मंगळागौरी हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात.
मंगळागौरीचे व्रत व्यक्तिगत असले तरी पूजा मात्र समूहाने केली जाते. यात जिची पहिली मंगळागौरी असेल तिच्यासोबत गावातील, नात्यातील, ओळखी मधील आणि इतरही नवविवाहित मुलींना पूजेसाठी बोलाविले जाते. या सर्व मुली एक ते पाच वर्षांपूर्वी लग्न झालेल्या असतात. जिची मंगळागौर असते ती सोडून पूजेसाठी येणाऱ्या इतर सर्व विवाहित मुलींना ‘वशेळी’ असे म्हटले जाते. पूजेला किमान पाच किंवा प्रत्येकाच्या हौस व कुवतीप्रमाणे कमाल कितीही ‘वशेळ्या’ बोलवाव्यात.
मुलीने लग्नानंतरच्या पहिल्या वर्षी श्रावणातील एका मंगळवारी अशा प्रकारे वशेळ्यांना बोलावून सामूहिक मंगळागौरी पूजन करावे आणि पहिल्या वर्षांतील इतर श्रावण मंगळवारी व नंतरच्या वर्षांतील श्रावण मंगळवारी इतरांच्या मंगळागौरीला ‘वशेळी’ म्हणून पूजा करण्यासाठी जावे. पाचव्या वर्षी पुन्हा उद्यापनाच्या वेळी आपल्याकडे वशेळ्या बोलावून मोठय़ा प्रमाणावर मंगळागौर करावी. काही कारणाने पाचव्या वर्षी उद्यापन करायचे राहून गेले तर नंतर केव्हा तरी सोयीनुसार ते केले तरी चालते मंगळागौर हे आईने मुलीला लग्नानंतर दिलेले सौभाग्य व्रत असल्याचेही मानले जाते. म्हणूनच लग्नानंतरच्या पहिल्या वर्षीच्या श्रावणात पहिल्या मंगळवारी नवविवाहितेच्या माहेरी मंगळागौर करण्याची प्रथा रूढ झाली असावी. या वेळी आईवडिलांचा मान-सन्मान करून आशीर्वाद घ्यायचा असतो.
नाग दानाने संततीवर येणारे संकट टळते, अशी समजूत असल्याने या व्रताच्या उद्यापनाच्या वेळी आईला नागप्रतिमेचे वाण देण्याची प्रथा आहे.
पूर्वी घरे मोठी, ऐसपैस असायची, त्यामुळे मंगळागौर घरातच पुजली जायची. आता विशेषत: शहरांत गरजेनुसार हॉल किंवा एखाद्या मंदिराची जागा भाडय़ाने घेऊन मंगळागौरी पूजन केले जाते. तसेच बहुतांश मुली हल्ली नोकरी लागल्याशिवाय लग्नच करत नसल्याने लग्नानंतरची पहिली पाच वर्षे श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करणे त्यांना शक्य होत नाही. तरीही पहिल्या वर्षी सोयीनुसार श्रावणातील एका मंगळवारी घरची एक मंगळागौर अवश्य केली जाते. मंगळागौरीच्या निमित्ताने सासर-माहेरच्या मंडळींखेरीज इतरही आप्तेष्ट जमतात व मुळात धार्मिक असलेल्या या कार्यक्रमास ‘कौटुंबिक सोहळ्याचे’ स्वरूपही आपसूकच येते .
भाद्रपदातील श्री गणपती पूजनाप्रमाणे मंगळागौरीच्या पूजेलाही २१ विविध प्रकारच्या औषधी समजल्या जाणाऱ्या अश्या फुलझाडांच्या पानांची पत्री (पाने ) वाहण्याची पद्धत आहे. नववधूने घरातील जाणत्या स्त्रियांसह परसदारात फिरून पूर्वी ही पत्री गोळा केली जायची. त्यानिमित्ताने घराच्या परिसराची, तेथील वृक्षवेलींची व त्यांच्या गुणवैशिष्टय़ांची ओळख व्हावी, ही यामागची कल्पना. हल्ली निगुतीने सर्व पत्री गोळा करण्याचा उत्साह फारसा कोणी दाखवत नाही. बाजारात फुलांसोबत जे काही पत्री म्हणून मिळते त्यावर भागविले जाते.
मंगळागौरीच्या दिवशी घरात पहाटेपासूनच लगबग सुरू होते. पूजा करणारी नवविवाहिता व घरातील इतर स्त्रिया शुचिर्भूत होऊन पूजेच्या तयारीला लागतात. पूजेनंतर नैवेद्य व जेवण असल्याने, वशेळ्यांनाही लवकरच बोलावले जाते. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली यजमान नवविवाहितेसह वशेळ्या मंगळागौरीची षोडशोपचार पूजा करतात. पूजेनंतर आरती. प्रथम रिवाजाप्रमाणे गणपतीची व त्यानंतर मंगळागौरीची..
जय देवी मंगळागौरी,
ओवाळिन सोनियाच्या ताटी,
रत्नांचे दिवे, माणिकांच्या वाती,
हिरे या मोती-ज्योति,
जय देवी मंगळागौरी..
