“लुडविग वान बीथोवेन”
लुडविग वान बीथोवेन हे एक श्रेष्ठ जर्मन संगीतकार व पियानो वादक होते. जर्मनी मधील बॉन नावाच्या शहरात २७ जानेवारी १७७० साली ह्यांचा जन्म झाला. संगीत परंपरा असणाऱ्या घरात वडील योहान वान बीथोवेन आणि आई मारीया मागडेलेना ह्यांच्या पोटी ह्या दिव्य आत्म्याने जन्म घेतला. ह्या दाम्पत्याला झालेल्या सात पाल्यांपैकी तीनच वाचली आणि त्यातला थोरला मुलगा म्हणजे लुडविग वान बीथोवेन.
मुळातच संगीतावर प्रेम असणारे, अभ्यास असणारे त्यांचे वडील कोर्ट मध्ये समुहगायन करायचे आणि वाद्य ही वाजवायचे. त्यामुळे संगीताचे पहिले धडे लुडविग वान बीथोवेन ह्यांनी आपल्या वडिलांकडेच गिरविले. वयाच्या चवथ्या वर्षीच त्यांनी पियानो वाजवायला सुरुवात केली आणि त्यांचे कौशल्य पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले.
१७८० साली जेव्हा बॉन मधील राजसत्ता बदलली आणि सामाजिक, सांस्कृतिक बदल घडले तेव्हा नेफे ह्यांच्या मार्गर्शनाखाली लुडविग वान बीथोवेन ह्यांनी आपले शिक्षण चालू केले आणि त्यातूनच १७८३ ला त्यांची पहिली संगीत रचना लोकांसमोर सादर झाली. त्यांची प्रगती पाहून त्यांना व्हिएन्ना येथे मोझार्ट नावाच्या सुप्रसिद्ध सिद्ध संगीतकाराकडे पुढील शिक्षणासाठी पाठवले खरे पण दोनच आठवड्यात आईची तब्येत बिघडल्याने त्यांना परत यावे लागले. लहानशा दौऱ्यात देखील मोझार्ट ह्यांनी त्यांची संगीतातील चुणुक लक्षात घेऊन त्यांचे कौतुक केले व हा मुलगा मोठे नाव कमावेल अशी भविष्यवाणी केली. मातेचा मृत्यू, दारू पिऊन त्रास देणारे वडील आणि २ लहान भावांची जबाबदारी हे सर्व सांभाळत ते पुढील पाच वर्ष बॉन मध्येच राहिले व उदरनिर्वाह चालवत असतानाच उत्तमोत्तम संगीत रचना करत राहिले.
हेडन नावाच्या तत्कालीन कला क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तीने त्यांचे संगीत ऐकले व त्यांना व्हिएन्ना ला घेऊन गेले. त्यानंतर ते बॉनला परत कधीच आले नाहीत. तीच त्यांची कर्मभूमी ठरली.
पैसे, नाव आणि मान कमवल्यावर बीथोवेन यांच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. १८०० साल सुरु होण्याआधीच त्यांच्या लक्षात आले की त्यांना कमी ऐकू येते आहे. त्यांचे काम आणि कार्यक्रम तरीही काही काळ तसेच चालू होते पण लवकरच त्यांना सामाजिक कार्यक्रमांना जाणे कठीण होऊन बसले. त्यांनी एकटे राहूनच त्या पुढे देखील काही काळ संगीत रचना केल्या आणि त्या गाजल्या सुद्धा. दर वर्षी मे महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत ते व्हिएन्ना शहराच्या आसपास लहानशा खेड्यात राहत. निसर्गाच्या सान्निध्यात राहून लांब लांब फेरफटका मारत आणि तिथेच म्हणे त्यांना नवीन सुंदर रचना सुचत. निसर्ग त्यांच्या अंत:प्रेरणेचा स्त्रोत होता. त्यांची सहा क्रमांकाची सिंफनी म्हणजेच द पॅस्टोरल सिंफनी तर निसर्ग सौंदर्य, पक्षांचे आवाज, वादळ वारा ह्याचे सांगीतिकीकरण आहे, असेच म्हटले जाते. ह्या आणि अशा अनेक रचना नोंदवून ठेवण्याची त्यांची वही होती जी अजूनही व्हिएन्ना येथील संग्रहालयात जपून ठेवली आहे. रचना सुचली की ते गायचे नाहीत, वाजवायचे नाहीत तर सांगीतिक भाषेत लिहून ठेवायचे म्हणे. ते एकाच वेळी अनेक रचनांवर काम करत आणि एखादी रचना पूर्ण करण्याची त्यांना अजिबात घाई नसे. अत्यंत सुरेल अशा रचना त्यांना दिसत असे म्हटले जाते.
बीथोवेन त्यांच्या जीवनात अनेक वेळा प्रेमात पडले पण त्यांनी प्रेम त्या व्यक्तिसमोर कधी व्यक्त केले नाही. ते प्रेम त्यांच्या सांगितिक रचनांमध्ये दिसून येते. Für Elise (एलिस साठी) अशा नावाची त्यांची रचना अशाच प्रेमाचे प्रतीक आहे. ती तुम्ही इथे ऐकू शकता.
त्याचप्रमाणे १८०१ रोजी गुलीयेट्टा नावाच्या मुलीवर त्यांचे प्रेम होते आणि तिचेही होते असे त्यांनी मित्राला लिहिलेल्या पत्रातून कळते पण तिचे लग्न एका सरकारी अधिकाऱ्याबरोबर झाले आणि ह्यांचे प्रेम परत अधुरे राहिले. मूनलाईट सोनाटा
Moonlight Sonata ही रचना त्यांनी तिच्यावरच्या प्रेमाखातर बनवली आणि तिला अर्पण केली. ती तुम्ही इथे ऐकू शकता. भरभरून उत्कट प्रेम अचानक संपुष्टात येते तेव्हा अशीच रचना जन्मास येणार. जलद गतीने जाणारी आणि अचानक संपणारी लय असलेली ही धून तुम्ही सगळ्यांनी शांत चित्ताने नक्की ऐका.
दैव गुण असलेल्या ह्या व्यक्तीबरोबर राहणे कठीणच होते म्हणा. ते बोलायला अत्यंत उद्धट होते, मोठ्याने ओरडून बोलायचे आणि राहणीमान अगदीच अव्यवस्थित होते असे म्हणतात. त्यांचे कपडे नेहमीच मळके आणि खराब असायचे. रात्री हे झोपल्यानंतर त्यांचे मित्र ते काढलेले खराब कपडे चोरून घेऊन जात आणि त्याच जागी स्वच्छ धुतलेले कपडे आणून ठेवत पण हे कपडे बदली केल्याचे त्यांच्या लक्षात देखील येत नसे असे म्हणले जाते . कलाकार मंडळी जरा विक्षिप्त असतात, असे म्हणतात ते खरेच आहे असे वाटते, नाही का ?
बीथोवेन १८१४ मध्ये पूर्णपणे बहिरे झाले होते. आयुष्याची शेवटची वर्षे ते अत्यंत खचून गेले होते आणि आजारपणाने अंथरुणाला खिळून होते. ५७ वर्षांचे असताना २६ मार्च १८२७ रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि पाश्चात्य संगीत क्षेत्रातील एक पर्व संपले. व्हिएन्ना मध्ये त्यांचे अंत्यसंस्कारासाठी हजारोने लोक आले होते. त्यांचे संगीत हे केवळ मजेसाठी, करमणुकीसाठी नसून ते मानवतेच्या कल्याणासाठी आहे असे ते मानत. त्यांच्या संगीतामुळे तत्कालीन समाजाचा संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला. त्यांच्या संगीतरचना ऐकून अंध:कारात जखडलेल्या माणसाला आशेचा एक किरण मिळेल असा त्यांचा विश्वास होतो. त्यांच्या रचना खरंच मनाला शांती आणि आत्म्याला मुक्ती देणाऱ्या वाटतात.
एक संगीतकार देखील समाजावर इतका प्रभाव पाडू शकतो हे ह्यांच्याचमुळे जगाला कळले. त्यांच्या ह्या जीवनात त्यांनी सुमारे ६०० संगीत रचना केल्या आहेत आणि त्या आजही इतक्या वर्षांनी देखील तितक्याच आवडीने आणि यांच्या प्रती असलेल्या आदराने ऐकल्या जातात. एकूण ९ सिंफनी, ५ पियानो कोन्सर्तो, एक वोयलिन कोंसर्ट, ३२ पियानो सोनाटा, १६ स्ट्रिंग क्वॉर्ट्स अशा त्यांच्या कलाकृती जगभर प्रचंड गाजल्या.
एक चमत्कारिक गोष्ट अशी की लुडविग वान बीथोवेन ह्यांनी एकूण ९ सिंफनी रचल्या. ते गेल्यानंतर एकाही संगीतकाराला ९ पेक्षा जास्त सिंफनी रचता येणार नाहीत असा शाप मिळाला आहे असे म्हणतात. १९१० मध्ये गुस्ताव माहलर नावाच्या संगीतकाराने जवळ जवळ १० सिंफनी रचल्या पण दहावी सिंफनी पूर्ण होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.
क्रमशः
— लेखन : प्रा आशी नाईक.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
वाह…! मनापासून धन्यवाद…!🙏