Wednesday, March 12, 2025
Homeलेखजर्मन विश्व : १०

जर्मन विश्व : १०

“ग्युंटर ग्रास”

जर्मनीमधील सर्वात प्रसिद्ध लेखकांपैकी एक लेखक, कवी म्हणजे ग्युंटर ग्रास होत. ते शिल्पकार तसेच नाटककार देखील होते. १९९९ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक त्यांना प्रदान करण्यात आले होते.

ग्युंटर ग्रास ह्यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९२७ रोजी डान्झिग या स्वतंत्र शहरात झाला. हे शहर सध्या पोलंड देशात येते. त्यांचे बालपण बहुतांशी शांततेत गेले असले तरी त्यांच्या तारूण्यात जर्मनी मध्ये हिटलरचे नाझी सरकार प्रस्थापित झाले होते. परिणामी परिस्थिती बदलू लागली होती. १९३९ पासून १९४४ पर्यंत दुसरे महायुद्ध सुरू होते. तेव्हा ग्रास ह्यांनी नाझी सैनिक म्हणून तत्कालीन सरकारला सेवा दिली होती. १९४५ साली अमेरिकन सैन्याने त्यांना युद्धातील कैदी म्हणून अटक केली. १९४६ मध्ये त्यांची तिथून सुटका झाली. त्यानंतर त्यांनी बर्लिन आणि ड्युसेलडॉर्फ येथे खाणीत आणि शेतात काम केले.

ग्युंटर ग्रास ह्यांनी १९५० च्या दशकात लिखाण सुरू केले. त्यांनी लिहिलेल्या अनेक साहित्यकृती जग प्रसिद्ध आहेत. १९५६ ते ५९ पर्यंत ते पॅरिस मध्ये होते. तिथे त्यांनी शिल्पकार आणि चित्रकार म्हणून काम केले व प्रसिद्ध झाले. त्यांच्या अनेक पुस्तकांचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ त्यांनी स्वतःच रेखाटले आहे.

१९५५ मध्ये ग्युंटर ग्रास “ग्रुप ४७” (Gruppe 47) ह्या सामाजिक चळवळींच्या गटात सामील झाले. ज्याबद्दल त्यांनी यथावकाश “द मीटिंग ॲट टेलग्ट” (The Meeting at Telgte) ह्या त्यांच्या पुस्तकात सविस्तर लिहिले आहे. १९५६ साली त्यांचे पहिले काव्य तर १९५७ साली त्यांचे पहिले नाटक आले. १९५९ मध्ये मात्र त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून देणारी कादंबरी “द टिन ड्रम” (The Tin Drum जर्मन मध्ये Die Blechtrommel) प्रकाशित झाली. ह्याच साहित्यकृतीला मानाचे नोबेल पारितोषिक मिळाले. ह्याचे कथानक थोडक्यात जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

डान्झिग ट्रायलॉजी मधील ‘द टिन ड्रम’ हे पहिले पुस्तक. ज्यात लेखकाने दुसऱ्या महायुद्धाचे सामान्य जनतेवर झालेले विदारक परिणाम अतिशय प्रभावी भाषेत व प्रतिकात्मक शैलीत मांडले आहेत. ग्युंटर ग्रास ह्यांची आणखी दोन पुस्तके म्हणजे १९६१ मधील ‘कॅट ॲन्ड माउस’ (Katz und Maus) आणि १९६३ मधील ‘डॉग इयर्स’ (Hundejahre). लेखकाचे महायुद्धाचे स्वतःचे अनुभव ह्या पुस्तकांमध्ये थोड्याफार प्रमाणात पण भडक करून दाखवले आहेत. लेखनशैली विविधतेने नटलेली तसेच अंगावर येणारी आहे. त्या काळातील लेखन परिस्थितीनुरूप असल्याने सामान्य वाचकांना ते अंगावर येणारे, भयानक आणि मन अस्वस्थ करणारे वाटते. कोमल हृदयाच्या वाचकांना ते पचवता येत नाही.
ह्या तीन पुस्तकांच्या संचाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

ग्युंटर ग्रास यांचे बाकी लोकप्रिय साहित्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आधारलेले आहे. जसे की व्हिएतनाम युद्धाविरुद्ध लिहिलेले १९६९ मधील ‘ऑर्टलीश बेत्राऊब्ट’ (Local Anaesthetic), १९७७ मधील ‘देर बट’ (The Founder) ज्यात पाषाणयुगीय काळापासून सद्य परिस्थिती पर्यंत चा एका विशिष्ट प्रकाराने आढावा घेतला आहे.

ह्या शिवाय एक कादंबरी काल्पनिक लेखनावर आधारलेली ती म्हणजे ‘ग्रुप १६४७’. ह्यात लेखकाने तत्कालीन सामाजिक आणि व्यक्तीच्या मानसिक परिस्थितिचा विचार करून अत्यंत गरजेचे असे लेखन केले आहे. नुकतेच संपलेले महायुद्ध पण त्याही काळात अणू युद्धाची असलेली भीती मनात बाळगून जर्मन लोक मुलांना जन्म द्यायला कचरत होते; त्यावर देखील लेखकाने लेखन केले आहे. १९८६ मधील ‘द रेटिंन’ (The Rat) ह्या त्यांच्या पुस्तकात तर त्यांनी निसर्गाची झपाट्याने होणारी हानी, वातावरणातील बदल व त्याचा परिणाम म्हणून मानव जातीच्या विनाशाची भीती व्यक्त केली आहे. ह्या कादंबरीवरून प्रेरित एक जर्मन सिनेमा देखील बनवला गेला आहे.

१९९५ मध्ये ग्रास यांचे आईन वाईटेस फेल्ड (Too Far Afield) असे पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी च्या एकत्रीकरणावर भाष्य करणारे पुस्तक प्रकाशित झाले, जे वाचकांनी फार आवडीने वाचले नाही. एकेकाळी हिटलर च्या सैन्यात असलेले, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी चे सदस्य असलेले आणि डाव्या विचारसरणीचे प्रतिपादन करणारे ग्रास ह्यात म्हणतात, जर्मनीकडे राजकीय दृष्ट्या सक्षम करणारे सरकार नाही आहे. ह्यानंतर त्यांच्या १९९९ मध्ये प्रकाशित झालेले माईन यारहुंडर्ट् (My Century) हे पुस्तक म्हणजे १०० कथांचे संकलन आहे. लेखकाने ह्यात प्रत्येक वर्षासाठी एक कथा आणि प्रत्येक कथेचा वेगवेगळा कथाकार अशी वेगळ्या धाटणीची रचना केली आहे.

ग्रास ह्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर 1954 मध्ये त्यांनी आना मार्गारेटा श्वार्झ ह्या नर्तिकेशी विवाह केला. त्यांना ४ अपत्ये झाली. १९७२ पर्यंत ते एकत्र होते. नंतर त्यांनी १९७८ साली घटस्फोट घेतला. विवाहबाह्य संबंधातून त्यांना वेरोनिका पासून १९७४ साली एक व इंग्रिड कडून १९७९ साली एक अशा दोन मुली झाल्या. त्याच वर्षी त्यांनी उटे ग्रुनर्ट बरोबर दुसऱ्यांदा विवाह केला. त्यापुढील सर्व जीवनकाळ ते एकत्र होते.

ग्रास यांचे ल्युबेक मधील घर आणि कबर

जवळजवळ संपूर्ण आयुष्य ग्रास यांना पाईप ओढण्याची सवय होती त्यामुळे त्यांना फुफ्फुसांचा आजार झाला व त्यातच ते ८७ वर्षांचे असताना १३ एप्रिल २०१५ मध्ये जर्मनीमधील ल्युबेक नावाच्या शहरात मरण पावले. त्यांच्या खाजगी जागेतच त्यांची कबर आहे. त्यांचे घर आणि ती कबर पर्यटकांसाठी खुली आहे. एका महान साहित्यिकाने त्यांना जर्मनी आणि पोलंड मधील दुवा असे संबोधून त्यांचा गौरव केला आहे.
क्रमशः

— लेखन : प्रा आशी नाईक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित