स्वतः कोविड च्या भयानक आजारातून जिद्दीने बाहेर पडून समाजाच्या दुर्लक्षित कला आणि त्यांना अवघे जीवन वाहिलेल्या अवलिया कलाकारांचे जीवन जवळून पाहून त्यांचे संवेदनशील मन अशा कलाकारांना आपल्या छायाचित्रणाच्या माध्यमातून सर्वांसमोर या कलाकारांचा जीवनपट मांडण्याचा ध्यास घेतला कितीही अडचणी मग स्वतःच्या आजारपणाला बाजूला ठेवून तो भयानक दर्द विसरून अगदी झपाटल्या प्रमाणे हा आगळावेगळा उपक्रम पार पाडतात हे आजच्या काळात अविश्वसनीय कामगिरी आहे तीचे मोल आज नाहीतर भविष्यात त्या गोष्टीं ची किंमत समाजाला समजेल हे नक्की. ध्येय समोर ठेवून ते साध्य करणे हे लाखात एका व्यक्तीला पण साधेल कि नाही पण हे इंद्रधनुष्य त्यांनी सहज पेलले आहे मी त्यांना त्यांच्या या कर्तृत्ववाला नमन करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो
Congratulations sir. I really admire your hard work and dedication to study and photograph these artists.
🌹हार्दिक अभिनंदन सर 🌹🌹
अशोक साबळे
Ex. Indian Navy
आदरणीय डॉ नितीन सोनवणे सरांचे मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
आदरणीय श्री देवेंद्र सरांचे मनपूर्वक आभार, त्यांनी डॉ नितीन सोनवणे सरांची कला वाचकांपर्यंत पोचवली.
आपला विश्वासू
मदन लाठी
न्यू सांगवी पुणे
छायाचित्रकार डाॅ नितिन सोनवणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन . मावज मधील छायाचित्रकार सहकारी मित्रांना निश्चित ऊर्जा मिळेल. शुभेच्छा.