Friday, May 9, 2025
Homeलेखजपानी टॅक्सिवाला

जपानी टॅक्सिवाला

सर्व देशांचे विमानतळ सर्वसाधारणपणे एकाच मुशीतून तयार केलेले असतात .. जपान असो वा जाकार्ता , विमानतळाकडे बघून काही पत्ता लागत नाही. सर्व बाह्यरूप एकसारखे असते. आपण जातो त्या देशाची संस्कृती आणि त्या देशाचा आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्यामध्ये फक्त विमानतळाबाहेर पडणाऱ्या सरकत्या दाराचा अडसर तेवढा असतो. अल्याड आणि पल्याड चे विश्व मात्र सर्वस्वी वेगळे असते. त्या दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर मात्र , तुम्हाला तुमच्या मुक्कामाच्या ठिकाणी हॉटेलात घेऊन जाणाऱ्या वाहनचालकापासून तुम्हाला त्या देशाची खरी तोंडओळख होऊ लागते. ते वाहन जर का टॅक्सी असेल तर त्या देशाचा परिचय करून घेण्यासाठी तो टॅक्सिचालक तुमचा पहिला दुवा आणि संधी ठरतो .

अनोळख्या देशाच्या विमानतळावर प्रथमत: भेटणाऱ्या टॅक्सिचालकात, आरसा बघीतल्याप्रमाणे नेहमी मी त्या देशाचे प्रतिबिंब बघत असतो – न्यूयॉर्क मधले ते बिलंदर पाकिस्तानी चालक, उगाचच आगाऊ वाटणारे लॅटीना वा आफ्रिकन अमेरिकन चालक, बेल्जियमचे… बहुतांशी नेदरलँड निवासी आणि स्वित्झर्लंड चे बोलघेवडे टॅक्सी चालक , चीन चे शिरजोर आणि भांडकुदळ ड्रायव्हर्स , इस्रायल चे भारताविषयी कमालीची माहिती असणारे आणि तळमळीने भाष्य करणारे ज्यु ड्रायव्हर्स आणि सिंगापूरचे , सिंग्लिश भाषा बोलणारे टॅक्सिवाले अंकल – त्या छोट्या प्रवासामध्ये सुद्धा प्रत्येक जण आपापला ठसा अन प्रतिमा नकळत उमटवत असतो. परंतु या सगळ्यांमध्ये लक्षात राहतात ते सुसंस्कृत जपानी टॅक्सिचालक !

अगदी २०२3 सालापर्यंत वैज्ञानिक प्रगतीबरोबर आणि आंतरराष्ट्रीय दळणवळणी मुळे येणाऱ्या परकीय संस्कृतीचा अनाहूत हल्ला परतावयास जपानी माणूस कमालीचा यशस्वी ठरला आहे. त्यामुळेच परप्रांतीयांचे स्वागत न करणारा ” अंतर्मुख ” समाज अशी त्याची संबोधन जरी झाली तरी बहुतांशी जपानी परंपरा टिकवून धरण्यात हीच वृत्ती कारणीभूत झाली आहे. जपानी संस्कृती म्हणजे काय ह्याचे अनेक मापदंड देण्यात येतात , परंतु म्या पामराच्या मते त्यात एक गोष्ट नक्कीच समाविष्ट होणे जरुरी आहे आणि ती म्हणजे जपानी टॅक्सिवाला ! हानेदा विमानतळावरून इन्फॉर्मशन कॉउंटरच्या मागे सरकत्या जिन्यावरून खाली गेल्यानंतरच्या जेव्हा कोणी जपानी टॅक्सिवाला सुहास्य मुद्रेने तुमचे कमरेत वाकून स्वागत करतो.. स्वगतालाच ‘ हाई’ अशी संबोधना होते , तेव्हा पासून जपानी संस्कृती ची खरी तोंडओळख होऊ लागते.

जपानी टॅक्सिवाला ही काही फक्त बघायची गोष्ट नव्हे, तर त्याच्या सर्व वैशिष्ट्यांसकट अनुभवायचे एक प्रकरण आहे. सर्वसाधारणतः. धीरोदत्त आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व , वय अदमासे चाळीशी सहज पार केलेले.. इंग्रजीचे किरकोळ शब्द येणारी भाषा. सतत फॉर्मल कपड्यात…म्हणजे सूट , कोट मध्ये वावरणारा , आणि महत्वाचे म्हणजे दोन्ही हातात पांढरे शुभ्र हातमोजे घातलेला, जपानी शिष्टाचाराप्रमाणे सहजगत्या आणि पदोपदी कमरेत वाकून स्वागत करणारा चालक!

जपानी टॅक्सी ही सुद्धा सर्वसामान्य टॅक्सिपेक्षा थोडी वेगळी असते. प्रवाशाने मागच्या सीट वर प्रथम बसायची प्रथा . मागचा डाव्या बाजूचा दरवाजाच साधारणतः प्रथम उघडला जातो . त्याला एक हॅन्डल असते आणि त्याची कळ चालकाकडे असते. म्हणजे दरवाजाचे उघडणे आणि बंद होणे हे सर्वस्वी चालकावर अवलंबून असते. प्रवाशाने मुक्कामस्थळी पोहोचल्यावर पैसे दिल्यानंतरच हा दरवाजा उघडला जातो. चालकाची सीट मागून प्लास्टिक चे आवरण घालून संरक्षित केलेली. समोर डॅशबोर्ड्वर कार्ड पेमेंट करण्यासाठीची विविध साधने आणि चालकाचा फोटो व लायसेन्स क्रमांक. चालक आणि प्रवाश्यामध्ये कार्ड आणि पैश्याच्या देवाणघेवाणीसाठी छोटा ट्रे हमखास ठेवलेला. सगळे कसे साग्रसंगीत आणि हार्मोनाईज्ड असते.

जपानी टॅक्सिवाला हा जन्मजात मितभाषी अन शांन्त ! ही व्यवसायाची देणगी आहे की उपजत सवय हे नाकळे . त्यातून भाषेची अडचण. ९० टक्के चालक हे फक्त लोकल भाषा बोलणारे. प्रवाशाची भाषा कळावी लागते फक्त ठिकाण सांगताना ..आणि शेवटी पैसे देताना..नंतरचे सगळे संभाषण हे फक्त ” हाई ” आणि ” आरिगातो ” मध्ये संपते. आपल्या मुक्कामाचे जपानी भाषेतले नाव, आणि त्याचे इन्ग्लाळलेले उच्चार त्या चालकाला समजतीलच ह्याचा काही भरोसा नाही मी तर नेहमीपेक्षा अनोळखी ठिकाण असेल तर सरळ जपानी भाषेत पत्ता लिहून घेतो व टॅक्सी वाल्याला दाखवतो. म्हणजे दोघांचे जीव भांड्यात.

प्रमुख जपानी शहरे सोडून जसे तुम्ही दुसऱ्या , तिसऱ्या वर्गाच्या गावात जाऊ लागता तसे वयाने वरिष्ठ चालक सर्रास आढळतात वय जास्त असले तरी एकंदरीत खाक्या सारखाच किंबहुना जरा अधिकच कट्टर. वय जेवढे अधिक , तेवढा चालक व्यवसायात मुरब्बी. अगदी मुरत चाललेल्या लोणच्याच्या आस्वादाप्रमाणे. मला आतापर्यंत धांदरट आणि पोरसवदा वागणुकीचा जपानी टॅक्सिचालक दिसलाच नाही कुठे खरेतर.

मुद्दामून लांबच्या रस्त्याने नेणे…प्रवाश्याला उद्धट उत्तरे देणे.. सुट्टे पैसे न देणे .. कोणी ही बसलेले नसताना टॅक्सी एव्हेलेबल नाही असे सांगणे..अश्या टॅक्सिचालकांच्या मूलभूत हक्कांविषयी या जपानी टॅक्सिवाल्यांना काही कल्पना नसावी. मुंबईच्या टॅक्सिवाल्यांनी त्यांची ट्युशन बहुधा घेतलेली नाही अजून. एकदा मी माझ्या हॉटेल पासून सरळ विमानतळावर टॅक्सी ने पाहोचलो. चेक इन काउंटर पाशी जाणाऱ्या एका विविक्षित गेट क्रमांकापाशी माझा जपानी सहकारी मला भेटणार होता. मी टॅक्सिवाल्याला पैसे देऊ केले आणि उतरण्याची तयारी करू लागलो. तर हा पठया टॅक्सी चे दरवाजे उघडीना . त्याची नजर सतत गेटवर भिरभिरत होती आणि मला जपानी भाषेत काहीतरी सांगणे चालू होते. शेवटी मी सहकाऱ्याला फोन केला. त्याला पोहोचायला उशीर झाला होता. यथावकाश ५ मिनिटांनी माझा सहकारी पोहोचला आणि मग माझी त्या टॅक्सितून सुटका झाली. तो चालक त्याच्या भाषेत कंबरेतून लवून माझी प्रचंड क्षमा मागत होता आणि मग सगळा उलगडा झाला. माझ्या जपानी सहकाऱ्याने टॅक्सी बुक करताना सूचना दिली होती की तो गेटवर दिसला की ह्या मराठी माणसाला टॅक्सितून सोडा नाहीतर मी मधल्या वेळेत कुठे दुसरीकडे गेलो फिरायला की त्याची पंचाईत. टॅक्सिवाल्याने त्या सूचने चे अगदी तंतोतंत पालन केले होते ! आणि ह्या प्रकारामध्ये त्याची १० मिनटे गेली, पेट्रोल वाया गेले तरी तो त्याच्या शब्दांना बांधील होता. मला आठवते की अशाच एका प्रसंगात माझा ओव्हरकोट विमानतळावरच राहिल्या मुळे टॅक्सिचालक माझ्याबरोबर मदत म्हणून ‘लॉस्ट अँड फाऊंड ” विभागापर्यंत आपला व्यवसाय सोडून आला होता.

