Wednesday, November 13, 2024
Homeसाहित्यजगण्याचेही झाले ओझे !

जगण्याचेही झाले ओझे !

जगतो आहे आज असा की जगण्याचेही झाले ओझे! ||धृ||

दुर्बलतेचे बळकट धागे
जडती जिवाला पुढती मागे
धुगधुगलेपण तरिही जागे
मरगळलेल्या धमन्यांमधुनी, कोठे उरले रक्तच ताजे?
जगतो आहे आज असा की जगण्याचेही झाले ओझे! ||१||

श्वास बिचारे येती जाती
उरलेच काय त्यांच्या हाती ?
उदास जळती फिक्कट वाती
धकधक देता थाप हृदय ते, धाप शरीरी आता निपजे !
जगतो आहे आज असा की जगण्याचेही झाले ओझे! ||२||

स्वप्ने झाली केविलवाणी
पोतेऱ्याची दशा जीवनी
तुच्छपणाच्या भरल्या गोणी
ढोर पडावे मरून कुजके, तसले माथी भाग्य विराजे!
जगतो आहे आज असा की जगण्याचेही झाले ओझे! ||३||

आकांक्षांची झाली माती
आठवणींच्या चिंध्या हाती
एकांताची स्मशानभीती
प्राण पाहतो अता उडाया, बंद घराचे परि दरवाजे!
जगतो आहे आज असा की जगण्याचेही झाले ओझे! ||४||

उरलीसुरली आशा सरली
नैराश्याने झोळी भरली
परावलंबी काया उरली
उठता बसता आधाराला, चाचपती कर दोन्ही माझे!
जगतो आहे आज असा की जगण्याचेही झाले ओझे! ||५||

विझता अग्नी फुंकरून का
तगवित जाणे, असे योग्य का?
व्यर्थ परिश्रम, नाहक हेका
हीच प्रार्थना, श्रवणी यावे, आयुष्याचे भरतवाक्य जे!
जगतो आहे आज असा की जगण्याचेही झाले ओझे! || ६||

— रचना : डाॅ. श्रीनिवास आठल्ये. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. सरत्या आयुष्यावर खूप छान रचना केली आहे सर👌👌👌👌

  2. जगण्याचेही झाले ओझे ही कविता वाचनीय आणि अर्थपूर्ण आहे.

  3. आशयघन कविता आहे आठल्येसर

    गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments