“*M – मैत्रीत T – टिकणाऱ्या N – नवनवीन L – लिलयांप्रमाणे”…… म्हणजेच MTNL* चला तर जाणून घेऊया, ती २३ फेब्रुवारी २०२६ ची भन्नाट संध्याकाळ………
स्नेहसंमेलनाला आकार – उकार देणारी प्रतिभावंत कलाकार म्हणजे उत्साही, विविध कल्पकतेची जादूगार सौ.अलका भुजबळ.
मैत्रीच्या चिन्हाकीत चित्रासोबत, मैत्रीत गुंफलेले हात नि समोर कपबशीत वाफाळलेला….
आहा ??? मस्त चहा !

अश्या फ्लेक्सने महेश हॉलचे व्यासपीठ सजले. शेजारीच पाठमोरी सुंदर स्त्री, नाचरा मोर, एका वर्तुळाच्या कडेला दोन जास्वंदी फुले नि सोबत छानश्या पिशवीसोबत सुंदर पाकीट भिंतीवर विराजले. ही म्हणजे स्नेहमिलनाची आठवणीत राहणारी भेट.

अंजुचा संगीत सेट सज्ज झाला नि स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. एव्हाना रंगीबेरंगी पोशाखातील, फुलपाखरांप्रमाणे आमच्या सख्यांनी हॉल भरून गेला.
लगेच गणरायांच्या नमन गीतानंतर, अलकाने सूत्रसंचालन करण्यास सुरुवात केली.

आमच्यामधील काही मैत्रिणींच्या कुटुंबातील अगदी जिवाभावाच्या व्यक्तींना देवाज्ञा झाली होती, त्यासाठी प्रथम सर्वांनी स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. याला म्हणतात माणसातला माणुसकीचा आदरणीय भाव……….
प्रभा, अंजु, आनंद दादा, समता, मंदा यांच्या सुरेल गीतांची जणू मेजवानीच झाली. मी “दाताच्या दातवणाने” या गीतावर पूर्ण हॉलभर अगदी सोप्या ठेक्यावर फेर धरला. स्मिता, सुरेखा आणि तिची मैत्रीण, यांनी सर्वांनी जुन्या नटी, त्यांच्या नाचातून डोळ्यासमोर उभ्या केल्या.
तर क्षणात “जगात मोठं कोण ?” या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास प्रेक्षकांना भाग पाडणारी नाटिका, पुजारी झालेल्या सुरेखा गावंडे आणि बेवडा झालेल्या अलका भुजबळ या दोन पात्रांनी हास्याचा कल्लोळ निर्माण केला.

निवृत्ती नंतर वकिल झालेल्या स्मिता लोखंडे ची वकिली पेशातील प्रत्यक्ष अनुभव, भेटलेली माणसे, मानवी नाते संबंध ह्या बद्दल महत्वाची माहिती देणारी मुलाखत अंतर्मुख करून गेली.

काही सख्यांनीही मनोगत व्यक्त केले. कुणी प्रोत्साहित होऊन गाणीही गायली. माझ्या “स्त्री आयुष्याची वाटचाल” कवितेत साऱ्या जणींना स्वतः चे आयुष्य जाणवले. ज्या मैत्रिणींचे, आयुष्याचे साथीदार साथ सोडून देवाघरी गेले, त्यांच्या पाठीवर सांत्वनरुपी शाल लपेटून, आदर व्यक्त केला.

MTNL नामक, मैत्रिणींच्या फोटोसोबत मैत्रीचा हातात हात धरून, कपबशीतील वाफाळलेला चहा, या सजावटीत केक स्थानापन झाला. जेष्ठ सख्यांना मान देऊन, केक सोहळा संपन्न झाला.
विविध वेशभूषेत थटून जलवाच्या तालावर फॅशन शो रंगला. अखेर कोळीगीते आणि झिंगाट गाण्यावर सर्वांनी मनसोक्त नाचत मजा लुटली….
चविष्ट जेवणाचा आस्वाद घेऊन, आठवणरूपी भेटवस्तू घेत, अंधाऱ्या रात्रीने वेळेचे भान कळूच दिले नाही. एकमेकींचा निरोप घेत, नवी ऊर्जा उराशी कवटाळून, पक्षीनी आपापल्या घरट्याकडे निघाल्या.
पुन्हा असं कधीतरी भेटण्याची आस हृदयाशी कवटाळून…………….
अलका, सलाम तुझ्या उत्साहाला, तुझ्या प्रतिभावंत कलागुणांना ……………

— लेखन : सौ. वर्षा भाबल. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
