कोरोनाच्या काळातही, वेळप्रसंगी जीवावर उदार होऊन इतरांच्या मदतीला धावून जाणारे माझेच मित्र नव्हे तर जनमित्र विलास बाबुराव सरोदे यांचा आज, १५ जून रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
सरोदे, प्रसार माध्यमात गेली ४० वर्षे सक्रिय राहूनही सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहिले आहेत हे त्यांचे उदाहरण सर्वांनाच खूप प्रेरणादायी आहे.
शासकीय सेवेत असतानाच नव्हे तर, निवृत्तीनंतरही ते आपला वेळ, ज्ञान,अनुभव, वेळप्रसंगी पैसा, सामाजिक सेवेत व्यतीत करीत आहेत, ही मोठी प्रशंसनीय बाब आहे.
१९८८ साली मी मराठवाडा विद्यापीठात (आताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद) मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचा अभ्यासक्रम करत असताना आम्ही वर्गमित्र होतो. पुढे मित्र झालो, राहिलो, ते आजतागायत.
त्यावेळी मी मुंबई दूरदर्शनमध्ये, तर ते महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयात कार्यरत होते. नंतर मी ही माहिती महासंचालनालयाच्या सेवेत रुजू झालो. अत्यंत निस्पृह, निगर्वी, कुणाच्याही अडीअडचणीला न सांगता धावून जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे सरोदे सतत लोकप्रिय राहिले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेले, स्वतःच्या हिंमतीवर सर्व शिक्षण पूर्ण केलेले सरोदे यांनी कधीही परिस्थितीला, आईवडिलांना, देवाला, दैवाला दोष दिल्याचे मी पाहिले नाही. उलट आहे, त्या परिस्थितीत आनंदाने कसे जगावे, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आनंदाने जगा या एका चळवळीचे ते कार्यकर्ते (हॅपी थॉट्स) आहेत.
श्री. विलास सरोदे यांचा जन्म १५ जून १९५९ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे झाला. घरामध्ये पाच बहिणी व दोन भाऊ, आई वडील, असा मोठा परिवार. त्यात घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. १९७२ च्या दुष्काळामध्ये म्हैसमाळ, फुलंब्रीरोड या ठिकाणी रस्त्यावर आई व आजी सोबत माती काम करायला जात असत. तसेच वेळप्रसंगी जंगलातून मोळ्या आणण्यास त्यांना जावे लागे. अशा अनंत अडीअडचणींना तोंड देत त्यांनी बी. कॉम, बी जे, एम. एम. सी. जे. या पदव्या प्राप्त केल्या.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून मराठी लघुलेखन देखील यशस्वीरित्या पूर्ण केले. या सर्व यशात मोठे बंधू भास्कर सरोदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे ते मोठ्या अभिमानाने सांगतात. मोठे भाऊ यांनी देखील दुष्काळामध्ये सुखडीवर वर काम करून बी.एस्सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. वन विभागातून वर्ग
एकच्या पदावरून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. वहिनी देखील सेवानिवृत् सहशिक्षिका आहेत. त्यांच्या दोन्ही मुली, जावई आणि मुलगा उच्च विद्याविभूषित आहेत.
श्री. सरोदे यांना जून १९८० मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सेवेची संधी मिळाली. ३८ वर्षांच्या कालावधीत नांदेड, जालना, लातूर आणि औरंगाबाद येथे सेवा करून ते विभागीय लेखापाल या पदावरून ३० जून २०१७ रोजी औरंगाबाद येथून सेवानिवृत्त झाले.
सेवेत असताना त्यांनी शासनाच्या लोकराज्य, खादी ग्रामोद्योग मंडळाच्या ग्रामोद्योग मासिकासाठी, तसेच समाजाची मासिके व या विविध वृत्तपत्रांसाठी समाज प्रबोधनात्मक लिखाण केले आहेत.
माझ्या शासकीय सेवेचे शेवटचे वर्ष औरंगाबाद येथे गेले. पत्नी मुंबईत नोकरीला असल्याने, मी (देवेंद्र भुजबळ) औरंगाबाद येथे एकटाच रहात असे. दिवसाचा वेळ कामांमुळे, कार्यक्रमांमुळे सहज निघून जाई. परंतु संध्याकाळ खायला उठत असे. “बसणारी” मित्र मंडळीं रोज नियमितपणे भेटत असतात. पण रोज न बसणारी मात्र क्वचितच भेटत असतात. एकटं राहणाऱ्या अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना हा अनुभव आला असेल. तर मला अशा अनेक एकट्या संध्याकाळी मित्र म्हणून सरोदे यांनी मोलाची साथ लाभली आहे. हे मी कधी विसरू शकत नाही.
आम्हा दोघांच्या निवृत्तीनंतर आम्ही अन्य मित्रांसोबत दक्षिण भारत यात्रा, माऊंट अबू येथील प्रजापिता ब्राह्मकुमारी येथील “विश्व शांतीसाठी माध्यमांचे योगदान”, ही कार्यशाळा व अन्य महत्वाचे अनेक कार्यक्रम एकत्रपणे आनंदले आहेत.
