मारू नका मला आई बाबा
ऐकतेय तुमची कुजबुज मी आत
अन बेत काढून मला टाकण्याचा
बेचैन होतेय मी आतल्या आत
दिसुंदया मलाही तुमचं जग
आडवे येतायेत क्रूर लिंगभेद
मुलीनं असं काय घोडे मारलेत
करताय म्या कोवळीचा शिरच्छेद
पोरगं असे काय दिवं लावणार हाय
किंवा मारेल नेमके वेगळे तीर
मीच उलटी जास्तीची हाय प्रेमळ
काळजाला तुमच्या देईन धीर
मला मारण्याने आटवताय तुम्ही
वात्सल्याचा इथला नितळ झरा
आई बाबा नावाला कलंक तुम्ही
जर का घाबरले नाही आता जरा
जीवनाच्या शाळत मातृत्वाचा धडा
कुणी शिकवला नाही का तुम्हा
मुलगी हाय म्हणून नगं तुम्हाला मी
असा काय केलाय तुमचा गुन्हा
कळकळीची इनंती वात्सल्य दिना दिशी
विचार करा पुण्यांदा याचा
म्या हाय तुमच्या रक्ताचच लेकरू
होऊद्या जन्म तुमच्या चिमुरडीचा

– रचना : सर्जेराव पाटील, ऑस्ट्रेलिया
(कौलवकर – नाशिककर)