एरवी पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम एखाद्या हॉल मध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमा दरम्यान होतात, हे आपण नेहमीच वाचत आला असाल. पण नुकतेच “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकाचे प्रकाशन जपानच्या जगप्रसिध्द बुलेट ट्रेनमध्ये झाले ! असे या बुलेट ट्रेनमध्ये प्रकाशन होणारे हे बहुधा जगातील पहिलेच पुस्तक असावे.
या पुस्तकाचे प्रकाशन,पुस्तकाचे लेखक – संपादक श्री देवेंद्र भुजबळ, एम टी एन एल च्या निवृत्त उप व्यवस्थापक तथा कवयित्री सौ पौर्णिमा शेंडे, नागरिक प्रतिनिधी श्री जसविंदर सिंग, युवा प्रतिनिधी श्री शिवम खन्ना, टूर गाईड कुमारी लू विन आणि पुस्तकाचे प्रकाशन करणाऱ्या न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन च्या प्रकाशिका सौ अलका भुजबळ यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना श्री भुजबळ म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या आणि पुढे कार्यक्षम, लोकाभिमुख सेवा बजावित असलेल्या ५१ अधिकाऱ्यांच्या यश कथा या पुस्तकात आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैस यांना नुकतेच हे पुस्तक भेट दिले असता त्यांनी, हे पुस्तक युवकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे कौतुक केल्याचे सांगून प्रकाशनापूर्वीच पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली अशीही माहिती श्री भुजबळ यांनी दिली.
नागरिक प्रतिनिधी म्हणून बोलताना श्री गुरविंदर सिंग यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की, सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना नागरिकांच्या करातून पगार मिळतो याचे भान ठेवून त्यांनी स्वच्छ, कार्यक्षम, लोकाभिमुख सेवा बजावून सौजन्यपूर्ण वागणूक दिली पाहिजे.
युवा प्रतिनिधी म्हणून बोलताना श्री शिवम खन्ना याने सांगितले की, जशा पालकांच्या मुलांकडून अपेक्षा असतात तशाच मुलांच्या पालकांकडून काय अपेक्षा आहेत ? हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. विशेषत: करिअरच्या बाबतीत मुलांची आवड निवड, कल ओळखून त्यांना पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे. आजचा युवक हा “आजचा युवक” आहे, तो २५ वर्षांपूर्वीच्या युवक नसून आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केलेला आहे, हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.
सौ पौर्णिमा शेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, मी एम टी एन एल मध्ये टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरीस लागले.पुढे लग्न होऊन दोन मुलं झाल्यावर सासरच्या मंडळींनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी चांगली केल्याने अधिकारी होऊ शकले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ अलका भुजबळ यांनी बहारदारपणे केले. तर कार्यक्रमाचे चित्रिकरण सौ राखी देढीया यांनी केले.
या कार्यक्रमास उपस्थित सर्व सहप्रवासी यांनी या अभिनव पुस्तक प्रकाशनास भरभरुन प्रतिसाद दिला.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
आपण सर्वांनी इतके भरभरून कौतुक केले,दिलखुलास दाद दिली,या बद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. असाच लोभ कायम असू द्या.
अविस्मरणीय व अद्भूत प्रसंग आहे हा..खुपच आनंद झाला वाचून..सौ. अलका ताई, श्री देवेंद्रजी भुजबळ व सौ.पूर्णिमा ताई यांना सर्वांचे खुप खुप मनःपूर्वक अभिनंदन..
” आम्ही अधिकारी झालो, ” हे पुस्तक खरोखरच प्रत्येकाने वाचून त्यातून प्रेरणा घ्यावी असेच आहे. तळागाळातील जीवनापासून ते उच्चभ्रू वर्गापर्यंत होणारा प्रवास आणि त्यासाठी घेतलेले कष्ट, परीक्षेची तयारी, मिळालेले यश, या सर्वांचेच वर्णन अगदी समर्पकरित्या लेखकांनी केले आहे.
भुजबळ दांपत्याने घेतलेले अथक कष्ट मात्र सार्थकी लागले असेच वाटले हे पुस्तक वाचून. आणि प्रथम आवृत्ती संपून दुसऱ्या आवृत्तीच्या तयारीस सुरुवात हे बघून तर दोघांबद्दलचा आदर कमालीचा दुणावला.
आणि आता तर चक्क जपानच्या बुलेट ट्रेनमध्ये पुस्तकाचे प्रकाशन…. एकामागोमाग एक शिखरे सर करण्याचा दोघांचा झपाटा पाहून थक्क व्हायला होते.
अलका, तुम्हा दोघांचा साहित्य प्रवास असाच उत्तरोत्तर यशाची कमान चढती ठेवो आणि तुमच्या न्यूज पोर्टलचे नाव सर्वत्र दुमदुमत राहो हीच मनोकामना.
अरे वाह! खूपच आनंदाची बातमी आहे. असा बुलेट ट्रेन मध्ये पुस्तक प्रकाशन करण्याचा सन्मान एका मराठी दाम्पत्याला मिळाला, ही सुद्धा अतिशय अभिमानास्पद बाब आहे. खरंच खूप भाग्यवान आहात तुम्ही ! तुमची दोघांचीही मेहनत फळाला आली.मनःपूर्वक अभिनंदन 🙏💐
Congratulations
Heartily Congratulations and Best wishes.
अभूतपूर्व.. हार्दिक अभिनंदन सर
खुपच अनोखा उपक्रम! खुप छान वाटले बातमी वाचून. जापान च्या बुलेट ट्रेन मधे ‘आम्ही अधिकारी झालो’चे प्रकाशन एक जागतिक इतिहास घडवीणारी अविस्मरणीय अशी घटना आहे. या पुस्तकातील सर्वच अधिकारी लेखक आणि अविश्रांत परिश्रम घेवुन या पुस्तकाचे संपादन करणारे संपादक मा. देवेंद्रजी भुजबळ साहेब, न्यूज स्टोरी टुडे च्या प्रकाशिका अलका ताई भुजबळ व कार्यकम यशश्वीतेसाठी प्रयत्नशील सर्व टीम यांचे खुप खुप अभिनंदन 💐🎁🎊🎉
अभूतपूर्व… हार्दिक अभिनंदन सर
आम्ही अधिकारी झालो या लोकप्रिय पुस्तकाचं प्रकाशन
जपानच्या बुलेट ट्रेनमध्ये झाल्याच्या नाविन्यपूर्ण बातमीने
खूप आनंद झाला.सौ.अलका ताई व देवेंद्रजी भूजबळ यांच्यासह संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन
It is good occasion that indian book is inaugurate in japan