Wednesday, July 2, 2025
Homeकलाछा गये बादल......

छा गये बादल……

दहा दिवसांचा गणपती… घरी येतो काय आणि विसर्जन होतं काय.

विसर्जनानंतर घरात होणारी आरती नेहमी मला आवडते… सगुणा कडून निर्गुणा कडे नेणारी वाटते ही आरती…. सगळं घर नीट आवरलं… दुपारची छोटीशी झोप झाली.. बाहेर आले आणि चौरंग पाहून हसले..निर्गुण आता मनात विराजमान.

मस्त चहा झाला आणि माझ्या लाडक्या खिडकीत बसले. बरेच मेसेजेस पाहिले नव्हते… ते निवांत पहात बसले.

बाहेर पाहिलं. थोडंसं उदास वातावरण वाटलं.. मन हळवं झालं होतं अशा उदास उदास दूर दाटल्या सावल्या…. असं काहीतरी जाणवलं. बाहेर मंद संध्याकाळ होत होती..उदास सारं झटकून टाकावं म्हणून सहज यूट्यूब चैनल उघडलं आणि मन इतकं प्रसन्न झालं की बस…..गाणं कोणतं होतं माहितीये…

छा गये बादल नील गगन पर
घुल गया कजरा सांज ढले
देख के मेरा मन बेचैन
रैन से पहले हो गई रैन
आज हृदय के सपने फले |
रूप की संगत और एकांत
आज भटकता मन है शांत
कहेदो समय से थम के चले |
अंधीयारो की चादर तान
एक होंगे दो व्याकूल प्राण
आज ना कोई दीप जले |

बापरे…या गाण्याने मन मस्त रोमँटिक करून टाकलं. प्रदीपचा शांत, धीरगंभीर मूड, मीनाकुमारीचा व्याकूळ भाव, रोशनचं संगीत, साहिरजींची प्रणय दाखवणारी कविता, संध्याकाळची तरल वेळ, सगळीकडे पसरलेला सूर्यप्रकाश, मीनाकुमारीचा गुलाबी पेहराव, कमळांनी भरलेलं तळं, त्यात पाय सोडून बसलेली सुंदर,मादक मीनाकुमारी, तिच्यावर उडावलेलं पाणी, नाजूक आलता लावलेली तिची सुंदर पावलं, कुरळे मोकळे केस, प्रेमाची सरळ मागणी करणारा अभिनय आणि काव्य, मीनाजींची नाचरी चाल, …. काय बघू आणि काय नको असं मला झालं.

प्रदीप च्या समोर येऊन मूडमध्ये मीनाकुमारीने वाजवलेली चुटकी सुद्धा लाजवाब. संध्याकाळचा गुलाबी केशरी सूर्य बुडतोय आणि ती लाली तिच्या चेहऱ्यावर इतकच नाही तर सगळ्या आसमंतात पसरलेली आहे .वा.वा…

हा चित्रपटच माझा आवडता आहे. त्यातली गाणी म्हणजे काय.. लाजवाब… साहिरजींचं मला नवल वाटतं.या चित्रपटात त्यांची बाकीची गाणी किती वेगळी आहेत… जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी, विचार करायला लावणारी. मन रे तू काहे ना धीर धरे…संसार से भागे फिरते हो…. ही गाणी किती गहन अर्थ सांगणारी आहेत. त्याच साहिरने सखी री मेरा मन उलझे तन डोले, काही तरसाये जियरा आणि छा गये बादल सारखी गाणी दिली. यातूनच त्यांच्या लेखणीची ताकद दिसते. कसलं रोमँटिक गाणं दिल आहे त्यांनी. हे गाणं अक्षरशः दोन तीन वेळा मी पूर्ण पाहिलं.. शेवटी ती म्हणते….. आज ना कोई दीप जले…. तो सीन आठवतोय ? बॅकग्राऊंडला संपूर्ण मोठा सूर्य अस्ताला चाललेला…. तो केशरी गोळा… खरा दीप विजला की मग दीप नको…. ही मागणी… त्यात आशाचा मादक आवाज ….संध्याकाळचे बदलत जाणारे रूप इथे खूप सुंदर दाखवले आहे.. काय बोलायचं त्यावर…गाण्याच्या शेवटी तर अगदी दाटून आलेली सांज आणि दोन जीव अगदी त्या सांज केशरी, गुलाबी रंगात विरघळून गेल्यासारखे दिसतात. यातली एक जरी गोष्ट कणसूर राहिली असती तरी ती मजा आलीच नसती. हे गाणं चित्रित करायला भरपूर कष्ट घेतले आहेत हे जाणवत राहत.

खरंतर या गाण्यात मीनाकुमारीचा चेहरा खूप आकर्षक दिसतो… पण तिची कंबर खूप मोठी आणि विसंगत दिसते. ती झाकण्यासाठी तिचे बरेच शॉट कमरेच्या वरचे घेतले आहेत..एका शॉटमध्ये ती आपल्या कडे पाठ करून पुढे जाते हे दाखवताना मात्र प्रदीप पटकन तिला कव्हर करताना दाखवला आहे, हेही जाणवतं.

तरीही गाणं म्हणाल तर मात्र संपूर्ण वसूल असं झालं आहे. गाणं संपताना शेवटी आलेले सतारीचे आर्त सूर येतात आणि गाणं संपतं.ते सूर मागे रेंगाळत राहतात… हुरहूर लावून जातात हेच या गाण्याचं वैशिष्ठ, गमक, यश सारं काही आहे.

गाणं पाहिलं आणि लगेच हा लेख लिहायला घेतला. साहिरजी, आशा, रफी, मीनाजी, प्रदीपजी आणि रोशनजी यांच्या प्रेमात पडलेल्या माझ्यासारख्या रसिकांसाठी साठी ही माझी आजची भेट….

अलका अग्निहोत्री

– लेखन : सौ. अलका अग्निहोत्री
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खुप छान लिहिलय सौ.अलका.अत्यंत प्रवाही तरलता आपल्या लेखनातील उत्कटता भावून गेली. आम्हा उभयतांकडून मनःपुर्वक अभिनंदनासह हार्दिक शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील