Wednesday, September 17, 2025
Homeलेखजय जवान...

जय जवान…

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. या स्वातंत्र्याचे रक्षण आपले जवान
प्राणपणाने करीत असतात. म्हणून आपण सुखाने जगू शकतो.

सीमेवरच्या आपल्या जवानांना केवळ शत्रू, नैसर्गिक आपत्ती, परिस्थिती या बरोबरच वेळ प्रसंगी स्वतःवर, घरच्यांवर कोसळलेल्ल्या दुःखद परिस्थितीशीही कसा सामना करावा लागतो, याचे हृयदद्रावक, थरारक वर्णन सौ संपदा पंडित आपटे यांनी केले आहे.

सौ संपदा या, माहिती खात्यातील सहकारी कै. सतीश पंडित यांच्या कन्या आहेत. शिवाय त्या जपानी भाषेच्या तज्ज्ञ आहेत. न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे सहर्ष स्वागत करू या…
– संपादक.

थ्री इडीयट सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून लडाख प्रकाशझोतात आलं. तेव्हापासून प्रत्येक भारतीय तिथे जाण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. म्हणूनच इतर लोकं गळत असली तरी आम्ही दोघींनी तरी जायचंय असं ठरवून टाकलं होतं. आज मात्र लडाख बद्दल बोलायचं नाहीये. तर ३ वर्षांपूर्वी आमच्या ट्रीप दरम्यान घडलेल्या एका प्रसंगाबद्दल बोलायचय. तो प्रसंग आमच्या मन:पटलावर कायमचा कोरला गेला आहे.

मुंबई हून निघताना आमच्या सोबत मुंबई, पुणे आणि नाशिक हून आलेले इतर १२ जण होते. आम्ही त्यांना एअरपोर्ट वर पहिल्यांदाच भेटलो. संपूर्ण ट्रीप मध्ये गाणी, गेम्स, फोटोज्, खादाडी, अर्थहीन जोक्स बरोबरीनेच अर्थपूर्ण गप्पा इतक्या झाल्या की आमची चांगलीच गट्टी जमली. स्वप्नवत वाटणारे लडाख कॅमेरात टिपून कायमस्वरूपी एक आठवण म्हणून लक्षात ठेवावेत, असे खास लडाखी भाषेतले शब्द पाठ करत करत आमची टीम कारगिल हून श्रीनगर ला एनएच १ मार्गे निघाली होती.

आजपर्यंत ऐकिवात असलेलं काश्मिरी साैंदर्य पाहण्याची ओढ लागली होती. मधेच कारगिल चेक पोस्टपाशी गाडी थांबली. या प्रदेशातली गम्मत अशी आहे की इथे कुठल्याही ठिकाणी थांबलो तरी तो आपल्या शहरातल्या समस्त प्रेक्षणीय स्थळांच्या गालात चपराक मारेल इतका सुंदर ! त्यामुळे आम्ही मुली खुश होतो. गाडी का थांबलीये ? याची ना माहिती होती ना फिकीर. मग आमचं फोटोसेशन झाल्यावर कळलं की पुढे ल्यांड स्लाईड झाल्यामुळे गाडी पुढे सरकूच शकणार नाही. हा महामार्ग इतर महामार्गासारखा नसून निमुळता, घाटातला, कच्चा रस्ता आहे. मुळातच आव्हानात्मक असलेला हा पट्टा,
ल्यांड स्लाई मुळे जीवघेणा झाला होता. रस्ता मोकळा करायला निदान अर्धा तास लागणार होता. श्रीनगर पहायला पुरेसा वेळ मिळावा म्हणून कधी नव्हे ते आम्ही सगळे जण सकाळी लवकरच निघालो होतो. आमची निराशा झाली. पण तिथे थांबण्यावाचून आमच्याकडे पर्यायही नव्हता.

एव्हाना जेवणाची वेळ झाली होती. आसपास हॉटेल काय ढाबाही दिसेना. वेळ नुसताच वाया जात होता. तेवढ्यात केतन, आमच्यातला एक जण, एका अनोळखी व्यक्तीला घेऊन गाडीत बसला आणि एका इशाऱ्यावर आमची गाडी सुरू झाली.

कोण आहे हा इसम ? क्षणभर काहीच कळेना. वैतागलेल्या आमच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून मग त्यानेच उलगडा केला. पाठीवर छोटीशी बॅग घेऊन आमच्या बसमध्ये बसलेला हा मनुष्य वाट दाखवणारा ग्रामस्थ नाही तर कारगिल कॅम्प मध्ये कर्तव्य बजावणारा एक जवान होता. त्याला समोर बसवल्यानंतर त्याच्याविषयी सांगायला बसमध्ये केतन थोडासा मागे आमच्याकडे आला. शक्य तितक्या लवकर श्रीनगर ला पोचण्यासाठी धडपडणाऱ्या या व्यक्तिशी केतनला का कुणास ठाऊक पण मराठीत बोलायची बुद्धी झाली. आणि आश्चर्य म्हणजे आपला सैनिक मराठीत उत्तरला.