सरोदे यांनी माहिती अधिकारी आणि कर्मचारी पतसंस्थेमध्ये त्यांनी पदाधिकारी म्हणून यशस्वीपणे काम केले आहे. औरंगाबाद जिल्हा आणि विभागीय पेन्शनर असोसिएशन, प्रगतिशील जेष्ठ नागरिक सेवा संघाचे ते सक्रिय सदस्य आहेत. साळी समाजास भूषणावह असलेल्या न्यू जिव्हेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या कोषाध्यक्षपदी ते कार्यरत आहे. तसेच जिव्हेक्षर समाचारचे सहसंपादक म्हणूनही ते जबाबदारी पार पाडत आहेत. साळी समाचार साठीही ते सतत सहकार्य करत असतात.
संघर्षातून यशाकडे वाटचाल केलेले सरोदे स्वभावाने शांत आहेत. बोलके पण मृदुभाषी आहेत. ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचे आपल्यावर ऋण आहे ही उच्च कोटीची भावना ठेवून समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी ते विविध प्रकारच्या माध्यमातून सेवा करीत आहे.
अखिल भारतीय स्वकुळ साळी समाजाचे मराठी साहित्य संमेलन, पुणे आणि मुंबई येथे संपन्न झाले आहे. या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद समाजाचे भूषण असलेले आय.ए.एस. अधिकारी तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे विद्यमान महासंचालक व सचिव, आदरणीय श्री. दिलीप पांढरपट्टे साहेब यांनी भूषविले आहे. या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेसाठी मराठवाडा विभागातून संमेलनाच्या संयोजन समितीचे सदस्य या भूमिकेतून त्यांनी फार मोठी जबाबदारी स्वीकारून ती यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांचा साहित्य संमेलनात मोठा सत्कारही करण्यात आला होता.
श्री. सरोदे यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुनिता या यादेखील बी.एस्सी, बी.एड, एम.एड, बी.जे. असून बळीराम पाटील विद्यालय, औरंगाबाद येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सौ. सुनीतावहिनीना देखील समाज कार्याची खूप आवड आहे. श्री.सरोदे यांना एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा चैतन्य हा इंजीनियर असून पुणे येथे टाटा कन्सल्टन्सी आय.टी . कंपनीमध्ये सेवारत आहे. मुलगी नम्रता ही इंजिनिअरिंगच्या सर्व शाखांमध्ये प्रथम श्रेणीत बी. टेक., एम.टेक झाली असून ती सुवर्ण पदक विजेती आहे. या यशाबद्दल तत्कालीन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री हंसराज अहिर यांच्या हस्ते तिचा गोल्ड मेडल व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे. आता ती अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे.

आळंदी येथील स्वकुळ साळी ज्ञाती गृहाचे सदस्यत्व देखील श्री. सरोदे यांनी स्वीकारले आहे. औरंगाबाद येथील जिव्हेश्वर मंदिर व मंगल कार्यालयाचे ते सक्रिय कार्यकर्ते आहे. मागच्या वर्षी प्रा. नम्रता व मुलगा चैतन्य यांनी जिव्हेश्वर मंदिर व मंगल कार्यासाठी मदत केली आहे.
श्री सरोदे यांचे जावई राजीव प्रसाद अटलुरी, एन.आय. टी. एम. टेक. इंजिनीयर आहेत. सध्या ते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असिस्टंट मॅनेजर आहेत.
सरोदे उच्चतम विकसित समाज निर्मितीसाठी सदैव कार्यरत असतात. यावरून सरोदे यांची लोकप्रियता, जनसंपर्क किती मोठा आहे हे दिसून येतो आहे.
सरोदे यांनी हॅप्पी थॉट्स थॉट्सचे प्रशिक्षण घेतले असल्यामुळे ते सदैव आनंदी असतात, आणि इतरांना देखील आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, हे विशेष होय.
सर्वांच्या मदतीला धावून जाणारे, सदा हसतमुख असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची आगळी वेगळी ओळख आहे. श्री.सरोदे यांचे आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे , त्यांना उदंड आयुष्य मिळावे हीच मित्र या नात्याने आमची मनीषा आहे. त्यांच्या भावी जीवनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.
– देवेंद्र भुजबळ,
सेवानिवृत्त संचालक (माहिती) 9869484800.
सर्वांचे मनपूर्वक आभार
खूप छान लेख! संपूर्ण जीवनपट उलगडणारा!लेखातून लेखकाच्या लोकसंग्रहात किती गुणी रत्ने सामावली आहे हे कळतं त्याच बरोबर त्यांची गुणग्राहकताही नजरेस भरते!
लेखाचा विषय झालेल्या श्री सरोदेना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
आनंद लुटा,आनंद वाटा !
निरामय राहून शंभरी गाठा!!
श्री सरोदे हे दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा