भारतातील लोकांना उच्च शिक्षणासाठी पूर्वी इंग्लंड व अमेरिकेचे आकर्षण होते. पण आता जर्मनीत उच्चशिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. याचे कारण जर्मनीत उत्तमोत्तम विश्वविद्यालये तर आहेतच पण तिथे शिकण्यासाठी विद्यार्थ्याला अत्यल्प फी भरावी लागते. तसेच उच्च दर्जाचे शिक्षण मिळाल्यामुळे नोकरीही अपेक्षेप्रमाणे मिळते. जर्मनीचे हवामान इंग्लंडसारखेच असल्यामुळे भारतीयांना सुसह्य होते. त्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यातून कानडी, बंगाली, पंजाबी, तामिळ विद्यार्थी जसे जर्मनीत आले आहेत तसेच मराठी विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात आहेत.
मराठी माणूस कोणत्याही देशात गेला आणि तेथील देशातील वातावरणाशी मिळते जुळते घेऊन राहायला लागला तरी आपली भाषा आणि संस्कृती टिकवून धरणे त्याला जरुरीचे वाटते. जर्मनीत स्थायिक झालेली मराठी माणसे देखील एकमेकांच्या भेटीगाठी घेऊन सण उत्सव एकत्र साजरे करू लागली आहेत . अनेक ठिकाणी असे उत्साही गट निर्माण होताना पाहून फ्रँकफर्ट इंडियन कॉन्सुलेटने ‘फ्रेंड्स ऑफ इंडिया’ असा ग्रुप तयार केला आणि मराठी, बंगाली, तामिळ अशा सर्व गटांना बोलावून, मिटिंग ठरवून, त्यांना अधिकृत नोंदणी करण्यास मदत देण्याचे कबूल केले. १९९० पासून तेथे स्थायिक झालेले रवी जठार आणि त्यांच्या मित्रमंडळींनी या मीटिंगनंतर मंडळ स्थापन करण्याचे ठरवले. मग वकिलाला भेटून आवश्यक ती कागदपत्रे जमवून मंडळाची नोंदणी केली. २०१३-१४ मध्ये ही प्रक्रिया सुरु होती. २०१४ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाला नाव दिले ‘मराठी मित्र मंडळ’. हे जर्मनीतील पहिले मराठी मंडळ आहे. याचे अध्यक्ष झाले रवी जठार. पुढे पाच वर्षे आपल्या कारकिर्दीत मराठी सण, उत्सवांच्या निमित्ताने त्यांनी अनेक कार्यक्रम आयोजित केले. संक्रांत, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सव, दिवाळी अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना मराठी जणांना खूप आनंद होत असतो.
२०२० मध्ये अध्यक्ष झालेले प्रसाद भालेराव यांनाही हीच परंपरा सुरु ठेवायची होती. परंतु २०२० मध्ये आलेल्या कोरोना संकटामुळे हे शक्य झाले नाही. दिवाळी पहाट कार्यक्रम ऑनलाईन करावा लागला. रवी जठार यांनी सांगितले, “आमच्या पहिल्या मंडळाच्या स्थापनेनंतर स्फूर्ती घेऊन जर्मनीतील इतर प्रांतात मिळून ‘फ्रँकफर्ट मराठी कट्टा’, ‘म्युनिक मराठी मंडळ’, बर्लिन मराठी मंडळ’, हॅम्बुर्ग मराठी मंडळ’ ई. अकरा मराठी मंडळे स्थापन झाली आहेत. प्रत्येक मंडळात ५० ते १५० सभासद आहेत. सर्व मंडळे आपापल्या परीने मराठी भाषिकांना एकत्र आणून सर्व मराठी सण आणि मराठी भाषा दिन साजरा करतात. अशा तऱ्हेने मराठी संस्कृतीचे जर्मनीत जतन करत आहेत.”
२०१४च्या सुमारास फ्रँकफर्ट येथे ‘मराठी कट्टा’ स्थापन झाला आहे. आसपासच्या गावातील मंडळीही येथील कार्यक्रमात सामील होतात. मराठमोळ्या कार्यक्रमांचा आणि खाद्य संस्कृतीचा आस्वाद हे याचे वैशिष्ट्य आहे. कधी मराठीजनांचे रेशीमबंधही येथे जुळतात. परिसरातील सभागृहाचा वापर करून हे मंडळ मराठी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कट्ट्याचा वर्धापन दिनदेखील साजरा करतात. जुन्या आणि नवीन पिढीतील भाषेच्या फरकामुळे (मराठी आणि जर्मन) तेथे स्थायिक झालेली मराठी मंडळी अस्वस्थ होत होती. हा फरक नाहीसा करण्यासाठी मराठी शाळा स्थापन करण्याचा उपक्रमही हाती घेतला. तसेच वाचनालयही सुरु केले.
“फ्रँकफर्टचा प्रसिद्ध मराठी गणपती” फार उत्साहाने साजरा केला जातो. तसेच दिवाळी संमेलनही थाटात होते. मराठी भाषा आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी या मंडळाने आणखी एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे मराठी चित्रपट, चित्रपटगृहात दाखवणे. यातून मिळणारा नफा ते सत्कारणी लावतात. कधी महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांना आर्थिक मदत पाठवून तर कधी वेगवेगळ्या विषयांवर शिबिरे आयोजित करून. सामाजिक बांधिलकीचे हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.
महाराष्ट्र मंडल म्युनिक दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करते. प्रामुख्याने मराठी उत्सव जसे मकर संक्रांती, गुढीपाडवा, महाराष्ट्रदिन, गणेशोत्सव, दिवाळी, दसरा, कोजागिरी इ. उत्सव आणि त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम साजरे करतात. या निमित्ताने स्थानिक मराठी कलाकार आणि मुलांसाठी सातत्याने एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील गाजलेल्या कलाकारांना आमंत्रित करून त्यांच्या कलेचा आस्वाद स्थानिक मराठी जनांना दिला जातो. केवळ सांस्कृतिक कार्यक्रमच नव्हे, तर ह्या महा. मं. ने मराठी वाचनालय, आगामी व नूतन मराठी चित्रपटांचे प्रदर्शन, तसेच स्वतःचा दिवाळी अंक प्रकाशित करून आपली एक वेगळी छाप उमटवलेली आहे. एवढेच नव्हे तर या मंडळानी, आपल्या बाल मित्रांनाही आपल्या मातृभाषेची ओळख व्हावी म्हणून ‘मायमराठी –कल्चर बियोंड बॉर्डर्स ’ अश्या ब्रीदवाक्याने मराठी वर्ग घेण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे.
जर्मनीतील मराठी संमेलने
साधारणपणे १९९० पासूनच जर्मनीतील सर्व मराठी भाषिकांना एका छत्राखाली आणण्यासाठी ‘जर्मन मराठी संमेलने’ आयोजित करण्यात येऊ लागली. यामुळे सर्व मराठी माणसांचा एकमेकांशी संपर्क वाढून स्नेहभावना वाढण्यास मदत झाली. त्यावेळी अधिकृत स्थापन झालेले एकही मराठी मंडळ नव्हते. प्रत्येक संमेलनानंतर पुढच्या वर्षी कोण करणार हे विचारून गाव आणि नाव ठरत असे. ही परंपरा मराठी मित्रमंडळाने पुढे सुरू ठेवली आहे.
यूरोपात स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी १९९८ पासून ‘युरोपियन मराठी संमलने’ आयोजित करण्यास सुरवात केली. पहिले मोठे संमेलन १९९८ मध्ये डॉ. आनंद पांडव यांनी पुढाकार घेऊन घडविले. हे संमेलन नेदरलँडमध्ये झाले. युरोपातील अनेक देशातील मराठी मंडळी या संमेलनासाठी नेदरलँडला आली. त्यानंतर दार दोन वर्षांनी युरोपिअन मराठी संमेलन युरोपातील निरनिराळ्या देशात झाले. हे देश होते, स्वित्झर्लंड, जर्मनी, इंग्लंड, नॉर्वे अशा अनेक देशांतील मराठी मंडळांनी यजमानपद स्वीकारून ती यशस्वी केली. ही परंपरा सुरूच राहिली.
२०२० मध्ये जर्मनीतील मराठी मित्र मैत्रिणींनी युरोपियन संमेलन करायचे ठरवले आणि सर्व तयारी केली. भारतातील अनेक कलाकारांच्या तारखाही घेतल्या.पण कोविड १९ च्या थैमानामुळे हा संपूर्ण कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. हे संमेल्लन आता २०२२ मध्ये होणार आहे.
अमेरिकेतही बीएममचे अधिवेशन दर दोन वर्षांनी होत असते. पण ज्या वर्षी ते आयोजिले असते त्या वर्षी युरोपियन संमेलन न ठेवता त्याच्या पुढील वर्षी ते ठेवलेले असते. त्यामुळे अमेरिकेतील लोकांनाही या संमेलनाला उपस्थित राहता येते. युरोपियन मराठी संमेलनाची कार्यकारी समिती व बीएमएमची कार्यकारी समिती एकमेकांच्या संपर्कात आहेत. २०२२ मध्ये मात्र ही दोन्ही संमेलने वेगवेगळ्या तारखांना व्हावीत अशी योजना आहे.
अशा तऱ्हेने जर्मनीत मराठी भाषा व संस्कृती जपण्याचा सर्वतोपरीने प्रयत्न होत आहे. पुढच्या पिढीलाही आपली भाषा आणि संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून जर्मनीत मराठी शाळाही सुरू झाल्या आहेत.भारती विद्यापीठ त्यांचा अभ्यासक्रम ठरविण्यास मदत करीत आहे. जर्मनीतील मराठी माणूस, मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे.
मराठी मंडळांचे सांस्कृतिक आदानप्रदान प्रभावीपणे सुरु असताना नव्या पिढीला माय मराठीशी जोडून घेण्याची गरज भासू लागली. इंटरनॅशनल स्कुलमध्ये जाणारे विद्यार्थी इंग्रजी अथवा जर्मन भाषेत शिकत होते. साहजिकच त्यांची मराठीची नाळ तुटत चालली होती. भारतातील आपल्या नातलगांशी त्यांचा नीट संवाद होत नव्हता. यावर काहीतरी उपाय शोधणे आवश्यक होते. जर्मनीतील म्युनिक मराठी मंडळाचे पदाधिकारी, डॉ. प्रवीण पाटील सांगतात, “एका मित्राची पत्नी सिडनीतील मराठी शाळेत शिकवते” असं त्याने सांगितल्यावर जर्मनीतही आपण मराठी शाळा काढावी असा विचार मनात आला. पण ही गोष्ट एकट्याने करण्यासारखी नव्हती. म्हणून मंडळाच्या मीटिंगमध्ये मांडली. ही कल्पना सर्वांनाच पसंत पडली. पण किती पालक यासाठी तयार असतील याचा अंदाज येत नव्हता. त्यासाठी एक ऑनलाईन सर्व्हे घेण्याचे ठरले. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला .कारण सर्वांनाच आपल्या मुलांनी भारतातील नातलगांशी मराठीत संवाद करावा असं वाटत होतं. आता प्रश्न होता खर्चाचा.
एका उदार मराठी नागरिकाने ‘माय मराठी’ च्या स्थापनेसाठी वर्षभराचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली. शाळेसाठी जागासुद्धा मिळाली. आणि ‘माय मराठी’ ही शाळा स्थापन झाली.” या शाळेत पहिल्याच वर्षी ४५ मुले दाखल झाली होती. वयाप्रमाणे दोन गट करून त्यांना ‘पारिजात’ व ‘गुलमोहर’ अशी नांवे देण्यात आली. शाळेचा अभ्यासक्रम व पुस्तके यासाठी भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ पतंगराव कदम यांना डॉ. पाटील भेटले. भारती विद्यापीठाने पुस्तके देण्याची तयारी दाखवली. अशा तऱ्हेने हा उपक्रम मार्गी लागला. मुलांना संवादातून जास्त शिकता यावे यासाठी त्यांचे काही कार्यक्रम बसवून त्यांना संवाद म्हणण्याची सवय लावली. म्युनिक मराठी मंडळाच्या कार्यक्रमात हे विद्यार्थीसुद्धा व्यासपीठावर आपली कला सादर करतात.
‘माय मराठी’ च्या पाठोपाठ ‘फ्रँकफर्ट मराठी कट्टा’ या मंडळानेदेखील मराठी शाळा सुरु केली. या शाळेमध्ये मराठी सांस्कृतिक जीवनाशी संबंधित श्लोकांचे पठणही केले जाते. विद्यार्थी उत्तरं मराठी बोलू शकतात. पण लिहिणे त्यांना तेवढे सोपे नसते. प्राथमिक पातळीवरील शब्द लिहायला शिकतात. व पुढील इयत्तेमध्ये वाक्ये लिहायला शिकतात. त्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी कट्ट्याने वाचनालयदेखील सुरु केले आहे.
जर्मनीतील मराठी मंडळे व त्यांनी चालविलेल्या शाळा ही तेथील मराठी जनांचे मराठी भाषेवरील व संस्कृतीवरील प्रेम आणि निष्ठाच अधोरेखित करते. आपापल्या नोकरी / व्यवसायाचे अवधान सांभाळून ही मंडळी मराठीची रोपे लावणे व त्यांचे संवर्धन करण्याचे कार्य करीत असतात हे खरंच कौतुकास्पद आहे.
लेखन – मेघना साने.
संपादक – देवेंद्र भुजबळ. 9869484800
मातृभाषेचं महत्व हे परदेशातील आपल्या मराठी बांधवांना आपल्यापेक्षा जास्त मोलाचं वाटतं आहे कारण मातृभाषेतून अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होता येतं. मेघनाताई, तुम्ही हा लेख लिहून योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
खरोखर कौतुकास पात्र आहेत हे सर्व मराठी जन.. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती चे संवर्धन होण्यास नक्कीच मदत होईल.,🙌👍👌
खरेच अप्रतिम एमअसे काम आहे. बाहेरच्या देशांत गेल्यानंतर आपली संस्कृती व भाषेवर प्रेम नकळतच वाढतं.