मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला रत्नागिरी येथे जन्मलेले, शिकलेले प्रख्यात चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर यांचे नाव देण्याबाबत रत्नागिरीचे सुपुत्र तथा मुंबई दूरदर्शन केंद्राचे निवृत्त सहाय्यक संचालक श्री जयु भाटकर यांनी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते.

या पत्राची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने या उपकेंद्राला धनंजय कीर यांचे नाव देण्याचा निर्णय नुकताच घेतला. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे श्री जयू भाटकर यांनी आभार मानले आहेत. उपकेंद्राला चरित्रकार धनंजय कीर यांचे नाव दिल्यामुळे नव्या पिढीला त्यांचे कार्य ज्ञात होणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मुंबई विद्यापीठाच्या मॅनेजमेन्ट कौन्सिलमध्ये मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला पद्मभूषण धनंजय कीर यांचे नाव देण्याचा ठराव गुरुवारी मंजूर झाला. त्याबाबत जयू भाटकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर यांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जयु भाटकर यांनी ५ डिसेंबर २०२० रोजी, पत्र लिहून मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला रत्नागिरीचे सुपूत्र लेखक चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर यांचे नाव देण्याची मागणी केली होती. सदर पत्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठवण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून डिसेंबर अखेर श्री भाटकर यांना कळवण्यात आले.

त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनाही पत्र दिले आणि मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला पद्मभूषण धनंजय कीर यांचे नाव देण्याबाबत मागणी करून सविस्तर चर्चा केली होती.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांनाही ११ जानेवारीला पत्र दिले होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पाठपुरावा केल्याने विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कॉन्सिलने रत्नागिरी उपकेंद्राला पद्मभूषण स्व. धनंजय कीर यांचे नाव देण्याचा ठराव संमत केला.
याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना जयू भाटकर म्हणाले की, २८ मे या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सावरकरांचे चरित्रकार धनंजय कीर यांचे नाव विद्यापीठाने रत्नागिरी उपकेंद्राला देण्याचा निर्णय घेतला हा एक कपिलाषष्टीयोग आहे.
पद्मभूषण स्व. धनंजय कीरांचे रत्नागिरीतील सुपूत्र डॉ. सुमित कीर आणि त्यांच्या परिवाराचे मी यानिमित्ताने अभिनंदन करतो, असे सांगून श्री भाटकर पुढे म्हणाले की, माझ्या प्राथमिक शाळेच्या (शाळा क्र. ३ नगरपरिषद रत्नागिरी) – दिवसात शाळेचे मुख्याध्यापक स्व. आखाडेगुरुजी [जाकादेवी, ता. रत्नागिरी] हे रोज प्रार्थना झाल्यावर महान व्यक्तींची माहिती सांगायचे.
त्यांच्या या माहितीतूनच स्व.धनंजय कीर यांचे लेखन, व्यक्तीमत्व प्रथम मला कळाले. त्याचवेळी मुख्याध्यापक आखाडेगुरुजींनी स्व.धनंजय कीरांना शाळेत कार्यक्रमाच्या निमित्ताने निमंत्रित केले होते. त्यांचा सत्कार केला होता. त्यावेळचे स्व.धनंजय कीरांचे भाषण आणि तो ऐतिहासिक दिवस यांचे आज स्मरण होत आहे.
विद्यापीठ उपकेंद्राला स्व.धनंजय कीराचे नाव द्यावे ही सूचना, कल्पना मूर्त स्वरुपात साकार होत आहे. ती मी स्व. मुख्याध्यापक आखाडेगुरुजी यांना विनम्रपणे समर्पित करत आहे असे सांगून पुन्हा एकदा श्री. भाटकर यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.
धनंजय कीर यांचा परिचय :
धनंजय कीर यांचा जन्म २३ एप्रिल १९१३ रोजी रत्नागिरी येथे झाला. तिथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण स्कुल ऑफ इंडस्ट्री तर माध्यमिक शिक्षण पटवर्धन हायस्कूलमध्ये झाले. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात त्यांनी २३ वर्षे नोकरी केली.
महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा थोरामोठ्यांवर त्यांनी मराठी व इंग्रजीत लिहिलेली चरित्रे देश विदेशात लोकप्रिय आहेत. “कृतज्ञ मी, कृतार्थ” हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. १२ मे १९८४ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800.
भुजबळ साहेब आपल्या संकलनमुळे पद्मभुषन धनंजय कीर यांची ओळख झाली..धन्यवाद 🙏
आपणही लिहीत चला. आम्हाला नक्कीच आवडेल.
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला प्रख्यात चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर यांचे नाव दिल्या बद्दल महाराष्ट्र शासनाचे हार्दिक आभार. पद्मभूषण धनंजय कीर यांचे नाव देण्याबाबत मुंबई दूरदर्शन केंद्राचे निवृत्त सहाय्यक संचालक श्री जयु भाटकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले त्यांचे अभिनंदन 🌹
तसेच छान माहिती संकलन करून प्रसिद्धी दिल्याबद्दल श्री देवेंद्र भुजबळ साहेब यांचेही आभार आणि धन्यवाद 🙏
मनःपूर्वक धन्यवाद, सर.आपलं मार्गदर्शन असू द्या.
या निमित्ताने धनंजय कीर यांचे कार्याचा जनमानसात सतत उजाळा होत राहिल.