जपानमध्ये टॅक्सी कुठून पकडावी आणि कुठून नाही , ह्याची माहिती असणे मात्र अत्यावश्यक आहे म्हणजे असे कि “हानेदा” एरपोर्टपासून टोकियो सिटी ला जाणारी टॅक्सी फायद्याची पडते, म्हणून टोकीयोच्या दुसऱ्या एरपोर्टपासून “नारिता” पासून शहरात जायला सुद्धा टॅक्सी पकडली कि डोळे पांढरे होण्याएवढे बिल येते सारांश काय तर टॅक्सी बिल बघून हार्टऍटक येणे टाळायचे असेल, तर जाण्याचे ठिकाण किती दूर आहे ह्याचा होमवर्क आधी अत्यंत जरुरी असतो आणि ह्याची जाणीव त्या जपानी टॅक्सिचालकांना पण असते ट्रॅफिकमुळे एका टॅक्सिवाल्याने माझा रोजचा जपान ऑफिसचा मार्ग सोडून लांबचा मार्ग अवलंबिला. मला लक्षात आल्यावर मी फक्त… वेळ वाया जाणार आता .. असे काही तरी पुटपुटलो…परंतु त्याएका वाक्यामुळे मला ऑफिस ला सोडल्यावर त्या संवेदनाशील टॅक्सिचालकाने वरचे सगळे पैसे माफ केले आणि माझी एवढ्यावेळेला माफी मागितली की मीच जरा खजील झालो… तात्पर्य काय – जबाबदारीची अशी जाणीव या जपानी टॅक्सिचालाकांकडून असणे हे मला अनपेक्षित होते.

नासके आंबे या व्यवसायातसुद्धा नक्कीच असू शकतील हे मान्य केले तरी सर्वसाधारण जपानी टॅक्सिवाल्याची वर्तणूक मात्र याला अपवाद ठरते.

फुजी पर्वताच्या छायेत वाढलेला हा छोटा देश, सतत प्रलयंकारी त्सुनामी आणि भूकंपांशी झुंजणारा, अक्षरशः इंच इंच भूमी लढवावी अशी परिस्थिती ! एकदा त्या नगाधिराजालाच विचारावे वाटते की असे काय वेगळे आहे तुझ्या या भूमीत ?… अशी काय वेगळी आहे तुझी शिकवण, की या देशातील टॅक्सिचालक सुद्धा असे सुजाण अन जबाबदार नागरिक होतात ? पण तोही पडला जपानी संस्कृतीचा आद्यपुरुष .. सर्वसाधारण जपानी टॅक्सिचालकासारखाच धीरगंभीर , मितभाषी आणि संयमी…. उत्तर मिळेलच याची शाश्वती नाही … अनुभवता मात्र पदोपदी येईल !

— लेखन : उपेंद्र कुलकर्णी. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. खूपच छान लिहिले आहेस उपेंद्र. अक्षरशः जपान आणि तिथला टॅक्सी ड्रायव्हर समोर उभा राहिला.
    जपानी संस्कृती छान मांडली/ व्यक्त केली आहेस.
    असेच लिहित रहा.

  2. Japan is a very nice and clean city. I have seen that country. I saw Tokyo , Hiroshima , and other cities also. All Japanese all very Honest. Taxi driver from Japan are too honest to mention.

    I like that country very much.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
शितल अहेर on रेघोट्या…
शितल अहेर on हास्य दिन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on समस्यांना कॉमा करा आणि पुढे जा…– अलका भुजबळ
सौ.मृदुलाराजे on कामगार चळवळीचा इतिहास