आरतीनंतर प्रथम गणेशाची व त्यानंतर मंगळागौरीची कहाणी सांगितली जाते. इतर कथांप्रमाणोच या कथेतूनही मंगळागौरी व्रताचे माहात्म्य सांगितले जाते
एरवी नवऱ्याला अरे-तुरे करणारी आधुनिक नवविवाहिताही स्त्रीसुलभ लाजते व लाजत लाजत उखाणा घेते.
मंगळागौरीच्या वेळी आग्रहाने पाळली जाणारी आणखी एक बाब म्हणजे यजमान नवविवाहितेने व वशेळ्यांनी काहीही न बोलता मुक्याने जेवणे. जणू मूकपणाने एकमेकांना समजून घेण्याची, एकमेकांना काय हवं काय नको ते समजून घेण्याची कल्पना यामागे असावी.
दुपारची जेवणे उरकल्यावर रात्रीच्या मंगळागौरीच्या खेळांची तयारी सुरू होते. त्यासाठी मंगळागौरीची पूजा केलेला चौरंग फुलापानांनी सजविला जातो व त्याला शिवलिंगाचे रूप दिले जाते. मनोभावे पुजलेल्या या शिवपार्वतीच्या साक्षीने रात्र जागविली जाते. पहाटेपर्यंत चालणारे खेळ हे मंगळागौरीचे खास आकर्षण असते.
रात्रीचे खेळ सुरू होण्याआधी फराळ करून घेतात. पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या मंगळागौरीत या फराळाचा मेनूही पूर्वापार ठरलेला असतो. रात्रीच्या फराळाचा हा मेनू रूढ होण्यामागेही आरोग्यशास्त्राचा विचार आहे. मुसळधार श्रावणसरींनी वातावरण कुंद झालेले असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी पचायला सोपे जावे यासाठी भाजलेल्या आणि मोड आलेल्या धान्य-कडधान्यांचा यात समावेश केला जातो. मसालेभात, मटकीची उसळ, चटणी, गोड शिरा या नेहमीच्या पदार्थाखेरीज भाजणीचे खमंग वडे आणि त्यासोबत घट्ट कवडीबाज दही हे या मेनूचे फक्कड आकर्षण.
मंगळागौरीच्या खेळांची सुरुवात यजमान नवविवाहितेलाब घेऊन घातलेल्या फुगडीने होते. खेळताना मनातील सहज ओठावर येते आणि यातूनच ‘चहा बाई चहा, गवती चहा, मायलेकीची (किंवा सासू-सुनेची) फुगडी पाहा. पाहा तर पाहा, नाही तर उठोनि जा, आमच्या फुगडीला जागा द्या’, असे म्हणत खेळण्यासाठी जागा मोकळी करून घेतली जाते.
पट्टीच्या खेळणाऱ्या असतील तर साधी फुगडी, एका हाताची फुगडी, त्रिफुला फुगडी असे फुगडीचे अनेक प्रकार खेळले जातात.
फुगडीनंतर दोन-तीन प्रकाराचा झिम्मा, खुर्ची का मिर्ची, नाच गं घुमा, आटुंश पान, तिखट मीठ मसाला, तांदूळ सडू बाई, कीस बाई कीस.. दोडका कीस, आगोटं-पागोटं, कोंबडय़ाचे तीन-चार प्रकार, आळुंकी-साळुंकी, सासू-सुनेचे अथवा सवतींचे भांडण, आवळा वेचू की कवळा वेचू, किकीचे पान, माझी आई मोठी की तुझी आई मोठी, नखोल्या, ताक, सोमू-गोमू, काच-किरडा, धोबीघाट, होडी, मासा, भोवर भेंडी, अडवळ घूम, पडवळ घूम, गोफ असे मजेदार व प्रसंगी मिश्कील खेळ रंगत जातात.
असे हे मंगळागौरीचे खेळ पहाटेचा कोंबडा आरवेपर्यंत सुरू राहत. खेळून दमलेल्या वशेळ्यांना व खेळणाऱ्या इतर बाया-मुलींना घरी जायचे वेध लागतात. जाण्याआधी पुन्हा एकदा मंगळागौरीची छोटेखानी आरती केली जाते व मंगळागौरीला दहीभाताचा नैवेद्य दाखविला की या धार्मिक व्रताच्या पूजाविधीची सांगता होते.

माझ्या माहितीतील बारसावडे कुटुंब आहे, साताऱ्यातल्या कोरेगाव मधील एकमेव अशी संपूर्ण ऍडव्होकेट फॅमिली असणाऱ्या श्री व सौ मृणाली श्रेयस बारसावडे.
यांच्या घरच्या मंगळागौर पूजेसाठी, या फॅमिलीत स्वतः नवरा बायको सासू सासरे नणंद असे सगळे उच्चशिक्षित ऍडव्होकेट असले तरी, पुरोगामी विचाराबरोबर आधुनिकतेची जोड देऊन पारंपरिक सण जपणारे आहेत. त्यामुळे सण उत्सवांच्या काळात या कुटुंबात स्त्रियांच्या बरोबरीने पुरुषही प्रत्येक कामात हातभार लावतात. अगत्याने स्वागत करतात.

– लेखन : यामिनी करंदीकर