महाराष्ट्राच्या या वीरपुत्राला देशाप्रतीचे कर्तव्य चोख पार पाडत असताना आपल्या गरोदर पत्नीच्या मृत्यूची बातमी कानावर आली होती. आपल्या बाळाच्या जन्माची खबर सांगणारा फोन कोणत्याही क्षणी अपेक्षित असताना या बाबाने हे हिमालया एवढं दुखः कित्येक मैल अंतरावर असलेल्या त्या हिमालयाच्या कुशीत कसं बरं पचवलं असेल ? आता निदान अंतिम दर्शन घेता यावे ही एकच इच्छा त्याच्या मनात होती. आम्ही निशब्द !! सगळ्यांचेच डोळे पाणावले. सगळं कल्पनातीत होतं..
अशा प्रसंगी भारतीय सैन्यदलाकडून हेलिकॉप्टर ची सोय केली जाते पण आज प्रतिकूल हवामानामुळे ते शक्य न झाल्याच कळलं. मग त्याला श्रीनगर एअरपोर्ट पर्यंत थेट जाता यावं यासाठी आमच्यापैकी काहींच्या नजरा खिडकीबाहेर तर काहींच्या वेगवेगळ्या अॅप वर टॅक्सी शोधू लागलो. पण पहाडी प्रदेशातली वाहतूक ती,  हात दाखवा टॅक्सी मिळवा इतकी सहज कसली ? आमचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरत होते. काही वेळाने असा पॉइंट आला जिथे श्रीनगर एअरपोर्ट एका रस्त्याने आणि आमचं ठिकाण असलेला डाल लेक दुसऱ्या मार्गाने येणार होता. गाडी हळू करत त्याला कुठे उतरवता येईल याचा अंदाज ड्रायव्हर घेऊ लागला. या मनस्थितीत त्याला अशा दुर्गम भागात असं एकटं सोडून देणं आम्हाला मुळीच पटलं नाही. “ड्रायव्हर, हम श्रीनगर एअरपोर्ट चलेंगे” आम्ही क्षणाचाही विलंब न लावता म्हणालो. ड्रायव्हर तयार नव्हता. त्याला ठरलेल्या वेळी हॉटेल वर पोहोचायचेच होतं. पण नंतर तो तयार झाला अर्थात परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आलं म्हणून नाही तर ज्यादा रक्कम मिळणार होती म्हणून !

आता सगळ्यांचं ध्येय निश्चित होतं. लवकरात लवकर श्रीनगर एअरपोर्ट गाठण्याचे. तिथ पर्यंत जायची सोय झाली. पण तिकिटाचे काय ? आमच्याकडे ते ही नव्हतं. आपला जवान हिंगोलीतील असल्यामुळे त्याला श्रीनगर ते हैद्राबाद किव्हा नागपूर अशी फ्लाईट हवी होती. विमानतळावर उतरल्या नंतरच्या हिंगोली पर्यंतच्या प्रवासाची सोय त्याच्या मित्रांनी करून ठेवली होती. वेळेत पोहोचण्याची शक्यता कमी होती. एअर लाईन्स ना फोन करून विमान थोडा वेळ थांबवता येईल का ? हे आम्ही पाहत होतो. पण हातात तिकिटच नसेल तर तसं करता येणार नाही असं आम्हाला सांगण्यात आलं.

काहीवेळाने कशीबशी एका तिकीटाची सोय झाली. आता तातडीने पुढची फोनाफोनी करणं महत्त्वाचं होतं. जवानाकडून त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा नंबर मिळाला. आमच्यातल्या एकाने घडला प्रकार सरांना सांगितला. तेही हळहळले. आपल्या परीने सूत्र हलवण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. असाध्य वाटणारं धेय्य आता जवळ येऊ लागलं होतं. श्रीनगर
एअरपोर्टचे दिशादर्शक बोर्ड्स आता सुखावत होते. बसनेही वेग चांगलाच वाढवला होता.
काही वेळातच आम्ही एअरपोर्ट ला पोहोचलो. जवानाने सगळ्यांकडे बघून हात जोडले.. आणि सगळ्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले.. जवानांसह आमचे मित्र अक्षरशः धावत सुटले.. आम्ही बसमध्ये चमत्कारिक मनस्थितीत होतो.. १५-२० मिनिटांनी विमान मिळाल्याचा फोन आला.. आणि आमचा जीव भांड्यात पडला.

त्यावेळेस श्रीनगर दर्शन झालं नाही. पण जे दिसलं आणि अनुभवलं ते विलक्षण होतं..
शत्रूच्या जवानावरही अशी वेळ न येवो.. आणि दुर्दैवाने ती आलीच, तर अतिशय सुरक्षित वातावरणात राहणाऱ्या, आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना खारीचा वाटा उचलता यावा म्हणून आपली उपस्थिती तिथे असो असं वाटतं..

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी, सगळ्या प्रकारची आव्हानं पेलणाऱ्या जवानांना सलाम..
जय हिंद जय महाराष्ट्र !

संपदा आपटे

– लेखन : संपदा पंडित आपटे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. खरोखर चांगला लेख आहे.जर लोकांनी मंनात आणले तर आपण कुटल्याही मार्गाने त्याची मदत करू शकतो 👍👋👋

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं