जेव्हा जेव्हा मला एखाद्या शाळेत, महाविद्यालयात वक्ता,प्रमुख पाहुणे, अध्यक्ष अशा कोणत्याही का निमित्ताने बोलावले जाते, त्या त्या वेळी तेथील कार्यक्रमांना जायला मला नेहमीच आवडते. एरव्ही ही मला जेष्ठ, श्रेष्ठ व्यक्तींपेक्षा बालके आणि युवा यांच्या सहवासात रहायला आवडते. कारण या दोन्ही गटातील मुलामुलींची डोकी नको त्या ओझ्याने भरलेली नसतात. मने शुध्द असतात. नवनवीन विचार, कल्पना आपल्याला ऐकायला मिळतात. आजच्या तरुणाईत काय चालले आहे, ते कळते आणि उगाचच आजची तरुण पिढी ऐकत नाही, बिघडत चालली आहे वगैरे बोलणे किती एकांगी आहे, हे लक्षात येते. त्यामुळे मला असे वाटते की, उगाचच अशी सरसकट विधाने आपण करू नये.
आता हेच बघा ना, नुकतेच मला भारतातील पहिल्या १० महाविद्यालयातील एक असलेल्या मुंबईतील जयहिंद कॉलेज मध्ये वाद विवाद स्पर्धेचा परीक्षक म्हणून बोलाविले होते. तसे तर मी मंत्रालयात माहिती संचालक असताना, आमच्या (महाराष्ट्र शासनाच्या) बी रोड वर असलेल्या सागर या शासकीय निवासस्थानी काही काळ राहिलो होतो. त्या अर्थाने मी या कॉलेजचा सख्खा शेजारी होतो. रोजच या कॉलेज वरून जाणे येणे होत असे. पण आत जायची काही कधी संधी मिळाली नाही. ती संधी मला नुकतीच मिळाली, ती या कॉलेज मध्ये “उमेद” या वार्षिक स्नेह संमेलन आणि त्या अनुषंगाने आयोजित केलेल्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांमुळे. या सर्व स्पर्धा आणि कार्यक्रमांना नाव दिले होते ते “उमेद”! विविध स्पर्धांपैकी वाद विवाद स्पर्धेचा परीक्षक म्हणून मला बोलाविले होते.

सकृत दर्शनी हे कॉलेज श्रीमंत मुलामुलींचे समजले जाते. आता हे कॉलेज ही आहे, अशाच ठिकाणी की तिथे बहुतांश मंडळी श्रीमंत आहेतच. त्यामुळे अशा हाय फाय कॉलेज मध्ये कसा अनुभव येईल, या विषयी मी साशंकच होतो. पण कॉलेज कडून अतिशय विनम्र भाषेत होत असलेला ईमेल व्यवहार, तेथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे मोबाईल वरून अतिशय आर्जवी स्वरूपात होत असलेले बोलणे यामुळे मी आश्वस्त होत राहिलो आणि प्रत्यक्ष कॉलेज मध्ये गेल्यावर तर खूपच छान, अविस्मरणीय अनुभव आला.
कॉलेज मध्ये, म्हणजे गेट पाशी पोहोचल्यावर एन एस एस को ऑर्डीनेटर प्रिती कोटियन हिला मी पोहोचल्याची खबर दिली. ती अन्य कामात व्यस्त असल्याने तिने लगेच ध्रुव या स्वयंसेवकाला मला घ्यायला पाठविले. (याला इंग्रजीत “एस्कॉर्ट” म्हणतात. मराठीत चपखल शब्द शोधावा लागेल) त्याने अतिशय अदबशीरपणे विश्रांती कक्षात नेले. स्वच्छतागृह कुठे आहे ते दाखविले. नंतर पाणी आणि छानपैकी मला हवी तशी, कमी साखरेची कडक कॉफी आणून दिली. खरं तर माझी अपेक्षा होती की या सर्व गोष्टी एक तर कॉलेजचा शिपाई करेल किंवा कॅन्टीन चा वेटर करेल. पण हे सर्व ध्रुव इतक्या आत्मीयतेने करत होता की मला नवल आणि त्या बरोबर आनंद सुध्दा होत होता.
ध्रुव ची भूमिका संपल्यानंतर दुसरी स्वयंसेवक, तन्मयी आली. ती मला मुख्य सभागृहात सुरू होणाऱ्या उद्घाटनपर कार्यक्रमाला घेऊन गेली. तिथे कॉलेजचे प्राचार्य डॉ विजय दाभोलकर यांची ओळख झाली. ते ही खूप अगत्याने वागत बोलत होते. उद्घाटनपर कार्यक्रमात काही छान गाणी, काही समूह नृत्ये मुलामुलींनी सादर केली.


प्राचार्य दाभोळकर यांनीही प्रसंगाचे औचित्य ओळखून लंबे चौडे, फार उपदेश पर भाषण न करता अक्षरशः पाच मिनिटांचे अतिशय स्फूर्तिदायक मनोगत व्यक्त केले. त्या नंतर ज्या ज्या स्पर्धांसाठी जे जे परीक्षक बोलाविले होते, ते ते त्या त्या स्पर्धांच्या ठिकाणी नेमून दिलेल्या स्वयंसेवकांबरोबर गेले.
वाद विवाद स्पर्धा पहिल्या मजल्यावरील मोठ्या हॉल मध्ये होती. दोन दोन विद्यार्थ्यांचा जोडीने त्यांना दिलेल्या विषयावर बोलायचे होते. एका जोडीने त्या विषयाच्या समर्थनार्थ बोलायचे होते. तर दुसऱ्या जोडीने त्या विषयाची नकारात्मक बाजू मांडायची होती.

पहिला विषय होता, परदेशात जाऊन शिक्षण घेणे योग्य आहे का ?
दुसरा विषय होता, पारंपरिक वस्त्र कारागीर श्रेष्ठ की आधुनिक फॅशन डिझायनर श्रेष्ठ,
तिसरा विषय होता, आजच्या जागतिककरणाच्या परिस्थितीत भारतीय संस्कृती कशी टिकेल ?
प्रत्येक विषयाच्या दोन्ही बाजू इतक्या हिरीरीने मांडल्या गेल्या की, ऐकावी तीच बाजू आपल्याला खरी वाटेल आणि पटेल !
एका तासाने दुसरी एक स्वयंसेविका, दिया ने मला काही नाश्ता, चहा हवंय का ? असे विचारल्यावर मला आपली कॉफी ची वेळ झाल्याची आठवण झाली आणि मी कॉफी हवी म्हणून सांगितले. थोड्या वेळात ती स्वतःच कॉफी घेऊन आली ! दोन तासांनी ही स्पर्धा संपली. या सर्व स्पर्धेचे सूत्र संचालन करणारी प्रमुख स्वयंसेविका नीती आणि तिला सहाय्य करणारी मोहिनी या दोघी इतक्या आत्मविश्वासाने सर्व काही हाताळत होत्या की, असे वाटत होते, त्यांना जणू अनेक वर्षांचा अनुभव असावा. पण तसा तो नव्हता. कारण अशी स्पर्धा कॉलेजमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धा संपल्यावर मी छोटेखानी मनोगत व्यक्त केले. कॉलेज तर्फे मला छानशी भेट देण्यात आली. पुन्हा काही खाण्यासाठी हवे आहे का ? अशी अगत्याने विचारणा करण्यात आली. पण मला काही नकोच होते पण प्राचार्यांची सदिच्छा भेट घ्यायची आहे म्हणून मला त्यांच्या दालनात नेण्यात आले. पण ते कुठल्या तरी बैठकीसाठी कॉलेज बाहेर गेलेले असल्याने भेट काही झाली नाही.

हे सर्व आटोपल्यावर दोन स्वयंसेवक मला कॉलेज च्या दारापर्यंत सोडायला आलेत. टॅक्सी बुक करून देऊ का, म्हणून विचारले. पण तशी काही गरज नव्हती.
आल्यापासून ते निघेस्तोवर कॉलेज, कॉलेज मधील जल्लोषाचे वातावरण, सर्व मुलामुलींचा उत्साह, छान वागणे बोलणे पाहून मी अत्यंत आनंदी मनाने तसेच आजच्या तरुण पिढीच्या हाती देशाचे भवितव्य सुरक्षित आहे, ही भावना मनात बाळगून बाहेर पडलो.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— छायाचित्रण : ज्ञानेश्वर चव्हाण.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
धन्यवाद काका ( देवेंद्र भुजबळ ) तुमच्यामुळे मला भारताच्या टॉप 10 च्या कॉलेजमध्ये जायला मिळाले . हा अनुभव खूप सुंदर होता पण मला या अनुभवामुळे शिकायला मिळाल्याचे कितीही मोठे झाले तरी आपला नम्रपणा विसरू नये आपण कितीही श्रीमंत झालो तरी दुसऱ्यांचा आदर केलाच पाहिजे आणि तुमच्या सहवासात राहून खूप आशा नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या त्यामुळे खूप खूप धन्यवाद .
आ.संपादक भुजबळ साहेब
आपला काॅलेज तरुणाई सोबतीचा व त्यांनी मांडलेले विचारांचे आपण कौतुक केले.
सुंदर शिर्षक ‘उमेद’